तुर्कस्तानला आधुनिक स्वरूप देणाऱ्या केमाल पाशा याने १९२४ साली खिलाफतीस गाडून नव्या शासन प्रणालीचा पुरस्कार केला. तेथेच आता हा वारसा पुसून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून लगतच्या इराकमध्ये कालबाहय़ खिलाफतीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न अबु बक्र याने सुरू केले आहेत. मात्र समस्त इस्लामी जगाचा नेता होण्याचा त्याचा हा डाव यशस्वी होणार नाहीच.
एका अर्थाने हा इतिहासाने उगवलेला सूड म्हणावयास हवा. आजपासून ६६ वर्षांपूर्वी मे महिन्यात डेव्हिड बेन गुरियन यांनी जॉर्डन नदीच्या किनाऱ्यावर पश्चिम आशियाच्या आखातातील पवित्र भूमीत जेव्हा इस्रायलची निर्मिती केली तेव्हा जगभरातील यहुदी धर्मीयांना तेथे येऊन नवा देश वसवण्याचे आवाहन केले. डेव्हिड बेन गुरियन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगभरातील यहुदींनी आपापली वसतिस्थाने सोडून नव्या देशास आपले घर मानले आणि बघता बघता इस्रायल हा देश म्हणून उभा राहिला. आज त्याच इस्रायलच्या जिवावर उठलेल्या द इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया या संघटनेने इराक आणि सीरियाच्या परिसरात असाच नवा प्रदेश, खिलाफत जन्माला घातल्याची घोषणा केली असून जगभरातील इस्लाम धर्मीयांना नव्या देशात स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. या दोघांतील फरक येथे संपतो. डेव्हिड बेन गुरियन यांना यहुदी धर्मीयांसाठी मायभूमी विकसित करावयाची होती तर या नव्या खिलाफतीचा कर्ता अबु बक्र बगदादी याला आहे त्या देशांमधून कडव्या इस्लामींची कट्टरपंथी भूमी तयार करावयाची आहे. जगभरातील इस्लाम धर्मीयांनी या नव्या खिलाफतीस आपले म्हणावे असे आवाहन करतानाच या इस्लामींनी अन्य धर्मीयांच्या विरोधात हत्यार हाती घ्यावे अशीही हिंसक भाषा या अबु बक्र याने केली आहे. आपण म्हणजे कोणी इस्लामचे तारणहार आहोत असा त्याचा आविर्भाव असून त्या धर्माचा संस्थापक प्रेषित महम्मद याच्यानंतर थेट आपणच असे त्याचे वागणे आहे. त्याच्या या कृत्याने जगभर इस्लामी आणि बिगरइस्लामी जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आपल्यावरही परिणाम करू शकेल अशी ही घटना समजून घेणे त्यामुळे गरजेचे आहे.
खिलाफत या प्रथेचा उगम थेट पैगंबरांपाशी जाऊन थांबतो. सातव्या शतकाच्या पूर्वार्धात महम्मद पैगंबर अल्लास प्यारे झाल्यानंतर त्यांच्या पश्चात कशी राजवट असावी या चर्चेतून खिलाफत या संकल्पनेचा जन्म झाला. खिलाफत याचा अर्थ उत्तराधिकारी. तेव्हा महम्मद पैगंबरांच्या या उत्तराधिकाऱ्यांनी जी राजवट प्रस्थापित केली तिला खिलाफत हे नाव पडले. इस्लामी धर्मकायदा, म्हणजे शरिया, याच्या आधारे राज्य करणे आणि अर्थातच इस्लामचा प्रचार आणि प्रसार हे या खिलाफतीचे प्रमुख उद्दिष्ट होते. याच अनुषंगाने पहिला खलिफा निवडला गेला. परंतु इतिहास हे दर्शवतो की पहिल्या दिवसापासून या खिलाफतीत मतभेदांची दरी होती आणि अनेकदा तिचे पर्यवसान हिंसाचारात होत गेले. याचे महत्त्वाचे कारण असे की ही खिलाफत प्राधान्याने सुन्नी धर्मीयांपुरतीच मर्यादित राहिली. शिया पंथीयांना मुळात प्रेषित महम्मदानंतरची व्यवस्था मान्य नव्हती. शिया पंथीयांनुसार प्रेषित पैगंबरापश्चात त्यांच्या फातिमा या मुलीचा पती, म्हणजे प्रेषितांचा जावई इमाम अली याच्याकडेच इस्लाम धर्मीयांचे नेतृत्व जाते. सुन्नी पंथीयांना हे मान्य नसल्याने इस्लाम धर्मीयांतील शिया आणि सुन्नी ही दरी आजतागायत भरून निघालेली नाही. त्याचमुळे शियाबहुल परंतु सुन्नी संचालित इराकमध्ये ही नवी खिलाफत जन्माला येणे अनेकार्थानी महत्त्वाचे आहे. इतिहासातील ही खिलाफत व्यवस्था पहिल्या महायुद्धानंतर १९१८च्या सुमारास ऑटोमन साम्राज्य लयाला जात असताना संपुष्टात आली. या ऑटोमन साम्राज्याचा भाग असलेल्या तुर्कस्तानला आधुनिक स्वरूप देण्यात ज्याने निर्णायक भूमिका बजावली त्या केमाल पाशा याने १९२४ साली अधिकृतपणे खिलाफतीस गाडून नव्या शासन प्रणालीचा पुरस्कार केला. परंतु दैवदुर्विलास हा की ज्या प्रदेशाने इस्लामला आधुनिक आणि सहिष्णू बनवले त्या तुर्कस्तानात केमाल पाशा याचा सुसंस्कृत वारसा पुसून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्याच वेळी त्या देशास खेटून असलेल्या इराकमध्ये कालबाहय़ खिलाफतीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरकरणी ही सरळ घटना असली तरी तीस अनेक पदर आहेत.
