गौरव सोमवंशी
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान ‘बिटकॉइन’पुरतेच मर्यादित आहे, असा समज सर्वदूर असण्याच्या काळात- ‘या तंत्रज्ञानात आणखी अनेक शक्यता दडलेल्या आहेत,’ असे भाकीत सायमन देदेओ यांनी केले. त्यांनी या संदर्भात ‘कॉमन नॉलेज’ अर्थात ‘सामायिक ज्ञान’ ही संकल्पनाही मांडली. तिचा आणि ‘ब्लॉकचेन’चा काय संबंध आहे?
‘ब्लॉकचेन’चा परिचय मला २०१७ च्या सुरुवातीस ‘विकिपीडिया’वरील एका नोंदीतून झाला. तेव्हा याबाबत कोणताही प्रस्थापित किंवा नामांकित अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता वा असे कोणतेही एक पुस्तक नव्हते, ज्यामध्ये या विषयाची माहिती एकाच जागी सोप्या पद्धतीने मिळेल. इंटरनेटवरील लेख, ऑनलाइन चर्चासत्रे, यू-टय़ूब, स्वत: करून पाहिलेले प्रयोग, ई-मेलवरून विविध देशांतील अभ्यासकांशी साधलेला संवाद.. असा तो प्रवास होता. पण २०१७ च्याच शेवटी सायमन देदेओ या अभ्यासकाचा एक लेख वाचनात आला. त्यांनी इतिहास आणि राजकारणाच्या अनुषंगाने ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचे काय होऊ शकते, याचे भाकीत केले होते. २०१७ मध्ये अनेक लोकांमध्ये हाच समज होता की, ‘बिटकॉइन’ आणि ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे दोन्ही एकच आहेत. परंतु या तंत्रज्ञानात आणखी अनेक शक्यता दडलेल्या आहेत, हे भाकीत देदेओ यांनी मांडले होते.
मागील दोन लेखांत आपण ‘प्रूफ ऑफ वर्क’ या बहुमत ठरवून ते सिद्ध करायच्या प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लेस्ली लॅम्पोर्ट यांच्या १९८२ सालच्या शोधनिबंधातील आणि २००८ मध्ये सातोशी नाकामोटोने पाठवलेल्या ईमेलमधील राजा आणि त्याच्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी टपून असलेल्या सेनापतींच्या गोष्टीचे उदाहरण घेतले होते. या लेखात ‘प्रूफ ऑफ वर्क’ ही संकल्पना सायमन देदेओ यांनी दिलेल्या उदाहरणाद्वारे पुन्हा नव्याने समजून घेऊ या.
देदेओ यांचा अभ्यास वा संशोधन हे खगोलशास्त्र ते भौतिकशास्त्र ते निर्णयशास्त्र ते मानसशास्त्र असे बहुव्यापी आहे. त्यांनी ‘कॉमन नॉलेज’ (सामायिक ज्ञान) ही संकल्पना समजावून सांगितली आहे. त्यानुसार कोणतेही काम मोठय़ा पातळीवर आणि एकमेकांच्या मदतीने करायचे असेल, तर ‘कॉमन नॉलेज’ लागतेच. म्हणजे एखादी गोष्ट मलाच माहीत असून चालत नाही, तुम्हालाही ती गोष्ट माहीत हवी; मला हे माहीत असावे की, तुम्हाला ती गोष्ट ठाऊक आहे आणि तुम्हाला ती गोष्ट ठाऊक आहे हे मला माहीत आहे हे तुम्हाला स्पष्ट असावे, आणि असेच पुढे..
हे ‘कॉमन नॉलेज’ कसे कामी येते आणि त्याचा आणि ‘ब्लॉकचेन’चा किंवा ‘बिटकॉइन’चा काय संबंध आहे, ते देदेओ यांनी दिलेल्या उदाहरणावरून पाहू या..
