गौरव सोमवंशी

बिटकॉइनला आंतरिक मूल्य नाही किंवा त्याचा काही उपयोगही नाही, हे चलन म्हणजे नुसता आकडय़ांचा खेळ, त्याचा बुडबुडा कधी ना कधी फुटणारच, असे आक्षेप बिटकॉइनबाबत घेतले जातात; त्यांत किती तथ्य आहे?

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ‘बिटकॉइन’ प्रणाली कशी चालते हे सविस्तर समजून घेणे गरजेचे होते. त्यामुळे गेल्या काही लेखांमध्ये बिटकॉइन प्रणालीविषयी काही तांत्रिक बाबींची चर्चा केली. बिटकॉइनच्या दुनियेत कोणतेही बदल घडवायचे असतील तर त्यासाठी बिटकॉइन वापरकर्त्यांचे बहुमत मिळवावे लागते. ते मिळाल्यावरच बदल अमलात आणता येतात. बदल घडवायचा आहे, पण बहुमत मिळत नसेल तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचीही चर्चा मागील लेखांत केली आहे.

आता, बिटकॉइनची चर्चा थांबवून ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आणि त्याच्या इतर क्षेत्रांत होणाऱ्या वापरांविषयी जाणून घेण्यापूर्वी, बिटकॉइन किंवा कुटचलनांवर (क्रिप्टोकरन्सी) घेतले जाणारे आक्षेप पाहू या. मात्र, इथे एक बाब ध्यानात ठेवावी लागेल की, पुढील आक्षेप हे बिटकॉइनबाबत आहेत, एकंदरित ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर नाहीत. ते आक्षेप असे :

(१) ‘‘बिटकॉइनला आंतरिक मूल्य नाही’’ :

हे विधान जगविख्यात उद्योजक व गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी केले आहे. त्यांच्या मते, बिटकॉइनचा सोने वा अन्य धातूप्रमाणे चलनाव्यतिरिक्त दुसरा कोणता उपयोग नाही, म्हणजे त्यास स्वत:चे असे काही मूल्य नाही. परंतु हेच विधान इतर कोणत्याही चलनाबद्दलही तितकेच खरे ठरेल. याआधी (‘पोलोने पाहिलेला पैसा..’, ६ फेब्रुवारी) आपण १३व्या शतकात चीनमध्ये कागदी चलन कसे सुरू झाले आणि त्यास मूल्य कसे प्राप्त झाले, हे पाहिले आहे. कोणत्याही चलनास ते नेमके चलन म्हणून वापरता येईल की नाही, वापरण्यास सोयीचे आहे की नाही, चलनाची नक्कल करणे अवघड आहे की नाही, हे सारे पाहूनच मूल्य प्राप्त होत असते.

(२) निव्वळ आकडय़ांचा खेळ :

‘बिटकॉइन हे सरतेशेवटी संगणकात असलेला आकडय़ांचा ‘कोड’ आहे.. बिटकॉइन एटीएमद्वारे काढता येत नाहीत किंवा ते खिशात घेऊन फिरताही येत नाही,’ अशीही टीका केली जाते.  परंतु नाण्याचे  वा चलनाचे मूल्य हे त्याच्या मूलभूत गुणधर्मात (म्हणजे ते कोणत्या धातूचे बनले आहे, किती मोठे आहे वगैरे) नसून ते त्याच्या प्रतीकात्मक गुणधर्मामध्ये असते. आठवा, यॅप बेटांवरील दगडी चलन! तिथे समुद्रात बुडालेल्या दगडी चलनाच्या निव्वळ स्मृतीवर आजही व्यवहार होत असतात.

