उमेश बगाडे

‘पब्लिक स्फिअर’ किंवा सार्वजनिकतेच्या चव्हाटय़ाचा महाराष्ट्रातील घडता काळ हा वासाहतिक शिक्षण, सुविधा आणि परंपराबद्ध जाणिवा यांचा काळ असल्याने या चव्हाटय़ावरही, समावेशनाऐवजी वगळण्याचे तर्कशास्त्र आपसूकपणे आले.. पण त्यातून मार्ग काढत ‘प्रति-चव्हाटा’ कसा तयार झाला?

वसाहतकाळात आधुनिकतेबरोबर ‘लोक’ ही संकल्पना महाराष्ट्राच्या चर्चाविश्वात दाखल झाली. मध्यमवर्गातील काही व्यक्तींच्या पुढाकारातून लोक म्हणजे काय याची कल्पना केली गेली, लोकांच्या हिताचा विचार मांडण्यात आला. समाजाच्या समस्यांवर चर्चा घडवली गेली; लोकमताची घडण करण्यात आली आणि राजकीय कृतिशीलतेची सुरुवात करण्यात आली. जर्मन तत्त्वज्ञ युर्गेन हेबरमास ज्याला मध्यमवर्गीयांच्या सार्वजनिकतेचा चव्हाटा (पब्लिक स्फिअर) म्हणतात, तो महाराष्ट्रात आकाराला आला.

राज्यसंस्था व्यक्तीला जो खासगी स्वायत्ततेचा अवकाश देत असते त्यापलीकडे समाजाच्या प्रश्नांवर चिकित्सक लोकसंवाद घडवणारा, चर्चेसाठी सर्वाना खुला असा हा सार्वजनिकतेचा चव्हाटा उभा राहात असतो. तो आभासी अवकाश असतो, खासगीपणा व राज्यसंस्थेच्या दरम्यान तो काम करत असतो. खासगी व्यक्ती आणि समूहांच्या एकत्र येण्यातून, विचारविनिमयातून, लोकांच्या वतीने राज्यसंस्थेसमोर समाजाचे प्रश्न मांडण्यातून तो आकार घेत असतो. ‘दर्पण’ पत्राच्या रूपाने मध्यमवर्गीय सार्वजनिकतेचा हा चव्हाटा वासाहतिक राजवटीच्या पहिल्या १४ वर्षांतच महाराष्ट्रात साकारला. वर्तमानपत्रे, नियतकालिके, पत्रके, पुस्तके अशा छापील माध्यमांमधून तो जसा आकाराला आला तसा स्वयंप्रेरणेने उभ्या राहिलेल्या संस्था व संघटनांच्या धडपडीतूनही घडला.

मध्यमवर्गाची सार्वजनिक चव्हाटय़ावरील कार्यशीलता मोठी राहिली. दर्पण, दिग्दर्शन, प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, सुबोधपत्रिका, विविधज्ञान विस्तार, निबंधमाला, इंदुप्रकाश, दीनबंधू, उपदेशचंद्रिका, वृत्तवैभव, विचारलहरी, दीनमित्र, केसरी, मराठा, सुधारक अशी अनेक वर्तमानपत्रे व नियतकालिके त्यांनी सुरू केली. संस्था व संघटनांचे एक जाळेच त्यांनी विणले. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, परमहंस मंडळी, बॉम्बे असोसिएशन अशा संस्था पहिल्या पिढीतल्या शिक्षितांनी स्थापन केल्या. प्रार्थना समाज, पुणे सार्वजनिक सभा, आर्य महिला सभा, औद्योगिक परिषद, वेदोत्तेजक सभा, वक्तृत्वोत्तेजक सभा, ग्रंथकार सभा अशा संस्था न्यायमूर्ती रानडेंच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिल्या, तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, केसरी-मराठा ट्रस्ट, चित्रशाळा (प्रेस) अशा संस्था विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या पुढाकारातून उदयाला आल्या. सत्यशोधक समाज, दीनबंधू सार्वजनिक सभा, मराठा ऐक्येच्छु सभा, मिलहँड असोसिएशन अशा संस्था व संघटना सत्यशोधक विचाराच्या छत्राखाली स्थापन झाल्या. मध्यमवर्गाच्या अशा उद्यमशीलतेमधून महाराष्ट्रातील सार्वजनिक चव्हाटय़ाची घडण होत राहिली.

