आनंदयोग : लोकप्रियता

‘हे सारे नमस्कार वगैरे खोटे असतात.. ज्याचे काम असेल तो जास्त झुकतो!’ हे बाळासाहेबांनाही कळत होते. पण म्हणून त्यांचा दिलखुलासपणा कमी झालेला नव्हता. हाडाचे रसिक आणि कलाकारही असल्याने माणसे त्यांना आवडत. त्यांच्यामध्ये अन्यायाची चीड आणि मराठी माणसाबद्दलचा लोभ ही दोन्ही प्रचंड प्रमाणात होती; त्यामुळे राजकारणात त्यांनी राहणे भागच होते..

‘हे सारे नमस्कार वगैरे खोटे असतात.. ज्याचे काम असेल तो जास्त झुकतो!’  हे बाळासाहेबांनाही कळत होते. पण म्हणून त्यांचा दिलखुलासपणा कमी झालेला नव्हता.  हाडाचे रसिक आणि कलाकारही असल्याने माणसे त्यांना आवडत.  त्यांच्यामध्ये अन्यायाची चीड आणि मराठी माणसाबद्दलचा लोभ ही दोन्ही प्रचंड प्रमाणात होती; त्यामुळे राजकारणात त्यांनी राहणे भागच होते..
मराठी माणसाने आणि बाळासाहेब ठाकऱ्यांनी एकमेकांवर जिवापाड प्रेम केले. त्याचा प्रत्यय बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आला. मुंगीला रीघ नाही अशी गर्दी न जमवता जमली. शिवसेनेच्या गर्दीचा बहुतेकांनी धसका घेतलेला आहे. पण यावेळी साऱ्यांनीच अभूतपूर्व असा संयम दाखवला याचे खरोखरच कौतुक करायला हवे. एखाद्या लोकनेत्याने असे प्रेम मिळवणे म्हणजेही फार मोठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रात आणि बाहेरच्याही असंख्यांना बाळासाहेबांची अफाट लोकप्रियता म्हणजे एक न उलगडणारे कोडेच वाटते. अर्थात मलाही!
भारतीयांना त्यागाचे महत्त्व अतिशय वाटते. महात्मा गांधी, सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या व्यक्तींनी सिंहासनावर बसता येणे शक्य असतानाही त्या लोभापासून निग्रहाने दूर राहाणे पसंत केले. सत्ता हातात असूनसुद्धा लोकप्रियता मिळवणे सोपे नसते. कारण एकाला खूश करणे म्हणजे इतर अनेकांना दुखवणे असे विचित्र समीकरण असते. आपली माणसेच पुढे आणायची झाली तर इतर गुणवान लोक दुखावले जाऊन दुरावतात. त्यांना न्याय द्यायचा तर आपली वाटणारी माणसे तोडली जातात.
बाळासाहेब खरे तर हाडाचे रसिक आणि कलाकारही. पण त्यांच्यामध्ये अन्यायाची चीड आणि मराठी माणसाबद्दलचा लोभ ही दोन्ही प्रचंड प्रमाणात होती. लेखणी आणि कुंचला प्रभावीपणे चालवण्याचे सामथ्र्य होते. वक्तृत्वाची पकडही चांगलीच होती. अत्यंत फटकळ जीभ असूनही माणसे जोडण्याची कला अवगत होती. राजकारणात ते ओढले गेले नसते तरच नवल!
सुरुवातीला शिवसेना आणि हिंदुत्वाची बाळासाहेबांची भूमिका या दोन्ही गोष्टी व्यवहारात उतरणे अशक्य असेच वाटले होते. आणि सत्तेपर्यंत पोहोचायला बरीच वर्षे जावी लागली. बाळासाहेबांचे लेख आणि प्रक्षोभक भाषणे यावरून हा एखादा खदखदता ज्वालामुखी आहे असेच वाटत असे. मी पोलीस खात्यात असल्याने माझा या साऱ्या गोष्टींकडे पाहाण्याचा दृष्टिकोन सर्वसाधारणपणे नोकरशाहीचा असतो तसाच होता. त्यातून माझी आणि बाळासाहेबांची पहिली भेट चांगलीच वादळी झाली होती. कायदा आणि नियम यांत बसत असेल तेच करू असे सांगितल्यावर ते चांगलेच उखडले होते. त्यामुळे मी त्यांच्यापासून सांभाळूनच राहात असे. पण नंतर त्यांच्याशी चांगला परिचय झाला. तेव्हा हा काटे टाळून अनुभवायचा अतिशय चविष्ट असा फणस आहे हे ध्यानात आले.
