देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे। तरी परिपूर्ण सहजें। जाहलें जाण।। आदिपुरुषाला सर्व कर्मे अर्पण केली की ती सहज परिपूर्ण होतात. नंतर त्या कर्माची साखळी उरत नाही, हे ‘परिपूर्ण’ या शब्दातूनच स्पष्ट होतं. अर्थात त्या कर्मापुरतं समस्त प्रारब्ध संपून जातं. मग अशी सर्वच कर्मे, नव्हे सर्वच प्रारब्ध जर त्या आदिपुरुषाला अर्पण करता आलं, तर ते उरणार नाही. अर्पण करणं म्हणजे त्याच्या चिंतनात, त्याच्या इच्छेनुसार ते कर्म करणं. मग प्रश्न असा की हा ‘आदिपुरुष’ कोण? गेल्या भागाच्या अखेरीस ज्या दोन ओव्या नमूद केल्या त्यात या ‘आदिपुरुषा’चा उल्लेख आहे. ‘ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ आणि ‘किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिहीं लोकी। भजिजो आदिपुरुषीं। अखंडित।।’ यातली एक ओवी ज्ञानेश्वरीच्या अगदी प्रारंभी आहे. तिचा अर्थ असा की, जो ॐकारस्वरूप आहे, आद्य अर्थात आधीपासूनचा आहे, वेदांनीही ‘नेति नेति’ म्हणून ज्याचं वर्णन केलं आहे, अर्थात वेदांनाही ज्याचं स्वरूप ओळखता आलं नाही असा जो स्वसंवेद्य आहे आणि जो आत्मरूपानं माझ्या अंतरंगात व्याप्त आहे अशाला माझं नमन असो. त्याचाच जयजयकार असो. आता असा कोण आहे? तर तो श्रीसद्गुरूच आहे. याचाच अर्थ ‘आदिपुरुष’ हा श्रीसद्गुरूच आहे. नाथपंथानुसारही ‘आदिनाथ गुरू’च आहे! मग पसायदानातही त्यांचाच उल्लेख आहे. हे पसायदानही मागितलं ते विश्वेश्वराकडे. अर्थात सद्गुरूकडेच. त्यात हे दिव्य मागणं आहे की, सर्व प्राणिमात्र सुखी होवोत आणि आदिपुरुषाच्या अर्थात हे सद्गुरो, तुमच्या अखंड स्मरणात ते मग्न होवोत. मग अशा ‘आदिपुरुषा’ला समस्त प्रारब्ध अर्पण केलं की ते उरत नाही, ते पूर्णत्वास जातं, याचा अर्थ काय? नाथांनीही अगदी स्पष्टपणे ही गोष्ट सांगितली आहे- ‘एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। हरिकृपे त्याचा नाश झाला।।’ हरी म्हणजे हरण करणारा. माझ्या समस्त भवदु:खांचं जो हरण करणारा हरी सद्गुरूच आहे. त्या एकामध्ये जेव्हा मी एकरूप होईन तेव्हा त्यांची सहजकृपा लाभेल आणि त्या हरिकृपेनं प्रारब्ध भोगाचा नाश होईल! देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे। तरी परिपूर्ण सहजें। जाहलें जाण।। आता सद्गुरूला प्रारब्धकर्म अर्पण करण्यामागचा हेतू काय, याचा थोडा विचार करू. माझं आजचं जीवनकर्म हे प्रारब्धानुसार माझ्या वाटय़ाला आलं आहे, हे आपण मागेच पाहिलं. माझ्या आजच्या प्रयत्नांनी त्या प्रारब्धात बदल होऊ शकतो तसंच नवं प्रारब्धदेखील तयार होऊ शकतं! माझे प्रयत्न जर सुयोग्य, निरासक्त, कर्तव्यापुरते असतील तरच आजचं प्रारब्ध हे सुसह्य़, सोयीचं, कमी-अधिक होऊ शकतं. हे योग्य प्रयत्न म्हणजे, सद्गुरूंच्या इच्छेनुसार, आज्ञेनुसार, बोधानुसार कर्मरत राहणं. पण हेच प्रयत्न अयोग्य असतील म्हणजेच फळाच्या इच्छेनं, आसक्त भावानं, ‘मी’पणानं झाले तर त्याच कर्मातून नवं प्रारब्धही निर्माण होऊ शकतं. आजवर हेच झालं आहे. ही कर्मप्रारब्धाची साखळी तोडायची तर आदिपुरुषाला समर्पित व्हावंच लागेल.
    ल्ल चैतन्य प्रेम