वर्तमानकाळाकडे तटस्थपणे पाहणे कठीणच. कारण एक तर त्यात आपले हितसंबंध गुंतलेले असतात आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वर्तमानाबद्दल आपण जो विचार करत असतो, तो ‘आपला’च आहे असे आपल्याला वाटत असते. प्रोपगंडाचे खरे यश कशात असेल तर ते हेच, की प्रत्येक व्यक्तीचे विचार, मत, कल्पना आणि कृती हे सारे ‘त्याचे’ असते, ते त्याने त्याच्या मनाने, बुद्धीने काळजीपूर्वक पारखून घेऊन निवडलेले असते, असे त्या व्यक्तीला पटवणे. एकदा तसे वाटू लागले, की मग कोणी काहीही सांगो, त्यावर तिचा विश्वासच बसणार नाही. कारण आपणही प्रोपगंडाबळी आहोत असे मान्य करणे हा त्या व्यक्तीला आपल्या बुद्धीचा अपमान वाटतो. त्यामुळे प्रोपगंडानामक काही प्रकार असतो, हे एक तर नाकारण्याकडे किंवा त्याचा फारसा प्रभाव नसतो, असे सांगण्याकडे त्यांचा कल असतो. हेच मोदी-प्रचाराबाबतही झाले आहे. ते ज्यांच्यासाठी दैवी अवतार आहेत, उद्धारक आहेत, त्यांना मोदींच्या यशात प्रोपगंडाचा मोठा वाटा आहे हा विचारही सहन होणार नाही. किंबहुना हाच विरोधकांचा प्रचार आहे, अशी त्यांची भावना असू शकेल. २०१३ पासून मोदी यांच्या केवळ प्रतिमासंवर्धनाचेच नव्हे, तर त्यांच्या दैवतीकरणाचे प्रयत्न सुरू झाले होते, हे त्यांना पटणार नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की ७ सप्टेंबर २०१३ रोजी मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याआधीपासून त्यांच्याभोवती ‘हॅलो बायस’ निर्माण करण्यात येऊ  लागला होता.

या काळातला मोदी-प्रचार दोन मुद्दय़ांवर केंद्रित होता. एकीकडे ते विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ देशासमोर मांडत होते. यातून त्यांची विकासपुरुष ही प्रतिमा गडद करण्यात येत होती. दुसरीकडे ते स्वत:ची यशोगाथा मांडत होते. आपण कसे रेल्वे फलाटावर चहा विकत होतो, वगैरे गोष्टी माध्यमांतून लोकांसमोर आणण्यात येत होत्या. चित्रपटांत खलपुरुषांना मारणारा नायक हा प्रत्यक्षातही तसाच असणार, दारिद्रय़ात दिवस काढलेली व्यक्ती पुढेही गरिबांबद्दल कनवाळू असणार, व्हॉट्सअ‍ॅपवर देवाचे वगैरे प्रतिमाचित्र ठेवणारी व्यक्ती तशीच सज्जन असणार असे आपसूक मानले जाते. हा ‘हॅलो बायस’. मोदींभोवती तशी प्रभा निर्माण केली जात होती. २०१४च्या निवडणूक प्रचारकाळात त्याला अधिकृतता आली ती पुस्तकांतून. ‘न्यूज एक्स’ वाहिनीचे वृत्तसंपादक सुदेश वर्मा, जे पुढे भाजपच्या राष्ट्रीय माध्यम मंडळाचे सदस्य बनले त्यांनी लिहिलेले ‘नरेंद्र मोदी – द गेम चेंजर’, ब्रिटिश चरित्रकार अ‍ॅण्डी मॅरिनो यांचे ‘नरेंद्र मोदी – ए पोलिटिकल बायोग्राफी’ अशी बरीच पुस्तके या काळात प्रकाशित झाली. या पुस्तकांसाठी मोदी यांनी आपला बराच वेळ लेखकांना दिला होता. अ‍ॅण्डी मॅरिनो यांना तर मोदी कधीही उपलब्ध असत, हे महत्त्वाचे. यावर कडी म्हणजे ‘बाल नरेंद्र’ हे कॉमिक बुक. रेल्वे स्थानकांवर ते हातोहात खपले. बाल नरेंद्राने मगरीशी दिलेला लढा ही कथा याच पुस्तकातील. तिला अधिकृतता दिली होती ती सुदेश वर्मा यांच्या पुस्तकाने. मोदींभोवती तयार करण्यात आलेल्या या प्रभेचा त्यांच्या विरोधकांनी अतिशय धसका घेतला होता. मणिशंकर अय्यर यांच्या १७ जानेवारी २०१४ च्या विधानातून तेच दिसले.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार

