चित्रपटाच्या स्वरूपातच अंगभूत सामथ्र्य आहे. एक तर तो पाहण्यासाठी अक्षरओळखीची आवश्यकता नसते.   ती चित्रे, त्यांबरोबरचे संगीत, शब्द, प्रकाशयोजना, त्यांसाठी वापरलेले खास परिणाम हे सारे थेट छेडत असते दर्शकाच्या भावनांच्या तारा. त्यातून प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशांमधून त्या भावना हव्या तशा घडवता येतात..

चित्रपट हे खरोखरच केवळ मनोरंजनाचे साधन आहे? दोन घटका करमणूक एवढाच त्याचा हेतू आहे? चित्रपटांना समाजाचा आरसा म्हटले जाते. वस्तुस्थिती काहीशी तशी आहे हे खरे. पण तो केवळ आरसाच आहे.. जसे आहे तसे दाखविणारा?

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

अमेरिकेतील डेटन विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या प्रोफेसर डॉ. मिशेल सी. पॉट्झ यांनाही हे प्रश्न पडले होते. त्यांनी मग त्याचा अभ्यास केला आणि त्याचे निष्कर्ष ‘केंब्रिज कोअर’ जर्नलमध्ये (जाने. १५, खंड ४८, अंक १) मांडले. साधाच प्रयोग होता तो. त्यांनी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गोळा केले. त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली. त्यांची सरकारबद्दलची मते जाणून घेतली. मग त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी ‘आर्गो’ आणि ‘झिरो डार्क थर्टी’ हे चित्रपट दाखविले. आर्गो होता इराणी क्रांतीच्या पाश्र्वभूमीवरचा. झिरो डार्क थर्टी हा ओसामा बिन लादेनला सीआयएने कसे शोधले आणि मारले त्याबद्दलचा. हे चित्रपट पाहून झाल्यावर त्यांनी त्या मुलांकडून पुन्हा प्रश्नावली भरून घेतली. आणि त्यातून त्यांच्या लक्षात आले, की आता त्या मुलांची सरकारबद्दलची मते बदलली आहेत. सरकारवरचा त्यांचा विश्वास वाढला आहे. हा त्या दोन चित्रपटांचा परिणाम होता. हे दोन्हीही अतिशय लोकप्रिय चित्रपट. ऑस्करसाठी नामांकन मिळालेले. आर्गोला तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्करही मिळाले. म्हणजे चित्रपट म्हणून ते छानच होते. कलात्मक, शिवाय मनोरंजन करणारे. सुशिक्षितांच्या उच्च अभिरुचीला भावणारे. आणि तरीही ते प्रचारी होते. सीआयए, अमेरिकी सरकार यांची प्रतिमासंवर्धन करणारे होते. वरवर पाहता या दोन्ही चित्रपटांना कोणीही प्रोपगंडा फिल्म – प्रचारी चित्रपट – म्हणू शकणार नाही. पण प्रोपगंडाचे तेच तर वैशिष्टय़ असते. तो असतो, दिसतो, पण जाणवत मात्र नाही. अशा अनेक चित्रपटांतून आजवर तो दिसला आहे. चित्रपटांचा अशा प्रकारे प्रोपगंडासाठी वापर करण्यास सुरुवात झाली ती पहिल्या महायुद्धाच्या आगेमागेच.

