गौरव सोमवंशी

शेती व्यवसाय आणि अन्नपुरवठा साखळीत ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञाना’चे उपयोजन विविध स्वरूपांत होत आहे, ते कसे?

loksatta analysis imd predict india to receive above normal monsoon
विश्लेषण : यंदा दमदार पावसाचा अंदाज का वर्तवला जात आहे?
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?

शेती व्यवसाय आणि अन्नपुरवठा साखळीत ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञाना’चा विविध स्वरूपांत जगभर उपयोग होत आहे. गत तीन वर्षांत या क्षेत्रात अनेक नवीन कंपन्यांची निर्मिती झालीच; पण आयबीएम, वॉलमार्ट यांसारख्या काही मोठय़ा कंपन्यादेखील यात उतरल्या आहेत. त्यांनी केलेल्या प्रयोगांबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊ या..

फ्रेंच इतिहासकार फर्नाद ब्रुडेल यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे : भांडवलनिर्मिती करता येणे, भांडवल उभारणे हे इतिहासात आणि वर्तमानातही काही थोडय़ाच घटकांना का सहजशक्य झाले? सर्वच घटकांपर्यंत ते का झिरपले नाही?

‘द वेल्थ ऑफ नेशन्स’मध्ये अ‍ॅडम स्मिथ यांनी भांडवलाबाबत म्हटले होते : साध्या मालमत्तेचे रूपांतर भांडवलात करायचे असेल तर केवळ समोर दिसणाऱ्या मूल्यापर्यंत तीस सीमित न ठेवता, त्याच मालमत्तेतून संभाव्य मूल्य कसे उत्पन्न होऊ शकते, याचा विचार हे खरे भांडवल समजावे.

जमिनीत दडलेल्या ‘मृत भांडवला (डेड कॅपिटल)’चे हेच मूल्य पुनर्जीवित करण्यासाठी पेरूच्या हर्नाडो डी सोटो यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान कसे वापरले हे आपण पाहिलेच आहे (आठवा : ‘अधिकारांसाठी दुसरा मार्ग..’, ५ नोव्हेंबर). मग तसेच काही शेती व्यवसायात का घडू नये?

अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज काढण्यासाठी क्वचितच मार्ग उपलब्ध असतात. ज्या प्रकारच्या आर्थिक सुखसुविधा नोकरदार वर्गाला किंवा खासगी कंपन्यांच्या पगारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध असतात, त्या सर्वच सुविधा अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपलब्ध नाहीत. सहसा बँका कर्ज देताना संबंधित व्यक्तीचे ‘सिबिल’ गुणांक किती आहेत हे तपासतात. या ‘सिबिल’ गुणांकाद्वारे त्या व्यक्तीची आर्थिक विश्वासार्हता किती आहे, याचे मूल्यमापन तिच्या मागील आर्थिक व्यवहारांद्वारे केले जाते आणि ते तीनअंकी आकडय़ात दर्शवले जाते. त्या व्यक्तीस कर्ज देणे हे विश्वसनीय आहे की नाही, हे तपासणे बँकांना यामुळे सोयीचे पडते. पण एखाद्या शेतजमिनीचा ‘सिबिल’ गुणांक कोणी काढला आहे का? म्हणजे अमुक जमिनीतून पिकांच्या मूल्याच्या स्वरूपात तमुक भांडवल मागील काही वर्षांत निर्माण झाले आहे, त्यामुळे या जमिनीच्या आधारावर किती कर्ज देणे उचित आणि सुरक्षित आहे, वगैरे. नेमका तसे मूल्यमापन करणारा प्रकल्प इंडोनेशियातील ‘हरा’ या कंपनीने हाती घेतला.