समजा, तुम्हाला एका आलिशान हॉटेलमध्ये बंदिस्त केले आहे. तुम्ही तुमच्या खोलीच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि कोणाशी संवादही साधू शकत नाही. तुमच्याकडे फोन किंवा इंटरनेट नाही. तुमच्यासोबत आणखी किती लोकांना हॉटेलमध्ये बंदिस्त केले आहे, हेही तुम्हाला माहीत नाही. तुमच्याकडे वेळ मात्र भरपूर आहे. रोज तीन वेळा रुचकर जेवणसुद्धा दिले जाते. एक दिवस जेवणाच्या ताटात एक चिठ्ठी येते. तुम्ही एकदम उत्सुक होता आणि त्याच चिठ्ठीवर काही तरी लिहून पाठवता. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच चिठ्ठीवर काही लिहून येते आणि मग पुढील काही दिवस आणखी काही चिठ्ठय़ा येतात. परंतु-
(अ) तुमची चिठ्ठी कोणी आणि किती लोकांनी वाचली, याची माहिती तुम्हाला नाही.
(ब) ज्यांनी दुसरी चिठ्ठी पाठवली, त्यांनी तुमची पहिली चिठ्ठी वाचली की नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही.
(क) या आलिशान तुरुंगामधून सुटण्यासाठी तुम्ही काही लोकांना सोबत घेऊन बंड वगैरे करू शकता का, हेही नक्की माहीत नाहीये; पण त्या अनुषंगाने संवाद सुरू व्हावा म्हणून तुम्हाला प्रयत्न जरूर करायचे आहेत.
अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? मागील लेखात पाहिल्याप्रमाणे तुम्ही गणिताची किंवा कूटशास्त्राची (क्रीप्टोग्राफी) मदत घ्याल. यासाठी तुम्ही आता चिठ्ठीवर एक गणिताचे कोडे लिहून द्याल. हे एक विशिष्ट प्रकारचे कोडे असेल. त्यात तुम्ही फक्त अंदाज वर्तवू शकता; हा अंदाज बरोबर की चूक, हेच तुम्हाला कळेल. म्हणजे समोरची व्यक्ती अंदाजाने एक एक करून काही आकडे फेकत राहील; तो बरोबर लागला की त्या व्यक्तीला तुमचे कोडे कळेल. मात्र हे फक्त अंदाजानेच होऊ शकते.
मग तुम्ही ठरवता की, किती लोक आपली चिठ्ठी वाचताहेत हे कळण्यासाठी एक खूप अवघड कोडे पाठवू या. तुम्ही असे कोडे लिहिता, जे एका माणसाला सोडवण्यासाठी सरासरी ३०० दिवस लागतील; म्हणजे तो ३०० दिवस वेगवेगळे अंदाज करत बसेल. तुम्ही त्या अवघड कोडय़ाची चिठ्ठी जेवणाच्या ताटात लपवून पुढे पाठवता. पण तुम्हाला चिठ्ठी १० दिवसांतच परत मिळते. याचा अर्थ सुमारे पाच ते १५ जण तरी तुमची चिठ्ठी रोज वाचणारे आहेत. कारण एकटय़ानेच सारे अंदाज करणे इतक्या लवकर शक्य झाले नसते. मात्र, खात्री करून घेण्यासाठी तुम्ही हे तीन-चार वेळा करून पाहता. त्यामुळे सरासरी किती दिवसांत हे कोडे सोडवून तुम्हाला चिठ्ठी परत मिळते आहे, याचा खात्रीशीर अंदाज बांधता येईल. म्हणजे तुमच्यासोबत त्या आलिशान हॉटेलमध्ये आणखी किती लोक बंदिस्त आहेत, हे तुम्हाला समजेल.
