चतुर आणि चलाख वाचकांना हे बरोबरच स्मरेल, की कोणत्याही ऋतुबदलाच्या प्रारंभी वृत्तपत्रांत हमखास एक मोसमी वृत्तलेख येतो- ‘आला उन्हाळा/ हिवाळा/ पावसाळा, तब्येत सांभाळा!’ त्याच चालीवर या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने आपले नेते आणि उमेदवार यांना, ‘कमी खा आणि आपापले पोट सांभाळा’ असा आरोग्यसल्ला दिला आहे. अलीकडे भाजपच्या पंक्तीमध्ये ‘या पोटावर, या खाण्यावर शतदा प्रेम करावे’, असे आळवणारी पोटभरू मंडळी अंमळ वाढली असून, त्यांचा एकंदरच पोटावर जास्त जीव असा श्लेष यातून कोणी काढेल. कोणी भाजपचे माजी अध्यक्ष रा. रा. नितीनभौ गडकरी यांच्या वैदर्भीय जिव्हालौल्याचे उदाहरण या निमित्ताने पुढे करील. परंतु त्यात तसा काही अर्थ नाही. भाजपमध्ये ‘उदरभरण नोह जाणिजे पक्षकर्म’ असे मानणारे कार्यकर्तेगणही उदंड आहेत. तेव्हा केवळ त्यांचीच ढेरी काढता कामा नये. शिवाय भाजपाईंचे ते दोंद आणि काँग्रेसींचे ते लंबोदर असा पक्षपात तर मुळीच करता कामा नये. कारण पोट हे सर्वानाच असते. तेव्हा भाजपहून अन्य पक्षांचे नेते याबाबत फार आदर्श आहेत, असे मानण्याचे मुळीच कणमात्र कारण नाही. राजकारणी म्हटले की ते सर्व जण एकाच पंक्तीचे आणि पोटजातीचे, हे तर सर्वमान्य सत्यच आहे. त्यांची पोटावर माया असणारच. ती निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून येणार. आता निवडणूक -त्यात पोटनिवडणूकही आलीच- हा उपक्रम म्हणजे महायुद्धच. आणि सैन्य हे पोटावर चालते, हा तर युद्धशास्त्रातील मान्यताप्राप्त सिद्धांत आहे. युद्ध हे पोटाच्या कायद्यानुसार लढले जाते, ही बाब कोणाहीपेक्षा जास्त काँग्रेसी नेत्यांना चांगलीच उमगलेली आहे. उगाच नाही त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर खास अन्नसुरक्षा कायदा आणला! हे सर्व पाहता निवडणुकीच्या प्रचारकाळात आपल्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी आपापली अन्नसुरक्षा राखावी, कमी खावे आणि तब्येतीस सांभाळावे, अशी खास सूचना भाजपने दिली, हे या पक्षाच्या एकंदरच उपक्रमशीलतेस साजेसेच झाले. त्याचे भारतीय लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या सर्वानीच भरपेट स्वागत केले पाहिजे.
तशी निवडणूक ही वाटते तेवढी सोपी चीज नसते. आधीच भारतीय सत्ताकारण म्हणजे पुन:पुन्हा नव्याने रचले जाणारे महाभारत. तेवढेच व्यापक, तेवढेच व्यामिश्र. माणसाच्या जिजिविषेची हरघडी कसोटी पाहणारे. सत्तेच्या या खेळात आमादमी म्हटल्या जाणाऱ्या आपली यत्ता तशी खालचीच. आपली राजकारणातील पीएचडीसुद्धा वृत्तपत्रे आणि च्यानेले यांतून येणाऱ्या वृत्ततुकडय़ांवर आधारलेली. आपली समज अशी, की राजकारण हा केवळच लालसेचा खेळ असतो. तो असतोच. त्यात काही गैर नाही. तो जोवर कायद्याच्या कक्षेत आणि नैतिकतेच्या नियमांत खेळला जातो, तोवर त्यावर टीका करण्याचे काहीच कारण नाही. अखेर एक गोष्ट तर मान्यच करायला हवी, की सत्ता, पैसा, सन्मान, कीर्ती हे माणसास कार्यप्रवण करणारे बल आहे. या इंजिनांकडे आपण मात्र नेहमीच नकारात्मकतेने पाहतो. हा आपला नेहमीचा मध्यममार्गी विचारदोष. आपणांस वाटते, की सर्वानी -म्हणजे आपण सोडून सर्वानी- अगदी निरपेक्षपणे काम करावे. देव, देश आणि धर्मासाठी हाती प्राण घ्यावे. तेही त्या बदल्यात काहीही न मागता. आणि जे असे सांगत फिरतात, त्यांच्या मागे आपण आरत्या घेऊन धावतो. पण निरपेक्षता हा गुण फक्त बुद्धिहीन पशूंचाच असू शकतो. कोणी अगदी बाबा-महाराज झाला, तरी त्याला कशाची ना कशाची अपेक्षा असतेच. नसते असे म्हणणाऱ्यांना धूर्त समजावे. अशा अनेक भंडांच्या टोळ्या समाजकारणात धुमाकूळ घालत असल्याचे आपण रोजच पाहतो. राजकारण्यांचे एक बरे असते, की त्यांचा शुचितेचा दावा नसतो. आपण साधुसंत असल्याचा आव नसतो. मी तुमच्यासाठी हे हे केले वा करणार आहे. ते हवे असेल, तर मतदार बंधुभगिनींनो, मला आपले मूल्यवान मत देऊन विजयी करा, असा सच्चा सौदा ते करीत असतात. मुळात सत्ता हा सौद्याचाच खेळ. राजकीय नेते तो हार्दिक आनंदाने खेळत असतात.
