एलिझाबेथ उपाशी
बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी उद्धव व राज हे ठाकरे बंधू आपल्या एका घरगुती कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. फक्त एवढेच या भेटीचे महत्त्व. पण एवढय़ासाठी प्रसारमाध्यमे, निकटवर्ती सर्व आजी-माजी नेते मंडळी, कार्यकर्ते, शिवसैनिक या सर्वाना आनंदाचे भरते येऊन जे तृप्तीचे ढेकर यायला लागले त्याला तोड नाही. या सर्वावर समर्पक भाष्य म्हणजे ‘एकादशीकडे शिवरात्र’ हा अग्रलेख (१८ नोव्हें.).
आता हे दोघे भाऊ एकत्र येऊनही असे काय महाराष्ट्राचे भले होणार आहे, जेव्हा एकत्र येण्याची वेळ होती तेव्हा मोडेन पण.. चा मराठीबाणा, स्वाभिमान, मान-सन्माम कवटाळून बसले व सत्तेची गाडी चुकवली. एकत्र लढले असते तर एकीचे बळ सर्वानी अनुभवले असते. पण जे सर्वसामान्यांना कळते ते या स्वाभिमानी मातबरांना उमगले नाही, नाही तर अशी ढोपराला हिंग लावून ताटकळत बसविण्याची वेळ आली नसती.
आता तर, जर-तरच्या भाषेचीसुद्धा वेळ चुकली आहे. सत्तेच्या ‘एलिझाबेथ’ सायकलीची उंची जास्त असल्यामुळे सत्तेपर्यंत पाय न पोहोचणाऱ्यांना आता सर्व विचारतील, तुझे नाव काय बाळा. एकादशी, द्वादशी, शिवरात्र.. सर्वच सत्तेशिवाय उपाशीच राहणार आहेत.
-अनिल प्रल्हाद पाठक, विरार

शाळांची हुकूमशाही, पालक ‘सहनशील’!
‘शुल्कवाढीला विरोध? विद्यार्थ्यांना काढून टाकू’ हे बोरिवलीमधील शाळेचे वृत्त (लोकसत्ता, १८ नोव्हेंबर) फक्त त्या शाळेपुरते मर्यादित नसून बहुतेक सर्व खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा- विशेषत: जिथे राज्याचे बोर्ड नसून इतर बोर्ड असते- तिथेही शुल्कवाढीत ‘हम करे सो कायदा’ वृत्ती दिसून येते. सध्या पालक केवळ इंग्रजी माध्यमावर समाधानी नसतात, तर सीबीएससी, आयसीएसईसारखे बोर्डही त्यांना हवे असते. त्यासाठी कितीही पसे ‘टाकायची’ त्यांची तयारी असते. प्राथमिक शाळेच्या वर्गासाठी काही हजार वा लाख रुपये मोजणे योग्य आहे का, हा प्रश्नही या पालकांना पडत नाही आणि कालांतराने फी वाढली की तो अन्याय वाटायला लागतो.
 खासगी शाळांवर नसलेला अंकुश आणि इतर बोर्डाबद्दल वाढलेली पालकांची आसक्ती यामुळे शालेय शिक्षणालासुद्धा व्यावसायिक रूप प्राप्त झाले आहे. लवकरात लवकर सर्व शालेय बोर्ड समपातळीचे झाले तर, तसेच खासगी शाळांच्या फीवर काही प्रमाणात जरी अंकुश लागला तर.. आणि तरच असे प्रकार थांबतील. नाही तर आपल्या पाल्याला त्रास होऊ नये म्हणून पालक मुकाटय़ाने शाळेची हुकूमशाही सहन करीत राहतील.
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

दोघांनाही बदलावे लागेल!
