बधिर पिढीला विचारप्रवणकरू पाहणारी ‘धूळपेर.’

आसाराम लोमटे यांच्या ‘धूळपेर’ या सदरातील ‘नाद नाय करायचा’ (१५ सप्टें.) हा लेख म्हणजे, आजच्या संवाद माध्यमांच्या अतिरेकी वापरावर केलेलं मार्मिक आणि भेदक भाष्यच होय.

आसाराम लोमटे यांच्या ‘धूळपेर’ या सदरातील ‘नाद नाय करायचा’ (१५ सप्टें.) हा लेख म्हणजे, आजच्या संवाद माध्यमांच्या अतिरेकी वापरावर केलेलं मार्मिक आणि भेदक भाष्यच होय. संवाद माध्यमाच्या वापरासाठी अत्यंत आवश्यक अशी आचारसंहिताच (कोड ऑफ कंडक्ट) या लेखामुळे आज तरुणाईला उपलब्ध झाली आहे, असे मला वाटते.
‘लाईक/कमेंट करणे= जबाबदारी/कर्तव्य पार पाडणे’ अशा प्रकारचं तरुणाईतलं आविर्भावात्मक समीकरण लोमटे यांनी लेखाद्वारे हाणून तर पाडले आहेच, पण संवाद माध्यमांच्या भिंतीं’वर भरकटलेल्या तरुणाईला येथे विचार करायलाही भाग पाडले आहे.
खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांनी संवाद माध्यमांच्या बरोबरीने, ‘बधिरीकरण’ हीदेखील एक देणगी आज आपल्याला दिली आहे, हे वाचकाला  येथे पटते. ‘आजच्या निर्वकिार तरुणाईत संवेदना जागवण्याची अतीव निकड’ हा लेखाचा आंतरिक गाभा तर ठळकपणे लक्षात येतोच. मात्र अगदी सहजतेने तरुणाईच्या मनाला शेवाळलेल्या गुळगुळीत दगडगोटय़ाची उपमा देऊन, त्यांना गदागदा हलवत त्यांना अस्वस्थ करून, त्यांच्या ठिकाणी आत्मभान आणि नवसंवेदना निर्माण करण्याबरोबरच त्यांना नवदृष्टी देण्यात हा लेख अत्यंत यशस्वी होतो.
-अक्षदा रा. आघाव (विद्यार्थिनी, फर्गसन महाविद्यालय) पुणे

‘सबका साथ’ की सर्वावर दोषारोप?   
‘यांना आवरा’ हा अग्रलेख (१६ सप्टें.) वाचला आणि वाटले की ‘सब का साथ सब का विकास’  या तत्त्वाचा उद्घोष करीत मोदी सरकार सत्तेवर आले होते, हे विसरले जात आहे. साक्षी महाराजाचे देशप्रेम आता जागे झाले आहे.. मदरशांमध्ये लव्ह जिहादचे शिक्षण दिले जाते, असे विधान करून ‘सर्व मुसलमानांना जबाबदार’ धरणे हे कोणते तत्त्वज्ञान म्हणावे?  ‘सर्व मुसलमान दोषी’ असे ठरवण्यात संघ, विश्व हिंदू परिषद हे नेहमीच आघाडीवर असतात आणि भाजप त्यांना वेळोवेळी साथ देतो. मग यांना विरोध म्हणून एमआयएम यासारखी संघटना पुढे येते आणि अशा धर्माच्या राजकारणावरून देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात येऊ शकते
वेळीच अशा वाचाळवीरांना नाही रोखले, तर ‘सब का साथ सब का विकास’ म्हणणाऱ्या मोदी सरकारवर जनता विश्वास ठेवणार नाही.
 -मारोती सं. गायकवाड, उंदरी (नांदेड)

