‘बालभारती’च्या पुस्तकात  वा. भा. पाठक यांची एक छान कविता होती. ‘खबरदार जर टाच मारूनी..’ सावळ्या हा तिचा नायक. तो शिवकालातला. लहान मुलगा. पण तो म्हणजे स्वामीभक्तीचे, कर्तव्यपरायणतेचे, शौर्याचे प्रतीकच. आता मुळात सावळ्या हे काल्पनिक पात्र. पाठक यांनी ते तयार केले आणि मुलांसमोर एक आदर्श ठेवला. मुलांनी कविता वाचावी. सावळ्याचे गुण आपल्या अंगी बाणवावेत. हा हेतू. सोव्हिएत रशियातल्या पावलिक मोरोझोव्हचे तसे नव्हते. म्हणजे तो सावळ्यासारखाच लहान मुलगा होता. परंतु खराखुरा. सोव्हिएत रशियात त्याचे पोवाडे गायले जात होते. मुलांना त्याच्या कथा सांगितल्या जात असत. शाळाशाळांमध्ये त्याचे पुतळे बसविण्यात आले होते. मुलांच्या छातीवर त्याचे चित्र असलेले बिल्ले असत. फार काय, त्याच्यावर एक ऑपेराही रचण्यात आला होता. पुढे तर चित्रपटही काढण्यात आला त्याच्यावर. लाडाने त्याला कोणी पाशा म्हणे, कोणी पावलुश्का, तर कोणी नुसतेच पाश. कोण होता तो?

तो होता सोव्हिएत रशियाच्या प्रोपगंडाची निर्मिती. प्रचारातून प्रचारासाठी कशा प्रकारे मिथक निर्मिती केली जाते, याचे उत्तम उदाहरण. ‘अधिकृत’ इतिहासानुसार, हा अवघ्या तेरा वर्षांचा मुलगा. येकाटेरिनबर्ग म्हणजे आजचे स्वेर्डलोव्हस्क. रशियातलं एक मोठं औद्योगिक शहर. त्यापासून साडेतीनशे किलोमीटरवर एक गाव होते. छोटेसेच. हा तिथे राहणारा. खाऊनपिऊन सुखी असणाऱ्या शेतकरी कुटुंबातला. शाळेत जायचा. सक्तीचेच होते ते. या शाळांमध्ये ‘पायोनियर’ चळवळ असे. ब्रिटिश लष्करातील लेफ्ट. जनरल रॉबर्ट बेडन-पॉवेल यांनी सुरू केलेल्या स्काऊट चळवळीसारखीच ही. फरक एवढाच की स्काऊटचा कोणा राजकीय पक्षाशी संबंध नसतो. पायोनियर मात्र पूर्ण राजकीय होती. लेनिनचा वारसा पुढे चालविणे हे तिचे ध्येय होते. तोवर लेनिनचाही एक पंथ तयार करण्यात आला होता तेथे. लेनिनचे आठवावे रूप, लेनिनचा आठवावा प्रताप असे सगळे पद्धतशीरपणे चाललेले होते. शाळांमध्ये मुलांना ‘बेबी लेनिन’चे गोंडस चित्र असलेले बिल्ले दिले जात.

Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
Zee Marathi channel answer to user who objected of Satvya Mulichi Satavi Mulgi celebration cake
मालिकेच्या सेलिब्रेशन केकवर देवीचा फोटो, युजरने आक्षेप घेतल्यावर ‘झी मराठी’ने दिलं स्पष्टीकरण, लिहिलं…
Virat Kohli and Gautam Gambhir hugging each other
RCB vs KKR : विराट-गौतमने जिंकली सर्वांची मनं, गतवर्षातील वाद विसरुन एकमेकांची घेतली गळाभेट, VIDEO व्हायरल

