‘माइन काम्फ’मध्ये हिटलरने संघटक आणि प्रचारक यांची नेमकी कामे काय असतात, हे विस्ताराने सांगितले आहे. त्यात प्रचारकाविषयी तो म्हणतो- ‘बहुसंख्य माणसे मानसिकदृष्टय़ा आळशी आणि भिरू असतात. ती निष्क्रिय असल्यामुळे एखाद्या राजकीय विचारधारेवर विश्वास ठेवण्याचा साधासा प्रयत्न करणे एवढेच त्यांच्यासाठी पुरेसे असते. प्रचारकाचे- प्रोपगंडिस्टाचे- काम हेच, की आपल्या चळवळीला असे नवनवे अनुयायी मिळतील हे त्याने न थकता पाहायचे.’

पण असे अनुयायी मिळाल्यानंतर थांबून चालत नसते. त्यांना सतत त्या मार्गावर ठेवणे आवश्यक असते. लोकांच्या मनावर आपला प्रचार बिंबवायचा तर तो सतत त्यांच्या मनावर, डोळ्यांवर, कानावर आदळत राहिला पाहिजे. तोही एकतर्फी. एखाद्या गोष्टीला दुसरी बाजू असताच कामा नये. वायमार रिपब्लिक नेत्यांनी राष्ट्राची दुर्गती केली म्हणजे दुर्गतीच केली. त्यांनीही काही चांगल्याही गोष्टी केल्या असतील असे चुकूनसुद्धा म्हणायचे नाही. कारण चांगला प्रोपगंडा तोच, की जेथे लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याला वावच ठेवलेला नसतो. हिटलर म्हणतो- ‘प्रत्येक प्रकारच्या प्रोपगंडाची पहिली अटच ही आहे, की आपल्या समोरच्या कोणत्याही समस्येबाबतचा आपला दृष्टिकोन व्यवस्थितपणे एक-पक्षीय, एकाच बाजूचा असाच असला पाहिजे.’ सत्य जर विरोधकांच्या बाजूचे असेल, तर त्याचा उच्चारही करता कामा नये.

हा प्रोपगंडा लोकांसमोर मांडायचा तो लोकप्रिय पद्धतीनेच. त्याचे लक्ष्य समजा एखादा गट असेल, तर त्या गटातील सर्वात रेम्याडोक्याची जी व्यक्ती असेल, तिलाही तो समजला पाहिजे. म्हणजे प्रोपगंडामध्ये तुमचे ते सौंदर्यशास्त्र, ती अभिजातता, ती वैचारिकता हे सारे असायला काहीही हरकत नाही. परंतु ते कुठवर? तर ते त्या व्यक्तीच्या डोक्यावरून जात नाही तिथपर्यंतच. आधुनिक वैज्ञानिक प्रगतीने या प्रोपगंडासाठी दोन सर्वोत्तम माध्यमे दिली. एक- रेडिओ. दोन- चित्रपट.