(३) बिटकॉइन ही ‘पॉन्झी योजना’ आहे :

समोर काहीही नसताना आणि कशात पैसे गुंतवावे हे माहीत नसतानाही, केवळ ‘तुम्ही या योजनेत पैसे गुंतवा आणि आणखी अमुकतमुक मित्रांना यात पैसे ओतायला लावा, तुम्हाला नक्की फायदा होईल,’ असे सांगणाऱ्या योजनांबद्दल आपण ऐकले असेलच. बिटकॉइनदेखील तशाच प्रकारची काही तरी योजना आहे असा काहींचा समज झालेला आहे. पॉन्झी योजनेत सुरुवातीला पैसे गुंतवणारे आपला नफा घेऊन बाजूला होतात आणि उशिरा पैसे गुंतवणारे सारे नुकसान सहन करतात,असे एक साधे गणित आहे. ‘पॉन्झी योजना’ हे नाव चार्ल्स पॉन्झी या इटालियन लबाड व्यक्तीच्या नावावरून घेतले आहे. या पॉन्झीने ‘‘४५ दिवसांत ५० टक्के नफा मिळवून देतो’’ असे सांगत एक योजना राबवली आणि हजारोंना फसवले. तसे काही बिटकॉइनचे आहे का? की अगोदर काहींनी स्वस्तात अनेक बिटकॉइन घेतले अन् नंतर त्याची किंमत वाढवली? याचे उत्तर नकारात्मकच येते. दुसरे म्हणजे, बिटकॉइनमध्ये ठोस मूल्य आणि उपयोग सिद्ध करून झाला आहे, जे कोणत्याही पॉन्झी योजनेत नसते. इतर कोणत्याही अचानक मोठय़ा झालेल्या कंपनीच्या समभागांचे मूल्य त्या कंपनीच्या यशामुळे किंवा यशाच्या भाकितामुळे वाढते, तसे बिटकॉइनबाबत झाले आहे.

(४) बिटकॉइन हा बुडबुडा? :

कधी कधी जनमनात एखाद्या वस्तू किंवा उत्पादनाबद्दल प्रचंड आशावाद निर्माण होऊन, ती वस्तू वा उत्पादन कितीही महाग असले तरी विकत घेण्याची लोकांची तयारी असते. कारण त्यांचा असा समज झालेला वा करून दिलेला असतो की, त्या वस्तू वा उत्पादनाची किंमत नेहमी वाढतच राहणार आहे. परंतु कोणताही तार्किक आधार नसणाऱ्या अशा आशावादाच्या बुडबुडय़ास वास्तवाची टाचणी लागून तो कधी ना कधी फुटणारच. असा एक प्रसिद्ध बुडबुडा आठवतो. तो ‘टय़ुलिप मेनिया बबल’ म्हणून ओळखला जातो. हे सारे घडले ते सतराव्या शतकात डच रिपब्लिक (नेदरलँड्स) मध्ये. तेव्हा ‘टय़ुलिप’ या फुलाचे भाव कधी कमीच होणार नाहीत या भावनेने अनेक लोक यात गुंतवणूक करू लागले आणि मर्यादित पुरवठा असल्यामुळे या फुलाचे भाव काहीच्या काही झाले. एकोणिसाव्या शतकातील स्कॉटिश पत्रकार चार्ल्स मॅके यांनी त्यांच्या ‘एक्स्ट्राऑर्डिनरी पॉप्युलर डील्युजन्स अ‍ॅण्ड द मॅडनेस ऑफ क्राऊड्स’ या पुस्तकात नमूद केले आहे की, टय़ुलिपचे दर उच्चांकावर असताना एका फुलासाठी तब्बल १२ एकर जमीनसुद्धा मिळत होती!

बिटकॉइनचा साठासुद्धा मर्यादित आहे आणि तो मर्यादित का आहे हे आपण ‘संख्या आणि मूल्य’ (२ जुलै) या लेखात पाहिले आहे. हे झपाटय़ाने प्रचलित कसे झाले तेदेखील आपण पाहिले आहे. पण बिटकॉइन खरेदी करण्यासाठी गर्दी करून आपण कोणते ‘बबल’ बनवत आहोत का? खरे तर बिटकॉइनचा उपयोग हा दैनंदिन व्यवहारांसाठी प्रस्थापित चलनांना पर्याय म्हणून होणार होता; पण अनेक मंडळी बिटकॉइनला पैशासारखे न वापरता सोन्यासारखे वापरू लागली. म्हणजे बिटकॉइन साठवून ठेवू आणि भविष्यात नफा मिळवू, असा विचार त्यांनी केला. परंतु बिटकॉइनचे मूल्य तेव्हाच वाढू शकेल, जेव्हा लोक याचा वापर करतील.

