संतोष प्रधान

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी पुढील महिन्यात राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचे सूतोवाच केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला पर्याय म्हणून आपला पक्ष रिंगणात उतरविण्याची त्यांची योजना असून तसे संकेत दिले जात आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात अनेक प्रादेशिक पक्ष स्थापन झाले. त्यांनी त्या त्या राज्यांची सत्ता भूषविली किंवा त्या राज्यातील प्रमुख पक्ष म्हणून उभे राहिले. परंतु एकाही प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविता आलेला नाही. प्रादेशिक पक्षांचे नेते त्या राज्यांपुरेतच सीमित राहिले.

himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा
AAP and Congress will fight together
आप आणि काँग्रेस दिल्लीत भाजपाविरोधात एकत्र लढणार, पण गुजरात, आसाम अन् गोव्याचे काय?
Narendra Modi and Rahul Gandhi
“वाराणसीत तरुणांना नशेत नाचताना पाहिलं”, राहुल गांधीच्या टीकेवर मोदींचा पलटवार; म्हणाले, “जे स्वतः…”

गेली आठ वर्षे तेलंगणाचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे चंद्रशेखर राव यांनी गेल्या काही दिवसांत भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. वास्तविक आधी त्यांची भूमिका भाजपला अनुकूल होती. पण तेलंगणात सत्ता खुणावू लागताच भाजप नेतृत्वाने चंद्रशेखर राव यांची कोंडी करण्यास सुरुवात केली. तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावर तेलंगणा सरकार आणि तेलंगणा राष्ट्र समितीची कोंडी झाली. यातूनच चंद्रशेखर राव हे भाजपच्या विरोधात गेले. विरोधी एवढा टोकाचा झाला की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी हैदराबाद विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित राहणे दोनदा टाळले. भाजपच्या नेतृत्वाने चंद्रशेखर राव व त्यांच्या घराणेशाहीला लक्ष्य केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांचा पराभव करण्याची भाजपची योजना आहे. ती प्रत्यक्षात येईल का, हे नंतर स्पष्ट होईल. पण चंद्रशेखर राव हे अधिक सावध झाले आहेत. सत्ता टिकविण्याचे आव्हान असताना त्यांना राष्ट्रीय पातळीवर भूमिका बजाविण्याचे स्वप्न पडू लागले आहे. त्यासाठीच ते दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

तेलंगणा राष्ट्र समितीच्या धर्तीवर ‘भारत राष्ट्र समिती’ या नवीन पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर पक्ष वाढविण्याची त्यांची योजना आहे. आंध्र प्रदेशात तेलुगू बिड्डा किंवा अस्मितेच्या मुद्द्यावर प्रादेशिक पक्षाची मुहूर्तमेढ रोवणारे तेलुगू देशमचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांनी राष्ट्रीय पातळीवर स्वतःचा पक्ष वाढविण्याची योजना आखली होती. त्यासाठी त्यांनी भारत देशम या पक्षाची घोषणाही केली होती. भारत देशम हा पक्ष तिसरी आघाडी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी जाहीर केले होते. पण एन. टी. रामाराव त्यांचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याचे स्वप्न साकारू शकले नाहीत. या पाश्वर्भूमीवर दुसरे तेलुगू नेते चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. रामाराव यांचे जावई व तेलुगू देशमचे सध्याचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली असली, तरी त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा होत्याच.

राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी विविध राज्यांचा दौरा केला. शेतकरी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तेलंगणा सरकारच्या वतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. आपले नेतृत्व समाजातील सर्व घटकांमध्ये सर्वमान्य व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता. चंद्रशेखर राव यांनी मुंबईचा दौरा केला. दौऱ्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पण ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांंना जाहीरपणे पाठिंबा देणे टाळले. मुंबई भेटीत चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली होती. या भेटीत राजकीय चर्चा झालीच नाही, असे ट्वीट करून शरद पवार यांनी चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय योजनेची हवाच काढून घेतली होती. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, जगनमोहन आदींची त्यांनी भेट घेतली. ममता बॅनर्जी यांचीही राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अशा वेळी ममतांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यताच नव्हती. काँग्रेस तर चंद्रशेखर राव यांना जवळही करण्यास तयार नाही. चंद्रशेखर राव यांची चौधरी चरणसिंह, देवीलाल या माजी पंतप्रधान वा उपपंतप्रधानांसारखी प्रतिमाही अद्याप तयार झालेली नाही. तेलंगणाच्या बाहेर त्यांचे नेतृत्व अजून तरी मान्य झालेले नाही. अगदी शेजारील आंध्र प्रदेश या तेलुगू भाषक राज्यातही चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व स्वीकारले जाणे कठीणच आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन चंद्रशेखर राव यांच्यामुळे झाले, हा राग तेथील नागरिकांमध्ये आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप, शिवसेना, आता शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असे विविध प्रस्थापित पक्ष असताना चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा स्वीकार होणे कठीणच दिसते.

अगदी तेलंगणाच्या सीमेवरील राज्यांतील नागरिकांमध्ये मेडीगट्टा धरणाच्या बांधकामावरून संतप्त भावना आहेत. उत्तर भारतात तर दक्षिण भारतातील प्रादेशिक नेत्याचे नेतृत्व स्वीकारले जाणे महाकठीण. कारण दक्षिणेकडील नेतृत्व कधीच उत्तरेत प्रस्थापित होत नाही. अगदी हैदराबादचे एमआयएमचे ओवेसी यांना उत्तर प्रदेश वा बिहारमधील मुस्लिमांमध्ये स्वतःचे नेतृत्व प्रस्थाापित करण्यात अद्याप यश आलेले नाही.

देशातील विविध प्रादेशिक नेते त्या त्या राज्यांपुरतेच सीमित राहिले होते. समाजसुधारक किंवा द्रमुकचे संस्थापक पेरियार हे तमिळनाडूपुरतेच मर्यादित राहिले. प्रकाशसिंह बादल, सुरजितसिंह बर्नाला आदी अकाली नेते पंजाबच्या बाहेर कधी पडले नाहीत. दक्षिणेत पेरियार, अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता, शिवाजी गणेशन, चिरंजीवी असे विविध प्रादेशिक नेते झाले. वा त्यांचा त्या त्या राज्यांमध्ये झंझावात होता. पण राष्ट्रीय पातळीवर कोणीच प्रभाव टाकू शकले नाही. माजी पंतप्रधान देवेगौडा किंवा देवराज अर्स हे कर्नाटकातील नेते राष्ट्रीय पक्षांमुळे राष्ट्रीय पातळीवर चमकले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक हिंदुत्वाबद्दल उत्तर भारतात आकर्षण होते. पण बाळासाहेबांचे नेतृत्व उत्तरेत कधीही स्वीकारले गेले नाही वा स्वतः बाळासाहेबांनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला तरी शरद पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्राबाहेर फारसे स्वीकारले गेले नाही. सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित करत पवारांनी काँग्रेसमध्ये बंड केले. तेव्हा पवारांना देशात सर्वत्र चांगला पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण काँग्रेसमधील अन्य नेत्यांचे तेवढे पाठबळ मिळाले नाही वा राष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रतिमाही निर्माण झाली नाही. पवार १९९१ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. पण तेव्हाही काँग्रेसच्या खासदारांमध्ये पवारांच्या नावावर सहमती झाली नव्हती.

राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. काँग्रेस कमकुवत झाल्याने आपला पर्याय असावा, असा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न दिसतो. पण ती जागा व्यापण्यासाठी आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे देशभर भ्रमण करत आहेत. परिणामी चंद्रशेखर राव हे नव्याने प्रयत्न करीत असले तरी आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता तेलंगणाच्या या नेत्यासमोर स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान असेल.

santosh.pradhan@expressindia.com