‘एकादशीकडे शिवरात्र’ या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे ठाकरे बंधूंचे एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज नव्हती. यापुढे जर का ते खरोखरीच एकत्र आले तर त्याचे वर्णन ‘बल गेला आणि झोपा केला’ असेच करावे लागेल. गेल्या वर्षांत शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष होता; परंतु त्याचे वर्तन एका जबाबदार विरोधी पक्षाचे असल्याचे जाणवलेच नाही. आजही जो पक्ष समर्थ विरोधी पक्ष बनू शकत नाही तो जबाबदार सत्ताधारी कसा बनणार, हा खरा प्रश्न आहे.
 राजकारणात इच्छाशक्ती, प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर पुन्हा सत्तेपर्यंत भरारी मारणे कठीण नसते. त्याकरिता पक्षांतर्गत खूप बदल करावे लागतील, जनतेत जावे लागेल, चांगले सल्लागार बाळगावे लागतील. जनतेत आश्वासक प्रतिमा तयार करावी लागेल. हे सारे करण्यास शिवसेना व मनसेचे आजचे नेतृत्व तयार आहे काय?
शैलेश न पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)

कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन.. काही अनुभव
बिलासपूरची भयंकर घटना वाचून सुन्न व्हायला झाले. तो भाग महाराष्ट्रापासून खूप दूर असल्याने त्याचे पडसाद इकडे फार तीव्रतेने उमटले नसावेत. पण इथली परिस्थितीही काही खूप वेगळी नाही.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एका स्त्री-आरोग्य संवादाच्या शिबिरात उपस्थित ग्रामीण महिलांना मी म्हटले की, तुमचा कुटुंब नियोजन शिबिरातल्या ऑपरेशनचा खराखुरा अनुभव लिहा. तर एकीने असे लिहिले :
 ‘‘माझा नंबर पंचवीस होता. सकाळीच आठ वाजता मला भुलीची सुई मारली. जनु काय एकदम दवाखानाच फिरला आसं दिसलं. माझं आप्रीषन रात्री नऊ वाजता झालं. आप्रीषन करायला डाक्टर होता. आत नेल्यावर जमिनीवर कापडाचे लाल लाल बोळे खूप पडले होते. ते पाहून मी अर्धमेल्यासारखी झाली. आप्रीषनच्या वेळी दुखलं म्हणून मी ताडकानी उठून बसली. मानेच्या आनी पायाच्या शिरा एक झाल्या. मला दोन गडी मानसानी धरून परत दाबुन झोपवलि. मग आप्रीषण झालं. मला सगळं कळत होतं. मी हळूहळू आरडत होती. कनत होती. डाक्तर आपणच कोणाशी(तरी) बोलत होता. माझी पिशवी बाहेर काढून परत आत घातली (की) काय आसं वाटत होतं. नंतर मला बखोटाला धरून दोन माणसांनी बाहेर आणून ताडपत्रीवर टाकली. उघडय़ावरच होती. चादरपण नवती. मी सकाळपासून उपाशीच होती. चहापन नवता. माजी थरथर होत होती. मला कुशीवर करायला कुनी नवते. कंपाऊंडर, शिपायी दिसले की मी घुडगे वरती करायची. ते गेले की खाली करायची. खूप लाज वाटत होती. शेजारच्या बाईने तिच्यातला चा दिला. मला नंतर जेवा मोटारने सोडलं तेवा मी रात्री फाटय़ावरून घरी अंधारात चालत गेली. रात्री दोन वाजले होते. चार दिवसांनी टाके पुलावले. मी हातानी पिळला तर पु निगायाचा. खूप दुखायाचे. तापही आला होता. मग कोरपडीचा तेल लावला. तेवा पू कोरडा पडला. मला पसे भेटले नाहीत. दवाखान्यातल्या बाइला मिळले. आता माझी तब्येत चांगली आहे.’’
आणखी एका महिलेचा वेगळाच अनुभव..
