संयमास चिकाटी व प्रयत्नांची जोड लाभली, तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते, याचा प्रत्यय मुंबईत नुकत्याच झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने दाखवून दिला. तब्बल ४० वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे ही कामगिरी तशी अवघडच. त्यातही पहिल्या डावात १२२ धावांनी पिछाडीवर असताना विजय मिळवू शकू अशी अपेक्षाही करण्याची शक्यता नाही. मात्र महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करीत ही गोष्ट शक्य करून दाखविली. त्यांच्या गोलंदाजांनी पहिल्या डावातील अपयश धुवून काढताना मुंबईचा दुसरा डाव अवघ्या १२९ धावांमध्ये गुंडाळला. समाद फल्लाह, अनुपम संकलेचा व श्रीकांत मुंढे हे तीनच गोलंदाज मुंबईच्या घसरगुंडीकरिता पुरेसे ठरले. पहिल्या डावातील पिछाडीमुळे पराभवाच्या उंबरठय़ावर महाराष्ट्राचा संघ होता. मात्र गोलंदाजांनी केलेल्या किमयागार कामगिरीनंतर दुसऱ्या डावात महाराष्ट्राच्या फलंदाजांनी आपल्या सहकारी गोलंदाजांनी खेचून आणलेला सामना घालवायचा नाही याच जिद्दीने फलंदाजी केली. केदार जाधव व यंदा रणजीमध्ये पदार्पण करणारा विजय झोल या दोनच फलंदाजांनी महाराष्ट्राच्या विजयाची जबाबदारी स्वत:कडे घेत द्विशतकी भागीदारी करीत संघास सनसनाटी विजय मिळवून दिला. सोळा वेळा इराणी चषक जिंकणाऱ्या मुंबई संघाविरुद्ध महाराष्ट्राने मिळविलेला हा फक्त तिसरा विजय आहे. महाराष्ट्राच्या विजयात संघातील प्रत्येक खेळाडूचा महत्त्वाचा वाटा आहे. केदार जाधव याने यंदाच्या रणजीमध्ये एका द्विशतकाबरोबरच तीन शतके प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावर टोलविली आहेत.  हर्षद खडीवाले याने या मोसमात रणजीमध्ये सातशेहून अधिक धावा केल्या आहेत. विजय झोल हा तर भारताचा भावी आधारस्तंभ मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली नाबाद ९१ धावांची खेळी आणि केदार जाधवला दिलेली शानदार साथ यामुळेच महाराष्ट्राला विजय मिळविता आला. महाराष्ट्राच्या या यशात संघाचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांचाही मोठा वाटा आहे. यापूर्वी संघासाठी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याचा प्रयोगही झाला आहे. मात्र हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नव्हता. त्यामुळेच भावे यांच्याकडे गेल्या मोसमात प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली होती. प्रत्येक खेळाडूकडे असलेले नैपुण्य ओळखून त्याच्याकडून ते योग्य रीतीने काढून घेण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे खेळाडूंना योग्य दिशा दाखवीत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे शक्य झाले. मुंबईच्या खेळाडूंनी दिलदार वृत्तीने महाराष्ट्राविरुद्धचा पराभव स्वीकारणे आवश्यक होते. मात्र घरच्या मैदानावर सामना गमावल्यानंतर त्यांना हा पराभव खूपच जिव्हारी लागला असावा. झहीर खान याच्यासारखा अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूने विजय झोल याबाबत केलेली शेरेबाजी ही नक्कीच त्याच्यासारख्या महान खेळाडूस अशोभनीय होती. खरे तर त्याने खिलाडूवृत्ती दाखवीत युवा खेळाडू झोल याच्या शैलीदार खेळाचे कौतुक करीत त्याला प्रोत्साहन द्यायला हवे. मुंबईविरुद्धच्या विजयामुळे महाराष्ट्राने रणजी करंडकाच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे. आता ही स्पर्धा जिंकूनच त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करावी. महाराष्ट्राने १९९२-९३ मध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. त्या वेळी महाराष्ट्रास विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. महाराष्ट्राने उपान्त्य व अंतिम फेरीतही उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखविले पाहिजे अशीच आता अपेक्षा आहे.