‘अशैक्षणिक महाराष्ट्र’ या अग्रलेखात (१२ सप्टें.) बंद होणाऱ्या शाळांबाबत सरसकट सहानुभूती व्यक्त केली आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही.
जिथे अजिबातच शिक्षणाची सोय नसेल तिथे एक विद्यार्थी असला तरी शाळा टिकलीच पाहिजे; परंतु या नावाखाली चुकीच्या शाळांना सहानुभूती मिळता कामा नये. प्रत्येक शाळेचे बंद होण्याचे कारण तपासायला हवे. केवळ साऱ्याच शाळा जणू दुर्गम आदिवासी भागातील आहेत असे चित्र रंगविले जाते तसे नाही, हे यातील शाळांची जिल्हावार संख्या अभ्यासल्यावर लक्षात येते. एकूण १३३०४ पैकी फक्त २४४० शाळा म्हणजे १८ टक्केच शाळा या धुळे, नंदुरबार, अमरावती, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ व ठाणे या प्रमुख आदिवासी जिल्हय़ांतील आहेत व उर्वरित शाळा या इतर विभागांतील आहेत. प्रगत समजल्या जाणाऱ्या आदिवासी लोकवस्ती नसणाऱ्या सपाटीवरच्या जवळपास १० हजारांपेक्षा जास्त शाळांपैकी अनेक, गरज नसताना सुरू झाल्या. त्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करणे शक्य आहे.
राज्यातील आठ हजार वस्तीशाळांचे उच्चीकरण करताना २० पटांच्या पुढील शाळांचे उच्चीकरण करावे अशी आमच्या समितीने शिफारस केली. अर्थात नसíगक अडथळा असेल तर अंतराची अट शिथिल होती. हे निकष बहुतेक जिल्हय़ांत नीट पाळले गेले नाहीत. आपल्या वस्तीत शाळा टिकवण्यासाठी अंतर चुकीचे दाखविणे, नसलेला नसíगक अडथळा दाखवून अंतराच्या निकषातून सूट मिळविणे, पटसंख्या जास्त दाखविणे या प्रकारांनी दाखविलेल्या अनेक शाळा आज अडचणीत आल्या आहेत हे स्पष्टपणे नोंदविले पाहिजे. अशा तक्रारी मराठवाडय़ात जास्त होत्या व त्याच मराठवाडय़ातील बंद पडणाऱ्या शाळांची संख्या २०२६ आहे.
चुकीच्या शाळा उघडण्याचा दोष लोकप्रतिनिधींकडेही जातो. शिक्षण हक्क कायद्याने नव्या शाळा उघडायला प्रोत्साहन दिले. दडपण आणून, खोटी पटसंख्या दाखवून, अंतराचे निकष न पाळता गेल्या पाच वर्षांत मोठय़ा संख्येने लोकप्रतिनिधींनी शाळा अधिकाऱ्यांना सुरू करायल्या लावल्या ही वस्तुस्थिती आहे. बंद पडणाऱ्या शाळांमध्ये नव्याने सुरू झालेल्या यातील शाळा किती ही आकडेवारी जाहीर करायला हवी म्हणजे हा प्रश्न नसíगक नसून भ्रष्ट अंमलबजावणीतून निर्माण झाल्याचे लक्षात येईल. पुणे, नाशिकसारख्या जिल्हय़ांत बंद पडणाऱ्या ४५९०पकी अनेक शाळांचे हेच कारण असण्याची शक्यता आहे!
आदिवासी भागातील शाळा अडचणीत येण्याचे कारण वेगळे आहे. आश्रमशाळा योजना सुरू झाली तेव्हा तिथे शाळा नव्हत्या, पण महाराष्ट्रात दर एक कि.मी.मध्ये जि. प. शाळा उघडली. आता आश्रमशाळा व प्राथमिक शाळांनाही मुले मिळत नाहीत.  तेव्हा दर एक कि.मी.मध्ये प्राथमिक शाळा असेल तर आदिवासी आश्रमशाळेचा प्राथमिक विभाग बंद करावा, मुले चौथीपर्यंत पालकांजवळच गावात शिकू द्यावीत. त्या बदल्यात पालकांना मुलांसाठी  निर्वाहभत्ता द्यावा, असे व्यवस्थात्मक निर्णय घ्यावेत. याउलट नंदुरबार किंवा डोंगराळ प्रदेशात निवासी शाळा हेच उत्तर आहे!
तेव्हा एकाच वेळी गरज असलेल्या शाळा एक विद्यार्थी असेल तरी टिकविणे, खोटय़ा अंतराच्या शाळा बंद करणे व आदिवासी भागात एकच आस्थापना ठेवणे असे उपाय करावेत. तेव्हा भावनिक मांडणीपेक्षा या सर्व शाळांची तटस्थ यंत्रणेने अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा.
– हेरंब कुलकर्णी, अकोले ( जि. अहमदनगर)

‘लाट’ नाकारणे कृतघ्नपणाचे
वास्तविक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले यश हे मोदी लाटेमुळे आहे हे स्पष्टपणे मान्य करण्यात शिवसेनेला कमीपणा वाटू नये. त्यांचे उमेदवार पाहता आणि त्यांना मिळालेली लाखो मतांची आघाडी पाहता हा मोदी लाटेचा करिश्मा होता हे सिद्ध होते.
 शिवसेनेचे उमेदवार असे होते की ज्यांना जेमतेम एका विधानसभा क्षेत्रात आघाडी मिळवता आली असती, अशा उमेदवारांना त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात प्रचंड मतदान झाले. असे असताना मोदी लाटेचा प्रभाव नव्हता असे म्हणणे कृतघ्न पणाचे आहे. शिवसेनेने आता बाळासाहेब नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाळासाहेबांच्या इतकी राजकीय आणि एकूणच उंची गाठणे उद्धव ठाकरे यांना किती शक्य होईल यात शंकाच आहे.
उमेश मुंडले, वसई.