भारत आणि इंडोनेशिया यांची शेतीविषयक तुलना केली तर अनेक साम्ये आढळून येतील. इंडोनेशियातही शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांवर अवलंबून राहावे लागते. हे सावकार अवाच्या सवा व्याजदर लावू शकतात आणि नाइलाजाने शेतकऱ्यांना ते दर स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. यातून मार्ग काढण्यासाठी ‘हरा’च्या संस्थापकांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एका मोबाइल अ‍ॅपची निर्मिती केली. या अ‍ॅपद्वारे कोणीही आपल्या शेतजमिनीची सर्वच माहिती स्वत:हून ब्लॉकचेन तंत्रव्यासपीठावर नोंदवू शकते. म्हणजे शेती नक्की कुठे आहे आणि कोणाच्या मालकीची आहे, शेतजमिनीसंबंधित छायाचित्रे, क्षेत्रफळ किती आहे, कोणते पीक घेतले/ घेताहेत, किती वा कोणते खतपाणी दिले जात आहे, किती उत्पादन झाले/ होणार आहे, अशा सर्व प्रकारच्या माहितीचा यात समावेश होऊ शकतो.

पण याआधी ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील ‘ओरॅकल आव्हाना’बद्दल जाणून घेताना (आठवा : ‘रक्तहिरे रोखण्यासाठी..’, १९ नोव्हेंबर) म्हटले होते : कोणतीही माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवताना, तिला खऱ्या जगातून डिजिटल जगात घेऊन जाणाऱ्या सेतूचे फार महत्त्व आहे. मात्र, या सेतूची विश्वासार्हता कशी राखायची? आफ्रिकेतील हिरे व्यापाराच्या बाबतीत हा पेच सोडवण्यासाठी त्या त्या हिऱ्याच्या सर्वच भौतिक गुणधर्माची माहिती टिपून ती नोंदवणे हा मार्ग वापरला गेला.

पण तसे करणे शेती व्यवसायात शक्य नसल्यामुळे ‘हरा’च्या संस्थापकांनी ‘ओरॅकल आव्हाना’संदर्भात दुसरा मार्ग वापरला. तो असा.. तुम्ही काही माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे नोंदवली म्हणून त्या माहितीस वैधता मिळणार नाही. पण जर त्याच माहितीस इतरांनीही दुजोरा देण्यास सुरुवात केली, तर त्या माहितीची वैधता आपोआप वाढवली जाईल. पण असा दुजोरा देण्याचे काम स्वत:हून कोण कशाला करेल, हा प्रश्न पडू शकतो. त्यासाठी ‘हरा’ने युक्ती योजली : वैध माहिती नोंदवा अन् मोबदला मिळवा. माहिती नोंदवण्याचे हे काम काही जणांसाठी इतके फायदेशीर ठरते, की अनेक जण पूर्णवेळ हेच काम करतात. पण त्यांना मिळणारा मोबदला येतो कुठून? तर ‘हरा’ हीच माहिती ‘सिबिल’ गुणांकांसारखी वापरून बँकांना विकते व त्या पैशातून माहिती नोंदविणाऱ्यांना मोबदला देते.

या माहितीद्वारे संबंधित शेतकऱ्यास कर्ज द्यावे की नाही आणि दिले तर किती द्यावे, हे बँका ठरवू शकतात. यामुळे सावकारशाहीच्या कचाटय़ात न अडकता, शेतकऱ्यांना योग्य व्याजदरात कर्ज मिळते आणि बँकांचाही ग्राहकवर्ग वाढतो. माहिती नोंदवण्याच्या कामातून रोजगारनिर्मिती होतेच आणि कर्जाची परतफेडही जवळपास १०० टक्के होते. यात नुकसान झाले ते केवळ अवाच्या सवा भावात कर्ज देणाऱ्या सावकारांचे! याच धर्तीवर, शेतकऱ्यांना भांडवल उभारण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा यासाठी मेक्सिकोत ‘अ‍ॅग्रोकॉइन’ आणि रशियात ‘बनानाकॉइन’ हे प्रकल्प सुरू झाले आहेत.

पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक रोखण्यासाठीदेखील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. पीक विम्याबद्दल खरी माहिती मिळवायची असेल तर आयओटीचा (इंटरनेट ऑफ थिंग्ज- वस्तुजाल) वापर महत्त्वाचा ठरू शकेल. त्या दृष्टीने वस्तुजालाचे संवेदक (सेन्सर्स) स्वस्त दरात शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचू शकतात, यावर संशोधन सुरूच आहे. हेच संवेदक पुढे हवामानाची वा मातीची अचूक माहिती देऊन ती ब्लॉकचेनद्वारे पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने साठवून विमावाटप प्रक्रियेला मदत करू शकतील. असे प्रयोग आफ्रिकेत सुरू झाले आहेत. ‘अटॉस’ नामक फ्रेंच कंपनीच्या प्रकल्पामुळे विम्यासाठी लागणारी माहिती ब्लॉकचेनद्वारे शेतकरी आणि विमा कंपन्यांना परस्परांना पुरवता येणे शक्य झाल्याने, अलीकडेच भारतीय व्यापारी संघटनेने त्या कंपनीस पारितोषिक जाहीर केले.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अन्नपुरवठा साखळीत पारदर्शकता आणण्यासाठी उपयोग होतो. यंदा मार्चमध्ये अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाकडून एक सूचना जारी झाली, ज्याद्वारे अन्नपुरवठा साखळीत कार्यरत असलेल्या ब्लॉकचेन व्यवस्थापकांची ‘अत्यावश्यक व्यवसाय आणि सेवा’ अशी नोंद करण्यात आली. आपले अन्न नेमके कुठून आले, त्याचा आपल्यापर्यंतचा प्रवास कसा झाला, त्यावर कोणती प्रक्रिया करण्यात आली आहे वा नाही, ही सारी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आता शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, स्लोव्हेनियातील ‘ओरिजिन ट्रेल’ या कंपनीचा प्रकल्प. यात दुग्धजन्य पदार्थाच्या पाकिटावर असलेले क्यूआर कोड मोबाइलद्वारे स्कॅन केल्यास त्या पाकिटातील पदार्थाविषयी सर्वच माहिती- तारीख, पुरवठा साखळीतील प्रवास, प्रक्रिया आदी- दर्शवली जाईल. अन्नपुरवठा साखळीची सर्वच माहिती जगभर आता अशा प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रकल्प उभारले जात आहेत. वॉलमार्टने आयबीएमसह संयुक्तपणे या दृष्टीने एक प्रकल्प कार्यान्वित केला आहे. चिनी अलीबाबा या कंपनीनेदेखील अन्नपुरवठय़ात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केला आहे. इटली आणि फ्रान्समध्ये अनेक वाइन उत्पादक थेट द्राक्षांपासून वाइनच्या बाटल्यांपर्यंत होणारी सर्व प्रक्रिया ग्राहकांना पारदर्शकपणे दाखवीत आहेत, जेणेकरून ग्राहकांचा विश्वास वाढावा.

पण माहिती फक्त ग्राहकोपयोगी असावी का? अन्नपुरवठा ज्यांच्यामुळे शक्य होतो त्या शेतकऱ्यांचे काय? अन्नविक्री करताना ग्राहकांना हे दाखवू शकलो की त्यांनी दिलेल्या एकूण रकमेपैकी शेतकऱ्यांपर्यंत किती रक्कम पोहोचत आहे, तर याचा फायदा पुढे शेतकऱ्यांना होईलच. असाच प्रकल्प भारतातील सर्वात मोठय़ा फळभाज्या शेतकरी उत्पादक कंपनीत- ‘सह्य़ाद्री फाम्र्स’- राबविण्याचा प्रयोग सुरू आहे.

अशी पारदर्शकता फक्त अन्नपुरवठय़ापुरती सीमित राहत नाही. आपण परिधान करत असलेल्या कपडय़ांसाठी वापरण्यात आलेला कापूस वा रेशीम आले कुठून, त्यामध्ये किती कापूस शेतकरी बांधवांच्या मालाचा वापर करण्यात आला आहे, त्यांना योग्य मोबदला मिळाला की नाही, हे सारे कपडय़ांवरील क्यूआर कोडवरून जाणून घेता येईल. आणखी एक उदाहरण द्यायचे तर बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तूवरील क्यूआर कोडद्वारे- हा बांबू कोणाच्या शेतातून आला, यावर काम करणारे कारागीर कोण आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळतोय की नाही, ही माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. मुख्य म्हणजे ही सारी माहिती ब्लॉकचेनवर साठवली जाणार असल्यामुळे त्यास विश्वासार्हतेची जोड असेलच!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io