इथे आपण एका विरोधाभासावर येऊन अडकतो. कारण बिटकॉइनचा वापर होईल की नाही हे बाह्य़ गोष्टींवरसुद्धा अवलंबून असते. उदा. त्या त्या देशात बिटकॉइनला मान्यता आहे की नाही, यावरून वापर ठरतो. भारतीय राजस्व सेवेतील (आयआरएस) अधिकारी रचना सिंग यांनी असे स्पष्टपणे म्हटले होते की, बिटकॉइनचे भवितव्य हे आता तंत्रज्ञानावर नसून राजकारणावर अवलंबून आहे. २०१७ मध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार ६४ टक्के बिटकॉइन हे आजपर्यंत खर्चच केले गेले नाहीत. जर बिटकॉइनचा वापर सुरूच झाला नाही, तर त्यास भाकीत केले गेलेले मूल्यसुद्धा प्राप्त होणार नाही अशी दाट शक्यता आहे.

(५) बिटकॉइनचा गैरवापर केला जातो :

बिटकॉइनवर लक्ष ठेवणे बरेच अवघड असल्याकारणाने याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो आणि होतोही, असाही एक आक्षेप घेतला जातो. ‘‘बिटकॉइनला आंतरिक मूल्य आणि उपयोग नाही’’ या म्हणण्याच्या अगदी विरुद्ध हा आक्षेप आहे. यात बिटकॉइनचा उपयोग आहे हे मान्य केले आहे, पण तो उपयोग दुरुपयोगाच्या रूपाने जास्त जाणवत असल्याचे म्हटले आहे.

परंतु गतशतकातील तंत्रज्ञानाच्या इतिहासाचे अभ्यासक मेल्व्हिन क्रॅन्झबर्ग यांनी मांडलेल्या आणि कोणत्याही तंत्रज्ञानास लागू होणाऱ्या सहा नियमांपैकी पहिला नियम हे सांगतो की, ‘कोणतेही तंत्रज्ञान हे चांगले किंवा वाईट नसते.’ त्यामुळे कोणा गुन्हेगाराने बिटकॉइन वापरला म्हणून ते तंत्रज्ञान वाईट ठरत नाही. पण नियम पुढे असेही सांगतो की, ‘तरीही तंत्रज्ञान हे कधी तटस्थ नसते.’ म्हणजे तंत्रज्ञानाचे फायदे कोणाला होतील आणि नुकसान कोणाचे होईल हे त्या त्या समाजरचनेवर अवलंबून असेल. त्यामुळे बिटकॉइन जगात प्रत्येकाला उपलब्ध असावे, असे त्याच्या निर्माणकर्त्यांचे स्वप्न असले, तरी आज बरेच बिटकॉइन हे श्रीमंतांकडेच पडून आहेत. म्हणून बिटकॉइन सर्वासाठी कसे सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्यावे, हे आव्हान आहेच.

(६) पर्यावरणपूरक नाही :

गणिताच्या खाणीतून बिटकॉइनची बक्षिसी मिळवण्यासाठी ‘नॉन्स नंबर’ शोधावा लागतो (आठवा : ‘चार शून्य.. बिटकॉइन!’, ११ जून).  या प्रक्रियेसाठी ऊर्जा लागतेच, कारण प्रचंड ताकदीचे संगणकच हे करू शकतात. यामुळे बिटकॉइनच्या दुनियेत एका दिवसात इतकी वीज वापरली जाते, जितकी डेन्मार्क किंवा चेक रिपब्लिकसारख्या देशांत रोज वापरली जाते. संगणक जास्त गरम होऊ नये म्हणून वातानुकूलित खोल्यासुद्धा उभारल्या जातात आणि तोही खर्च वाचावा म्हणून बर्फाळ वा थंड हवेच्या ठिकाणीच ‘मायनिंग फार्म’ उभारले जातात.  मात्र, जी प्रस्थापित बँकिंग प्रणाली बिटकॉइन बाजूला सारू पाहते, तिच्या तुलनेत बिटकॉइनमधील वीजवापराचा आकडा नगण्य ठरतो. दुसरे म्हणजे, बिटकॉइनमध्ये ही प्रक्रिया पार पाडावी लागत असली, तरी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान बरेच पुढे गेले असून जास्त वीज खर्च होणार नाही असे अनेक उपाय आखले गेले आहेत.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io