‘‘या २१व्या शतकात तरी मोदी पंतप्रधान बनू शकणार नाहीत. मात्र त्यांना चहा विकायची इच्छा असेल, तर आम्ही त्यांना येथे जागा देऊ,’’ असे ते म्हणाले होते. मोदींच्या ‘चहावाला’ या प्रतिमेतून दिला जाणारा संदेश खोडून काढण्याचा तो प्रयत्न होता. या विधानाने प्रशांत किशोर यांच्या ‘कॅग’ला हव्या त्या ‘ओव्हर्ट अ‍ॅक्ट’ची संधी अलगद मिळाली आणि त्यातून जन्मास आली ‘चाय पे चर्चा’ ही मोहीम. अमेरिकेतील जॉर्ज क्रिल यांच्या ‘फोर मिनट मेन’चे प्रतिमान किशोर यांच्यासमोर होतेच. त्यांनी त्याला आधुनिक साज चढविला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा त्यांच्या हाताशी होतीच. त्या बळावर १२ फेब्रुवारी २०१४ रोजी पहिली ‘चाय पे चर्चा’ झाली. त्याची वेळही महत्त्वाची होती. ती अंधूक प्रकाशाची वा रात्रीची हवी. लोक थकलेले असतात त्या वेळी. वैचारिक विरोध करण्याची त्यांची ताकद कमी झालेली असते. त्यामुळे सायंकाळी सहा ते आठची वेळ पक्की करण्यात आली. चहाची टपरी हे स्थान ठरले. त्यातून मोदी हे आपल्यातलेच हा संदेश जात होताच आणि त्याच वेळी त्यासाठी वापरण्यात आलेल्या आधुनिक साधनांमुळे मोदींची तंत्रप्रेमी ही प्रतिमाही समोर येत होती. अशा प्रकारे देशभरातील दीड हजार ठिकाणी हा कार्यक्रम झाला. हजारो लोक त्यात सहभागी झाले, पण तो पोचला ४५ लाख लोकांपर्यंत. नवनव्या तंत्राच्या वापराने ‘स्यूडो इव्हेन्ट’ तयार करणे आणि ते माध्यमांतून गाजविणे हाही यातील एक भाग. ‘त्रिमितीय प्रतिमा’ सभा हा त्याचाच पुढचा टप्पा. ११ एप्रिल ते ९ मेदरम्यान देशभरात १३०० ठिकाणी अशा सभा झाल्या. अवकाशातून अवतरावेत अशा प्रकारे मोदी आपल्यासमोर येतात. ‘दैवी जादू’च ती. तिचा सामान्यजनांवर प्रभाव पडणारच होता.

हे सुरू असतानाच इंटरनेट या माध्यमातून मतदारांना घेरण्यात येत होते. विरोधी पक्षांनी त्यातही हातपाय मारले; परंतु मोदींची प्रचारयंत्रणा त्यांच्यापासून हजारो मैल पुढे होती. भाजपची संकेतस्थळे होतीच, परंतु ‘सेंटर राइट इंडिया’, ‘इंडिया बिहाइंड द लेन्स’ यांसारख्या संस्थांद्वारे लोकांच्या मनांवर छुपा प्रचारमारा करण्यात येत होता. शिवाय ट्विटरवरील जल्पक होतेच. विरोधकांचे राक्षसीकरण करतानाच मोदींची प्रतिमावृद्धी हा त्यांचा कार्यक्रम. त्याला साथ होती भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाची. त्या काळात त्याची जबाबदारी होती इलिनॉय विद्यापीठातून पीएचडी करून आलेले तंत्रज्ञ अरविंद गुप्ता यांच्याकडे. या सगळ्यातून ‘बॅण्डवॅगन इफेक्ट’ तयार करण्यात येत होता. समाजमाध्यमांत सर्वत्र मोदीच दिसतात म्हटल्यावर संपूर्ण देशच त्यांच्या मागे आहे असा भ्रम कोणाच्याही मनात निर्माण होणे सहजशक्य होते. त्यातून ही संपूर्ण निवडणूक अध्यक्षीय पद्धतीच्या तालावर नेण्यात आली. या प्रोपगंडाचा पुढचा टप्पा होता अर्थातच जाहिरातींचा.

