रवींद्र महाजन auraent@gmail.com

पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी ग्रथित केलेल्या एकात्म मानववादाशी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी हे थेट संबंधित नसले तरी अखेर भारतीय उपखंडातील समाजविषयक वैचारिकतेची पार्श्वभूमी हा या साऱ्यांतील समान दुवा आहे..

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

‘समाजविचार’ संज्ञेत व्यक्ती व समाज, त्यांचे परस्परसंबंध व सर्वाच्या कल्याणासाठी समाजव्यवस्था यांचा विचार होतो. हे करताना एकात्म मानव दर्शनात संस्कृती, धर्म, समाजपरिवर्तन, सर्वागीण विकास आदींचाही समग्र दृष्टीतून परामर्श घेतला जातो. पुढे काही प्रमुख पैलूंचा विचार थोडक्यात मांडला आहे.

समाजधारणा : समाजधारणेमध्ये समाज संघटन, रक्षण, संवर्धन, उन्नयन असे सर्व पैलू अंतर्भूत आहेत. निकोप समाजधारणेसाठी ‘अध्यात्माधारित व्यक्तिजीवन व धर्माधिष्ठित समाज’ हे सूत्र महत्त्वाचे आहे. धर्म व ‘रीलिजन’ यांच्या गल्लतीमुळे व जडवादाच्या प्राबल्यामुळे धर्माबद्दल चुकीच्या समजुती आहेत. धर्माचा शाश्वत भाग म्हणजे मानवांच्या हिताची व उन्नत जीवनव्यवहाराची मार्गदर्शक तत्त्वे, मूल्ये. धर्मजीवन म्हणजे उदात्त मूल्यांनुसार वैयक्तिक व समाजजीवनाची आखणी करणे व देश, काल परिस्थितीप्रमाणे ती जीवनात उतरवणे, हा आचारधर्म परिवर्तनीय असतो.

भारतीय परंपरेनुसार राष्ट्र वा समाज हे जीवमान एकक आहे, ते स्वयंभू म्हणजे स्वत:हूनच अस्तित्वात आले असून काही लोक वा गटांद्वारा निर्मित नाही. माणसात संघप्रवृत्ती निसर्गत:च असते. नैसर्गिक कारणांनी वा स्वेच्छेने व्यक्ती एकत्र येऊन निर्माण झालेली समाजरचना म्हणजे समाज-संघटन. उदा. कुटुंब, कुल, ग्राम.

पुरुषार्थचतुष्टय़ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) हा जीवनोद्देश. सुख-समृद्धीसाठी प्रयत्न करणे योग्यच; पण आंतरिक समाधान व व्यापक समाजहित यांना बाधा न येऊ देणे ही सुख-समृद्धीच्या हव्यासाला मर्यादा घातली आहे.

आदर्श समाजासाठी प्रयत्न करीत असताना आदर्श व्यक्ती व आदर्श कुटुंब यांचा विचार हवा.

आदर्श व्यक्ती

कानपूर येथील भाषणात परिपूर्ण मानवाचे चित्र श्रीगुरुजींनी (दिवंगत सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी) रेखाटले आहे: ‘‘आपल्यात असलेले अनेक गुणावगुण आणि विचार उत्तम प्रकारे नियंत्रित करून मानसिक सुव्यवस्था निर्माण करणे, व धर्माला आपल्या जीवनाचा आधार मानून त्या अनुरूप अर्थ व काम यांची आपल्या जीवनातील व्याप्ती निश्चित करून अंतिम उद्दिष्टाची नित्य उपासना करीत राहून जो चौथा म्हणजेच शेवटचा मोक्ष-पुरुषार्थ आहे, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हेच मनुष्यजीवनाचे संपूर्ण स्वरूप आहे. हीच परिपूर्ण मानवाची कल्पना आहे. अर्थ व काम हे दोनच पुरुषार्थ जीवनात असलेला मानव अपूर्ण व विदीर्ण आहे. समाजाची धारणा व व्यवस्था यांना आच लागू नये अशा प्रकारचे गुण असलेला, समाजात विकृती उत्पन्न होणार नाही इतक्याच प्रमाणात अर्थोपार्जन आणि कामोपभोग यांचे भान राखणारा, संयमित व एकाग्रचित्ताने मनाला योग्य वाटते त्या कोणत्याही प्रकारच्या उपासना पद्धतीचे किंवा संप्रदायाचे अवलंबन करणारा, ईश्वराच्या कोणत्याही मूर्तीची उपासना करून अंतिम लक्ष्यरूप चतुर्थ पुरुषार्थ प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारा मानव हाच परिपूर्ण मानव आहे.’’  