न्यू यॉर्कमधील ब्रॉडवेवर फे४ मध्ये पहिले चित्रपटगृह – कायनेटोस्कोप पार्लर – सुरू झाले, त्याला आता वीसेक वर्षे झाली होती. या काळात अमेरिकेत हळूहळू चित्रपट संस्कृती आकार घेऊ  लागली होती. तिकडे १९१४ मध्ये ऑस्ट्रियाचे आर्चडय़ुक फ्रान्झ फर्डिनांड यांच्या हत्येने युद्धाचा भडका उडालेला असतानाच अमेरिकेत चार्ली चॅप्लीन यांचा भटक्या चित्रपटातून अवतरला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी डी. डब्लू. ग्रिफिथ यांचा, आजच्या चित्रपटांचा पितामह शोभावा असा, द बर्थ ऑफ ए नेशन हा चित्रपट झळकला होता. सेसिल बी डिमेल यांचा जोन द वुमन (१९१६) प्रेक्षकांची गर्दी खेचत होता. जोन ऑफ आर्कच्या जीवनावर आधारलेला हा चित्रपट. पंधराव्या शतकातली ही फ्रेंच मुलगी. फ्रान्ससाठी लढली. शहीद झाली. नंतर तिला संतत्व बहाल करण्यात आले. या चित्रपटास सुरुवात होते ती महायुद्धात लढत असलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यापासून. त्याला आत्मघातकी मोहिमेवर पाठविण्यात येणार असते. त्याच्या मनाची चलबिचल सुरू असते. त्याला एका खंदकात एक तलवार सापडते. ती असते जोन ऑफ आर्कची. येथे तिची हकिकत फ्लॅशबॅकमधून येते. ती ऐकून तो मोहिमेवर जाण्यास तयार होतो. असा हा चित्रपट. फ्रान्स आणि ब्रिटन जर्मनीविरोधात लढत असताना या जोन ऑफ आर्कची जीवनकहाणी पडद्यावर आली हा योगायोग खरा. पण त्याचाही युद्धकालीन प्रोपगंडासाठी अतिशय खुबीने वापर करण्यात आला. लेस्ली डिबॉश यांच्या ‘रील पॅट्रॉईटिझम’ या पुस्तकानुसार, प्रारंभी या चित्रपटाची जाहिरात जोन ऑफ आर्कच्या स्त्रीत्वाभोवती केंद्रित होती. सुंदर तरुणी, तिचे पावित्र्य, तिचे नि:स्वार्थी बलिदान हे त्या जाहिरातीचे आवाहन होते. परंतु १९१७ मध्ये युद्धाचे ढग अमेरिकेवर घोंघावू लागले आणि जोन द वुमनच्या जाहिरातीमधील अलिप्ततावाद संपला. आता न्यू यॉर्क टाइम्समधील चित्रपटाच्या जाहिरातीतून सांगण्यात येऊ  लागले, की अमेरिकन रेड क्रॉस, नॅशनल गार्ड आणि सैनिकांसाठी या चित्रपटाच्या खेळादरम्यान खास जागा राखून ठेवण्यात येतील. अमेरिकेने युद्धाची घोषणा केल्यानंतर जाहिरातीचा नूर आणखी बदलला. त्याच्या पोस्टरवर शब्द आले – ‘तिने तिच्या देशाला विजय मिळवून दिला. तुम्ही तुमच्या देशासाठी काय करता आहात?’ आता तो महिलांनाही युद्धतयारीत सहभागी होण्याचे आवाहनही करीत होता.

नंतर तर या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन अमेरिकेत जोन ऑफ आर्कची भित्तिपत्रकेही तयार करण्यात आली. ‘तिने फ्रान्सला वाचविले, तुम्ही युद्धबचत तिकिटे विकत घेऊन अमेरिकेला वाचवा,’ असा संदेश त्यांतून देण्यात येत होता. अर्थात अशा प्रकारे राष्ट्रभक्तीची, युद्धखोरीची भावना जागविण्यासाठी या चित्रपटाचा वापर करण्यात आला, तरी तो काही खास त्यासाठी काढण्यात आला नव्हता. चित्रपट निर्मात्यांनी काळवेळ पाहून त्याला राष्ट्रभक्तीचा झगा चढविला. पण काहींनी मात्र स्वत:हून पुढे येत खास राष्ट्रभक्तीपर चित्रपट काढले. त्यासाठी चित्रपट उद्योगातील मान्यवरांनी एक समिती स्थापन केली होती. तिच्या अध्यक्षस्थानी होते ख्यातनाम दिग्दर्शक डी. डब्लू. ग्रिफिथ. चार्ली चॅप्लीन, डग्लस फेअरबँक्स, मेरी पिकफोर्ड, विल्यम हार्ट यांसारखे तारेही मागे नव्हते. ‘द ग्रेट लिबर्टी बाँड होल्ड अप’सारख्या चित्रपटांतून त्यांच्या ‘ब्रँड’चा वापर करण्यात येत होता. दुसरीकडे ‘द लिटल अमेरिकन’, ‘द हूण विदिन’, ‘द कैसर – द बीस्ट ऑफ बर्लिन’, ‘द क्लॉज ऑफ द हूण’ अशा चित्रपटांतून जर्मनीची क्रूर प्रतिमा अमेरिकी नागरिकांच्या मनावर ठसविली जात होती. पण या चित्रपटांनी जॉर्ज क्रील समाधानी नव्हते. त्यांनी मग युद्धपट काढण्यासाठी स्वतंत्र विभागच स्थापन केला. त्याचे नाव डिव्हिजन ऑफ फिल्म्स. (आपल्याकडील फिल्म्स डिव्हिजनप्रमाणेच) या विभागातर्फे सुमारे ६० माहितीपट आणि चित्रपट तयार करण्यात आले. त्यात त्यांना साहय़ केले अमेरिकी लष्कराच्या सिग्नल कोअरने. ते त्यांचे अधिकृत फिल्म युनिट होते. त्यांनी चित्रित केलेली लढाईची खास दृश्ये ‘अमेरिकाज आन्सर’, ‘अवर कलर्ड फायटर्स’ यांसारख्या समितीच्या चित्रपटांत वापरण्यात आली होती. पण समितीचे हे चित्रपट आणि हॉलीवूडने तयार केलेले चित्रपट यांत एक खास फरक होता.

ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय माहितीसंप्रेषण या विषयातील तज्ज्ञ फिलिप टेलर यांच्या मते, समितीच्या चित्रपटांपेक्षा हॉलीवूडचे चित्रपट हे अधिक प्रचारी होते! याचे उदाहरण म्हणून ख्यातकीर्त दिग्दर्शक सेसिल बी डिमेल यांच्या ‘द लिटल अमेरिकन’कडे पाहता येईल. एक तरुणी (मेरी पिकफोर्ड) आपल्या आजारी मावशीला भेटण्यासाठी फ्रान्सला चाललेली असते. प्रवासात तिच्या जहाजावर पाणक्षेपणास्त्र डागण्यात येते. ते दुसरे कोण डागणार? अर्थातच जर्मन नौसैनिक. ती कशीबशी फ्रान्समध्ये पोहोचते. तेथे तिला दिसतात ते जर्मनांचे अत्याचार. ते पाहून ती फ्रेंचांसाठी हेरगिरी करू लागते. मग तिला अटक होते. जर्मन सैनिक तिला गोळ्या घालून मारणार एवढय़ात तिची सुटका केली जाते. अशी या चित्रपटाची कथा. पांढऱ्या आणि काळ्या रंगातली. जर्मनांची क्रूर हूण अशी साचेबद्ध प्रतिमा पुन:पुन्हा उजागर करणारी. भावनेला भिडणारी. प्रेक्षकांना स्वत:बरोबर वाहत नेणारी.

चित्रपटाच्या स्वरूपातच हे अंगभूत सामथ्र्य आहे. एक तर तो पाहण्यासाठी अक्षरओळखीची आवश्यकता नसते. ती चलत्चित्रे कोणासही समजू शकतात. शिवाय त्या चित्रचौकटीत एकदा अडकले की प्रेक्षकाला बुद्धीने विचार करताच येत नाही. त्या वेगात त्याला तेवढा अवधीच मिळत नसतो. ती चित्रे, त्यांबरोबरचे संगीत, शब्द, प्रकाशयोजना, त्यांसाठी वापरलेले खास परिणाम हे सारे थेट छेडत असते त्याच्या भावनांच्या तारा. त्यातून प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशांमधून त्या भावना हव्या तशा घडवता येतात. एवढेच नव्हे, तर व्यक्तीचे सामाजिक वर्तनही बदलता येऊ  शकते आणि ते केवळ चित्रपटांतील तारेतारकांच्या वेश-केशभूषेचे अनुकरण एवढय़ापुरतेच मर्यादित नसते. मुळात चित्रपटांतून, दूरचित्रवाणी मालिकांतून आपल्यासमोर उभे केले जात असते ते पर्यायी वास्तव – आल्टरनेटिव्ह रिअ‍ॅलिटी.  डॉ. मिशेल पॉट्झ या हेच सांगतात, की चित्रपटांतून केवळ मनोरंजनच होत नसते. त्यापलीकडे त्यात खूप काही असते. त्यातून अनेक प्रकारचे संदेश प्रसारित केले जात असतात.

पण असे पर्यायी वास्तव उभे करण्यासाठी वा प्रोपगंडासाठी प्रचारतज्ज्ञ केवळ चित्रपटांच्या पडद्याचाच वापर करतात असे नाही. ज्याचे काम वस्तुस्थिती मांडणे हे असते, त्या वृत्तमाध्यमांचाही त्यासाठी वापर केला जात असतो. क्रील समितीने पहिल्या महायुद्धात तेही केले होते..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com