रेडिओ हे यातील सर्वात परिणामकारक माध्यम. तेव्हा अजून घरात दूरचित्रवाणी संच आलेले नव्हते. त्यामुळे चित्रपट पाहायचे तर त्यासाठी उठून चित्रपटगृहांतच जावे लागणार. दुसरे माध्यम वृत्तपत्रांचे. तर अनेक जण वृत्तपत्रे वाचतच नाहीत. पुन्हा त्यातील मजकूर समजून घ्यायचा तर त्यासाठी किमान विचार साक्षरता हवी. गोबेल्सने १८ ऑगस्ट १९३३ रोजी केलेल्या एका भाषणाचे शीर्षक होते : ‘रेडिओ- एक आठवी महासत्ता.’ नेपोलियनने वृत्तपत्रांना सातवी महासत्ता म्हटले होते. तो संदर्भ येथे होता. या भाषणात तो म्हणतो, की एकोणिसाव्या शतकात मुद्रितमाध्यमांचे जे स्थान, तेच विसाव्या शतकात रेडिओचे आहे. त्यामुळे नाझींची सत्ता आल्यानंतर गोबेल्सने नभोवाणी प्रक्षेपणाचे सगळे अधिकार त्याच्या प्रोपगंडा मंत्रालयाकडे घेतले. आता नभोवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप कोणतेही असो, त्यांची विषयवस्तू असे ती राष्ट्र आणि राष्ट्रप्रमुखाविषयीचा, आर्य वंशाविषयीचा अभिमान, ज्यूंचा द्वेष, देशभक्ती, राष्ट्रवाद, अन्य ‘पाश्चात्त्य’ विचारांस विरोध हीच. या कार्यक्रमांतून, त्यावरील भाषणांतून, गाण्यांतून हेच सारे सातत्याने लोकांच्या मनावर ठसविले जात असे. हिटलरची भाषणे हा तर रेडिओवरचा खास कार्यक्रम. तो सातत्याने रेडिओवरून लोकांशी बोलत असे. तो पट्टीचा वक्ता. सभा मारून नेणारा. रेडिओवर मात्र तो फारसा प्रभावी वाटत नसे. पण एकाच वेळी लक्षावधी लोकांना आपले म्हणणे ऐकविण्याच्या या साधनाला पर्याय नव्हता. त्या काळात, १९३२ साली, जर्मनीतील नभोवाणी संचांची संख्या होती ४५ लाख. ती वाढावी यासाठी मग नाझी सत्तेने फोक्सवॅगन या लोकवाहनाप्रमाणेच स्वस्तातले लोकनभोवाणी संच- फोक्सएम्फेना- बाजारात आणले. परिणामी पुढच्या दहा वर्षांत रेडिओंची संख्या एक कोटी ६० लाखांवर गेली. पण लोक काही सतत रेडिओसमोरच नसतात. ते घराबाहेरही पडतात. तेव्हा त्यांच्या ‘सोयी’साठी अनेक शहरांतील रस्त्यांवर, कारखान्यांमध्ये ध्वनिवर्धक बसविण्यात आले. म्हणजे तुम्ही कोठेही असा, तुमच्या कानावर हा प्रचार आदळलाच पाहिजे. आज हातातील मोबाइलमधील समाजमाध्यमे जे काम करू इच्छितात, तेच तेव्हाचा रेडिओ करीत होता.

रेडिओचा वापर करीत असताना नाझी प्रोपगंडातज्ज्ञांच्या लक्षात एक बाब आली होती, की वक्ता आणि श्रोता यांतील मानवी बंध यात नाही. आधी बोल्शेविकांनीही रेडिओचा वापर केला होता. तो प्रभावी ठरला नाही. याचे हेच कारण होते. तेव्हा नाझींनी त्यावर एक उपाय शोधला. रेडिओ ऐकण्यासाठी गर्दी जमविण्याचा. जमाव हा मेंढय़ांच्या कळपासारखा असतो. त्या गर्दीतील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हळूहळू जमावाच्या व्यक्तिमत्त्वात विरघळून जाते. ते तसे व्हावे, याकरिता बहुसंख्य प्रचारतज्ज्ञ ‘इन्स्टिगेटर’चा वापर करतात. त्यांचे काम एकच. लोकांना घोषणांतून, टाळ्यांतून कृतिप्रवण करून उन्मादी स्तरावर आणायचे. गोबेल्सचा भर ‘मास मीटिंग’वर असायचा तो म्हणूनच. याच हेतूने नाझींनी रेडिओ क्लबची स्थापना केली. नभोवाणी श्रोत्यांच्या संघटना उभारल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेडिओ वॉर्डन नावाचे अधिकारी नेमले. तो रेडिओ आणि श्रोते यांच्यातील मानवी दुवा. ते पक्षाचे कार्यकर्तेच असत. त्यांनी श्रोत्यांना एकत्र आणायचे. त्यांच्याशी कार्यक्रमाविषयी, श्रुतिकांविषयी गप्पा मारायच्या. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आणि त्या रेडिओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या. आज प्रतिक्रिया जाणून घेण्याचे आधुनिक मार्ग उपलब्ध आहेत. त्या काळात रेडिओ वॉर्डन ते महत्त्वाचे काम करीत असत.