‘कोरडे पाषाण’
‘मोदीमास्तर, मंत्री आणि माध्यमे’ हा अग्रलेख वाचला. कोणत्याही सहकारी मंत्र्याने कोणत्याही पत्रकारास कोणत्याही स्वरूपाची भेटवस्तू द्यावयाची गरज नाही, हा नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या काही योग्य निर्णयांपकी हा एक चांगला निर्णय असे निश्चितच म्हणावे लागेल.
परंतु ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’  अशी बहुतांश प्रसार माध्यमांची भूमिका राहिली आहे. अंधश्रद्धाविरोधी मोठे मोठे लेख लिहायचे आणि अंधश्रद्धेला पूरक जाहिराती द्यायच्या. महिलांवरील अन्यायावर  टीका करायची आणि नग्न महिलांच्या चित्रपट जाहिरातींना पहिल्या पानावर स्थान द्यायचे. या पाश्र्वभूमीवर, ‘लोकसत्ता’ने मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे व चुकीच्या पत्रकारितेला धारेवर धरले आहे, हे अभिनंदनीय आहे.
किरण दामले, कुर्ला पश्चिम (मुंबई)

परवानेच सदोष, म्हणून गाडी चालवणेही..
‘वाहनचालकांची परीक्षा’ हा ‘अन्वयार्थ’ (१५ सप्टें.) वाचला. आपल्याकडील वाहतुकीचा जो बोजवारा उडाला आहे त्यास मुख्य कारण की वाहन चालवण्याचा परवाना देताना तो खिरापतीसारखा वाटला जातो.
त्यामुळे ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ या म्हणीप्रमाणे परवाने देतानाच काही तारतम्य बाळगले जात नाही तर मग चालकांकडून तारतम्याची अपेक्षा ठेवणे निष्फळच ठरणार.  मुंबईतील अंधेरीचे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ज्याप्रमाणे ‘एजंटमुक्त’ केले आहे ते स्तुत्य व कौतुकास्पद आहे. त्याप्रमाणे जर इतर आरटीओ दलालांच्या कचाटय़ातून मुक्त झाली तर गाडे बऱ्यापकी रुळावर येऊ शकेल.
डॉ. मयूरेश म. जोशी, पनवेल.

दुय्यम लेखण्याचा प्रयत्न
जवळ येऊन ठेपलेल्या विधासभेच्या निवडणुकीत १५० जागांवर ठाम राहण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय अगदी योग्यच आहे. पाच महिन्यांपूर्वी महायुतीने महाराष्ट्रात मिळवलेल्या यशाचे श्रेय केवळ मोदी यांच्या लोकप्रियतेलाच देण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सेनेला दुय्यम लेखण्याचा प्रयत्न आहे असे माझे स्पष्ट मत आहे. वेळ आलीच तर उद्धव ठाकरे यांनी युती तुटली तरी चालेल पण मराठी अस्मितेला धक्का लावू देणार नाही, असे भाजप अध्यक्षांना ठणकावून सांगावे.
मुरली पाठक, विले पाल्रे पूर्व (मुंबई)

सोकावलेली मुले!
‘मोदिमास्तर, मंत्री आणि माध्यमे’ हा अग्रलेख (१५ सप्टेंबर) वाचला ‘अच्छे दिन’ची इमारत उभी करण्यासाठी मोदी मास्तर भक्कम पाया उभारताना दिसतात. संख्येने अल्प असणाऱ्या सुजाण, शहाण्या, विचारी मुलांनाच ते कळेल. मोदी मास्तरांच्या या शाळेत इतर कोणत्याही शाळेप्रमाणे सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत. दंगेखोर, व्रात्य, खोडसाळ बहुसंख्य मुलांना ते कसे कळावे? आतापर्यंतच्या ‘मास्तरां’नी सरकारी तिजोरीतून आणि कचेरीतून या दंगेखोर मुलांना अमुक हक्क, तमुक सवलत, अमुक आरक्षण, तमक्यांचा अनुनय अशी पशाची आणि ‘सुख-सुविधांची’ लयलूट करून इमारतीचा पायाच खिळखिळा करून टाकला आहे. अशा फुकटच्या सुविधांना सोकावलेली ही मुले ‘अच्छे दिन’ येण्याची वाट किती दिवस बघणार, हा प्रश्न आहे.
– डॉ. सुप्रिया तडकोड, बोरिवली पूर्व (मुंबई)

संवाद राहातो दूरच!
‘धूळपेर’ हे आसाराम लोमटे यांचे सदर अंतर्मुख करणारे असतेच, तसा त्यातील ‘नाद नाही करायचा’ हा लेखही (१५ सप्टें.) आहे. माझ्यासह अनेकांना असेच अनुभव येत असतात.. आपण कोणाशी बोलायला जावे, तर तो मोबाइलवर चाळे करताना दिसतो, तेवढय़ात कॉल येतो. मग आपण समोर आहोत याचेही भान सोडून दूरस्थाशी त्याचा संवाद सुरू राहतो.. म्हणजे प्रत्यक्ष समोर उभी असलेली व्यक्ती ‘वेटिंग’वरच! ना आपली त्याला काळजी, ना कसलीच खंत. हे असेच खेळ सुरू राहिले, तर जाणिवांच्या कक्षा रुंदावणार तरी कशा?
– संतोष अधिकारी, लातूर.