untitled-21

प्रोपगंडाचा पहिला नियम हा आहे की तो प्रोपगंडा वाटता कामा नये. एडिथ कॅव्हेल ही ब्रिटिश परिचारिका होती व  जाज्वल्य राष्ट्रभक्तीने सैनिकांना मदत करीत होती. मग जर्मन न्यायालयाने तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. हे संपूर्ण प्रकरण अगदी सरळसोट, वस्तुस्थितीला धरून वाटते. पण ते तसे नव्हते..

a bride made Mehndi QR Code on the hand to get wedding gift video goes viral shared by Google
लग्नाचा आहेर घेण्यासाठी नवरीचा जुगाड! मेहंदीने हातावर कोरला QR Code, गुगलने शेअर केला व्हिडीओ
Patient Sexually Harassed Indian Nurse She Shuts Him Down Saying I love India Vulgar Remarks Make Netizens Angry Over Viral Video
“भारत बेडवर चांगला नाही, जर मी..”, नर्ससमोर अश्लील भाषेत बोलणाऱ्या रुग्णाचा Video व्हायरल; नर्सने शेवटी..
Brother crying at her sister wedding bidai
VIDEO : “..आणि मला माफ कर..” बहिणीला निरोप देताना भाऊ ढसा ढसा रडला, सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट, व्हिडीओ व्हायरल
Kitchen Jugaad Video
Jugaad Video: बटाटा सिलिंडरला एकदा घासून पाहा; ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका

माध्यमे बातम्या देतात. या बातम्यांचेही एक तंत्र असते. ते असते कहाण्यांचे. म्हणून तर बातमीला ‘न्यूजस्टोरी’ म्हणतात. आणि कोणत्याही कहाणीत महत्त्वाची असते ती भावना. भावना नसेल, तर बातमी रूक्ष, शुष्क होते. ती भावना केव्हा येते, तर जेव्हा त्या बातमीला मानवी चेहरा असतो. आकडय़ांना तो नसतो. कंबोडियात पोल पॉटने १५ लाख लोकांची हत्या केली. या बातमीतून वस्तुस्थिती समजते. पण ती काळजाला भिडत नाही. त्याकरिता अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये एक तंत्र अवलंबिले जाते. कहाणी १५ लाखांचीच सांगायची असते, ती आकडेवारी द्यायचीच असते, पण ती एका मनुष्याच्या दु:ख-वेदना-संकटांच्या माध्यमातून सांगितली जाते. ती एक व्यक्ती तशा हजारोंची प्रतिनिधी म्हणून समोर आणली जाते. लोक तिच्याशी स्वत:ला भावनिकदृष्टय़ा जोडून घेऊ  शकतात. जे बातमीचे तेच प्रोपगंडाचे – प्रचाराचे. प्रचारात भावना तर केंद्रस्थानीच असतात. तो भावनांशीच खेळत असतो. प्रचारातील या कथाकथन तंत्राचा सर्वोत्तम वापर पाहायला मिळतो, तो पहिल्या महायुद्धाच्या काळातील एडिथ कॅव्हेल प्रकरणात.

एडिथ कॅव्हेल ही ब्रिटिश परिचारिका होती. ब्रसेल्समधील बर्केडेल मेडिकल इन्स्टिटय़ूटमध्ये ती काम करीत असे. जर्मनांनी बेल्जियमवर आक्रमण केले. अशा युद्धकाळात परदेशी नागरिक गाशा गुंडाळून मायदेशी परततात. एडिथही परतू शकत होती. परंतु ती तेथेच थांबली. लवकरच तिचे इस्पितळ रेड क्रॉसचे रुग्णालय बनले. जखमी सैनिक तेथे भरती होऊ  लागले. त्यांत जर्मन सैनिक होते, तसेच बेल्जियम, फ्रेंच आणि ब्रिटिश सैनिकही होते. मनातील राष्ट्रभक्ती तिला हे सारे मूकपणे पाहू देत नव्हती. बऱ्या झालेल्या सैनिकांना जर्मनांच्या तावडीतून पळून जाण्यास मदत करण्यास तिने सुरुवात केली. संपूर्ण ब्रसेल्समध्ये तेव्हा जर्मनांनी भित्तिपत्रके लावली होती. जो कोणी इंग्रज वा फ्रेंच सैनिकांना आपल्या घरात आश्रय देईल, त्याला कडक शासन केले जाईल, असा इशारा त्यात देण्यात आला होता. पण एडिथने त्याची पर्वा केली नाही. तिने इस्पितळातच एका खोलीत जर्मनांच्या तावडीतून निसटलेल्या सैनिकांना आसरा देण्यास सुरुवात केली. त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देऊन निसटून जाण्यास ती सा करू लागली. अशा शेकडो सैनिकांना तिच्यामुळे पळून जाता आले. हे जर्मन गुप्तचरांच्या नजरेतून सुटणे अशक्य होते. अखेर ती पकडली गेली. तिच्यावर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सरकार त्याबाबत काहीच करू शकत नव्हते. अमेरिकेने मात्र जर्मनीवर राजनैतिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. खुद्द एडिथ स्वत:च्या बचावाचा कोणताही प्रयत्न करीत नव्हती. तिने गुन्हा कबूल केला होता. त्याबद्दल जर्मन न्यायालयाने तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. १२ ऑक्टोबर १९१५ रोजी तिला लष्कराच्या ‘फायरिंग स्क्वॉड’ने गोळ्या घालून ठार केले.

