प्रोपगंडा केवळ छद्म नसतो, तो त्याहून अधिक असतो. महत्त्वाची माहिती दाबून ठेवणे, अनुमानित गोष्टींचा वापर करणे ही त्याची तंत्रे असतात. ब्रिटिशांची या तंत्रावर जणू हुकमत होती..अमेरिकेला युद्धात ढकलण्यासाठी एक धक्का देणे आवश्यक आहे, हे लक्षात आले तेव्हा सांकेतिक भाषेतील तार बाहेर काढण्यात आली..

अ‍ॅडॉल्फ हिटलरसारखा प्रोपगंडा-पंडित जेव्हा ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांचे कौतुक करतो, प्रचारात केवळ आपल्या बाजूला सोयीचा असतो तेवढाच सत्याचा भाग घ्यायचा असतो, असे जेव्हा ‘माइन काम्फ’मध्ये लिहून ठेवतो, तेव्हा त्याच्या नजरेसमोर जी काही ब्रिटिश प्रचाराची उदाहरणे असतील, त्यात झिमरमन तार नावाचे प्रकरण नक्कीच असेल. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेमध्ये या प्रकरणाने मोठी सनसनाटी निर्माण केली हे खरे. परंतु वरवर पाहता त्यात फार काही विशेष चमकदार होते असे नव्हे. जर्मनीचे परराष्ट्र सचिव आर्थर झिमरमन यांनी जर्मनीचे मेक्सिकोतील राजदूत हाईनरिच व्हॉन एकार्ड यांना पाठविलेली ती तार. अमेरिका या युद्धात उतरलीच तर मेक्सिकोने जर्मनीच्या बाजूने यावे असे प्रयत्न करावेत अशी सूचना देणारी. राजनैतिक दृष्टीने ती महत्त्वाची होती यात शंकाच नाही. दुसरी बाब म्हणजे ती खरीही होती. खुद्द झिमरमन यांनीच नंतर तसे स्पष्ट केले होते. तेव्हा जर त्या तारेबाबतची माहिती खरी असेल, तर त्यात प्रोपगंडाचा प्रश्न येतोच कुठे असे कोणासही वाटेल. ती तर एक साधी महत्त्वाची बातमी होती. नेहमी वृत्तपत्रांत येते तशी. वाचकांचे प्रबोधन करणारी. येथे हा मुद्दा नीट समजून घेतला पाहिजे.

Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

प्रोपगंडा (प्रचार) आणि प्रबोधन यांत फरक आहे. अनेकदा यांत गल्लत केली जाते. प्रोपगंडा हा शब्द ज्या लॅटिन शब्दावरून आला त्याचा मूळ अर्थ पेरणे या संकल्पनेच्या जवळ जाणारा आहे. माहिती पेरायची. प्रबोधनातही ही माहिती दिली जाते. पण त्यात ती माहिती खरी आहे हे अध्याहृत असते. ती देण्यामागील हेतू शुद्ध आहे हे अधोरेखित असते. प्रोपगंडात तसे नसते. लिओनार्ड डब्ल्यू डूब यांनी या शब्दाची नेमकी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ते अमेरिकेतील येल विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक. प्रोपगंडा या विषयावरील त्यांची बरीच पुस्तके, लेख प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी अमेरिकेच्या युद्धमाहिती कार्यालयातील परराष्ट्र गुप्तचर संस्थेचे संचालक म्हणूनही काम केले होते. तेव्हा ते केवळ लिहिते प्राध्यापक नव्हते. प्रोपगंडाचा त्यांना जवळचा अनुभव होता. तर ते सांगतात, की व्यक्तींची वर्तणूक नियंत्रित करण्याचा आणि त्यांचे व्यक्तित्व प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे हे प्रोपगंडाचे काम. आता हे करताना तेथे सत्य, तथ्य, वस्तुस्थिती यांना फारसे स्थान असणार नाही हे उघडच आहे. अँथोनी प्रॅटकॅनिस आणि इलिऑट अ‍ॅरनसन या मानसशास्त्रज्ञांचे ‘एज ऑफ प्रोपगंडा’ हे अलीकडचे एक गाजलेले पुस्तक. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रोपगंडा म्हणजे प्रबोधनाशी केलेला र्दुव्‍यवहार. प्रोपगंडा केवळ छद्म नसतो, तो त्याहून अधिक असतो. महत्त्वाची माहिती दाबून ठेवणे, अनुमानित गोष्टींचा वापर करणे ही त्याची तंत्रे असतात. ब्रिटिशांची या तंत्रावर जणू हुकमत होती. यातील, महत्त्वाची माहिती दाबून ठेवणे, आपणांस हवी तेवढीच माहिती देणे किंवा तिचा हवा तसा वापर करून घेणे- ज्याला हल्लीच्या जनसंपर्काच्या भाषेत ‘स्पिन’ देणे असे म्हणतात, ते करणे- याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे झिमरमन तार प्रकरण.