त्यामागील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की धर्म एक असला तरी इस्लामी जग एकसंध नाही आणि या जगास एकमुखी नेता नाही. शिया आणि सुन्नी हे या धर्मीयांतील प्रमुख भेद. इराण हा शिया पंथीयांचा जगातील सर्वात मोठा देश. एके काळी अमेरिकेने ज्याप्रमाणे सुन्नी पंथीय इराकचे पालनपोषण केले त्याचप्रमाणे शियाबहुल इराणचेही उत्तम लांगूलचालन केले. १९७९ साली इराणात सत्ता काबीज करणारे अयातोल्ला रुहल्ला खोमेनी यांना अमेरिकेने सुरुवातीला गोंजारले. खोमेनी हे सौदी अरेबियाचे राजे फैझल यांना उत्तम पर्याय ठरू शकतील तसेच तत्कालीन सोविएत रशियाच्या साम्यवादी नेतृत्वाच्या विरोधात ठाम पर्याय देऊ शकतील असा अमेरिकेचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार झिबिग्न्यु ब्रेझन्स्की यांचा समज होता. परंतु खोमेनी यांनी अमेरिकी दूतावासातील कर्मचाऱ्यांनाच ओलीस ठेवून त्या देशास आपला हिसका दाखवला तेव्हा अमेरिकेस भान आले. त्यामुळे खोमेनी यांना इस्लामी जगाचा नेता म्हणून पुढे करण्याचे प्रयत्न संपुष्टात आले. खोमेनी यांच्या आधी इजिप्तचे गमाल अब्दुल नासर यांनी इस्लामी जगाचा सर्वमान्य नेता म्हणून उभे राहण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांना सोविएत रशियाची फूस होती कारण ते अमेरिकेच्या कळपातील ब्रिटनविरोधात सातत्याने उभे राहत होते. याच प्रयत्नांतून नासर यांनी मायभूमीतील सुवेझ कालव्याची मालकी ब्रिटिशांच्या हातून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तोंड देण्यासाठी ब्रिटनला युद्ध करावे लागले. या युद्धात ब्रिटनला सुवेझशी संबंधित फ्रान्स या शेजाऱ्याने आणि प. आशियाच्या आखातातील इस्रायलने मदत केली. इस्रायलचे नुकतेच दिवंगत झालेले पंतप्रधान आरियल शेरॉन यांचे युद्धकौशल्य याच लढाईत प्रगट झाले. यामागील आणखी एक योगायोग असा की या युद्धात ब्रिटनला मदत करण्यास सुरुवातीला अमेरिका राजी नसल्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स यांनी युरोपीय देशांची म्हणून एक स्वतंत्र संघटना जन्माला घालायची गरज व्यक्त केली होती. ते आधुनिक युरोपीय संघटनेचे बीज. आज तीच अमेरिका आणि त्याच युरोपीय संघटनेस पुन्हा एकदा समस्त इस्लामी जगाचा नेता होऊ पाहणाऱ्या अबु बक्र बगदादी याने आव्हान दिले असून ही एका अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती म्हणावयास हवी. या संदर्भात असलाच तर फरक इतकाच की त्या वेळी इस्लामी जगताचे नेतृत्व करू पाहणारे इजिप्तचे गमाल नासर हे आताच्या अब्रु बक्रच्या तुलनेत खूपच मवाळ आणि विचारांनी आधुनिक होते. इजिप्तच्या सीमावर्ती भागांत त्यांनी रेडिओ केंद्रे काढून आसपासच्या देशांतील सामान्य इस्लामी जनतेस इजिप्तमधील प्रगतीची माहिती देत मोहात पाडण्याचा जोरदार प्रयत्न चालवला होता. त्यातल्या त्यात नासर यांनाच इस्लामी नेते म्हणून थोडी का होईना ओळख मिळाली. अन्य सर्वाचे त्याबाबतचे प्रयत्न अयशस्वी झाले. सौदी अरेबियाचे राजे फैजल यांच्याबाबत आखाती देशात आदर होता. परंतु कृश प्रकृती आणि पुढे त्यांची झालेली हत्या या कारणांमुळे त्याही नेतृत्वावर मर्यादा आल्या. त्यानंतर समस्त इस्लामी जगाचा नेता होण्याचे प्रयत्न करण्याच्या फंदात कोणीही पडले नाही.
ते डोहाळे आता अबु बक्र बगदादी याला लागले असून ते सामुदायिक प्रयत्नांनी अयशस्वी ठरवले जात नाहीत तोपर्यंत ती डोकेदुखी सहन करावी लागेल. त्यास सर्वात मोठे आव्हान मिळेल ते ओसामा बिन लादेन याचा उजवा हात ऐमान अल्-जवाहिरी याच्याकडूनच. विद्यमान नेत्याच्या तुलनेत आपण अधिक पाक आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक उगवता इस्लामी नेता करतो. कडव्या वहाबी पंथाचा प्रणेता अब्दुल अल वहाब याने हेच केले, ओसामा त्याच मार्गाने गेला आणि आता अबु बक्रही त्याच दिशेने वाटचाल करताना दिसतो. त्यामुळे ओसामाचा साथीदार जवाहिरी याला त्याने कमअस्सल ठरवले असून त्यावरून अल काईदा आणि त्याची आयसीआयएस ही संघटना यांच्यात संघर्षांच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत.
तेव्हा अबु बक्र याचाही हा खिलाफत खेळ नष्ट होईल यात शंका नाही. तसा तो नष्ट होण्यासाठी जवाहिरी याला पाश्चात्त्य देशांची फूस होती असे काही काळाने उघड झाल्यास आश्चर्य वाटून घ्यावयास नको.