‘‘भाषण’प्रधान!’ या शीर्षकाचे अवधूत जोशी यांचे पत्र (लोकमानस, ८ सप्टें.) वाचले.  
शिक्षक, बी.एड्./ डी.एड्.धारकांची बेरोजगारी, नेट-सेट उत्तीर्णाना लागणाऱ्या ‘गांधीजीं’च्या (नोटांच्या) कुबडय़ा आणि राजकीय दबावाखाली होणाऱ्या कुलगुरूंच्या नेमणुका या सर्व समस्या शिक्षण क्षेत्रास भेडसावणे हे आपले दुर्दैवच आहे, मात्र ‘या प्रश्नांवर मोदींनी शिक्षक दिनी कोणताही धोरणात्मक निर्णय का घेतला नाही?’ या लेखकाच्या प्रश्नाचे उत्तर पत्रातच आहे.
शिक्षण क्षेत्राची ही दुरवस्था नव्या पिढीसमोर मांडल्यास त्या क्षेत्राबद्दल व त्यातील सक्रिय सहभागाबद्दल त्यांना कितपत आस्था, उत्साह राहिला असता? त्यामुळे प्राय: या क्षेत्राची चांगली बाजूच आधी मांडणे गरजेचे होते. नव्या पिढीला त्यातील सहभागासाठी प्रोत्साहन देणेच गरजेचे होते. आजची पिढी ही स्मार्ट आहे, भ्रष्टाचार वगरे गोष्टी सतत विविध माध्यमांतून त्यांच्या कानांवर पडतच असतात. याबाबत बोलण्यासाठी व कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यासाठी पंतप्रधानांना इतर व्यासपीठे आहेतच.
हा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानी पाहिला असला तरी त्याचा मुख्य उद्देश डॉ. राधाकृष्णन यांची शिकवण विद्यार्थ्यांसमोर मांडणे व मनात शिक्षण क्षेत्राबद्दल आस्था निर्माण करणे हा होता; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकसनशील मनावर जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी िबबवण्यासाठीच आपल्या ‘प्रचंड अनुभवी’ पंतप्रधानांनी इतर गोष्टींचा उल्लेख टाळला असावा, असे मला वाटते व यासाठी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करणे योग्यच ठरेल.      
ऋता भिडे, ठाणे

‘राष्ट्रवादी’ भाजप!
सध्या भाजपमध्ये जी भाकडभरती चालू आहे, त्यावर ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखाने चांगला प्रकाश टाकला. या भाकड मंडळींना त्यांच्या पक्षात स्थान नाही, येत्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळण्याची शक्यता नाही. पक्षातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता असती तर एकानेही पक्ष सोडला नसता.
कोणती का असेना, पण ‘खुर्ची’ नसली, की अशा नेत्यांची घुसमट होते, श्वास कोंडल्यासारखे होते. जिकडे खुर्ची मिळण्याची आशा तिकडे उडय़ा मारायला सुरुवात होते. या मंडळींना जर भाजपने ‘तिकिटा’चे आश्वासन दिले असेल, तर त्या मतदारसंघातील ‘निष्ठावंत’ नाराज होणार. कदाचित तेही मग उडय़ा मारणार.  असेच चालू राहिले, तर भाजपचे नाव बदलून ‘राष्ट्रवादी भाजप’ होईल.  
अनिल प्र. देशपांडे, ठाणे</strong>

भाजपला लाभ नक्की; पण गांधी घराण्याचे काय?
महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये होत असलेल्या भाकडभरतीचे अत्यंत विदारक आणि भयानक चित्र सोमवारच्या (८ नोव्हेंबर) अग्रलेखातून सादर केले आहे. भाकडभरतीमुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत थोडाफार लाभ नक्कीच होईल; पण भविष्यात पुढे जे ताट वाढून ठेवले आहे त्याची चाहूल भाजपमधील तरुण आणि उमद्या नेतृत्वास का लागली नाही, हा चिंतेचा विषय व्हावा. आज ते कोणीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील; पण महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ मंडळींनी (भाजप) तरी योग्य विचार करावा.
देशस्तरावरील काँग्रेसची अवस्था आणि राहुल गांधी यांच्या सध्याच्या दारुण स्थितीचे असेच विदारक चित्र त्याच अंकात, त्याच पानावरील ‘लाल किल्ला’ या सदरात प्रदíशत केले आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मजबूत विरोधी पक्षाची आवश्यकता असते हे जाणवत असताना राहुल गांधी इतक्या बेजबाबदारपणे वागत आहेत, हे देशाचे दुर्दैव आहे.
गांधी घराण्याला अडगळीत टाकण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घेऊन काँग्रेसमधील जुन्याजाणत्या मंडळींनी पावले उचलली, तर अजूनही वेळ गेली नाही असे वाटते.
श्रीनिवास जोशी, डोंबिवली पूर्व