भाजपचा गोंधळ नेते थांबवत का नाहीत?
योगी अदित्यनाथ यांचा ‘लव्ह जिहाद’चा शोध, तसेच खासदार स्वामी साक्षी महाराज यांची मदरसामधील जिहाद व अतिरेक्यांच्या निर्मितीचा शोध, तर श्रीमती मनेका गांधी यांचा कत्तलखान्यातून अतिरेक्यांना पैसा पुरवला जात असल्याबाबतचा कल्पनाविलास या गोष्टी म्हणजे गुपचूप सरकार चालवण्याचे काम करणाऱ्या पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासमोर अडचणी उभ्या करण्याचेच प्रकार वाटतात. मध्यंतरी सरसंघचालकांनी ‘भारतातील सर्व लोक (हिंदी म्हणण्याऐवजी) हिंदू’ अशी विचित्र घोषणा करून खळबळ मजवली होतीच.
 पण कोणत्याही प्रकारात स्वत पंतप्रधान किंवा पक्षाचे धडाडीचे अध्यक्ष अमित शहा हे काहीच बोलताना दिसत नाहीत. पत्रकार परिषद घेऊन मोदी आपली याबद्दलची आपली मते स्पष्टपणे मांडून या लोकांची तोंडे बंद का करीत नाहीत? एकंदरीत ‘धर्म की विकास’ याबद्दल भाजपमध्येच गोंधळाचे वातावरण दिसते. मोदींची पक्षावरील पकड ढिली होत चालल्याचेच हे लक्षण मानायचे का?
 -प्रसाद भावे, सातारा

बेधडक खिल्लीलाही आवरा..
‘ यांना आवरा..’ या अग्रलेखातून (१६ सप्टें.) खासदार साक्षी महाराज आणि मनेका गांधी यांचा अविवेकीपणा दाखवण्याच्या प्रयत्नात, त्यांची संपूर्णपणे मूर्खात गणती केली आहे असे वाटते. लव्ह जिहादबाबत साक्षी महाराजांनी केलेल्या वक्तव्याला त्यातील तथ्यांश सिद्ध होण्याआधीच बेधडक म्हणणे, हासुद्धा बेधडकपणाच नाही का? साक्षी महाराजाने मांडलेले धर्मातरित विवाहाचे दरपत्रक जर खरे असेल, तर ते त्यांनी बनवलेले नसल्यामुळे त्यात त्यांच्या कल्पनाविलासाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हिंदू मुलींना शीख मुलींपेक्षा कमी दर, अशा शब्दांत साक्षी महाराज हिंदू धर्माचा मान राखत नाहीत अशी उपहासात्मक का होईना, पण खिल्ली उडवण्याची आवश्यकता नाही.
खाटिकखान्यातून होणारी संपूर्ण कमाई दहशतवादावर खर्च होते म्हणून सर्व खाटिकखानेच बंद करा ही मनेका गांधी यांची मागणी नक्कीच आततायी आहे. जे या कृत्यात सामील असतील त्यांच्यावर फक्त कारवाई करता येईल. पण म्हणून दहशतवाद रोखण्यासाठी सर्वानी शाकाहारी व्हा, असे मनेकाबाईंना म्हणायचे आहे, असा त्याचा अर्थ कसा काय होऊ शकतो? शिवाय त्यासाठी शाकाहारामुळे जगभरात काय हाहाकार माजू शकतो याचा ऊहापोह करणे हे अप्रस्तुतच वाटते. डॉक्टरही रोग्यांना पथ्य म्हणून, तर निरोग्यांना रोग दूर ठेवण्यासाठी शाकाहारी बनण्याचा सल्ला देतच असतात.
तेव्हा ‘दरपत्रकासहित या मंडळींचे सर्व आरोप खरे असतील, तर त्यांची शहानिशा करा, सध्याचे सरकार तर तुमचे आहे, करा चौकशी..’ असे म्हणता येईल. पण या आरोपांना संपूर्णपणे वेडय़ात जमा करणे परवडण्यासारखे नाही.
-आशुतोष भालचंद्र सावे, जुहू (मुंबई)