तिच्या या ‘हौतात्म्या’च्या बातमीने ब्रिटनमध्ये प्रचंड खळबळ माजली. लोक प्रक्षुब्ध झाले. ते स्वाभाविकच होते. अखेर ती ब्रिटिश होती. तिचे वडील व्हिकार – धर्मगुरू – होते. मोठय़ा धैर्याने ती आपले कर्तव्य बजावत होती. जाज्वल्य राष्ट्रभक्तीने सैनिकांना मदत करीत होती. तेही शत्रूच्या नाकावर टिच्चून. तिचे हे शौर्य लोकमानसास भिडले नसते तर नवलच. ‘देव, देश आणि वैद्यकीय धर्मा’साठी लढणारी एडिथ म्हणजे ब्रिटिशांच्या दृष्टीने आधुनिक जोन ऑफ आर्क ठरली होती. वृत्तपत्रांतून तिची तशी प्रतिमा रंगविण्यात येत होती. अशा व्यक्तीला मारणारे जर्मन सैनिक सैतानी अवतार ठरले होते. एडिथ म्हणजे ‘स्त्रीत्वाचे थोर आणि उज्ज्वल उदाहरण. तिच्या हत्येचे जर्मन सैनिकांचे रानटी कृत्य पाहून प्रत्येकाच्या मनात घृणा निर्माण झालीच पाहिजे,’ अशा शब्दांत ‘शेरलॉक होम्स’कार आर्थर कॉनन डॉयल यांनी आपली भावना व्यक्त केली होती. या घटनेनंतर दहा दिवसांनी ‘मँचेस्टर गार्डियन’च्या मुख्य बातमीचा मथळा होता – ‘नर्स एडिथची क्रूर हत्या’. एकंदर हे सर्व स्वाभाविकच वाटते. मग यात प्रचाराचा, भावना भडकावण्याचा प्रश्न येतोच कुठे?

प्रोपगंडाचा हा पहिला नियम आहे की तो प्रोपगंडा वाटता कामा नये. वरवर पाहता एडिथ कॅव्हेलचे संपूर्ण प्रकरण अगदी सरळसोट, वस्तुस्थितीला धरून वाटते. पण ते तसे नव्हते. एडिथ ही परिचारिका होतीच. पण परिचारिकेच्या वेशातील ती गुप्तहेरही होती. एमआय-फाइव्ह या ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेच्या माजी महासंचालक डेम स्टेला रेमिंग्टन यांनी या प्रकरणाचे संशोधन करून काढलेल्या निष्कर्षांनुसार, लपलेल्या सैनिकांना ब्रिटनमध्ये परत धाडणे हे तिचे मुख्य ध्येय होते, पण तिची संघटना दोस्तराष्ट्रांसाठी हेरगिरीही करीत होती. एडिथच्या चरित्रकार डियाना सौहामी यांच्या म्हणण्यानुसार, तिला मारण्यात आल्यानंतर तिचे आपल्याशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे पुढे येऊ  नयेत यासाठी एमआय-फाइव्ह प्रयत्नशील होती आणि त्यात ती अत्यंत यशस्वी ठरली. एडिथ कॅव्हेलचे हे रूप त्या काळात लोकांसमोर आलेच नाही. समोर आली ती जर्मन क्रौर्याची ‘निष्पाप बळी’ अशी प्रतिमा.

