जयंत जेनेकर
प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक, भौगोलिक व प्रशासकीयदृष्ट्या राजुरा परिसराचं एक वेगळं महत्त्व आहे. यातच वेळोवेळी प्रशासनिक सोयीसाठी झालेला राज्य व जिल्हा बदलही तेवढाच रंजक राहिला आहे. त्याचाच हैदराबाद स्टेट, बेरार, निजामाबाद, आदिलाबाद, नांदेड, चांदा जिल्हा आदी गॅझेटिअरच्या नोंदीतून घेण्यात आलेला हा आढावा. प्राचीन काळात राजुरा परिसर मौर्य, सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव या राज्य सत्तेच्या अंमलाखाली राहिला आहे. मध्ययुगीन काळात गोंड, भोसले, निजामांची येथे राजवट होती.
भोसले-ब्रिटिश युद्ध परिणामानंतर भोसल्याकडून ब्रिटिशांनी हा भाग हस्तगत केल्यानंतर ब्रिटिशांकडून तो स्वतःकडे न ठेवता थेट बक्षीस स्वरूपात निजामाकडे देण्यात आला. हा प्रदेश निजामाने प्रशासकीय व्यवस्थेत न आणता, याला निजाम सैन्याच्या देयकासाठी असलेला ‘जागीर तालुका’ म्हणून अस्तित्वात आणले.
१८६६ मध्ये प्रशासनिकदृष्ट्या कारभार चालवण्यासाठी निजामाचे दिवाण सालार जंग यांनी जिल्हा प्रणालीची बांधणी केली होती. यात इंदूर (निजामाबाद) जिल्ह्यात एदलाबाद (आदिलाबाद) व शिरपूर तादुर (शिरपूर कागजनगर) तालुके समाविष्ट करण्यात आले होते. १८६७ ला त्या दोन्ही तालुक्यांना एल्गडल (करीमनगर) जिल्ह्यात हस्तांतरित करण्यात आले. परंतु पुन्हा परत १८६९ ला इंदूर (निजामाबाद) जिल्ह्यात सोपवण्यात आले. हा जिल्हा बदल राजुरा बाबत हुकला गेला तरी.
यानंतर पुनश्च नव्याने बदल करत १८७२ मध्ये शिरपूर तांदूर उपजिल्हा करण्यात आला. त्यात राजुरा तालुका अंतर्भूत करण्यात आला. हा राजुराचा प्रथम मात्र अपूर्ण जिल्हा होता. तिथून काही जिल्हा स्तरावरील कामकाज होऊ लागले. त्याचवेळी सैन्याच्या देयकासाठी देण्यात येणारा निजामाच्या थेट अमलाखाली असलेला राजुरा जागीर तालुका हा आदिलाबाद, शिरपूर प्रमाणे प्रशासकीय तालुका करण्यात आला होता.
१९०५ साली आदिलाबाद या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा राजुराचा पहिला पूर्ण जिल्हा झाला. १९१३-१९१४ त प्रशासकीय कारणास्तव आदिलाबादचे मुख्यालय आसिफाबाद येथे हलवण्यात आले. आसिफाबाद जिल्हा झाला. तो राजुराचा दुसरा पूर्ण जिल्हा ठरला. त्यानंतर परत आसिफाबादचे मुख्यालय आदिलाबाद येथे हलविण्यात आले.
१९४० ला आदिलाबाद जिल्हा झाला. हा तिसरा जिल्हा. या प्रवासात १७ सप्टेंबर १९४८ नंतर निजाम संस्थानचे हैदराबाद राज्य झाले. नोव्हेंबर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर राजुरा परिसर मुंबई प्रांतातील नांदेड जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. तो चौथा पूर्ण जिल्हा झाला. आणि राज्य ही मुंबई प्रांत झाले. १९५९ च्या मार्च महिन्यात पुन्हा एक राजुरा तालुका मुंबई प्रांतातील तात्कालीन चांदा जिल्ह्यात वर्ग करण्यात आला. तो राजुराचा पाचवा पूर्ण जिल्हा.
पुढे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन तेव्हापासून आजगायत हा भाग चांदा अर्थात चंद्रपूर या जिल्ह्यातच समाविष्ट आहे. लागू असलेल्या वेगवेगळ्या नियमांमुळे राजुरा प्रत्यक्षात एक स्वतंत्र जिल्हा आणि विभाग म्हणून अधिसूचित आहे. परंतु सर्व प्रशासकीय कारणांसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या अधीन आहे. असा प्रत्यक्षात उल्लेख चंद्रपूर जिल्ह्याच्या गॅजेटीयरमध्ये सुद्धा नमूद आहे. या सर्व जिल्हा बदलाच्या प्रवासात राजुरा परिसर पाचदा जिल्हा स्थान तर एकदा एका उपजिल्हा स्थानाचा भाग ठरले आहे.
याच दरम्यान काही काळ जिल्हा स्थानाप्रमाणे जिल्हास्तरिय प्रशासकीय व्यवस्था ही राजुरात स्वतंत्ररित्या अस्तित्वात असल्याची प्राथमिक माहिती काही जुन्या महसुली कागदपत्रांतून दिसून येते. हे ही विशेष. याच बरोबर हैदराबाद राज्य, मुंबई प्रांत व महाराष्ट्र या तीन राज्याचा ही प्रवास राजुरासाठी अनोखा अनुभव ठरला आहे.
चार लोकसभा मतदारसंघांचा प्रवास
देशात लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ ला पार पडली. या निवडणुकीत राजुरा तालुका आसिफाबाद विधानसभा व आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होता. १९५७ च्या दुसऱ्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत तो स्वतंत्र राजुरा विधानसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला.
तेव्हा मात्र मुंबई प्रांतातील नांदेड जिल्ह्यात होता. परंतु लोकसभा मतदारसंघ चांदा हा होता. पुढे राजुरा विधानसभा मतदारसंघ हा कायम राहून चंद्रपूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघ आणि २००८ पासून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात अंतर्भूत आहे.
ऐतिहासिक साक्ष व आधुनिक बदल
राजुरा येथे नवीन प्रशासकीय इमारत तयार होण्यापूर्वीची तहसील कार्यालयाची जुनी इमारत निजाम राजवटीत १९०५ या वर्षी बांधण्यात आली होती. तसेच १९२७ पासून या स्थानी मुहाफिज खाना (अभिलेखागार) कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १५ ऑगस्ट १९९२ ला राजुरातून कोरपना तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जुलै २००२ मध्ये राजुरा सह कोरपनाचे विभाजन करून जिवती तालुका सुद्धा आकारास आला.
jayantjenekar@gmail.com