नाझी सत्तेने लोकांच्या हाती रेडिओ दिले खरे. पण त्यावरून काय ऐकविले जाणार आणि त्यावरून लोकांनी काय ऐकायचे याचे अधिकार मात्र स्वत:कडेच ठेवले. येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की फॅसिस्ट व्यवस्थेत प्रोपगंडा हा हिंसेला पर्याय नसतो. तो हिंसेचाच एक भाग असतो. नाझी जर्मनीत सरकार मान्यताप्राप्त नभोवाणी केंद्रे सोडून अन्य काहीही ऐकले, उदाहरणार्थ बीबीसीसारखी परकी केंद्रे, तर त्याची शिक्षा एकच होती. छळछावणीत रवानगी. पण त्याच वेळी नाझी नभोवाणीचे प्रक्षेपण अन्य देशांतही करण्यात येत होते. त्यावरून केल्या जाणाऱ्या प्रोपगंडाचा हेतू एकच असे, शत्रुराष्ट्रांत अपमाहिती पसरविणे, शत्रुसैनिकांचे मनोधैर्य खच्ची करणे. जर्मन रेडिओवरून सादर केला जाणारा ‘होम स्वीट होम’ हा कार्यक्रम हे त्याचे एक उदाहरण. अमेरिकी सैनिकांना उद्देशून तो कार्यक्रम केला जाई. घरापासून दूर आलेल्या त्या सैनिकांच्या मनात संशयाचे विष कालवणे हा त्याचा हेतू होता. सैनिकांच्या पत्नी त्यांच्या पश्चात बाहेरख्यालीपणा करतात अशा  कथा त्यातून सांगितल्या जात. तो सादर करीत असे नाझींना सामील झालेली एक अमेरिकी युवती. तिचे नाव मिल्ड्रेड गिलार्स. पण ती ओळखली जायची अ‍ॅक्सिस सॅली या नावाने. अशा प्रकारच्या विविध मालिका, श्रुतिका रेडिओवरून सादर केल्या जात असत.

रेडिओप्रमाणेच नाझींनी चित्रपट या माध्यमाचाही प्रोपगंडासाठी मोठय़ा प्रमाणावर वापर केला. या प्रोपगंडा चित्रपटांच्या बाबतीत गोबेल्स हा ग्रिगोरी पोटेमकिनचा अनुयायी शोभावा. पोटेमकिन हा रशियन सेनापती. सम्राज्ञी कॅथेरीन द ग्रेटचा प्रियकर. त्याची अशी एक कथा सांगितली जाते, की १७८७ मध्ये या सम्राज्ञीने अन्य काही देशांच्या राजदूतांसह न्यू रशिया या भागास भेट देण्याचे अचानक ठरविले. आधीच्या युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या त्या प्रदेशाच्या पुनर्बाधणीचे काम पोटेमकिनकडे सोपविण्यात आले होते. ते किती छान झाले आहे हे या राजदूतांनी पाहावे ही तिची इच्छा. पण काम काही झाले नव्हते. तेव्हा पोटेमकिन याने एक भन्नाट कल्पना लढविली. त्याने सम्राज्ञीचे जहाज ज्या नदीतून जाणार होते, त्या नदीच्या किनाऱ्यावर खोटी खेडी वसवली. पोर्टेबल खेडी. सम्राज्ञीचे जहाज आले की किनाऱ्यावरील त्या खेडय़ांत पोटेमकिनचे सैनिक गावकरी म्हणून वावरत. ते तेथून गेले, की लगेच ते खेडे वाहनांवर चढविले जाई आणि तिच्या मार्गात पुढे कुठे तरी वसविले जाई. प्रोपगंडात अनेकदा हेच पोटेमकिन तंत्र तर वापरले जाते. चित्रे, प्रतिमा, आकडे, भाषणे, घोषणा आणि भाषा यांतून हा पोटेमकिन परिणाम साधला जातो. नाझी प्रोपगंडा चित्रपटांतून तोच साधला जात असे. त्या चित्रपटांनी जर्मनीतील एक बनावट- फेक- वास्तव लोकांसमोर ठेवले. सत्य-असत्याचा असा खेळ केला, की त्यातून दिसेल तेच सत्य असे लोकमानसात प्रस्थापित होऊ   लागले. त्यातील तो प्रोपगंडा, त्याची तंत्रे  आजच्या, चित्रपटांनी व्यापलेल्या काळात समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे..

रवि आमले

ravi.amale@expressindia.com