स्वत: एडिथने दिलेल्या कबुलीनंतर जर्मनीने तिला मृत्युदंड देणे हे त्या युद्धकाळात बेकायदेशीर नक्कीच नव्हते. एका स्त्रीला मारले म्हणून लोक संतापले म्हणावे, तर पुढे १९१७ मध्ये माताहारी या आपल्या भूमिकेच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेटा झेल्ला हिला हेरगिरीच्या गुन्ह्यबद्दल फ्रेंचांनी ठार मारले तेव्हा कोठेही संतापाची लाट उसळली नव्हती. जर्मन प्रचारतज्ज्ञांनाही त्याचा वापरच करता आला नव्हता. पहिल्या महायुद्धातील जर्मन प्रोपगंडावर हिटलर टीका करीत असे, ते उगाच नाही.

ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांनी मात्र कॅव्हेल प्रकरणाचा सुरुवातीपासूनच मोठय़ा खुबीने वापर करून घेतला. त्या प्रचाराचे दोन हेतू होते. एक म्हणजे ब्रिटिश जनतेत सूडभावना जागवून सैन्यभरती कार्यक्रमास वेग देणे आणि दुसरा – अमेरिकी नागरिकांना युद्धप्रवृत्त करणे. या दोन्हींतही त्यांना यश आले. कॅव्हेलच्या मृत्यूनंतर ब्रिटिश तरुण मोठय़ा प्रमाणावर सैन्यात भरती होऊ  लागले. अमेरिकेत भित्तिचित्रे, टपालकार्डे, वर्तमानपत्रे अशा विविध माध्यमांतून कॅव्हेल प्रकरण लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

कशा प्रकारचा होता हा प्रचार? जर्मन सैन्याने आतापर्यंत किती हजार सैनिकांना, नागरिकांना कंठस्नान घातले हे सांगण्याहून अधिक परिणामकारक ठरेल, भावनांना भिडेल, ती एका निष्पाप, अबलेस जर्मन सैनिकांनी कशा प्रकारे ठार केले याची कहाणी, हे ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांना माहीत होते. एडिथला फायरिंग स्क्वॉडसमोर नेण्यात आले. पण समोर मृत्यू दिसत असूनही तिने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेण्यास नकार दिला. परिचारिकेच्या वेशातच ती उभी राहिली. पण अबला स्त्री ती. त्या ताणाने तिला चक्कर आली. बेशुद्ध पडली ती. पण जर्मन अधिकारी असे क्रूर की बेशुद्धावस्थेत ती खाली पडली असतानाच, त्यांनी अगदी जवळून तिच्या डोक्यात गोळी घातली. अशी ही कहाणी प्रसिद्ध करण्यात आली. हे सर्व खोटे होते. फार काय, तिचे शेवटचे उद्गारही विकृत स्वरूपात मांडण्यात आले होते. तिला ठार मारले त्याच्या आदल्या रात्री एक धर्मगुरू तिला भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी बोलताना ती म्हणाली, ‘केवळ राष्ट्रभक्ती पुरेशी नाही. माझ्या मनात कोणाहीबद्दल द्वेष वा कडवटपणा असता कामा नये.’ ही झाली ‘अधिकृत’ माहिती. वस्तुत: तिचे उद्गार होते – ‘केवळ राष्ट्रभक्ती पुरेशी नाही. केवळ आपल्याच माणसांवर प्रेम करणे पुरेसे नसते. आपण सर्वावर प्रेम केले पाहिजे, कोणाचाही द्वेष करता कामा नये..’ पण अतिरेकी देशभक्तीच्या व्याख्येत हे प्रेम वगैरे बसत नसते. तेव्हा जाणीवपूर्वक खोटय़ा कथा पसरविण्यात आल्या आणि सर्वाचा त्यावर विश्वास बसला. देशभक्ती आणि धर्म अशा प्रचारास बळ देणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी कहाणीत असल्यानंतर हे होणारच होते. ते आजही घडते आहे.

प्रचारतंत्राचा वापर करून व्यक्तींची मिथके तयार केली जातात. त्यातून हव्या त्या प्रकारच्या भावनांना फुंकर घातली जाते. असा प्रचार सतत सुरूच असतो. इराक युद्धाच्या काळात असेच झाले होते. आठवतेय ती कहाणी? जेसिका लिंच हिची कहाणी?..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com