scorecardresearch

राष्ट्रभाव : राष्ट्रवाद.. युरोपीय आणि भारतीय!

आपल्या देशात राष्ट्रीयत्वाची भावना प्राचीन काळी केव्हा विकसित झाली याची नेमकी माहिती कोणी सांगू शकणार नाही

(संग्रहित छायाचित्र)

रवींद्र माधव साठे ravisathe64@gmail.com

भारतातील राष्ट्रवादाकडे पाश्चात्य चष्म्यातून बघितले जाऊ नये. कारण युरोपात तो प्रामुख्याने  ‘समूहाचा स्वार्थ’ या अर्थाने विकसित झाला व यातून उपासनापंथ सर्वावर लादणे सुरू झाले. आपल्याकडे मात्र त्याचे स्वरूप संकुचित नाही. आपल्याकडे तो मुळातच सुसंस्कृत आहे.

लुईस श्नायडर हे एक अमेरिकन विद्वान होते. त्यांनी ‘व्हरायटीज ऑफ नॅशनॅलिझम’ हे पुस्तक लिहिले आहे. वेगवेगळय़ा देशांतील राष्ट्रीयतेचा अभ्यास करून त्यांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की, ‘‘पश्चिमेकडील वेगवेगळय़ा देशांतील राष्ट्रीयतेसंदर्भातील मनोवैज्ञानिक बारकावे समान नाहीत. प्रत्येक देशातील ऐतिहासिक विकासक्रम वेगवेगळा आहे आणि त्याप्रमाणे वेगवेगळय़ा देशांत गुणात्मक दृष्टीने भिन्न असलेल्या राष्ट्रीयता भावनेचा उदय झाला.’’ श्नायडरने वरील निष्कर्ष काढला असला तरी युरोपमध्ये प्रामुख्याने प्रतिक्रियेच्या स्वरूपात राष्ट्रवादाचा उदय झाला. राष्ट्रीयता म्हणजे सामूहिक स्वार्थ अशी भावना तेथे वाढीस लागली, म्हणूनच एका पाश्चिमात्य विचारवंताने, ‘‘नॅशनॅलिझम ऑर पॅट्रिऑटिझम इज सेल्फिशनेस एक्सटेन्डेड’’ अशी व्याख्या केली आहे. (अर्थात ‘‘राष्ट्रवाद किंवा राष्ट्रभक्ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विस्तारलेला स्वार्थ मात्र आहे.’’) राष्ट्रीयतेमुळे केवळ स्वार्थाचे उद्दीपन होते असे तो म्हणतो. पाश्चिमात्य देशांत घडलेही काहीसे तसेच. स्वार्थासाठी एकजूट करून दुसऱ्यांशी लढणे हा तेथील राष्ट्रजीवनाचा आधार बनला. ‘राष्ट्र’ ही एक खरी भावात्मक संकल्पना, पण हा विचार मागे पडला. तिकडील राष्ट्रवादाला परस्पर सहकार्याचा पाया लाभला नाही. विरोधनिर्मित राष्ट्रवादाने घातक रूप घेणे स्वाभाविकच होते. युरोपीय देशांत राष्ट्रसंस्था हजार-बाराशे वर्षांपूर्वी निर्माण झाली. गेल्या चार-पाचशे वर्षांत तिचा विशेष विकास झाला. त्या इतिहासाच्या आधारे विचार करणाऱ्या विद्वानांनी राष्ट्रीयतेला पूर्णत: घातक घोषित केले. राष्ट्रीयतेचा उदय होण्यापूर्वी तिकडील लोक विविध उपासनापंथांच्या झेंडय़ांखाली एकत्र झाले होते. आधी खिश्चन आणि यहुदी यांच्यात संघर्ष माजला. नंतर खिश्चन आणि मुसलमान यांच्यात क्रुसेड्स म्हणजे सांप्रदायिक युद्धे होऊ लागली, विभिन्न समूह आपापल्या सत्तेच्या विस्तारासाठी युद्धे करू लागल्यामुळे, तिकडे भयानक रक्तपात झाला. रोमन सत्तेचा विरोध करता करता इंग्लंडची राष्ट्रीयता निर्माण झाली. देशोदेशी रोमन कॅथॉलिकांचा विरोध करण्याची भावना उत्पन्न झाली. आर्थिक क्षेत्रात वर्चस्व प्राप्त करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच लढले. सीमाप्रदेशावरून फ्रेंच आणि जर्मन यांच्यात युद्धे झाली.

इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेनमध्ये जसा राष्ट्रवाद सुरू झाला त्याच धर्तीवर जर्मनी आणि इटलीमध्ये तो विकसित झाला. या विकासक्रमात ज्याच्या हातात अधिक सत्ता आली तो दुसऱ्याला छळू लागला. साम्यवादी लोक कोणताही उपासनापंथ मानत नाहीत. ‘धर्म’ ही अफूची गोळी आहे असे ते म्हणतात. वर्गसंघर्ष हाच त्यांच्या विचारांचा आधार आहे. पूर्वी पाश्चिमात्य देशांतील लोक उपासनापंथासाठी लढत असत. आपला उपासनापंथ बळजबरीने दुसऱ्यावर लादत असत. राजाचा उपासनापंथ सगळय़ा प्रजेने मानावा असा आग्रह धरला जाई. सगळय़ा प्रजेला तो मानणे भाग पडे. जो मानत नसे त्यास देशाबाहेर धाडण्यात येत असे. एके काळी जी गोष्ट उपासनापंथासाठी होत असे तीच आज साम्यवादी देशात सत्तेसाठी होत आहे. चीनने तिबेट, हाँगकाँग, तैवान आदी भाग गिळंकृत केला आहेच. सध्या रशिया-युक्रेन चाललेले युद्ध याच विस्तारवादाचा एक भाग आहे. पाश्चिमात्य देशांत राष्ट्रवादाच्या उदयास काही ना काही संघर्षांची पृष्ठभूमी होती.

फ्रेडरिक हर्ट्स म्हणतो:- ‘‘कोणत्याही राजकीय तत्त्वज्ञानापेक्षा राष्ट्रवादाची प्रेरक शक्ती अधिक प्रभावी ठरली आहे. राष्ट्रवादामुळे महान राज्यक्रांती आणि युद्धे झाली आणि त्याच्या धक्क्याने मोठमोठी साम्राज्येसुद्धा नामशेष होऊन जगाचा आलेख (नकाशा) पालटला गेला. त्याच्या ओघास आर्थिक हितसंबंध, नीतितत्त्वे किंवा धर्म यांपैकी कशानेही बांध घातला गेला नाही. किंबहुना त्याच्या धक्क्याने आपली भौतिक संस्कृती एखाद्या खोल गर्तेत पडण्याची वेळ आली आहे.’’ (फ्रेडरिक हर्ट्स : नॅशनॅलिटी इन् हिस्टरी अ‍ॅण्ड पॉलिटिक्स, पृ.१)

राष्ट्रवादामुळे युद्धे होतात, राष्ट्रवाद हा मानवतावादाच्या विरोधात असतो आदी राष्ट्रवादावर आक्षेप घेतले जातात यांत थोडेफार तथ्य असेलही. हिटलर व मुसोलिनीचे उदाहरण देता येईल. परंतु याच आधारावर भारतीय राष्ट्रीयतेचे मूल्यांकन करणे चुकीचे ठरेल. युरोपात राष्ट्रवादाचा विकास झाल्यानंतर तेथील विचारवंतांनी राष्ट्रवादाच्या वेगवेगळय़ा व्याख्या व विश्लेषण केले. हे लेखक युरोपीय असल्याने त्यांची दृष्टी युरोप व अमेरिकेपुढे सहसा गेली नाही. युरोपातील केवळ पश्चिमेकडील राष्ट्रांचाच विचार त्यांच्या हातून झालेला दिसतो. त्यामुळे केवळ युरोपीय चष्म्यातून भारतीय राष्ट्रवादाकडे बघणे हे योग्य ठरणार नाही. भारतीय राष्ट्रवाद स्वार्थरूपात कधीच प्रगट झाला नाही. भारतीय राष्ट्रवादाचा इतिहास केवळ काही शतकांचा नाही. तो सहस्रावधी वर्षांचा आहे. परस्पर संघर्ष हा त्याचा आधार नसून समन्वय आणि परस्परानुकूलता यांच्या आधारे तो जोपासला गेला आहे.

पं. दीनदयाळ उपाध्याय म्हणत की ‘‘पाश्चिमात्य राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद याची तुलना करणे योग्य नाही परंतु पाश्चिमात्यांनी द्वैताच्या आधारे संघर्षांचे नगारे वाजविले आहेत तर भारतीयांनी अद्वैताचा पुरस्कार करून एकात्मतेची बासरी वाजविली आहे. दोन्हीही वाद्येच आहेत पण दोन्हींच्या स्वरलहरीत फार अंतर आहे. युरोपीय राष्ट्रवादामुळे युरोपातील देशांचा नाश झाला म्हणून भारतातही तो विनाशकारक ठरेल असे म्हणणे म्हणजे, दुधाने तोंड भाजले म्हणून ताक फुंकून प्यावे असे म्हणण्यासारखे आहे.’’

