आठवावं असं काही..!

मर्डॉक आल्यामुळे नक्की काय काय आणि कसा कसा बदल होत गेला हे आणि ‘टाइम्स’ एकूणच कसा बदलला याची अप्रतिम कहाणी ‘गुड टाइम्स..’मध्ये आहे. याशिवाय थॅलिडोमाइड प्रकरण, पाकिस्तानी अत्याचारांचा रक्तरंजित इतिहास, अशा अनेक महत्त्वाच्या घटना आहेत. चांगला, लिहिता संपादक काळाला पुरून उरतो तो असा..

मर्डॉक आल्यामुळे नक्की काय काय आणि कसा कसा बदल होत गेला हे आणि ‘टाइम्स’ एकूणच कसा बदलला याची अप्रतिम कहाणी ‘गुड टाइम्स..’मध्ये आहे. याशिवाय थॅलिडोमाइड प्रकरण, पाकिस्तानी अत्याचारांचा रक्तरंजित इतिहास, अशा अनेक महत्त्वाच्या घटना आहेत. चांगला, लिहिता संपादक काळाला पुरून उरतो तो असा..
ही १९८४-८५ च्या आसपासची गोष्ट असावी. गोविंदराव तळवलकरांनी त्या वेळी पहिल्यांदा या पुस्तकाविषयी लिहिलं होतं. पुस्तकाचं नाव ‘गुड टाइम्स, बॅड टाइम्स’. लेखक लंडनच्या ‘संडे टाइम्स’चे संपादक हॅरॉल्ड इव्हान्स. गोविंदराव मनाने तसे ब्रिटिश उमरावच. त्यामुळे ब्रिटिश संपादकाविषयी ते अधिक आत्मीयतेनं लिहिणं तसं साहजिकच. तळवलकरांचा तो लेख वाचल्यापासून हॅरॉल्ड इव्हान्स मनात कायमचे मुक्कामाला आले.
मग पुण्यात पत्रकारितेची पदवी घेत असताना रानडे इन्स्टिटय़ूटच्या वाचनालयात हॅरॉल्ड इव्हान्स यांचं हे पुस्तक हाताळायला मिळालं. चांगली पुठ्ठय़ांच्या बांधणीची काळ्या कागदावर सोनेरी अक्षरानं नावं लिहिलेली प्रत होती. अत्यंत आदरणीय अशी. त्या पुस्तकाला हात लावला तरी लेखकाचं वजन कळेल अशी. वाचायचा प्रयत्न केला, पण फारसं काही तेव्हा त्यातलं कळलं नाही. पुढे मग रूपर्ट मर्डॉक प्रकरणाच्या बातम्या यायला लागल्या तेव्हा इव्हान्स यांच्या या पुस्तकाचा संदर्भ आला. मर्डॉक यांनी ब्रिटिश प्रसारमाध्यमांमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यावर तळवलकरांचा तो लेख आठवायला लागला आणि हे पुस्तक पुन्हा एकदा वाचावंसं वाटलं. इव्हान्स हे लंडनच्या ‘संडे टाइम्स’चे संपादक होते. १९६७ ते १९८१ अशी भरगच्च र्वष. त्या काळात ‘टाइम्स’ हा वाचायचा पेपर होता आणि चटपटीतपणाला विद्वत्ता म्हणायचा काळ अजून यायचा होता. ग्रंथ परीक्षणांपासून ते आंतरराष्ट्रीय विषयावरील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांचा त्यात ऊहापोह व्हायचा. या सगळ्याला बौद्धिक उंची होती. ती थेट समजून घेण्याइतका पोक्तपणा अजून आमच्या पिढीच्या अंगी यायचा होता. हे सगळं कळायचं ते परात्परपणे. म्हणजे मुख्यत: गोविंदरावांच्या लिखाणातून.
आणखी एका प्रसंगी गोविंदरावांकडून या पुस्तकाचा संदर्भ दिला गेला होता. जगन फडणीस यांनी त्या वेळेला जे. जे. रुग्णालयात औषधांच्या भेसळीचं एक प्रकरण उघडकीला आणलं होतं. त्यात काही बळी गेले होते आणि ते सगळंच दाबून टाकण्याचा घाट घातला गेला होता, परंतु फडणीस यांनी ती बातमी फोडली आणि चांगलाच हलकल्लोळ झाला. आरोग्यमंत्री होते भाई सावंत. त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली, परंतु ते काही राजीनामा द्यायला तयार नव्हते. तेव्हा पुन्हा एकदा हॅरॉल्ड इव्हान्स यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला गेला.
