इस्रायल, मोसाद यांचा असा खास वाचक आहे. त्यातला बहुतांश इस्रायलच्या शौर्यानं भारावलेला असतो आणि त्याला तो देश बिच्चारा वगैरे वाटत असतो. पण तो आभास आहे. हेसुद्धा मोसादचंच एक प्रकारचं यश. तेव्हा ज्यांना हा आभास कुरवाळायचा आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना तो भेदून वास्तवात यायचंय त्यासाठीही हे पुस्तक वाचणं जीवनावश्यक आहे.

पॅरिसच्या उपनगरातला शहर बससेवेचा थांबा. हलीम रोज सकाळी त्या ठिकाणी कार्यालयात जाण्यासाठी बस पकडायचा. हलीमला आदेश होता. सरळ आपल्या कार्यालयात जायचं नाही. बस, लोकल बदलत बदलत पोचायचं. असं जरी असलं तरी सकाळी निघतानाचा त्याचा थांबा नक्की होता. घरासमोरचा हा बसस्टॉप. त्याच्या वेळेला बरोबर एक मदनिका तिथे असायची. हलीम बसथांब्यावर यायच्या आधी ती आलेली असायचीच. मग हलीमच्या बसच्या आधी एक लाल फेरारी यायची. एक तरुण चालवत असायचा. तो आला की ही तरुणी बसथांबा सोडून त्या मोटारीत बसायची आणि एका उत्साही तारुण्यसुलभ वेगात ते दोघे गायब व्हायचे. हा रोजचा क्रम.

 अपवाद झाला तो एकदाच.
 झालं असं की हलीम ठरलेल्या वेळी बस थांब्यावर पोचला. ती तिथे होतीच. पण त्या दिवशी त्या फेरारीला जरा उशीर झाला. ती यायच्या आधी बस आली. त्या तरुणीनं मागे बघितलं. फेरारी दिसत नव्हती. याचा अर्थ तिच्या मित्राला उशीर होणार होता. तेव्हा ती तरुणी बसमध्ये शिरली. हलीम त्याच्या बसची वाट पाहत तसाच उभा. त्याच्याही बसला जरा उशीरच झालेला असतो त्या दिवशी. त्याची बस यायच्या आधी ती लाल फेरारी येते. हलीम बघतो त्यातला तरुण आपल्या मैत्रिणीला शोधतोय. हलीमला तो चेहऱ्याने माहीत असतोच. तेव्हा तो सांगायला जातो त्या तरुणाला की तुझी मैत्रीण आताच बसने पुढे गेलीये.. त्यावर तो मोटारीतला तरुण विचारतो कोणत्या स्थानकाकडे ती बस गेलीये.. सांगतो नाव हलीम त्या स्थानकाचं. तेव्हा तो मोटारीतला तरुण म्हणतो हलीमला मी तिकडेच चाललोय.. तुला वाटलं तर सोडतो.. चल येतोस तर.. हलीमलाही त्याच स्थानकाकडे जायचं असतं. तो बसतो मोटारीत.
अन् मोसादच्या जाळ्यात अलगद सापडतो.
हलीमचं घर मोसादच्या गुप्तहेरांनी भेदलेलं असतं. त्याच्या घरात बोलला गेलेला शब्दन्शब्द त्यांनी ऐकलेला असतो आणि त्यामुळेच त्यांना हलीमची गरज असते.