भारतात राष्ट्रीयतेचा ऐतिहासिक विकासक्रम इतरांपासून भिन्न आहे. आपल्या देशात राष्ट्रीयत्वाची भावना प्राचीन काळी केव्हा विकसित झाली याची नेमकी माहिती कोणी सांगू शकणार नाही. अनादिकाळापासून आपण इथे एक सांस्कृतिक राष्ट्र म्हणून विद्यमान होतो. आपल्या पूर्वजांनी असा विचार केला होता की आपण जसे सुसंस्कृत आहोत तसे संपूर्ण विश्वालाही करू म्हणून त्यांनी घोषणा दिली की, ‘कृण्वंतो विश्वमार्यम्’. यातील ‘आर्य’ हा शब्द गुणवाचक असून तो वंश किंवा जातिवाचक नाही. येथील राष्ट्रवाद हा विश्व संस्कृती आणि सभ्यतेस प्रारंभापासून प्रोत्साहन देणारा राहिला आहे. आपल्या मनीषींनी ताडले होते की, व्यक्ती-परिवार, व्यक्ती-समाज, राष्ट्रीयता- आंतरराष्ट्रीयता यांत विरोध नाही तर मानवीय चेतनेच्या उत्तरोउत्तर होत जाणाऱ्या विकासाच्या त्या पायऱ्या आहेत. ज्या प्रकारे बीज-अंकुर- झाड- फांद्या- फूल-फळ या नैसर्गिक विकासाच्या अवस्था आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तीपासून मानवतेपर्यंत परस्परपूरक व पोषक अशा जाणिवा, विकासक्रमाच्या अवस्था आहेत. म्हणून आपल्याकडे वस्तुत: असे मानले गेले की, व्यक्तीपासून परमेष्टीपर्यंत जेवढे सामाजिक घटक आहेत तो एक विकासक्रम आहे. तत्त्वत: असे मानण्यात आले की, जसजसा व्यक्तीच्या जाणिवांचा विकास होत जातो तसतसे त्या व्यक्तीची विश्वाच्या एकात्मतेशी नाळ जोडली जाते. व्यक्ती जेव्हा बाल्यावस्थेत असते तेव्हा ती स्वत:चाच अधिक विचार करते परंतु हळूहळू माता-पिता, भाऊ-बहीण म्हणजेच संपूर्ण परिवाराशी ती एकात्म होते आणि ती मोठी म्हणजे जेव्हा सज्ञानी होते त्या वेळी ती समाज व राष्ट्राशी एकात्म होते. त्याच्या जाणिवा जेव्हा आणखी प्रगल्भ होतात तेव्हा ती संपूर्ण मानवतेशी एकात्म असल्याचा अनुभव घेऊ लागते. जेव्हा तिला आत्मज्ञान प्राप्त होते तेव्हा ती संन्यास ग्रहण करते आणि ‘हे विश्वची माझे घर’ किंवा ‘स्वदेश भुवनत्रयम्’ मानण्यास लागते. संक्षेपात सांगायचे झाले तर इथे आमची अशी धारणा राहिली आहे की, व्यक्तीचा त्याच्या परिवाराशी, राष्ट्र किंवा विश्वबंधुत्वाशी कोणताच विरोध नाही. तर त्या उत्तरोत्तर होत जाणाऱ्या आत्मचेतना विकासाच्या नैसर्गिक अवस्था आहेत. या दृष्टीने मनुष्याच्या आत्मचेतनेचा विकास हे आमच्या इथे जीवनाचे एक लक्ष्य मानले गेले.

आम्ही व्यष्टी-समष्टी-सृष्टी-परमेष्टी हे जैविक नाते मानले आहे. स्वामी विवेकानंद हे सर्व भारतीयांचे एक आदर्श. ते राष्ट्रवादाचे खंदे समर्थक होते. हिंदू धर्म व संस्कृतीचा त्यांना अभिमान होता. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’’ हे वाक्य मूळ विवेकानंदांचे आहे. हिंदू संघटनांनी त्यांच्याकडून ते घेतले आहे. स्वामीजींनी भारतीयांसमोर भारतीय राष्ट्रवादाच्या ऐतिहासिक कार्याची कल्पना मांडली. विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालून जागतिक शांती प्रस्थापित करण्याचे भारताकडून योगदान घडावे असे त्यांनी आवाहन केले होते.

अमेरिका आणि युरोपचा दौरा केल्यानंतर स्वामी विवेकानंद १८९७ मध्ये भारतात परतले. त्यानंतर कोलंबो ते आल्मोडा त्यांनी सलग प्रवास केला. त्यातील चार दिवस ते लाहोरला होते. त्या वेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले ‘‘भारत हे असे राष्ट्र आहे की जिथल्या नागरिकांची हृदये एकाच आध्यात्मिक स्पंदनांनी जुळली आहेत.’’ भारतीय राष्ट्रवादाची व्यावहारिक अनुभूती त्यांना झाली होती आणि तीच सर्वाना मिळावी ही स्वामीजींची इच्छा होती. लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.

मराठीतील सर्व राष्ट्रभाव ( Rastrabhav ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nationalism european and indian zws