राज्यातील शाळांमध्ये अध्यापनाचे काम करणारे ६० हजार शिक्षक अतिरिक्त असल्याचे कारण पुढे करीत शारीरिक शिक्षण आणि चित्रकला या विषयांच्या विशेष शिक्षकांच्या नेमणुकीला नकारघंटा दाखवणारे शिक्षण खाते अवलक्षणी आहे, यात शंका नाही. उद्या, १४ ऑगस्टपासून या विषयाच्या शिक्षकांनी अध्यापनाचे काम न करण्याचे ठरवले असले, तरी शिक्षण खात्याचे त्याकडे लक्ष जाण्याची सुतराम शक्यता नाही. शिक्षण खात्यात भरती झालेल्या सगळय़ा अधिकाऱ्यांची प्रवृत्ती कारकुनी असल्यामुळे, शिक्षण आणि ज्ञान वगैरे गोष्टींचा वैश्विक पसारा समजण्याची पात्रता त्यांच्या अंगी नाही. गेली दोन वर्षे या विशेष शिक्षकांच्या नियुक्त्या त्यामुळेच रखडवण्याचे धैर्य या अधिकाऱ्यांना दाखवता आले. शिवाय त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांनाही या विषयात फारसे गम्य नाही. काय शिकवायचे आणि कसे शिकवायचे याबाबत प्रगत देशांमध्ये जी चढाओढ आहे, ती उघडय़ा डोळय़ांनी दिसत असतानाही त्यांना त्यातून काही बोध होत नाही. जग ज्या गतीने विकसित पावते आहे, ती गती पकडण्याची ऊर्मीच आपल्या शिक्षण खात्याकडे नाही, हे या प्रकारच्या वागण्याने पुन:पुन्हा सिद्ध होते. खासगी शिक्षण संस्थांना वाटेल तशी परवानगी द्यायची आणि तेथील शिक्षक भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार उघडय़ा डोळय़ांनी बघत राहायचा, हेच या विभागाचे काम झाले आहे. राज्यात पटपडताळणी झालीच नसती तर शिक्षक भरतीमधील सगळे घोटाळे सहजपणे दाबले गेले असते. दर ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे सूत्र मान्य करताना एकूण विद्यार्थी भागिले शिक्षकसंख्या असे त्रराशिक मांडून शिक्षक अतिरिक्तठरवणे हा मूर्खपणा आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण आणि चित्रकला या विषयांच्या शिक्षकांवरही गदा आली. आपल्या निर्णयाचा कोणत्या घटकांवर काय परिणाम होईल, याचा विचार करण्याचे भान शिक्षणाधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे मुलांना आयुष्यात काय उपयोगी पडणार आहे, याबद्दल त्यांना चाड असण्याचे कारण नाही. गेल्या शैक्षणिक वर्षांत माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण १६ टक्के असल्याचा अहवाल शासनाच्याच माहिती यंत्रणेने दिला आहे. हे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षाही जास्त आहे. गेल्या वर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही भरीव वाढ झालेली नाही. सगळय़ा योजना कागदावरच उतरवणाऱ्या शिक्षण खात्याला आणि त्यांना आशीर्वाद देणाऱ्या मंत्र्यांना शिक्षण कशाशी खातात, हेच माहीत नसल्याचा हा परिणाम आहे. माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमात चित्रकला, हस्तकला, संगीत, शारीरिक शिक्षण यांसारखे विषय अत्यावश्यक असायला हवेत. पण त्याकडे नेहमी हेटाळणीच्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळेच आरोग्य आणि कला यांचा संबंध जीवनशैलीशी असतो आणि जगण्यासाठी हे शिक्षणसंस्कारही आवश्यक असतात, हे या खात्याला पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे. शिक्षण हक्ककायद्यातील तरतुदींचा अर्थ चुकीचा लावण्यात आल्याने या विषयाच्या शिक्षकांच्या नेमणुका थांबवण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटना करीत आहेत. मात्र त्यांच्या या आंदोलनाकडे लक्ष देण्याएवढा समंजसपणा अधिकाऱ्यांकडे कितपत असेल, याबद्दल शंकाच आहे. जगण्यातील सौंदर्य समजावून सांगणारे चित्रकलेसारखे विषय आणि जीवन संपन्न होण्यासाठी शरीरसंपदेकडे लक्ष पुरवण्याची आवश्यकता सांगणारा शारीरिक शिक्षणाचा विषय शिक्षण खात्यानेच ‘पर्यायी’ ठरवले असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य किती उज्ज्वल असेल, हे सांगायला नको. अशा परिस्थितीत या विशेष शिक्षकांच्या बरोबरीने मुख्य प्रवाहातील शिक्षकांनीही या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.