सार्वजनिकतेची कोंडी

महाराष्ट्रात मध्यमवर्गीय जाणीव व सार्वजनिक चव्हाटा एकमेकांच्या सान्निध्यात एकमेकांना प्रभावित करत विकसित होत राहिले. मध्यमवर्गाच्या अस्तित्वात पायाभूत असलेली जातवर्गीयतेची गुंतागुंत सार्वजनिक चव्हाटय़ाला तर सार्वजनिक चव्हाटय़ावरील चर्चा मध्यमवर्गाच्या जाणिवेला घडवत राहिली. पारंपरिक बुद्धिजीवी जातींतून आलेला मध्यमवर्ग जातिअस्मितेच्या साच्यात वर्गीय ओळख बांधत राहिला. इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवी म्हणून भांडवली परिवर्तनाच्या धुरीणत्वाची जबाबदारी तो घेत राहिला आणि त्याच वेळी धर्म व परंपरा रक्षणाचे पारंपरिक बुद्धिजीवीचे कामही करत राहिला. एका बाजूला, भांडवली वर्गसमाजातील विवेकनिष्ठा सर्वसमावेशकता व समान सहभागित्वाचे तत्त्व तो अंगीकारत राहिला तर दुसरीकडे, निम्न जाती व स्त्रियांना वगळणाऱ्या व उच्चजातीय पुरुषांना विशेषाधिकार देणाऱ्या शुद्धीच्या उतरंडीला जपत, स्वजाती-श्रेष्ठत्वाच्या भावनेला कुरवाळत राहिला. ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाच्या जाणिवेतल्या या दुभंगामुळे सार्वजनिकतेचा चव्हाटा विरोधाभासात अडकला.

एकतेच्या सूत्राआधारे सार्वजनिकतेचा चव्हाटा उभा राहतो. एकतेचे सूत्र मध्यमवर्गाच्या कृतिशीलतेला सामायिक धारणांची चौकट देते. सामाजिक सत्तेच्या मर्यादेत अधीनता घडवण्याचे काम ते करते. वासाहतिक सत्तारचनेतील उदारमतवाद महाराष्ट्रीय मध्यमवर्गाच्या सार्वजनिक चव्हाटय़ाला एकतेचे सूत्र देत होता. त्याचप्रमाणे जात-पितृसत्तेचा संस्कृतिव्यूह त्याला एकत्वाची चौकट देत होता. म्हणजे जात, धर्म, राष्ट्र, प्रदेश अशा एकत्व देणाऱ्या आत्मकल्पनांच्या साच्यांचा अचिकित्सक अंगीकार करूनच मध्यमवर्गीय सार्वजनिकतेचा चव्हाटा उभा राहात होता.

जातींच्या सामाजिक व सांस्कृतिक भांडवलाच्या आधारावर ब्राह्मण वा तत्सम जातींनी इंग्रजी शिक्षणाच्या क्षेत्रात मक्तेदारी राखली. वर्गोन्नती स्वजातीपुरती सीमित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकोणिसाव्या शतकात सार्वजनिकतेच्या चव्हाटय़ावर ब्राह्मण व तत्सम पारंपरिक बुद्धिजीवी जातींचा वावर सर्वाधिक राहिला. जातिपितृसत्ताक व्यवस्थेचे ‘वगळण्याचे तर्कशास्त्र’ प्रवाहित करून इतर/ शूद्रातिशूद्र जातींना व स्त्रियांना रोखण्याचा प्रयत्न ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाने केलाच, पण त्याबरोबर शूद्रातिशूद्र व स्त्रियांच्या ‘वतीने बोलण्या’ची भूमिका घेऊन सार्वजनिक चव्हाटय़ावर अधिराज्य राखण्याचा प्रयत्न केला.

मध्यमवर्गाच्या जाणिवेतील जात-पितृसत्ताकतेच्या नीतीमुळे सार्वजनिक चव्हाटय़ावरील विवेकनिष्ठा व सर्वसमावेशकता बाधित होत राहिली. जातीय आत्मतत्त्वात रुतलेल्या जात-पितृसत्ताक धारणांमुळे सार्वजनिक चव्हाटय़ावरील विवेकाचा संकोच होत राहिला तर त्यातील जातीवर्जनाच्या तर्कशास्त्राने समावेशनाऐवजी वगळण्याचेच कार्य आरंभले.

उदारमतवादाच्या मुशीतून आलेला सुधारणेचा विवेक गतानुगतिकतेमुळे ब्राह्मणी परंपरेच्या अंगाने वळवून आणि शुद्धीच्या प्रतीकात्मकतेशी जोडून सादर केला जाऊ लागला. हिंदूंचे पवित्र धर्मग्रंथ छापण्याचा विचार गळी उतरवण्यासाठी साजूक तूप वापरण्याची योजना बाळशास्त्री जांभेकरांनी त्या अनुषंगाने प्रस्तावित केली. विष्णुबावा ब्रह्मचारी यांनी हिंदूंच्या अध्यात्मज्ञानाला पाश्चात्त्य भौतिक शास्त्रांच्या नियमांशी जोडण्याचा प्रयत्न केला.

