संसदीय लोकशाहीत सर्वार्थाने ढ ठरणाऱ्या निरंजन ज्योती वा गिरिराज सिंह यांच्यासारख्या गणंगांना मोदी यांनी मंत्रिमंडळात शेजारी बसवून घेण्याची मुळातच गरज नव्हती. साध्वी म्हणवून घेणाऱ्या बाईंच्या वाक् -पापाचा सर्वात मोठा वाटा हा मोदी यांच्याच पदरात जात असून या प्रकरणी त्यांनी धरलेले मौन आता सोडण्याची गरज आहे.
संगतीवरून एखाद्याचे व्यक्तिमत्त्व कळू शकते हे वचन खरे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे, असे म्हणावे लागेल. हा मुद्दा त्यांच्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांबाबत विशेष लागू होतो. मोदी यांचे, साध्वी आणि साधू म्हणवून घेणारे काही सहकारी अगदीच गणंग आहेत. निरंजन ज्योती आणि गिरिराज सिंह हे असे दोन नमुने. वास्तविक हे दोघेही मंत्रिमंडळात सोडाच पण संसदेतदेखील असण्याच्या लायकीचे नाहीत. गंगाकिनारी भरणाऱ्या कुंभमेळ्यात अनेक गांजेकस साधू जमत असतात. त्यांचा आणि धर्माचा दूरान्वयानेदेखील संबंध नसतो आणि सर्व प्रकारच्या विधिनिषेधास रजा दिलेली ही मंडळी काहीही अर्वाच्य बोलू वा वागू शकतात. तेथे जे चालते त्यास आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. तो स्थानमाहात्म्याचा प्रश्न आहे. परंतु प्रश्न निर्माण होतो तो तेथे जावयाच्या लायकीची मंडळी संसदेत येऊन बसू लागली म्हणून. एरवी त्यांच्या वाहय़ात बोलण्याची दखल घ्यावयाचे काहीच कारण नाही. या साध्वी म्हणवून घेणाऱ्या निरंजन ज्योतीबाईंनी परवा कहरच केला. दिल्ली येथे निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना त्यांनी मतदारांची दोन गटांत विभागणी केली. रामजादे आणि हरामजादे. बाईंच्या मते भाजपला पाठिंबा देणारे ते रामजादे आणि न देणारे हरामजादे. या भाषणात त्यांनी मतदारांना आव्हान केले, तुम्हास रामजादे व्हावयाचे की हरामजादे व्हायचे ते ठरवा, असे. याखेरीजही अकलेचे अनेक तारे या साध्वी म्हणवून घेणाऱ्या निरंजन ज्योतींनी उजळले. त्यांच्या आगलाव्या विधानांनंतर गदारोळ उडाला नसता तरच नवल. तसेच झाले. विरोधकांनी गेले दोन दिवस या मुद्दय़ावर संसद दणाणून सोडली असून कामकाज पूर्णपणे बंद झाले आहे. या बाई जे काही बरळल्या ते अगदीच बेजबाबदारपणाचे होते यात शंका नाही. परंतु संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे काही कोणी बडबडत असल्यास त्यातून केवळ व्यवस्थेविषयीचा अनादरच दिसतो असे नाही, तर त्या व्यक्तीचा उच्च प्रतीचा निर्बुद्धपणादेखील अधोरेखित होतो. खरे तर आपण असेच आहोत हे या बाईंनी याआधीही अनेकदा सिद्ध केल्याचे आता समोर येत आहे. या इतके दिवस उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार होत्या. या वेळी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढल्या आणि संसदेत आल्या. आपण खासदार झालो म्हणजे जणू काही साऱ्या जगावरच राज्य करण्याचा अधिकार आपणास आला, असे त्यांचे वर्तन राहिलेले आहे. सरकारी कार्यालयात वेळी-अवेळी जा, तेथे हजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर डाफर, एखादा नसेल तर तो का नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यांना फैलावर घे आदी अनेक बालिश उद्योग त्यांच्या नावावर आहेत. कोठेही गेल्या तरी आपल्या आगमनाची आगाऊ सूचना दिली जावी, असा त्यांचा आग्रह असतो. तशी ती दिली गेली नाही आणि आगतस्वागतास कोणी आले नाही तर या साध्वी म्हणवून घेणाऱ्या बाईंचा पारा चढतो आणि मग त्या समोर असेल त्यास अद्वातद्वा बोलतात. पंतप्रधानांपासून भाजपच्या अध्यक्षांपर्यंत त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी गेलेल्या आहेत. याचा अर्थ मोदी आणि शहा या दोघांनाही या साध्वी म्हणवून घेणाऱ्या बाईंचा लौकिक माहीत असणार. तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असेल तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे जनकत्व या दोघांना घ्यावे लागणार. याचे कारण केवळ मंत्रिमंडळात समावेश झाला म्हणून या साध्वी म्हणवून घेणाऱ्या बाईंच्या जीवनशैलीत फरक होईल असे मानण्याचे कारण नाही. तेव्हा या साध्वी म्हणवून घेणाऱ्या बाईंच्या वाक् -पापाचा सर्वात मोठा वाटा हा मोदी यांच्याच पदरात जातो, यात शंका नाही.