‘‘..मी आठ दिवसाची बाळतीन होती. घरात सगळं काम माझ्यावरच. सासू आजारी. आधी तीन अर्धी कच्ची (गर्भ) पडून गेली होती. तेवा मला फार त्रास झाला. मग मुलगा झाला. त्या एकाच मुलावर आपरेशन करायचं मी ठरवलं होतं. पण नवरा नको म्हनाला. हा पोरगा बी सारका आजारी पडायचा. तो मोठा होऊ दे म्हनाला. मग  करून घे म्हनाला. मग ही मुलगी झाली. बाळत होऊन आठ दिवस झाले होते.
मी नवऱ्याला विचारले नाही. सांगितले नाही. सकाळीच आवरून निगून गेले. संगतीला कुनी नवते. मुलगी पोटाशी बांदली. कपडे डोक्यावर घेतले. डोंगर उतारानीला लागले. रस्त्यावरून आईला निरोप दिला. ती दुपारी दवाखान्यात आली. नवऱ्याला पण कळलंच. तो पण आला. दारू पिलेला होता की काय. पाच-सहा लोक त्याच्याबरोबर होते. तेही प्यालेले होते.. दवाखान्यात येऊन तमाशा केला. डाक्टरशी भांडला. डाक्टरला म्हणतो आपरेशन करायचे नाही. पन डाक्टरने त्याचे ऐकिले नाही. माझे ऐकिले. मग ते सर्व निगून (गेले).. नंतर मी घरी आलेवर काय झाले हे मोहनदादा तुमाला माहीत आहे..’’
अलीकडच्या काळात आपल्या देशाचा जन्मदर लक्षणीय प्रमाणात खाली आला आहे. त्याचे जवळजवळ संपूर्ण श्रेय आपल्या देशातल्या स्त्रियांना जाते. मुले त्यांना होतात, पुरुषांचा काय संबंध म्हणून कुटुंबनियोजनाचा सारा भार त्यांनीच घ्यायचा असे जणू आपल्याला मान्यच आहे. (पुरुष शस्त्रक्रियांचे प्रमाण पुरोगामी महाराष्ट्रात नगण्य आहे.) असे असूनही आपली एकूण अक्षम्य निष्काळजी आरोग्य व्यवस्था आणि पुरुष प्रधानतेने डागाळलेली कुटुंब व्यवस्था स्त्रियांना  काय प्रकारचा न्याय देते हे वरील मनोगते वाचून लक्षात येते.
खरे तर पुरुष-मानसिकता बदलणेसुद्धा शक्य आहे. स्त्रियांनी लिहिलेले असे काही अनुभव मी जेव्हा पुरुषांना वाचायला देतो, किंवा त्यांना वाचून दाखवतो, तेव्हा ते खरोखरच मुळापासून विचार करायला लागतात आणि त्यातले अनेक योग्य कृती करायलाही, म्हणजे स्वत:ची शस्त्रक्रिया करून घ्यायला तयार होतात.
पण आरोग्य सेवा देणाऱ्यांनी त्यापेक्षा खूप अधिक खोलवर विचार करायला हवा आहे.
डॉ. मोहन देशपांडे, पुणे</p>

मिशन नव्हे, कमिशन
‘एकादशीकडे शिवरात्र’ हा अग्रलेख (१८ नोव्हेंबर) वाचला आणि पटला. सरकार बनविण्याच्या सर्व कामकाजात जनतेचा कोणताच विचार शिवसेनेसमोर नाही. तो विचार असता तर कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन करून कामाला सुरुवात केली असती, पण नाही. मिशन नव्हे तर कमिशन त्यांच्या राजकारणाचा पाया आहे, हेच खरे. बहुमत मिळाले तरी ते कार्यक्षम कारभार करू शकणार नाहीत.     – विजय जोगळेकर, चिपळूण.
राजीव मुळ्ये (दादर, मुंबई) व श्रीनिवास जोशी (डोंबिवली) यांनीही अशा आशयाची पत्रे पाठविली आहेत.