झिमरमन यांनी मेक्सिकोतील राजदूताला सांकेतिक भाषेत ही तार पाठविली होती. ब्रिटिशांनी महायुद्ध प्रत्यक्षात सुरू होण्याच्या आधीच जर्मनीची संदेशवहन केबल कापून टाकली होती. त्यामुळे जर्मनीला आपल्या अनेक दूतावासांशी थेट संपर्क साधणेही कठीण झाले होते. तेव्हा जर्मनीने अमेरिकेचे अध्यक्ष व्रुडो विल्सन यांना पटवले, की त्यांनी अमेरिकेची संदेशवहन यंत्रणा वापरू द्यावी. युद्ध संपविण्याच्या दृष्टीने तसे करणे फायद्याचे ठरेल. विल्सन त्यांना पटले आणि जर्मनी अमेरिकेची यंत्रणा वापरू लागली. त्याद्वारे १६ जानेवारी १९१७ रोजी झिमरमन यांनी ही लांबलचक तार मेक्सिकोतील आपल्या दूतावासास पाठविली. पण ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा अमेरिकी संदेशवहन यंत्रणेतून जाणारे संदेशही चोरून वाचत असे. त्यांच्या हाती हा संदेश लागला. तो सांकेतिक भाषेत होता. पण ब्रिटिशांच्या ‘रूम फोर्टी’ला तो वाचणे कठीण नव्हते. रूम फोर्टी म्हणजे ब्रिटिश नौसेनेच्या मुख्यालयातील ‘खोली क्र. ४०’. तेथून संदेश ‘इंटरसेप्ट’ केले जात. तेथेच सांकेतिक भाषा उलगडणारे ‘कोडब्रेकर’ बसत. नायजेल डी ग्रे या कोडब्रेकरने ती तार उलगडली आणि त्याच्या लक्षात आले की हा माहितीबॉम्ब आहे. अमेरिकेच्या मदतीने पाठविलेल्या त्या तारेत अमेरिकेवरच आक्रमण करण्याची योजना होती. मेक्सिकोने जर्मनीस साथ देऊन अमेरिकेवर हल्ला केल्यास त्या देशास अमेरिकेने बळकावलेले टेक्सास, न्यू मेक्सिको तसेच अ‍ॅरिझोना हे भाग देण्यात येतील असे आमिष त्यात दाखविण्यात आले होते. ही एवढी महत्त्वाची माहिती ब्रिटनने लगोलग अमेरिकेस कळवावी, पण त्यांनी ती दाबून ठेवली. उघड केली तर आपण अमेरिकेचे संदेश चोरून वाचतो हे समजेल, आपल्याकडे जर्मनीची सांकेतिक भाषा उलगडण्याची क्षमता आहे हे समजेल, हे भय त्यामागे होते. शिवाय एरवीही अमेरिका युद्धात उतरण्याच्या बेतात होती. तेव्हा हे कशाला बाहेर काढायचे असा विचार होता. येथपर्यंत हे सारे हेरगिरीचे प्रकरण होते. पण नंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या जेव्हा लक्षात आले की अमेरिकेला युद्धात ढकलण्यासाठी आणखी एक धक्का देणे आवश्यक आहे तेव्हा ही तार बाहेर काढण्यात आली. तेथून पुढे सुरू झाला तो प्रोपगंडा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही तार ‘रूम फोर्टी’ने फोडली हे दडवून ठेवण्यात आले. त्यासाठी आणखी एक कारस्थान करण्यात आले. झिमरमन यांनी ही तार वेगवेगळ्या मार्गानी मेक्सिकोला पाठविली अशी हवा उठविण्यात आली. वर मेक्सिकोतील तार कंपनीतून त्या तारेची प्रत ब्रिटिश हेरांनी हस्तगत केली आणि ती अमेरिकेला दिली. ही तार बनावट नाही हेही त्यांनी अमेरिकेला पटवून दिले. व्रुडो विल्सन १९१६ मध्ये ‘ही केप्ट अस आऊट ऑफ वॉर’ या घोषणेवर निवडून आले होते. पण पुढे तेही युद्धास अनुकूल झाले होते. प्रश्न होता तो अमेरिकी नागरिकांचा. धोरणातील बदल त्यांना पटवून देण्याचा. त्यासाठी ही तार उपयोगी ठरणार होती. तिची माहिती अमेरिकी वृत्तपत्रांना पुरवण्यात आली. या सर्व प्रकरणामागे ब्रिटन आहे हे समजू नये, म्हणून त्याचे सारे श्रेय देण्यात आले ते अमेरिकी कोडब्रेकरना. १ मार्च १९१७ला ती बातमी प्रसिद्ध झाली आणि अमेरिकेत जर्मनीविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. तशात त्यानंतर दोनच दिवसांनी झिमरमन यांनीही ती तार खरी असल्याचा खुलासा केला आणि नागरिकांच्या मनातील सारेच संशय फिटले. अमेरिकेतील प्रबळ युद्धविरोधी लॉबीलाही या वातावरणात माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे पद्धतशीररीत्या ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांनी आपणांस हवी ती आणि तेवढीच माहिती अमेरिकी राज्यकर्त्यांना आणि प्रसारमाध्यमांना पुरवून आपणांस हवे ते साध्य करून घेतले.