तीच बाब गिरिराज सिंह या भगव्या कफनीतील साधू म्हणवून घेणाऱ्याची. निवडणुकीआधीदेखील या गिरिराजाने बरेच अकलेचे तारे तोडले होते. मोदी यांना विरोध असलेल्यांची रवानगी पाकिस्तानात व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. ते जर वास्तवात मान्य झाले असते तर भाजपच्याच अनेक नेत्यांना देशत्याग करावा लागला असता. तसे काही झाले नाही. तेव्हा त्यावरून तरी आपल्या शब्दाला काही किंमत नाही, हे या साधू म्हणवून घेणाऱ्या सद्गृहस्थास कळावयास हवे होते. तेव्हा संसदीय लोकशाहीत सर्वार्थाने ढ ठरणाऱ्या अशा गणंगांना मंत्रिमंडळात शेजारी बसवून घेण्याची मुळातच गरज नव्हती. अरुण जेटली, सुरेश प्रभू वा मनोहर पर्रिकर वा तत्सम विद्वानांच्या मांडीला मांडी लावून हे गिरिराज सिंह वा साध्वी उमा भारती वा या नव्या साध्वी निरंजन ज्योती बसत असतील ते धन्यच म्हणावयास हवे.
तेव्हा या असल्या बेतालांच्या बडबडीमुळे विरोधकांच्या हाती कोलीत मिळाले असल्यास नवल नाही. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्याने या निरंजनबाईंनी माफी मागितली. पंतप्रधान मोदी यांनी म्हणे त्यांना तसा आदेश दिला. यातील पंतप्रधानांच्या नाराजीची पुडी भाजपच्या कळपातून सोडून देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कारभाराचीच आठवण यावी. एखादा विषय वादग्रस्त ठरला की त्या वादाचा चिखल आपल्या नेत्यावर पडू नये यासाठी काँग्रेसजन असेच प्रयत्न करीत आणि गांधी घराण्याच्या वतीने सारवासारव करीत. आता भाजपवाले हा उद्योग मोदी यांच्याबाबत करताना दिसतात. गांधी हे कुटुंब होते, तर मोदी हे एकटे आहेत, इतकाच काय तो गुणात्मक फरक. काँग्रेस राजवटीच्या काळात गांधी घराणे जसे सोयीस्कर मौन पाळत असे, तसेच मौन आता मोदी पाळतात. वास्तविक आपल्या मंत्र्याकडून इतके वादग्रस्त विधान होत असेल तर मोदी यांनी स्वत: जातीने माफी मागावयास हवी होती आणि सदर मंत्र्याचे कान उपटावयास हवे होते. तसे झाले असते तर मोदी यांच्या हेतूबाबत तरी शंका घेता आली नसती. परंतु असे करणे मोदी यांनी टाळले. इतकेच काय संसदेत वा बाहेरही याबाबत गोंधळ होत असताना एक साधे निवेदनही प्रसृत करण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. इतके किमान त्यांना करता आले असते.
आता हा मुद्दा चांगलाच चिघळला असून विरोधकांकडून तो प्रतिष्ठेचा केला गेल्यास आश्चर्य वाटावयास नको. मोदी आपल्या प्रतिमेस खूप जपतात. तसे असेल तर हे असले साध्वी वा साधू यांच्यामुळे आपली प्रतिमा अधिक उजळ होईल असे त्यांना वाटते काय? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल तर तसे त्यांनी जाहीर सांगावे. अन्यथा त्यांच्या मौनाचा अर्थ वेगळा निघेल. व्यवहारात मौनम् सर्वार्थ साधनम् हे जरी खरे असले तरी ते कायमच खरे असते असे नाही. मौन अस्थानी असेल तर काय होते याचे उदाहरण मनमोहन सिंग यांच्या रूपाने आपल्या समोर आहेच.
तेव्हा आपले हे धोरणात्मक मौन मोदी यांनी सोडावे अन्यथा साध्वी म्हणवून घेणाऱ्या निरंजनबाईंच्या निर्लज्ज वक्तव्यांची काजळी मोदी यांच्या प्रतिमेभोवती जमेल.