कारण हलीम इराकच्या अत्यंत गुप्त अशा अणुभट्टीबांधणी योजनेवर काम करत असतो. फ्रान्समध्ये त्याच कामाच्या तयारीसाठी आलेला असतो तो. हलीमचं हे सूत मोसादच्या हाती पडतं आणि त्यातून जन्माला येते ऑपरेशन स्फिंक्स. इराकचा सद्दाम हुसेन ओसिराक इथं अणुभट्टी उभारत होता. सद्दामच्या हाती अणुबॉम्ब म्हणजे आपल्याला थेट धोका असं इस्रायलच्या मनानं घेतलं होतं. त्यामुळे इस्रायलला कसंही करून ही अणुयोजना हाणून पाडायची असते. सरळपणे नाही जमलं तर थेट हल्ला करून या अणुभट्टय़ा उद्ध्वस्त करायच्या असतात. त्यासाठी त्याला या योजनेची बित्तंबातमी हवी असते. हलीम फुटतो आणि ती माहिती जमा व्हायला सुरुवात होते. त्यातूनच १९८१ साली अत्यंत धाडसी म्हणता येईल अशी हवाई मोहीम इस्रायल आखतं आणि थेट इराकच्या भूमीत घुसून या अणुभट्टय़ा उद्ध्वस्त केल्या जातात.
हा सगळा तपशील असाच्या असा सापडला एका पुस्तकात. या पुस्तकाची पहिली भेट झाली तीच मुळी इस्रायलमध्ये असताना. २००२ सालातल्या जून महिन्यात. तिथला माझा जो यजमान होता त्याला मी सतत मोसादविषयी काही ना काही विचारत असे. कारण इस्रायल आणि त्यांची गुप्तहेर यंत्रणा मोसादची काहीही करायची अचाट शक्ती यामुळे नाही म्हटलं तरी एक भारलेपण होतंच. म्हणजे महाराष्ट्रात राजकारणात वा त्या आसपास काहीही झालं की कसं म्हणायची पद्धत आहे.. त्यामागे पवारांचा हात आहे.. तसं आंतरराष्ट्रीय क्षितिजावर मोसादविषयी बोललं जातं. त्यामुळे मोसाद हा बारमाही औत्सुक्याचा विषय होता आणि आहेही. त्यामुळे इस्रायलमध्ये असताना त्याविषयी प्रश्नावर प्रश्न पडत जाणं तसं साहजिकच. प्रश्न संपायचं चिन्ह नाही आणि दौरा संपत आलाय असं जेव्हा माझ्या यजमानाच्या लक्षात आलं, तेव्हा त्यानं एक पुस्तक सांगितलं. पुस्तकाच्या दुकानात मला घेऊन गेला. ते पुस्तक लगेच आम्ही घेतलंदेखील.
‘बाय वे ऑफ डिसेप्शन : अ‍ॅन इनसाइडर्स डिव्हास्टेटिंग एक्स्पोजे ऑफ द मोसाद’ हे त्याचं नाव.
तेल अविवहून रात्री उडाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचेपर्यंत मी पुस्तकाच्या मलपृष्ठाच्या बराच जवळ गेलो होतो. सलग वाचत होतो. भन्नाट याशिवाय या पुस्तकाविषयी दुसरं काहीही म्हणणं अशक्य आहे. ते लिहिलं आहे व्हिक्टर ऑस्ट्रोव्हस्की यानं. हा एके काळी स्वत: मोसादमध्ये होता. त्यामुळे त्याच्या सांगण्याला एक अर्थ आहे, वजन आहे. त्यामुळे जगातल्या अत्यंत निष्ठुर अशा गुप्तहेर यंत्रणेसाठी एखादा निवडला गेल्यापासून ते त्याच्यावर कामगिरी कशी सांगितली जाते, ती पूर्ण कशी करून घेतली जाते याचा अंगावर शहारे आणणारा आणि तरीही अत्यंत रसाळ भाषेत मांडला गेलेला ताळेबंद असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.