आदर्श कुटुंब

कुटुंबहितातच माझेही हित ही खात्री, आवश्यक तेव्हा स्वहितापेक्षा कुटुंबहितास प्राधान्य, कुटुंबसदस्यहितासाठी झटणे, कुटंबातील प्रेमळ वातावरण, मिळून आनंदाने कामे करणे, अशा कुटुंबभावनेने ओतप्रोत कुटुंबास आदर्श कुटुंब म्हणता येईल. कवी कालिदासाने गृहस्थाश्रमाला ‘सर्वोपकारक्षम’ म्हटले आहे. एकत्र कुटुंबात व्यक्तिमत्त्व विकास सहज होत असे. शहरी संस्कृतीत आज एकत्र कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाली आहे. मुलांचे मन आनंदी, विशाल व निर्भय व्हावे यासाठी तसेच प्रेम, दया, स्वार्थत्याग यांचे संस्कार त्यांच्या मनावर करण्यास गृह हे सर्वोत्कृष्ट स्थान व साधन आहे. म्हणून कुटुंबाचे सुदृढीकरण आवश्यक आहे.

ग्रीक संस्कृतीने आपल्या संस्कृतीचा असा अंत का झाला याचा शोध घेतला तेव्हा त्यांना असे आढळले की, देशातली कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाल्याने आपली संस्कृती लयाला गेली आणि भारतीय संस्कृती टिकली कारण भारताने कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवली.

हिंदू परंपरेत स्त्रियांकडे मुख्यत: आदिशक्ती-मातृस्वरूपात पाहिले आहे. वेद-उपनिषद आदी ग्रंथांतून स्त्रियांचे स्थान अत्यंत सन्माननीय, आदरणीय असे होते. या काळातील स्त्रियांमध्ये तत्त्वज्ञानी, खगोलशास्त्री, योद्धा, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेल्या, गुरुकुल चालविणाऱ्या, कृषितज्ज्ञ, गणिती अशा स्त्रिया आढळतात. परंतु नंतर प्रत्यक्ष समाजव्यवहारात पुरुषप्रधानता वाढली. स्त्री व पुरुष दोघेही आपापल्या परीने अपूर्ण आहेत तेव्हा जीवनाच्या परिपूर्णतेच्या, साफल्याच्या दृष्टीने सामंजस्याच्या व सहकार्याच्या पायावर दोघांनी सहजीवन विकसित करणे आवश्यक आहे. कुटुंबातील घरकाम, अपत्यसंगोपन व इतर बाबतीत श्रमविभाजन हे परस्परानुकूलतेतून व सामायिक जबाबदारीच्या आवश्यकतेतून झाले पाहिजे.

आदर्श समाज

व्यष्टी व समष्टी (व्यक्ती व समाज) यांचा परस्परपूरक विकास होणे व त्यातून संपूर्ण मानव-जीवनात एकात्म भावाची सहज निर्मिती होऊन, हे जीवन सृष्टीसंवादी राहून सुखी होणे व त्याची वाटचाल परमेष्ठीकडे सुरू होणे असा आदर्श समाज हवा. फार प्राचीन काळच्या आदर्श समाजाचे चित्र : न राज्यं न च राजा  रर सीत् न दण्डय़ो न च दाण्डिक:। धर्मेणव प्रजास्सर्वा रक्षन्ति स्म परस्परम्।। (तेव्हा राज्य नव्हते, राजा नव्हता, गुन्हेगारच नसल्याने शिक्षाही नव्हती; धर्माप्रमाणे वागून सर्व जण परस्परांचे रक्षण करत होते.)

स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की, आदर्श समाजव्यवस्थेत आद्य शंकराचार्याचा अद्वैताचा विचार समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचवून समता प्रस्थापित करावयाची आहे. विश्वबंधुत्व, स्वातंत्र्य, सर्वाना समान संधी, समाजातील सर्व थरातील व्यक्तींचा विकास, आचारस्वातंत्र्य हे महत्त्वाचे विषय आहेत. विषमतेला, विशेष हक्कांना मुळीच स्थान नाही.