प्रोपगंडामध्ये या बिल्ल्यांना फार महत्त्व. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत क्रील समितीने या बिल्ल्यांचा – लेपल पिनचा – मोठय़ा खुबीने वापर केला होता. लिबर्टी बॉण्ड खरेदी करणाऱ्यांना खास बिल्ले दिले जात असत. देशभक्ती फॅशनचा भाग म्हणून ते पोस्टरमध्ये चितारले जात असत. आजही अनेक संघटना, संस्था, पक्ष, व्यक्ती यांच्याकडून अशा बिल्ल्यांचा वापर केला जातो. त्यांना पर्याय म्हणून पेनची टोपणे, टोप्या, टी-शर्ट, उपरणी अशा गोष्टीही हल्ली वापरल्या जातात. काय हेतू असतो त्यामागे? या गोष्टी केवळ छान दिसतात म्हणून वापरल्या जात नसतात. त्यामागे खास उद्देश असतो. तो म्हणजे – समानजन-दबाव निर्माण करण्याचा. आपण एका मोठय़ा समूहाचे भाग आहोत ही जाणीव स्वत:ला आणि इतरांनाही करून देण्याचे ते माध्यम असते. अशा समानजन-दबावाखालील व्यक्तीला त्या विशिष्ट समूहाचे विचार, प्रेरणा, कृती यांत सामावून घेणे आणि त्यानुसार हवे तसे वळविणे, वाकविणे सोपे असते. म्हणूनच प्रचारतज्ज्ञांचे हे लाडके साधन असते.

सोव्हिएत रशियातील पायोनियर चळवळीत बिल्ल्यांप्रमाणेच खास प्रकारच्या टायचाही वापर करण्यात येत असे. ती त्यांची ओळख असे. तो लाल टाय मिळविणे हे मुलांसाठी प्रतिष्ठेचे लक्षण असे. आपण एका खास अशा संघटनेचा भाग आहोत, ती संघटना मोठी म्हणून आपणही मोठे, अशी भावना त्यातून जागृत होत असे. हे प्रोपगंडातील ट्रान्सफर – आरोपण तंत्र. अण्णा टोपी घातली की व्यक्ती लगेच भ्रष्टाचारविरोधी बनते. व्हॉट्सअ‍ॅपचे दर्शनचित्र (डीपी) म्हणून सैनिकांचे छायाचित्र ठेवले की केवळ तेवढय़ानेच आपण पक्के देशभक्त ठरतो. हा त्याचाच भाग. पायोनियरमध्ये या १० ते १५ वर्षांच्या कोवळ्या मुलांवर अशा प्रकारे समानजन-दबाव टाकण्यात येई. त्यांच्यामध्ये संघटनेबाबत बांधिलकी निर्माण केली जाई आणि त्यातून त्यांच्या मनावर बोल्शेविक मूल्ये, लेनिनचा आदर्श अशा गोष्टी बिंबविल्या जात. गाणी, गोष्टी यांतून ते बेमालूमपणे केले जाई. एक प्रकारे त्यांच्या मनाचे सैनिकांप्रमाणे पलटणीकरण केले जाई. पुढे १५ वर्षांनंतर हीच मुले ‘कॉमसोमॉल’ अर्थात ‘ऑल युनियन लेनिनिस्ट यंग कम्युनिस्ट लीग’मध्ये जात. साम्यवादी पक्षाची ही युवाशाखाच जणू. त्यातून पक्षासाठी कडवे कार्यकर्ते तयार होत. उत्क्रांतीच्या मार्गावरची पुढची पायरी म्हणजे ‘होमो सोव्हिएटिकस’ – साम्यवादी मनुष्य – ती यातूनच साध्य करण्याचा प्रयत्न होता. अनेक संघटनांची रचना – मग त्या डाव्या असोत की उजव्या – अशीच दिसते. तेथील प्रोपगंडावर पोसूनच ही मुले समाजात येतात.