त्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती तिघांवर- ‘ओग्लिव्ही अ‍ॅण्ड मॅथर’अंतर्गत येणाऱ्या ‘सोहो स्क्वेअर’ या जाहिरात संस्थेचे पीयूष पांडे, ‘मॅक्कॅन वर्ल्ड ग्रुप’चे प्रसून जोशी आणि ‘मॅडिसन वर्ल्ड’चे सॅम बलसारा यांच्यावर. ‘अब की बार मोदी सरकार’ ही घोषणा पीयूष पांडे यांची. तिची प्रेरणा होती ‘अब की बारी अटलबिहारी’ ही घोषणा. ‘आता येणारे सरकार भाजपचे नव्हे, मोदींचे’ हा संदेश देणारी ही जाहिरात मोदींचा आजवर तयार झालेला ‘ब्रॅण्ड’ विकत होती, तर ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ या घोषवाक्यातून स्वप्ने विकली जात होती. मोदी आणि रुझवेल्ट यांच्या प्रचारातील हे आणखी एक साम्य. ‘फायर साइड चॅट’ ही ‘मन की बात’ची प्रेरणा, तशीच ‘हॅपी डेज आर हीअर अगेन’ हे प्रचारगीत ही ‘अच्छे दिन’ची प्रेरणा. शिवाय बराक ओबामा यांनी केवळ ‘आशा’ हा शब्द किती परिणामकारक ठरू शकतो हे दाखवून दिलेच होते. तशा या घोषणा म्हणजे धूसरच. काहीही स्पष्ट न सांगणाऱ्या आणि म्हणूनच मतदारांच्या मनातील कल्पनांना पंख लावणाऱ्या.

पण केवळ आपणच चांगले दिन आणू हे सांगून भागण्यासारखे नव्हते, तर आताचे दिन वाईट आहेत हे सांगणे त्याहून गरजेचे होते. लोकांच्या मनात संतापाची भावना निर्माण करून, तो ‘तुमचाच’ संताप आहे हे सांगणे आवश्यक होते. भाजपच्या अनेक ज्येष्ठांनी प्रारंभी जिला नाके मुरडली त्या ‘जनता माफ नहीं करेगी’ या जाहिरातीने ते साधले. काळी पाश्र्वभूमी, त्यावर काळ्या-पांढऱ्या रंगांतली माणसे, आपल्यासारखीच. यूपीए सरकारवर रागावलेली. ‘जनता माफ नाही करणार तुम्हाला’ असा तळतळाट देणारी. ‘प्लेन फोक्स’ तंत्राचा प्रभावी वापर होता तो.

मोदींच्या प्रोपगंडा मोहिनीची ही केवळ झलक. याशिवाय भाषणे, भित्तिपत्रके, मीम, व्यंगचित्रे अशा विविध माध्यमांतून शास्त्रशुद्धपणे प्रोपगंडा केला जात होता. त्याला हिंदुत्ववादी नवराष्ट्रवादाच्या संदेशाची जोड होतीच. त्या सगळ्याचा परिणाम लोकमानसावर नक्कीच झाला. ते अर्थात आज अनेकांना अमान्य आहे. केवळ प्रोपगंडावर निवडणुका लढविता येत असत्या, तर मग जाहिराततज्ज्ञच नसते का निवडून आले, असा भोळा सवालही यावर येऊ  शकतो; पण असा भोळसटपणा कायम राहणे हे त्या सर्वाच्याच फायद्याचे असते. शिवाय त्यातून आपल्या बुद्धीचीही शान टिकून राहते.. तेवढेच आपल्याला समाधान.

रवि आमले

ravi.amale@expressindia.com