महत्त्वाची माहिती दाबून ठेवणे, सोयीची तेवढी सांगणे आणि केवळ अनुमानित गोष्टींचा वापर करणे या प्रचारतंत्राचे असेच आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे जर्मन साबू निर्मिती प्रकरण. अमेरिका युद्धात उतरल्यानंतर चारच दिवसांनी एका जर्मन वृत्तपत्रात एका साबण कारखान्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यात साबण बनविण्यासाठी मृतदेहांचा- ‘कॅडॅव्हर’चा- कसा वापर केला जातो याची माहिती देणारे ते वृत्त. एक आठवडय़ाने ब्रिटिश वृत्तपत्रांनी ती बातमी उचलली. माणसांचे मृतदेह उकळवून त्यातील चरबी काढून ती साबणात वापरणे हा किळसवाण्या क्रौर्याचा कळसच. ब्रिटिश वृत्तपत्रांनी त्यावरून टीकेची झोड उठवली. पण हे खरे होते का? ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री आर्थर बॅलफोर यांच्या मते, ‘जर्मनांनी यापूर्वी केलेले अत्याचार पाहता, ही गोष्ट खरी नसेल असे मानण्यास काही कारणच नाही.’ बॅलफोर यांचे हे विधान म्हणजे ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांनी जर्मनांची क्रूर हूण अशी जी प्रतिमा तयार केली होती, त्याचाच परिणाम. पण यात प्रोपगंडा होता कोठे? माहितीचे विकृतीकरण होते कोठे? ते होते बातमीच्या भाषांतरात. जर्मन भाषेत कॅडॅव्हर म्हणजे जनावराचा मृतदेह. त्या कारखान्यात घोडय़ांच्या मृतदेहांपासून चरबी काढण्यात येत होती. पण प्रचारात सारीच सत्ये सांगायची नसतात!

तर अमेरिका युद्धात उतरली आणि ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांचे तेथील काम संपले. यापुढे काम सुरू होणार होते ते अमेरिकेतील प्रचारतज्ज्ञांचे.. त्यांच्या त्या कामातूनच पुढे ‘पब्लिक रिलेशन’ या व्यवस्थेचा उदय होणार होता..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com