तर पावलिक मोरोझोव्ह हा असाच छोटा अग्रदूत. पण त्याचे पुतळे उभारावेत असे त्याने काय केले होते? त्याने केली होती हेरगिरी. तीही स्वत:च्या वडिलांविरुद्ध. त्याचे वडील गावातल्या सोव्हिएतचे – ग्रामपरिषदेचे – सभापती. म्हणजे कम्युनिस्ट ते. पावलिकही तसाच होता. सोव्हिएत सरकारच्या सामूहिक शेती धोरणाचा तो (त्या वयातही) कट्टर पाठीराखा. पण त्याचे वडील सरकारी धोरणांना फारसे अनुकूल नसल्याचे त्याच्या लक्षात येऊ  लागले होते. एके दिवशी तर हद्दच झाली. आपले वडील चक्क बनावट कागदपत्रे तयार करून ‘कुलाक’ना देत असल्याचे त्याने पाहिले. हे कुलाक म्हणजे श्रीमंत शेतकरी, सामूहिकीकरणाला विरोध करणारे. ग्रामपरिषदेचा सभापती अशा ‘वर्गद्रोह्य़ां’ना मदत करतो हे पाहून पावलिकच्या देशभक्त मनात आग भडकली. वडील की देश अशा कात्रीत तो सापडला. अखेर देशाचे पारडे जड झाले. त्याने सरळ गुप्त पोलिसांना ती खबर दिली. त्यावरून मग त्याच्या वडिलांना अटक झाली. त्यांना ठार मारण्यात आले. देशासाठी केवढे मोठे बलिदान दिले त्या बालकाने! पण त्याच्या या कृत्यामुळे संतापलेल्या काही वर्गशत्रूंनी नंतर त्याची हत्या केली. त्या बातमीने अवघा देश हळहळला. पुढे सरकारने त्याला ‘पायोनियर नायक क्र. १’ म्हणून घोषित केले. त्याच्या बलिदानाची गाथा पिढय़ान्पिढय़ा मुलांपुढे प्रेरक म्हणून ठेवण्यात येऊ  लागली. एक मिथक तयार झाले त्याचे. बोल्शेविक मूल्यांच्या प्रचारासाठी ते मोठय़ा प्रमाणावर वापरले गेले. ‘आई’ या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी तर ‘आपल्या युगातील एक छोटासा चमत्कार’ अशा शब्दांत त्याचे वर्णन केले होते.

पण अखेर मिथकच होते ते. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर हळूहळू त्याची खरी कहाणी समोर येऊ  लागली. रशियन लेखक-पत्रकार युरी ड्रझनिकोव्ह यांच्या ‘इन्फॉर्मर ००१’ या पुस्तकाने तर त्याचे सगळेच पितळ उघडे पाडले. सर्वानाच समजले, की पावलिक हा हुतात्मा वगैरे काही नव्हता. गरीब होते त्याचे कुटंब. त्याच्या वडिलांनी त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले होते. एकटय़ा पावलिकवर – खरे तर हेही त्याचे नाव नव्हते. ते होते पावेल. – घराची जबाबदारी होती. त्या रागातून आणि आईच्या सांगण्यावरून त्याने वडिलांची तक्रार केली. यानंतर तो पोलिसांचा खबऱ्याच बनला. गावात दादागिरी करू लागला. त्यातूनच कोणी तरी त्याला आणि त्याच्या भावालाही मारून टाकले. हे काम ओजीपीयूच्या (तेव्हाची केजीबी) गुप्तचरांचे. त्यांचे मृतदेह सापडले तेव्हा तेथे एक पोलीस खबऱ्या होता. त्याने त्याला ‘हिरो’ बनवून टाकले. पुढचे काम प्रोपगंडा पंडितांचे होते. त्यांनी पावेलचा पावलिक केला. त्याला वर्गशत्रूंनी मारल्याच्या बातम्या पसरविल्या. किंबहुना त्याचे सर्व चरित्रच बदलून टाकले त्यांनी. त्याचा पुतळा रेड स्क्वेअरमध्ये उभारावा असे आदेश स्टालिनने स्वत: दिले. मिथके तयार केली जातात ती अशी. त्यांचा वापर केला जातो प्रोपगंडासाठी. पावलिकच्या चरित्रातून लहान मुलांच्या मनांची मशागत केली जात होती. पण त्याचबरोबर त्यातून मोठय़ांनाही संदेश दिला जात होता. कुटुंब व्यवस्थेप्रति असलेली मुलांची बांधिलकी खणून काढतानाच, त्यांच्या पालकांच्या मनात भय आणि संशय निर्माण केला जात होता. असा भय आणि संशयग्रस्त समाज मेंढरांप्रमाणे हाकण्यास सोपा असतो. स्टालिनने ते करून दाखविले होते.

परंतु सर्वच समाज व्यवस्थांत कमी-जास्त प्रमाणात मिथकांचे असे मायाजाल दिसते. त्यांतील काही खरी असतात, काही अतिशयोक्त. काहींच्या तेव्हाच्या कृत्यांना आजचे अर्थ चिकटविले जातात. आणि आपण त्या प्रोपगंडाची शिकार बनत राहतो..

रवि आमले

ravi.amale@expressindia.com