कविता ही सुधीर मोघे यांच्या जगण्याचा भाग होती. श्वास जितका सहजपणे घेतला जातो तितक्या सहजपणे ते कवितेला घेत. तीच त्यांची सखी होती. त्यांची चित्रपटगीते आधी उत्तम कविता आहेत. चाली लागल्यामुळे त्याची गाणी झाली. या बाबतीत त्यांची नाळ थेट अण्णा माडगूळकर, शांताबाई शेळके यांच्याशी जुळते.
कवी तो दिसतो कसा आननी..या प्रश्नाचे उत्तर सुधीर मोघे हे निसर्गसहज उत्तर होते. मोराने जितक्या सहजपणे आपले पिसारावैभव मिरवावे तसे आपले कवीपण मोघे मिरवीत. आपण कवी आहोत, याचा त्यांना कोण अभिमान. झब्बा, त्याच्या बाह्यांच्या दोन घडय़ा, चुरगाळलेली वाटावी अशी पँट, खांद्यावर झोळणे आणि केसांची अवस्था त्यांचे कधी काळी विंचरणे झाले होते, हे दाखवणारी आणि काही ना काही गुणगुणणे. भेटले की नवीन काय वाचले हा प्रश्न. उत्तरात कोण्या कवीचा नवा संग्रह आल्याचे असेल तर क्या बात है.अशी दाद. मुळात मराठी कवी दुसऱ्या कवीला दाद देतोय, हा अनुभव कमी. त्यात त्याचे काव्य वाचायच्या वा ऐकायच्या आत त्याला क्या बात है..अशी दाद देणे हे काव्य या प्रकारावर निस्सीम प्रेम असल्याखेरीज शक्य नाही. सुधीर मोघे यांचे कवितेवर असे अव्यभिचारी प्रेम होते. शब्दांचा त्यांना सोस होता. आकाशात घारीने मुक्तपणाने विहरावे आणि तरीही तिच्या विहरण्यात एक लय असावी  तशी सुधीर मोघे यांची कविता होती. भाषा, तिचे विभ्रम यांच्या पंखावरून त्यांची कविता सहज अवतरत असे.
शब्दांच्या आकाशात
शब्दांचे मेघ फिरावे
शब्दांच्या क्षितिजावरती
शब्दांनी बिंब धरावे..
अशा शब्दांत त्यांचे काव्य येत असे. कारण कविता त्यांच्या जगण्याचा भाग होती. श्वास जितका सहजपणे घेतला जातो तितक्या सहजपणे ते कवितेला घेत. काव्याइतके प्रेम त्यांनी बहुधा अन्य कशावर केले नसावे. तीच त्यांची सखी होती.
लय एक हुंगली, खोल खोल श्वासांत
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात
लहडला वेल..तो पहा निघाला गगनी
देठांना फुटल्या..कविता पानोपानी..
अशी त्यांची कविता. तसे पहावयास गेल्यास सुधीर मोघे फारसे गद्यात येत नसत. आले तरी पद्याची लय घेऊनच ते गद्यात मुशाफिरी करीत. जुन्या मराठी, पंडिती कवींच्या उत्तम रचनांचे मनापासून परिशीलन केलेले असल्यामुळे सुधीर मोघे यांचे शब्द ताल, सूर आणि लय सोबतीला घेऊन येत. वृत्त, छंदासाठी त्यांना फार कष्ट करावे लागत नसत. छंद वा वृत्ताचे चालचलन माहीत नाही म्हणून मुक्तछंद असे त्यांचे कधी झाले नाही. पण म्हणून वृत्त, छंद आदी यमनियमांचा त्यांना वृथा अभिमान होता असे नाही. त्यांच्या लेखी काव्य हे चांगले वा वाईट इतकेच असे. त्याचमुळे त्यांची चित्रपटगीते आधी उत्तम कविता आहेत. चाली लागल्यामुळे त्याची गाणी झाली. पण या चालींशिवायही ते काव्य उत्तम चालू शकते.
रात्रीच खेळ चाले,  
हा गूढ सावल्यांचा
संपेल ना कधीही
हा खेळ सावल्यांचा..
असे सहज ते लिहून जात. या बाबतीत त्यांची नाळ थेट अण्णा माडगूळकर, शांताबाई शेळके यांच्याशी जुळते. चित्रपटगीते ही बऱ्याचदा प्रसंगबरहुकूम पाडावी लागतात. त्यामुळे त्यात काव्य दुय्यम ठरते अशी टीका वारंवार होते. काही प्रमाणात त्यात तथ्य आहे. या आणि अशा टीकेस अपवाद ठरावेत असे तीन चार कवी सांगता येतील. अण्णा माडगूळकर, शांताबाई आणि अलीकडच्या काळात सुधीर मोघे. बेतलेले आहे म्हणून त्यांचे काव्य हिणकस झाले नाही. साच्यातील आहेत म्हणून त्यात शब्द कसेही कोंबायचे हे जसे अण्णा, शांताबाईंनी केले नाही, तसेच सुधीर मोघे यांनीही केले नाही. या दोघांप्रमाणे सुधीर मोघे यांचे शब्द अर्थवाही असत आणि चित्रपटात वेळ मारून नेण्याचे काम जरी ते करीत तरी ते झाल्यावर काव्यप्रेमींच्या मनी रुंजी घालीत.
हा चंद्र ना स्वयंभू
रवीतेज वाहतो हा
ग्रहणात तारकांचा
अभिशाप भोगतो हा..
