चंद्रकांत बच्छाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात खंबीरपणे साथ देणारे, त्यांच्या प्रत्येक संघर्षात सावलीसारखे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माता रमाई आंबेडकर. त्यांचे जीवन त्याग, सहनशीलता, प्रेम, कष्ट आणि समर्पण यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. बाबासाहेबांना महान क्रांतियोद्धा होण्याच्या वाटेवर साथ देणाऱ्या रमाई खऱ्या अर्थाने युगनिर्मात्या होत्या.

रमाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद गावात अत्यंत गरीब कुटुंबात झाला. आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव भिकू धोत्रे असे होते. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. १४ एप्रिल १९०६ रोजी भायखळा मार्केट येथे त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला. त्यावेळी त्यांचे वय ९ वर्षे तर भीमरावांचे वय १४ वर्षे होते. त्या काळी बाबासाहेब शिक्षण घेत होते आणि अत्यंत कठीण परिस्थितीत संसार उभा राहत होता. बालपणापासूनच त्यांनी गरिबी, उपासमार आणि अनेक हालअपेष्टा अनुभवल्या. शिक्षणाची संधी मिळाली नाही, पण जीवनाने त्यांना सहनशीलता, संघर्ष आणि जिद्दीची मोठी शिकवण दिली.

रमाई स्वभावाने शांत, विनयशील, गंभीर आणि संयमी होत्या. त्यांना स्वतःचे सुख-दुःख बाजूला ठेवून बाबासाहेबांच्या शिक्षणाला आणि कार्याला पाठबळ द्यायचे होते. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले असताना संपूर्ण संसाराची जबाबदारी रमाईंवर आली. गरीबी, उपासमार, कर्ज, मुलांचे आजार, नातेवाईकांचे दुःख या सर्व संकटांना त्या धैर्याने सामोऱ्या गेल्या. स्वतः उपाशी राहून त्यांनी संसार सांभाळला, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात आणि ध्येयात कधी अडथळा येऊ दिला नाही.

घरात अत्यंत गरिबी असल्याने उदरनिर्वाहासाठी त्या सूर्योदयापूर्वी उठून वरळी येथे जाऊन गोवऱ्या थापण्याचे काम करत असत. एवढेच नव्हे तर रस्ते बांधणीच्या कामावरही मजूर म्हणून काम करत होत्या. एका बॅरिस्टरची पत्नी असूनही त्या अशी कष्टाची कामे करत होत्या आणि हे कोणाला कळू नये याची काळजी माता रमाई घेत होत्या. रमाई आणि बाबासाहेबांच्या संसारात अनेक दुःखद प्रसंग आले. त्यांना झालेली बहुतांश अपत्ये अल्पवयातच दगावली. या दुःखाने रमाईंचे मन विदीर्ण झाले, तरी त्यांनी धैर्य सोडले नाही. छोटा राजरत्न हा त्यांना अत्यंत प्रिय होता; परंतु, औषधांसाठी पैसे नसल्याने त्याचाही मृत्यू झाला. एवढ्या दुःखानंतरही रमाईंनी बाबासाहेबांना खचू दिले नाही. त्यांच्या मनात पतीबद्दल अपार प्रेम, श्रद्धा आणि काळजी होती.

बाबासाहेब समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढत होते. त्या संघर्षमय जीवनात रमाई त्यांची प्रेरणाशक्ती होत्या. बाबासाहेबांच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य अक्षरशः झिजवले. त्याग, सेवा आणि सहनशीलतेचे प्रतीक असलेल्या रमाई आपल्या कष्टातून बाबासाहेबांना समाजपरिवर्तनाच्या महान कार्यासाठी प्रोत्सहीत करीत होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामागे माता रमाबाई आंबेडकर यांचे निःस्वार्थ प्रेम, त्याग आणि संघर्ष उभा होता.

रमाईंच्या मनात गरिबांबद्दल अपार माया होती. स्वतः दुःख सहन करूनही इतरांच्या वेदना समजून घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यात होती. म्हणूनच समाजातील लोक त्यांना आईचे स्थान देत. समाजपरिवर्तनाच्या इतिहासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. माता रमाई या धार्मिक प्रवृत्तीच्या आणि उदात्त कार्यवृत्तीच्या होत्या. पंढरपूरच्या पांडुरंगावर त्यांची अपार श्रद्धा होती. रमाईंच्या या श्रद्धेची जाणीव ठेवून बाबासाहेबांनीही तिचा आदर केला.

पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती ही मूळतः बौद्ध परंपरेशी संबंधित असण्याची शक्यता असल्याचे बाबासाहेब रमाईंना सांगत असत. पुढे काही वर्षांनंतर बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करताना यासंदर्भात विचार मांडले होते. त्यांनी ‘कुंज पांडुरंग’ नावाचा एक शोधनिबंध लिहिण्याचाही प्रयत्न केला होता; मात्र तो अप्रकाशित राहिला. रमाईंचे नवे पंढरपूर म्हणजेच नागपूरची दीक्षाभूमी होय. ज्या भक्तिभावाने त्या पंढरपूरकडे वळत असत, त्याच श्रद्धेने पुढील काळात आंबेडकरी समाज दीक्षाभूमीकडे आकर्षित झाला. रमाईंचे जीवन हे भारतीय स्त्रीशक्तीचे, सहनशीलतेचे आणि निस्वार्थ प्रेमाचे तेजस्वी उदाहरण आहे.

डॉ. बाबासाहेब आणि रमाई यांचा विवाह हा सामाजिक समतेचा आणि संघर्षातील सहजीवनाचा आदर्श मानला जातो. दोघांनी मिळून संकटांचा सामना केला. बाबासाहेबांनी समाजासाठी दिलेले आयुष्य आणि रमाईंनी केलेला त्याग यामुळेच लाखो वंचितांना नवजीवन मिळाले.

रमाईंच्या आयुष्यात सुख कमी आणि दुःख जास्त होते, पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या सहनशीलतेमुळे बाबासाहेबांना त्यांच्या ध्येयासाठी पूर्णपणे वाहून घेता आले. रमाईंचे जीवन सततच्या कष्टांनी आणि चिंतेने व्यापलेले होते. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. अखेर २७ मे १९३५ रोजी ‘राजगृह’ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या ३७ वर्षात त्यांचा जीवन प्रवास संपला. त्यांच्या निधनाने बाबासाहेबांना मोठा मानसिक धक्का बसला. त्या बाबासाहेबांच्या जीवनातील ऊर्जास्रोत होत्या. त्या स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, पण त्यांच्या त्यागामुळे इतिहास घडला.

रमाईच्या जाण्याने बाबासाहेब अत्यंत व्यथित झाले. त्यांनी पत्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इ.स.१९४० मध्ये प्रकाशित झालेला ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा वैचारिक ग्रंथ त्यांना अर्पण केला. आज रमाईंच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.

(लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व संशोधक आहेत.)