नौदलात असताना लेबनॉनमधली एक मोहीम संपवून घरी परत आलेल्या व्हिक्टरला एक दिवस निरोप येतो, तुला बोलावलंय. या क्रमांकावर संपर्क साध. तिथे फोन गेल्यावर पुढचा संपर्क. मग आणखी एक क्रमांक. मग पहिली भेट. नंतर अज्ञातस्थळी जाणं आणि मग चाचण्यांच्या फेऱ्या. मध्ये कुठल्या तरी एका चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यावर काय करायचं याची सूचना. ती अशी की : गुमान घरी जायचं.. पुन्हा कधीही यापैकी एकाही क्रमांकावर संपर्क साधायचा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे नापास झालोय तर वशिल्यानं पास करून घ्यायचा विचारसुद्धा मनात आणायचा नाही.. आमचा निर्णय एकदा झाला की झाला. पंतप्रधानही तो बदलत नाहीत.. अशा करडय़ा सूचना आणि त्याहूनही करडय़ा चाचण्यांतून बाहेर पडल्यावर मानसिक क्षमतेची चाचणी. त्यातला पहिलाच प्रश्न असा : देशासाठी तुला सांगितलं अमुकला मार तर ते मारणं तुला जमेल का? मारल्यानंतर उगाच पाप-पुण्याचे वगैरे प्रश्न मनात येणार नाहीत ना? व्हिक्टर असं आपल्याला फिरवत फिरवत मोसादच्या अंत:पुरात घेऊन जातो. तोपर्यंत पुस्तकानं आपला ताबा घेतलेलाच असतो. व्हिक्टरनं ते लिहिण्यासाठी क्लेअर हॉय या पत्रकाराची मदत घेतलेली आहे. त्यामुळे अगदी पहिल्या पानापासून पुस्तक आपली सहज पकड घेतं.
व्हिक्टर स्वत:च मोसादमध्ये होता. त्यामुळे त्यानं दिलेली माहिती ही स्वत:च्या अनुभवावर आधारित आहे. मोसादमधल्याच कोणी तरी असं हे सगळं लिहायचं याचा हा बहुधा पहिलाच प्रयोग. त्यामुळे खुद्द मोसादमध्येच खळबळ उडाली होती. इतकी की अमेरिकेच्या न्यायालयात या पुस्तकाच्या विरोधात मोसादनं खटला दाखल केला होता. हे पुस्तक प्रकाशितच होऊ नये, असा त्या यंत्रणेचा प्रयत्न होता. कनिष्ठ न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली प्रकाशनाला. पण ती काही टिकली नाही आणि पुस्तक प्रकाशित झालं.
इस्रायल, मोसाद यांचा असा खास वाचक आहे. त्यातला बहुतांश हा इस्रायलच्या शौर्यानं भारावलेला असतो आणि या वर्गाला तो देश बिच्चारा वगैरे वाटत असतो. शेजारच्या अरब देशांच्या विशिष्ट प्रतिमेमुळे इस्रायलचं हे बिच्चारेपण आपल्याकडे खपून गेलंय. पण तो आभास आहे. हेसुद्धा मोसादचंच एक प्रकारचं यश. तेव्हा ज्यांना हा आभास कुरवाळायचा आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना तो भेदून वास्तवात यायचंय त्यासाठीही हे पुस्तक वाचणं जीवनावश्यक आहे. पुस्तकाचं नाव मोसादचं घोषवाक्य आहे असं व्हिक्टर सांगतो. बाय वे ऑफ डिसेप्शन दाउ श्ॉल्ट डु वॉर. म्हणजे.. आभासातूनच तू युद्ध घडवशील.
तशी ती घडलीही. कशी? ते वास्तव जाणून घेण्यासाठीच हे वाचायचं.
व्हिक्टरनं पुढे आणखी एक पुस्तक लिहिलं. द अदर साइड ऑफ डिसेप्शन.
त्याच्याविषयी नंतर कधी..

बाय वे ऑफ डिसेप्शन – अ‍ॅन इनसाईडर्स डिव्हास्टेटींग एक्स्पोजे ऑफ द मोसाद : व्हिक्टर ऑस्ट्रोव्हस्की आणि क्लेअर हॉय,
प्रकाशक : अ‍ॅरो बुक्स,
पाने : ३७१, किंमत : ३८.४९ डॉलर्स.