हे असे काव्य कामचलाऊ चित्रपटगीतासाठी गरजेचे नसते. पण सुधीर मोघे यांच्याबाबत असे म्हणता येणार नाही. त्यांच्या कवितांची जी गाणी झाली त्याच्यावर सहज नजर टाकली तरी त्यातील लुभावणाऱ्या काव्याची ओळख व्हावी. झुलतो बाई रास झुला, नभ निळे रात निळी कान्हाही निळा हे गीत असो वा काजळ रातीनं ओढून नेला..हे मनातल्या मनात टोचत राहणारे गीत, सुधीर मोघे मनापासून लिहीत. त्या लिहिण्यात जोरजबरदस्ती नसे. कारण त्यांचा कवी सहज होता. जरा विसावू या वळणावर, त्या प्रेमाची शपथ तुला, माझे मन तुझे झाले, विसरू नको o्रीरामा मला, सजणा पुन्हा स्मरशील ना..अशी सहज गुणगुणली जाणारी अनेक गाणी सुधीर मोघ्यांची आहेत, हे अनेकांना माहीतही नसावे. तेच त्यांचे यश. गोमू संगतीनं माझ्या तू येशील का..या हेमंतकुमार यांच्या सानुनासिक आवाजातला प्रश्न सुधीर मोघे यांच्याच कवितेतला आणि दिसं जातील, दिसं येतील..भोग सरल सुख येईल..हे आश्वासक शब्दही त्यांचेच. मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज..की घुंगरू तुटले रे..या ओळी हिंदीच्या आधारे रचलेल्या. पण सुधीर मोघे यांनी त्या रचतानाही त्यांना सांस्कृतिकदृष्टय़ा मराठीत आणले. असे झाले की तो नुसता अनुवाद राहात नाही. रूपांतर होते. या कवितेवर त्यांचा इतका जीव की फक्त तिच्या गायनाचा उत्सव करीत. ‘कविता पानोपानी’ नावाचा कार्यक्रम सुधीर मोघे करीत. रंगमचावर एकटे. खोक्यांच्या साह्याने बनवलेल्या रंगमंचाच्या पातळय़ांवर एकटे हिंडत सुधीर मोघे आपल्याच नादात कविता सादर करीत. त्यात तालवाद्यं नाहीत, सूर नाहीत. फक्त शब्द. ऐंशीच्या दशकात सुधीर मोघे यांनी हा प्रयोग करण्याचे धाडस दाखवले. त्यावेळी दोघे तिघे कवी मिळून काव्यगायन करीत. हा कार्यक्रम तसा नव्हता. सुधीर मोघे एकटेच. आणि कविताही स्वत:च्या. स्वत:च्या काव्यावर त्यांचा इतका विश्वास की हे अनोखे काव्यगायन ऐकण्यास आणि पाहण्यास रसिक o्रोते येतील याची त्यांना पूर्ण खात्री होती. आणि ते यायचेही. ‘कविता पानोपानी ’ किंवा ‘लय’ हा कवितासंग्रह. हे मोघे यांच्या प्रयोगशीलतेचे नमुने आहेत. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या काव्यात एक लय आहे, तिचा म्हणून एक आकार आहे, घाट आहे..त्या घाटाने सुधीर मोघे यांनी ‘लय’ आणि ‘कविता पानोपानी’ लिहिली. तिला अर्थातच उदंड प्रतिसाद लाभला. त्यांच्या काव्याने मराठी चित्रपटसंगीताच्या बाबत फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..अशीच अवस्था आली. दरीखोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश..असे जेव्हा त्यांची कविता सांगते तेव्हा ती आपल्याला त्यांच्यासमवेत घेऊन जाते आणि रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या..याचा प्रत्यय येतो. सूर्याचा जन्म सावल्यांनाही जन्म देतो..याची जाणीव सुधीर मोघे यांची कविता चित्रपटाच्या गाण्यांतून आपल्याला सहज करून देते.
सुधीर मोघे यांच्या दोन कवितांना उदंड प्रतिसाद लाभला. जनसामान्य ते काव्यरसिक दोघांनी या काव्यास मनापासून दाद दिली. यातील एक म्हणजे दयाघना..हे गीत. रसुल अल्ला या मूळ बंदिशीला सुधीर मोघे यांनी मराठीत आणले ते तिचे मूळचे वजन कायम ठेवून. हे गाणे अमाप लोकप्रिय झाले. आणि दुसरे म्हणजे सखी मंद झाल्या तारका..आता तरी येशील का..बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या आवाजातील हे गीत अत्यंत जनप्रिय झाले, परंतु अनेकांना माहीतही नसेल ते मूळ भीमसेनजींच्या घनगंभीर आवाजातून आले आहे. खरे तर दोन्ही मोघे बंधूंना काव्याची उत्तम जाण. थोरल्या मोघेंचे- o्रीकांत यांचे काव्य अभिनयातून व्यक्त झाले, सुधीर यांनी काव्याला आपले मानले.
असा हा कवितेवर मनापासून प्रेम करणारा कवी. शनिवारी अचानक अनंताच्या प्रवासाला निघाला. या प्रवासातही कवितेची सोबत त्यांना असेलच. कारण..
 एका समंजस सावध क्षणी माझ्या मनानं मला   बजावलं.
निर्वाणीनं बजावलं.तुझीच तुला चालावी लागेल
पायाखालची..एकाकी वाट !
मौज एकच..हे त्यानं मला सांगितलं तेव्हा
वाट जवळ जवळ संपली होती..!
..वाट संपली असली तरी त्यांची कविता मात्र फिरुनी नवी जन्मेन असेच म्हणेल. त्या कवितेस ‘लोकसत्ता’ची श्रद्धांजली.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!