पोलिसांत आणि नंतर गुप्तवार्ता विभागांत काम करताना अनेकदा बाळासाहेबांशी संबंध आला. आमचे न पटण्याचेच प्रसंग जास्त असूनही स्नेह वाढत गेला. अनौपचारिक भेटीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर आले. एकच व्यक्ती इतके छंद जोपासत असेल हे एरवी शक्यच वाटणार नाही. कौटुंबिक बाबींपासून मानसशास्त्रापर्यंत, चित्रकलेपासून क्रिकेटपर्यंत कशावरही गप्पा होत. व्यंगचित्रकाराच्या दृष्टिकोनातून समस्यांकडे पाहाण्यामुळे त्यांच्या बोलण्यात मिश्कील विनोद भरपूर असे. त्यामुळे एकदा बैठक जमली की ती मोडणे अगदी जीवावर येत असे. पण त्यांची इतर मित्रमंडळी असेल तेव्हा मी फार वेळ थांबत नसे. इतरांसमोर मोकळेपणाने बोलायला मी बिचकतो असे ध्यानात आल्यावर ते शक्यतो वेगळा वेळ काढत असत, पण हे फार वेळा शक्य होत नसे. त्यामुळे महत्त्वाचे काही असेल तर मी टेलिफोनवरच बोलून टाकत असे.
पण मोकळेपणाने बोलताना ते हातचे काहीही न राखता सगळे बोलून टाकीत असत. मी एकदा त्यांना म्हटलेसुद्धा ‘तुम्ही हे सगळे मला सांगता आहात. पण मी गुप्तहेर खात्यात आहे याचे जरा भान असू द्या’, त्यावर ते अगदी दिलखुलासपणे म्हणाले, ‘अहो, हे तुम्हाला सांगतो ते इतरांना सांगायलाही हरकत नाही. कोठे बोलायचे त्याचे तारतम्य ठेवा म्हणजे झाले. एकदम पत्रकारांना सांगून आमचे टायमिंग बिघडवू नका म्हणजे झाले.’
एकदा तर अतिशय महत्त्वाचा निर्णय ते घेणार होते. मी विचारल्यावर त्यांनी स्पष्टपणे आपण काय करणार आहोत ते सांगून टाकले. त्यांचा निर्णय माझ्या अंदाजाच्या अगदी उलट होता. मी त्यांना सुचवले की हा निर्णय त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे नुकसान करणारा ठरू शकेल. त्यावर ते संतापून उभे राहिले आणि म्हणाले, ‘आम्ही यात संपलो तरी हरकत नाही, पण माझा निर्णय अगदी ठाम आहे.’
असा सर्वस्व पणाला लावण्याचा जुगार खेळण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. हे धाडसदेखील सर्वसामान्य जनतेला आवडले असावे. एवढी मोठी संघटना बांधणे, सत्तेचा मोह बाजूला ठेवून ती चालवणे, मतांच्या राजकारणात महाग पडली तरी सडेतोड भाषा वापरणे आणि धडाकून निर्णय घेऊन तो अमलात आणणे असे गुण अलीकडच्या नेतृत्वात सापडणे अवघडच आहे. ते भगवे कपडे वापरत असत. गळ्यात माळा घालत असत. कार्यकर्ते आणि पुढारीसुद्धा त्यांना पायाला हात लावून नमस्कार करीत, त्यावरून मी त्यांना थट्टेने म्हटले, ‘तुम्ही राजकारणात चुकून आलात. खरे तर तुम्ही बुवा बनायला हवे होते.’ यावर ते म्हणाले, ‘हे सारे नमस्कार वगैरे खोटे असतात हो. ज्याचे काम असेल तो जास्त झुकतो!’ त्यांनीच बोलावलेले एक पुढारी आले असल्याचा निरोप आला. दहा मिनिटांत याचे काम उरकून टाकतो असे मला सांगून त्यांनी त्या पुढाऱ्याला पाठवायला सांगितले. त्यांनी आत आल्याबरोबर बाळासाहेबांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. त्यांच्याशी बोलणे होऊन ते जायला निघाले तेव्हा त्यांनी परत तसाच नमस्कार केला. तेवढय़ात सरबताचे ग्लास आले. सरबत घेऊन जा म्हटल्यावर ते थांबले आणि निघताना त्यांनी परत तसाच नमस्कार केला. मला आणि बाळासाहेबांना हसू आवरणे अशक्य झाले.
पण ते हाडाचे कलाकारच होते. मीनाताई गेल्यानंतर ते त्यांच्या छायाचित्राला रोज फुले वहात असत. या फुलांची अतिशय सुंदर रचना ते स्वत:च्या हातांनी करीत असत. फुलझाडे, बगीचा वगैरेची त्यांना फार आवड. एखादे पुस्तक फार आवडले तर ते आवर्जून वाचायला सांगत. मी ते वाचलेले असेल तर त्या पुस्तकावर गप्पा होत असत. कला आणि क्रीडा या दोन्हींमध्ये त्यांना भरपूर रस होता. कितीतरी कलाकार आणि खेळाडू मला त्यांच्याकडेच भेटलेले आहेत.
हे सगळे खरे असले तरी त्यांचा राजकारणात उतरण्याचा निर्णय योग्यच होता असे वाटते. कारण त्यांच्या राजकारणाशिवाय ते पूर्ण झालेच नसते. त्याशिवाय त्यांच्या कर्तबगारीला वेगळे परिमाण लाभले ते लाभले नसते. असा नेता परत केव्हा होईल ते सांगता येणार नाही, पण ही काळाची गरज आहे हे काळाला काय माहीत नसेल?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Publicity