‘अंधश्रद्धेच्या नावाने बोंबलणाऱ्या बुद्धिवादय़ांची आम्हाला गरज नाही’
‘अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धासुद्धा नाकारावी’ इतकंबुद्धिवादी अंधश्रद्धेने बरबटलेलं विधान वाचून आमच्या समाजात विचारवंत समजल्या जाणाऱ्या लोकांच्या बुद्धीविषयी कीव करावीशी वाटली. कुठलीही श्रद्धा नाकारणारी माणसे ही कसाबसारखी अतिरेकी होऊ शकतात, कारण डोळस श्रद्धेतून येणारी कुठलीही मूल्ये त्यांना माहीतच नसतात. जोपर्यंत माणसे माणसांसारखीच आपली मूल्याधारित जीवनशैली श्रद्धेने जगत आहेत, तोपर्यंत तरी शरद बेडेकरांसारख्या बुद्धिवादी धुरिणांची या समाजाला गरज नाही.
 समाजसुधारणेचा मार्ग हा सर्वसामान्य माणसांच्या वस्तुनिष्ठ वैचारिक प्रगतीतूनच प्रशस्त होत असतो. वैचारिक प्रगतीसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांनी होत असते आणि ही अशी प्रगती संपूर्ण समाजव्यवस्था हळुहळू स्वीकारत जाते, या मागेदेखील एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा समाजमानसात रुजवावी लागते.
मूलभूत विचार करण्याची शक्ती श्रद्धेमुळे नव्हे तर अंधश्रद्धेमुळे मारली जाते. अंधश्रद्धेच्या नावाने उठसूट बोंबलत फिरणारे हे भंपक बुद्धिवादी नेमकं काय साध्य करू पाहताहेत? आज प्रगतिशील राष्ट्रांतले लोक हे काय फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगूनच सुधारले आहेत काय? प्रत्येक माणूस एक संवेदनशील मन घेऊन जगत असतो. त्याच्या श्रद्धा त्याला एक चांगले जीवन जगण्याची ऊर्मी देत असते. दुर्दैवाचे फटके खाल्लेली माणसे बऱ्याच वेळा अंधश्रद्धेला बळी पडलेली दिसतात. अशा वेळी डोळस श्रद्धा असलेली माणसेच त्यांना सावरून घेऊ शकतात. तिथे असल्या बुद्धिवाद्यांचा समाजाला काहीही उपयोग नसतो.
-प्रदीप अधिकारी

प्रतिगाम्यांचा अभिनिवेश आता वाढतो आहे..
‘श्रद्धाच नाकारा’ असे परखड मत मांडणारे शरद बेडेकर आणि हा मथळा देणारा लोकसत्ता या दोघांचेही मन:पूर्वक अभिनंदन. परंतु, स्वातंत्र्यपूर्व काळातील सुधारणावादी पत्रांपेक्षाही आज लोकसत्तापुढील आव्हान अधिक कठीण आहे. ‘ज्या अर्थी आपण पारतंत्र्यात आहोत, त्या अर्थी आपले काहीतरी चुकत असेल’ इतपत तरी समज तत्कालीन लोकांना होती. पण आता तर प्रतिगाम्यांचा अभिनिवेश अधिकाधिक वाढत आहे. याचे एक कारण विवेकी अभिजनांची मुखदुर्बळ स्थितप्रज्ञ वृत्ती.
साधे उदाहरण : आजचे सार्वजनिक दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे उत्सव ही जवळपास सार्वजनिक शरमेची बाब झाली आहे. हे उत्सव आता धार्मिक व सामाजिक प्रदूषण झाले असून सनातन हिंदू धर्माचा यांच्याशी काहीही संबंध नाही असे मत हिंदू धर्माच्या  अभिमान्यांनी जाहीर करण्याची वेळ आली आहे. पण दुकाने घालून बसलेल्या धर्माच्या आणि राजकारणाच्या ठेकेदारांना हे परवडणार नाही.
  ‘नतिक आणीबाणीच्या प्रसंगीसुद्धा जे आपली स्थितप्रज्ञता सोडत नाहीत, अशांसाठी नरकातील खोल गुहा राखून ठेवलेल्या असतात’ हे इटालियन महाकवी दांतेचे उद्गार अशा वेळी प्रत्ययास येतात. समाजातील अभिजनांनी मौन पत्करल्यामुळे पाठीशी बुणग्यांच्या फौजा जमवू शकणारांचे फावते आणि या उपद्रवावरील टीका हा ‘धर्मावर हल्ला’ असल्याचा कांगावा ते करू शकतात. वैचारिक मध्ययुगातून आधुनिक युगात प्रवेश करायचा असेल तर या कठोर मूíतभंजनाची नितांत आवश्यकता आहे.
– मनीषा जोशी, कल्याण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers reaction on news

ताज्या बातम्या