त्यानंतर तुम्ही दुसरे कोडे लिहून पाठवता. परंतु हे कोडे सोडवण्यासाठी मागच्या कोडय़ाचे उत्तर माहीत असणे गरजेचे आहे. नसेल तर हे नवीन कोडे सोडवताच येणार नाही. काही दिवसांनी तुम्हाला या दुसऱ्या कोडय़ाचे उत्तर लिहिलेली पहिली चिठ्ठी येते (आणि पुढेही येत राहतात). यावरून किती लोकांनी तुमचे पहिले कोडे पाहिलेय आणि दुसरे कोडेसुद्धा किती लोकांनी पाहून सोडवायचा प्रयत्न केलाय, याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल.
आता तुमचा संवाद साधता यायचा मार्ग जवळपास मोकळाच झाला. प्रत्येक पुढच्या कोडय़ात मागील कोडय़ाचे उत्तर माहीत असणे अनिवार्य करायचे आणि तुम्हाला जो संवाद साधायचा आहे त्याला उत्तरातच गुंडाळून पुढे पाठवायचे. म्हणजे कोडे सुटले की पुढे संदेशही वाचता येईल. नंतरच्या संदेशाला मग नवीन कोडय़ाच्या उत्तरात लपवून पुढे पाठवायचे. मात्र, जी मंडळी आधीपासून या संवादात प्रामाणिकपणे सामील झाली आहेत, केवळ त्यांच्यामध्येच संवाद होऊ शकेल. कोणी दुसरी खोटी चिठ्ठी बनवून पाठवली तरी तुम्हाला लगेच कळेल. कारण आता संवादातील प्रत्येक संदेशाची एक साखळी निर्माण होत आहे. म्हणजे तुम्हाला कोणाविषयी काहीच माहिती नसतानासुद्धा त्या आलिशान हॉटेलमधील तुमच्याशी प्रामाणिक असलेल्या कैद्यांसोबत संवाद साधता येईल.
या सगळ्या यंत्रणेचा वापर फक्त न् फक्त व्यवहार व संवादासाठी होत असेल, तर तुम्हाला क्रीप्टोकरन्सी (कूटचलन) मिळते; ‘बिटकॉइन’ हे त्याचे एक उदाहरण! जे कोडे तुम्ही लिहिता आणि सोडवता, त्याला म्हणतात ‘प्रूफ ऑफ वर्क’.. काम केल्याचा पुरावा! कोडय़ासोबत तुम्ही जो संदेश जोडता, त्या जोडणीस म्हणतात ‘ब्लॉक’.. आणि त्या चिठ्ठय़ांनी जी संवादाची साखळी बनते ती तुमची ‘ब्लॉकचेन’!
..आणि हो, तो आलिशान हॉटेलसारखा तुरुंग म्हणजे आपले ‘इंटरनेट’.. जिथे तुम्ही आपापल्या ठिकाणी बंदिस्त आहात आणि एखाद्या व्यक्तीवर किंवा संदेशावर किती विश्वास ठेवावा, हे तुम्हाला फक्त चिठ्ठय़ांवरून ओळखावे लागेल. इंटरनेट हे ‘माहितीचा पाठपुरावा’ करण्यास उत्तम आहे; पण ती माहिती खरी की खोटी, किती विश्वासार्ह आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान अस्तित्वात आले आहे. त्यास फक्त ‘बिटकॉइन’पुरते मर्यादित ठेवणे म्हणजे इंटरनेटला फेसबुकपुरते मर्यादित ठेवण्यासारखे झाले!
या उदाहरणात जे संदेश पाठवले गेले, त्यात अक्षरश: हवी ती माहिती ठेवता येते. अन्नपुरवठा कसा, कुठून कोणाकडे झाला याची माहिती ठेवली, की त्याची वेगळी ‘ब्लॉकचेन’ बनेलच की! तसेच आता जागतिक आरोग्य संघटना विविध चाचणी केंद्रांवरून कोविड-१९ च्या चाचण्यांचे निकाल एकत्रित करण्यासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान अशाच प्रकारे वापरत आहे!
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io