प्रतिभा राय

त्यांना लोक कादंबरीकार म्हणून ओळखतात, पण त्यांचे पहिले प्रेम अर्थात कविता हेच आहे. स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडताना त्यांनी अनेकदा लेखणीच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. थोडक्यात त्या सामाजिक भान असलेल्या लेखिका आहेत, त्यांच नाव प्रतिभा राय.

त्यांना लोक कादंबरीकार म्हणून ओळखतात, पण त्यांचे पहिले प्रेम अर्थात कविता हेच आहे. स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडताना त्यांनी अनेकदा लेखणीच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. थोडक्यात त्या सामाजिक भान असलेल्या लेखिका आहेत, त्यांच नाव प्रतिभा राय. ओडिशा राज्यातील या आघाडीच्या कादंबरीकार व कथालेखिकेला ज्ञानपीठ पुरस्काराचा सन्मान लाभला आहे. एकदा त्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या तेव्हा त्यांच्याबरोबर एक श्वेतवर्णी महिला होती, ती महिला कुणी परदेशी असावी या समजातून तेथील पुजाऱ्यांनी तिला हटकले, त्यानंतर प्रतिभाताईंचा जो पारा चढला , त्यांनी तिथल्या पांडांशी बराच वाद घातला पण ते दगडावर डोके आपटण्यासारखे होते. त्यांचे मन त्यामुळे अस्वस्थ होते. त्यांनी लेखणीचे हत्यार उपसले व ‘धरमारा रंग काला’ (धर्माचा रंग काळा) हा लेख एका प्रतिष्ठित उडिया वृत्तपत्रात लिहिला, त्यामुळे या सगळ्या घटनेकडे राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले गेले. जगन्नाथ हा काही केवळ मोजक्या लोकांची मक्तेदारी असलेला देव नाही असे त्यांनी सांगितले. साहित्यिक म्हणून त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ संख्या नव्हे तर गुणवत्ताही प्रशंसनीय आहे. त्यांनी एकूण २० कादंबऱ्या व २२ कथासंग्रह लिहिले. त्यांच्या ‘शील पद्म’ व ‘जगयासेनी’ या दोन कादंबऱ्या विशेष गाजल्या. ‘शीलपद्म’ ही कोणार्क मंदिराशी संबंधित लोककथांवर आधारित कादंबरी आहे तर जगयासेनीमध्ये महाभारतातील द्रौपदीच्या व्यक्तिरेखेचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. त्यांच्या अरण्य, पुण्यतोय, नीलतृष्णा, शीलपद्मा, जगयासेनी, उत्तरामार्ग, आदिभूमी,महामोह या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. सामान्य कथांना, श्रेष्ठ गल्पा, पृथक ईश्वर, भागाबनारा देश, मनुष्य स्वर, सास्था सती, मोक्ष, उल्लंघन हे त्यांचे कथासंग्रह आहेत. पेशाने प्रतिभा या शिक्षिका आहेत. ओरिसा सरकारच्या शिक्षण खात्यात त्या प्राध्यापक होत्या व नंतर त्या ओरिसा लोकसेवा आयोगाच्या सदस्य बनल्या. ओडिशातील बोंडा जमातीच्या लोकांवर त्यांनी बरेच संशोधन केले असून त्यासाठी त्या प्रत्यक्ष त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन राहिल्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली तेव्हापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द आजतागायत सुरू आहे, त्यांना यापूर्वी भारत सरकारचा पद्मश्री सन्मान, मूर्तीदेवी पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे पण  त्यावर ज्ञानपीठ पुरस्काराने नक्कीच त्यांच्या कामगिरीवर मानाचा तुरा खोवला गेला आहे. या प्रवासात त्यांचे पती अक्षयचंद्र राय यांची त्यांना तितकीच मोलाची साथ आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pratibha rai

ताज्या बातम्या