व्यक्ती-समाज परस्परसंबंध

आपली जीवनदृष्टी व्यक्ती-कुटुंब-समाज हा संबंध अवयव-अवयवी या स्वरूपात पाहते.  साधारणपणे व्यक्तीचे जीवन समाजावरच अवलंबून असते. तिच्या जीवनातील सर्व अंगांचा विकास समाजात राहूनच शक्य आहे. तसेच  सर्वात्मक अंशामुळे अस्तित्वाच्या व्यापक व उन्नत पातळीशी एकरूप होण्याची ओढ माणसात असते. त्यामुळे मानवी जीवनातील कुटुंब, परिसरसमूह, विविध गटसंबंध, इ. एका दृष्टीने व्यक्तीच्या स्वाभाविक अंत:प्रेरणेचे प्रक्षेपण आहे.

कर्तव्य-अधिकार संतुलन

प्रत्येकाचे अधिकार, मग त्यांची टक्कर, त्यातून उफाळू शकणारे तणाव वा संघर्ष व मग त्यांचे संतुलन साधण्याचे प्रयत्न यातून सामाजिक सद्भाव बिघडतो. त्यापेक्षा व्यक्तीच्या कर्तव्यप्रवणतेवर भर देणे यातून सद्भाव राहतो व हक्कांचेही रक्षण होते. उदा. पालकांच्या कर्तव्यपालनातून बालकाचे हक्कसंरक्षण होते. व्यक्तीचे अधिकार साधारणपणे अबाधित असणे योग्यच आहे. व्यापक समाजहितासाठी यावर काही सुयोग्य बंधनेही सर्वमान्य आहेत.

जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती देव, पितर, ऋषी व मानवऋण ही ऋणे घेऊन जन्माला येते (महाभारत आदिपर्व). सृष्टीक्रम संरक्षणाने देवऋण, सुसंस्कृत अपत्यनिर्मितीने पितृऋण, ज्ञानार्जनाने ऋषिऋण व समाजसेवेद्वारा मानवऋण आपण फेडू शकतो. म. गांधींना मानवाधिकारांसंबंधी भूमिकेवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आम्ही केवळ रिस्पॉन्सिबिलिटीज- कर्तव्यांवरच भर देतो. 

समता-समरसतेचा मेळ

 समता ही सामान्यत: बाह्य परिस्थितीतील बदल, समानता दर्शविते. तर समरसता आंतरिक बदल, मनपरिवर्तन आणि एकात्मता दर्शविते. ‘सर्वाभूती एकच चैतन्य’ या एकरसतेचा व भावंडभावनेचा प्रत्यक्ष व्यवहार म्हणजे समरसता. समरसतेचा भाव जागृत झाल्याशिवाय समता येऊ शकत नाही. आली तरी ती टिकणार नाही. त्यामुळे समतेसाठी समरसता आवश्यक आहे. समता-समरसतेचा मेळ जमवूनच बंधुभाव येईल. समरसता हे मनपरिवर्तनाचे भावंड भावनानिर्मितीचे एक प्रभावी साधन आहे.

समन्वयात्मक परिवर्तन

प्रत्येक व्यक्ती व संपूर्ण समाजामध्ये परिवर्तन (अभिप्रेत, योग्य बदल) घडविण्यासाठी विविध प्रकारचे स्वभाव व आचरण यांचा समन्वयात्मक भूमिकेतून विचार करायला हवा. व्यक्ती ही परिवर्तनाचा आधार व सर्वाची उन्नती तसेच पूर्णत्व ही दिशा असावी.

केवळ आज्ञा वा कायदा यांद्वारे समाजात अपेक्षित परिवर्तन होत नसते. त्यापूर्वी मानसिक पातळीवर बदल घडविण्यास महत्त्व द्यावे लागेल. चर्चा, संस्कार, अनुकरणीय आदर्श समोर ठेवून प्रयत्न करावे लागतील. निरुपयोगी अशा जुन्या गोष्टी केवळ आपल्या आहेत, म्हणून त्यांना चिकटून राहणे किंवा उपयुक्त गोष्टी केवळ परदेशी आहेत म्हणून सोडून देणे योग्य नाही. आपल्या जुन्या चांगल्या गोष्टी युगानुकूल म्हणजे कालसुसंगत करून आणि परकीय चांगल्या गोष्टी देशानुकूल बनवून आपण आत्मसात करू.

(उत्तरार्धात समाजविचाराचे इतर मुद्दे येतील.)

लेखक अभियांत्रिकी अधिस्नातक, व्यवस्थापन सल्लागार, तसेच स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. सहसंयोजक आहेत