हे राजकीय क्रीडापटू, त्यांचे डाव-प्रतिडाव, त्यांच्या केविलवाण्या कोलांटउडय़ा, त्यांचे कलगीतुरे, त्यांचे पडणे-सावरणे, फिरून शड्डू ठोकणे या तशा मनोरंजकच गोष्टी. वरचेवर ते आपणांस वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सभा-संमेलने या माध्यमांतून आपणास रिझवीत असतात. पण त्यांना खरे पाहावे ते निवडणुकीच्या मैदानात. ज्याला पोपटाचा डोळाच तेवढा दिसत असतो असा अर्जुन आणि निवडणूक लढवीत असलेले नेते यांत त्या काळात फरक असा नसतोच. लढूनजिंकायचे एवढे एकच लक्ष्य समोर. बाकी सर्व दुय्यम अशा पद्धतीने त्यांचे तळपणे सुरू असते. आपणांस नवल याचे वाटावे, की ही एवढी किती तरी किलोव्ॉटची ऊर्जा यांच्याकडे येते कोठून? एकेक नेता म्हणजे विजेचा एकेक कारखानाच जणू. काही वर्षांपूर्वी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे एका प्रचारसभेस जाताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. हेलिकॉप्टर एका शिवारात कोसळलेच. हे सगळे झाल्यानंतर मुंडे यांनी काय करावे? सायकलवरून पडावे इतक्या सहजतेने ते उठले. कपडे झटकले आणि सरळ प्रचारसभेच्या गावचा रस्ता त्यांनी पकडला. हे प्रातिनिधिक उदाहरण मानता येईल. ते या अर्थाने, की निवडणूक प्रचार म्हटला, की ही मंडळी आपली दु:खे, वेदना, अडचणी असे सर्व काही विसरतात. त्यांना श्वास घेण्याचीही उसंत नसते, जेवण्याची शुद्ध नसते की झोपण्यास वेळ नसतो. पायाला भिंगरी आणि मेंदूला गिरमिट लावूनच ते वावरत असतात. हे करताना नेते थकले, तर सगळेच मुसळ केरात जाणार हे उघड आहे. पण या लाखांच्या पोशिंद्यांच्या पोषणाची काळजी कोण घेणार? काही हुशार नेतेमंडळी गाडीत डबा घेऊनच प्रचाराला निघतात. गाडीतच चार कार्यकर्त्यांबरोबर जेवतात. पण हे स्थानिक पातळीवर शक्य. राष्ट्रीय नेत्यांना ही कौतुके कशी जमणार? सकाळी मुंबईत, दुपारी औरंगाबादला आणि रात्री नागपुरात अशी त्रिस्थळी यात्रा, जेथे जाईल तेथे म्हणजे अगदी स्वच्छतागृहाच्या दारापर्यंत मागेपुढे अनुयायांचा मेळा, अशा वेळी त्यांना दोन घास खाण्याइतका निवांतपणा तरी कुठून मिळणार? पण नेत्यांनी हे टाळलेच पाहिजे. जेवणाच्या वेळा पाळल्याच पाहिजेत. सात्त्विक आहार घेतलाच पाहिजे. भाजपच्या सूचनापत्राचा आशय हाच आहे. भाजपने जैजैकार करीत घसा फोडणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी काही वेगळे सूचनापत्रक काढले असल्यास माहीत नाही. तसेही हल्ली भेळभत्त्यावर प्रचार करण्याचे दिवस सरले आहेत. परंतु याचा अर्थ कार्यकर्ते मंडळीही आपल्या पोटाची नीट काळजी घेतात असे नाही. ती त्यांनी घ्यावी. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली होती. त्यात दोंद ही मुख्य समस्या असल्याचे पुढे आले होते. तेव्हा हा मुद्दा आहेच. राजकीय पक्ष अनेकदा निवडणूक काळात एकमेकांच्या घोषणांची, आश्वासनांची उचलेगिरी करीत असतात. त्यांनी भाजपच्या या ‘आधी ते पोट राखावे’ या आरोग्यसल्ल्याची उचलेगिरी केल्यास ते गैर ठरणार नाही. सतत खोकणाऱ्या, ढेरपोटय़ा, सदा बद्धकोष्ठ झाल्यासारखे चेहऱ्यावर भाव असणाऱ्या नेत्यांपेक्षा आरोग्यपूर्ण टवटवीतपणा असलेले नेते कधीही चांगले. निदान ते कमी खातात याचे समाधान लोकांस असेल.