यांचा प्रचार करणार?
‘भाजपमधील भाकडभरती’ हा अग्रलेख (८ सप्टें.) वाचला.  रामविलास पासवान, चंद्राबाबू नायडू इत्यादी ‘धर्मनिरपेक्ष’ किंवा ‘सेक्युलर’ शब्द विसरून भाजपच्या गंगेत सामील झाले ते केवळ सत्तेसाठीच. तोच कित्ता आता महाराष्ट्रात पाच जणांनी गिरवला आहे.  पुढील काही दिवसांत या पाचाचे पन्नास लाभार्थी होतील व त्यांनाही भाजपने शुचिर्भूत करून घेतल्यास नवल नाही! अशा आयारामांची गरज फक्त त्यांच्याकडील ‘अगणित लक्ष्मीमुळे’ पडावी काय?
आदर्श घोटाळ्याची चिरफाड करणारे देवेंद्र फडणवीस जनतेत या आयारामांचा कुठल्या तोंडाने प्रचार करणार? यापुढे असल्या संधिसाधूंवर व घोडेबाजारावर चाप बसावा म्हणून ‘असा पक्षबदल (भाकडभरती) निवडणुकीच्या कमीत कमी सहा ते बारा महिने आधी झाला असेल तरच पक्षात येणाऱ्यांची निवडणुकीतील उमेदवारी ग्राह्य़ धरली जाईल’ असा ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण आदेश आता सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगास देईल काय?
प्रवीण आंबेसकर, ठाणे

आताच उपरती का झाली?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी नुकतेच नवी दिल्ली येथील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना, जोपर्यंत समाजात असमानता आहे तोपर्यंत असमानतेचा फटका बसलेल्यांना आरक्षण हवेच अशी भूमिका मांडली. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ त्यांनी असेही प्रतिपादन केले की, ‘त्यांनी देशाच्या हितासाठी हजार वष्रे अन्याय सहन केला, ज्या कारणासाठी त्यांनी अन्याय सहन केला, ती कारणे स्वातंत्र्यानंतर उरलेली नाहीत.. त्यांना समान स्थान देणे ही आपली जबाबदारी आहे, त्यासाठी शंभर वष्रे अन्याय सहन करावा लागला तरी हरकत नाही’.
 या अनुषंगाने असे निदर्शनास आणावेसे वाटते की अशी पापक्षालनाची संधी संघास व हिंदू धर्मनिष्ठ असलेल्यांना सन १९५६ मध्ये आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६च्या धर्मातराच्या अगोदर सुमारे २० वष्रे सखोल अभ्यास, चिंतन व सर्वाशी चर्चा करून हिंदू धर्मनिष्ठ असलेल्यांना भरपूर अवधी दिला होता. परंतु त्या वेळच्या सरसंघचालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे व निर्धास्तपणे आश्वस्त होतील व  हिंदू धर्मातच सन्मानाने आपल्या लाखो अनुयायांसोबत राहतील अशी कृती केल्याचे आढळत नाही. संघाच्या यथास्थिती या तत्त्वाला चिकटून राहण्याच्या मानसिकतेचा हा परिणाम असावा.
अशीच भावना व परखड विचार एके काळी रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या डॉ. संजीव केळकर यांनी त्यांच्या ‘लॉस्ट इयर्स ऑफ आर. एस्. एस्.’ या पुस्तकात (पृष्ठ क्रमांक ८२) प्रभावीपणे मांडले आहेत. यासंबधी संघाच्या कोणत्याही जबाबदार व्यक्तीने मत वा प्रतिवाद केल्याचे स्मरत नाही. या पाश्र्वभूमीवर सरसंघचालकांना आताच उपर्युक्त प्रतिपादन का करावेसे वाटले हे अनाकलनीय आहे.
एवढा मोठा समूह हिंदू धर्म सोडून गेल्याबद्दल संघाने खंत वा दु:ख व्यक्त केल्याचे आठवत नाही. ‘रा. स्व. संघ’ या संघटनेचा गाढा अभ्यास असलेल्या विद्वनांनी यावर प्रकाश टाकून समाजात मंथनप्रक्रियेला चालना द्यावी अशी अपेक्षा आहे.
सतीश भा. मराठे, नागपूर.

अमित शहांना माहिती द्यायला हवी..
‘भाजपमधील भाकडभरती’ हा अग्रलेख (८ सप्टें.) वाचला. भाजपच्या सर्वश्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार या स्थानिक नेत्यांनी बोध घेऊन आपल्या केंद्रीय नेत्यांना समजावून सांगावे. ‘आत येणाऱ्यांना घ्या’ असे धोरण असेल त्यांना बबनराव पाचपुते यांच्यासारख्यांबद्दल काही माहिती असेल असे वाटत नाही. ‘आम्ही काय करणार?’ असे म्हणून येईल त्याला घेण्याच्या तयारीने भाजपचे पानिपत व्हायला वेळ लागणार नाही. ‘ही मंडळी अग्रलेखाने दखल घेण्याच्या लायकीची नाहीत’ हा उल्लेख अत्यंत मार्मिक वाटला.
याच पाचपुते यांच्या राजीनाम्यासाठी भाजप व अन्य पक्षीयांनी विधानसभेचे कामकाज बंद पाडले होते, ही गोष्ट तरी अमित शहांना सांगायला हवी. खरे पाहाता आयाराम गयारामना पक्षात स्थान असता कामा नये. पक्षातील निष्ठावंतांनी पक्षाच्या पालख्याच फक्त वाहायच्या काय?
सुधीर सुदाम चोपडेकर, डोंगरी, मुंबई