इव्हान्स बातमीदारीत असताना त्यांच्या काळात थॅलिडोमाइड नावाचं एक प्रकरण बरंच गाजलं होतं. थॅलिडोमाइड नावाचं औषध त्या वेळी नव्यानं बाजारात आलेलं होतं आणि एकंदरच त्याच्या उपयुक्ततेची समीकरणं मोठय़ा उत्साहानं मांडली जात होती. ते घेतलं की मेंदूतील अस्वस्थता कमी होते, असंही लक्षात आलेलं. तेव्हा मन:शांतीसाठी, झोपेसाठी म्हणूनही ते द्यायला सुरुवात झाली होती. हे कमी म्हणून की काय या औषधाचा आणखी एक उपयोग लक्षात आला. तो असा की, गर्भवतींना ते दिलं तर सकाळी पोटातलं मळमळणं, उलटय़ा, कोरडे उमासे वगैरे प्रकार बंद होतातं. त्यामुळे गर्भवती महिलांनी हे औषध घेण्याची सर्रास प्रथा रुळली होती. अमेरिका आणि ब्रिटन या देशांत या औषधाचा प्रसार आणि प्रचार चांगलाच झालेला होता.
बातमी तिथे होती. ती अशी की, या औषधामुळे गर्भवतींची सकाळ चांगली जाऊ लागली होती, हे खरं. पण त्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर होते. म्हणजे ज्या ज्या महिलांनी आपल्या गर्भारपणाच्या प्राथमिक काळात हे औषध घेतलं त्यांच्या गर्भाचा अवयवच गायब होत गेला. म्हणजे कोणाला नाकच नाही, कानच गायब, तर कोणी एका पायाशिवायच जन्मलेला. सुरुवातीला कोणाला काही कळलंच नाही, असं का होतंय ते. नंतर मग थॅलिडोमाइडवर संशय घेतला गेला. पण खात्री पटवणार कशी? या कंपन्या इतक्या बलाढय़ असतात, कोण कशाला त्यांच्याविरोधात उभं राहील? एखाददुसऱ्यानं कोणी प्रयत्न केलाच तर तोंडाला पाणी सुटेल इतकी नुकसानभरपाई त्या देतात. मग सगळीच शांतता.
अशा वातावरणात इव्हान्स यांनी आपल्या वार्ताहरांचं शोधपथक तयार केलं. स्वत: मैदानात उतरले आणि या थॅलिडोमाइड प्रकरणाचा संपूर्ण छडा लावला. पुढे कंपनीला ते मान्य करावं लागलं आणि मग तर ते औषधच बंद झालं. पण त्याआधी शेकडय़ांनी अपंग झालेल्या ब्रिटिश बालकांचा, त्यांच्या पालकांचा शोध इव्हान्स यांनी घेतला. त्यांना संघटित केलं. अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयापर्यंत त्यांच्या खटल्यांचा पाठपुरावा केला. जवळपास १० वर्षांच्या या प्रयत्नानंतर यातल्या सर्वाना नुकसानभरपाई मिळाली. हा एक भाग झाला. परंतु या प्रकरणामुळे ब्रिटिश सरकारला आपले औषधांबाबतचे कायदे आमूलाग्र बदलावे लागले. हा विजय मोठा होता.
एका पत्रकार संपादकांच्या लढय़ाला इतकं मोठं यश येऊ शकतं हे पत्रकारितेत नव्यानं येऊ पाहणाऱ्यांना जे. जे. प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर भारून टाकणारं होतं. इव्हान्स यांनी आपल्या कारकिर्दीत शोधपत्रकारांची एक पिढीच्या पिढी घडवली आणि पत्रकारितेत एक नवा आदर्श घालून दिला.
पण पुढे मर्डॉक यांच्या व्यापारी वृत्तीचा उदय झाला. ‘संडे टाइम्स’ आणि ‘टाइम्स’ ही वर्तमानपत्रं त्यांनी विकत घेतली आणि मग सगळ्यातच बदल होत गेला. मर्डॉक हे फक्त आणि फक्त व्यापारी वृत्ती यासाठीच ओळखले जायचे आणि जातात. तेव्हा पत्रकारितेशी त्यांना काही घेणं-देणं नव्हतं. असलंच तर फक्त ‘घेणं’ होतं. जाहिरातींच्या महसुलाचं आणि राजकीय ताकदीचं. तेव्हा त्यांनी आल्या आल्या ‘टाइम्स’चं स्वरूप पालटायला सुरुवात केली. या बदलाची दिशा काय असेल याचा अंदाज इव्हान्स यांना आला. ते मुकाटपणे ‘टाइम्स’ सोडून निघाले. मग पुढे ‘रॉयटर्स’ वगैरेंचेही ते संपादक होते, पण ते नंतर. त्या वेळी मर्डॉक आल्यामुळे नक्की काय काय आणि कसा कसा बदल होत गेला हे आणि ‘टाइम्स’ एकूणच कसा बदलला याची अप्रतिम कहाणी ‘गुड टाइम्स..’मध्ये आहे. पुढे आंतरराष्ट्रीय मर्डॉक यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक देशी मर्डॉक आपल्याकडेही तयार झाले. मग सगळेच ‘टाइम्स’ घसरत गेले. टिळकांचा कित्ता न घेता फक्त अडकित्ताच घ्यावा तसं या देशी मर्डॉकांनी ब्रिटिश मर्डॉकांचा सोयीचा तेवढा गुण उचलला. काहींनी पत्रकारांना जाहिरातींचं रखवालदार बनवून टाकलं. काही तर इतके पुढे गेले की आपल्या पत्रकारांनाच जाहिराती मिळवण्यासाठी दामटू लागले आणि काही संपादकांनाही पेड न्यूजचं ओशाळेपण वाटेनासं झालं.