जातीसमाजातील अशुद्धीच्या तर्कशास्त्राच्या आधारेच सार्वजनिक चव्हाटय़ावर शूद्रातिशूद्र व स्त्रियांना वगळण्याची प्रक्रिया चालली होती. भांडवली वर्गसमाजातील समावेशनाची प्रवृत्ती आणि जातीसमाजातील कलंक लादून वगळण्याची प्रवृत्ती यांतून विरोधाभासाची स्थिती निर्माण होत होती. त्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. एका बाजूला, हिंदू स्त्रियांच्या निम्नस्तरीय सामाजिक स्थानावर बोट ठेवणाऱ्या वासाहतिक प्रभुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी आणि सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठी पंडिता रमाबाई यांच्या संस्कृत शास्त्रांच्या पांडित्याला सार्वजनिक चव्हाटय़ावर गाजवण्यात आले. याच रमाबाईंच्या धर्मातरानंतर सार्वजनिक चव्हाटय़ावरील त्यांचे अस्तित्व ‘रेव्हरंडा’ संबोधनाने कलंकित करून पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अस्पृश्यतेच्या कलंकामुळे दलितांचा प्रश्न एकोणिसाव्या शतकातील सार्वजनिक चव्हाटय़ावर क्वचितच चर्चिला गेला. शूद्रातिशूद्र व स्त्रियांची कड घेणाऱ्या जोतिराव फुले यांना कलंकित करूनच सार्वजनिक चव्हाटय़ावरून बेदखल करण्याचा प्रयत्न झाला. जोतिराव फुले यांचा उल्लेख उपरोधाने रेव्हरंड असा तुच्छतादर्शक करण्याची प्रवृत्ती तत्कालीन ब्राह्मणी वर्तमानपत्रांनी दाखवली. मृत्यूनंतर बातमी छापण्याचे सौजन्यही काही वर्तमानपत्रांनी दाखवले नाही. परत्वाला कलंकित व हीन ठरवून वगळण्याची ही प्रवृत्ती मध्यमवर्गाच्या सार्वजनिक चव्हाटय़ावर कायम नांदत राहिली.

वगळण्याचे तर्कशास्त्र अनेक प्रकारे काम करत राहिले. टिळकांनी राजकीय सुधारणांना अग्रक्रम देऊन सामाजिक सुधारणेला आणि पर्यायाने स्त्री-शूद्रातिशूद्र, शेतकरी, कामगार यांच्या हितसंबंधांना बाजूला सारले. पण वसाहतवादाच्या विरोधात जनतेचे समर्थन मिळवण्यासाठी शिवजयंती व गणेशोत्सवाच्या सार्वजनिकतेमधून शूद्रातिशूद्रांच्या निष्क्रिय सहभागाला प्रसारित करण्याचे काम केले.

प्रति-सार्वजनिकतेचा चव्हाटा

मध्यमवर्गाचा सार्वजनिक चव्हाटा सर्वासाठी खुला नव्हता. समावेशनापेक्षा वगळण्याचेच तत्त्व राबवले जात असल्याने शूद्रातिशूद्र नवशिक्षितांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीला त्यात वाव नाही हे जोतिराव फुले यांनी नेमके ओळखले. ‘ज्याची वेदना त्यालाच कळते’ असा पवित्रा घेऊन ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाच्या जन प्रतिनिधित्वाचे दावे फुले यांनी साफ धुडकावून लावले. स्त्रियांच्या वतीने बोलण्याच्या पुरुषांच्या प्रवृत्तीला आणि शेतकऱ्यांच्या वतीने बोलण्याच्या जमीनदार-सावकारांच्या प्रवृत्तीला त्यांनी गैरलागू ठरवले.

जोतिराव फुले यांच्या जातिविद्रोहाच्या विचारामधून प्रति-सार्वजनिकतेचा चव्हाटा उभा राहिला. सत्यशोधकांनी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या. कार्यकर्त्यांनी गावोगावी व्याख्याने दिली. सरकारदरबारी शूद्रातिशूद्र जनतेची गाऱ्हाणी सादर केली. वर्तमानपत्रे, नियतकालिके, पत्रके, पोस्टर्स, कविता, गाणी, पोवाडे, नाटक, कथा-कादंबऱ्या अशा सर्व छापील साहित्याच्या आधारे आणि वेगवेगळ्या संस्था व संघटनाच्या आधारे प्रति-सार्वजनिकता घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शूद्रातिशूद्र जातींमध्ये लोकप्रिय असलेल्या तमाशा, कीर्तन-प्रवचन सादरीकरणातून प्रति-सार्वजनिकतेला त्यांनी विस्तारले. सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मृत्यूनंतरच्या पडत्या काळात सत्यशोधक विचार व कृतिशीलतेची धग ओतूरच्या डुंबरे पाटिलांनी कीर्तनाच्या सादरीकरणातून टिकवून धरली.

शूद्रातिशूद्रांची व स्त्रियांची प्रति-सार्वजनिकता परंपरेने चालत आली होती. स्वयंपाकघर, पाणी भरणे वा धुणीभांडी करण्याची ठिकाणे, स्त्रियांचे सण, गाणी, खेळ, धार्मिक उत्सवातील सहभाग यातून स्त्रियांची प्रति-सार्वजनिकता घडत राहिली. तर चावडीवरच्या गप्पा, बाजारातल्या गप्पा धार्मिक एकत्रीकरणातला सहभाग यामधून शेतकरी समुदायातील प्रति-सार्वजनिकता घडत राहिली. सत्यशोधक विचारांच्या मुशीतला ओतूरच्या शेतकऱ्यांचा विद्रोह प्रति-सार्वजनिकतेच्या चव्हाटय़ावरच आकाराला आला होता.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

ईमेल : ubagade@gmail.com

shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….

Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?