त्या वेळी पुन्हा एकदा इव्हान्स यांच्या पुस्तकाची आठवण झाली. अगदी अलीकडे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’सारखं मातबर दैनिक आपल्या कळपात सामील व्हावं म्हणून मर्डॉक यांनी सर्व मार्गाचा अवलंब केला. तेव्हाही ‘गुड टाइम्स..’ आठवलं आणि त्याचा अगदी अलीकडचा संदर्भ निघाला तो गेल्याच आठवडय़ात. बांगलादेशात हिंसाचार बळावू लागल्यावर.
१९७१ च्या युद्धानंतर बांगलादेशातील एक मोठा गट हा पाकिस्तानच्या बाजूचाच होता आणि त्याला हे स्वतंत्र होणं मान्य नव्हतं. या मताला एक तर धर्माची किनार होती आणि त्याला पाकिस्तानचीही फूस होती. त्या काळी पाकिस्ताननं आपल्याच सहोदराच्या देशात अनन्वित अत्याचार केले. त्याचा या कानाचा पत्ता त्या कानाला नव्हता. आपण बांगलादेशच्या बाजूने युद्धात उतरलेले होतो. त्यामुळे आपले प्रश्न वेगळेच होते. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या बांगलादेशीय निर्वासितांच्या लोंढय़ामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडतं की काय अशी परिस्थिती होती. बांगलादेश नवनिर्मितीनंतरच्या प्रसववेदनांतून पूर्णपणे सावरलेला नव्हता. याच काळात पाकिस्ताननं लक्षावधी बांगलादेशीयांचं शिरकाण केलं. हजारोंनी बलात्कार केले.. याची कसलीही वाच्यता जगाच्या पाठीवर नव्हती.
त्याला वाचा फोडली गेली ती इव्हान्स यांच्या काळात. त्यातही आपल्याला अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे हे काम केलं एका भारतीय पत्रकारानं. अँथनी मस्कारेन्हस असं त्यांचं नाव. मूळचे गोव्याचे ते. कराचीत राहायचे. त्यांना या सगळ्याचा सुगावा लागल्यावर त्यांनी जीव धोक्यात घालून बांगलादेशचा दौरा केला आणि सर्व माहिती घेतली. वास्तव दर्शनाने हादरलेले मस्कारेन्हस तिथूनच थेट लंडनला गेले, कराचीत परतलेच नाहीत. त्यांना माहीत होतं, कराचीला एकदा गेलो आपण की अडकलो. त्यामुळे त्यांनी थेट लंडन गाठलं आणि सगळी कहाणी कथन केली हॅरॉल्ड इव्हान्स यांना.
यातलं गांभीर्य इव्हान्स यांच्याही लक्षात आलं. त्यांनी आणखी काही वार्ताहरांना कामाला लावलं आणि हा सगळा पाकिस्तानी अत्याचारांचा रक्तरंजित इतिहास कथन करायचा निर्णय घेतला. मस्कारेन्हस यांची मालिका लंडनच्या ‘टाइम्स’मध्ये पान १ वर झळकू लागली.
पाकिस्ताननं नक्की काय काय पापं केली आहेत.. ते त्यामुळे कळलं जगाला.
तेव्हा बांगलादेशात गेल्या आठवडय़ात हिंसाचार सुरू झाला आणि इव्हान्स यांचं ‘गुड टाइम्स..’ पुन्हा एकदा वाचावंसं वाटलं.
वर्तमानपत्र जरी एक दिवसापुरतं असलं तरी चांगला, लिहिता संपादक काळाला पुरून उरतो तो असा..
त्याची आठवण काढावी आणि छातीत भरून घ्यावी असंच काम आहे ते. त्या कार्यास मुजरा करण्यासाठी म्हणून..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुक-अप! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Remember good time bad time