या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेश बगाडे

मुक्ता साळवे, तुकारामतात्या पडवळ आणि गोपाळबाबा वलंगकर या तिघांचेही लिखाण ही दलित जाणिवेच्या ज्ञाननिर्मितीची सुरुवात. यापैकी विशेषत: साळवे आणि वलंगकरांच्या कृती-कार्यक्रमात फरक असला, तरी व्यक्तिनिष्ठ अनुभव, निरीक्षण आणि चिंतन हा त्या दोघांच्याही  लिखाणाचा पाया आहे..

दलितांमधील शिक्षणप्रसार १९ व्या शतकात फार गती घेऊ शकला नाही. वासाहतिक हितसंबंध व उच्च जातीयांच्या दबावाखाली ब्रिटिशांनी अस्पृश्यांच्या शिक्षणाची हेळसांड केली. त्यातच अंधश्रद्धा, अज्ञान व दारिद्रय़ यांचे प्राबल्य, शिक्षण व्यवस्थेत दलितांच्या वाटय़ाला येणारी तुच्छता व असहकार्य यामुळे प्रतिकूलतेचा डोंगर उभा राहिला. परिणामी, १९०१ च्या जनगणनेत दलितांमध्ये शिक्षणाचे प्रमाण दर हजार लोकसंख्येमागे एक साक्षर इतके नगण्य होते.

शिक्षणातील या मागासलेपणामुळे पांढरपेशा मध्यमवर्गापर्यंत दलितांना पोहोचता आले नाही. पण अल्पस्वल्प शिक्षणामुळे त्यांच्यात स्वत्वाची जाण मात्र निर्माण झाली. विशेषत: लष्करात गेल्यामुळे शिक्षणाचा लाभ झालेल्या दलितांना स्वजातीहिताबाबत जाण येऊ लागली. वासाहतिक काळात उपलब्ध झालेल्या अवकाशात, विशेषत: सत्यशोधक समाजाच्या विचारांच्या मुशीत ते स्वत:ला बुद्धिजीवींच्या भूमिकेत उभे करू लागले.

परिवर्तनाची दृष्टी

दलितांचे बदललेले आत्मभान मुक्ता साळवे या महात्मा फुलेंच्या शाळेतील मांग जातीतील मुलीच्या निबंधात पाहायला मिळते. फुले यांच्या विचारपद्धतीमुळे घडलेला विश्वदृष्टिकोन, त्यातून जागलेले दलितांचे बंडखोर आत्मभान आणि परिस्थितीत बदल करू इच्छिणारी परिवर्तनाची दृष्टी त्यात पाहायला मिळते. दलितांच्या विवक्षित अनुभवाला सार्वत्रिक ज्ञानाच्या रूपात परावर्तित करण्याची जाणही त्यात बघायला मिळते.

दलित आत्मस्थितीला तीन स्तरांवर मुक्ताने उभे केले. पहिले म्हणजे, महार-मांग हे समकालीन अस्पृश्यतावाचक संबोधन तिने आत्मकल्पना म्हणून अंगीकारले. जातिव्यवस्थेच्या वगळण्याचा, अवनतीकरणाचा, सत्ता-मत्ता-पद-प्रतिष्ठा यांच्या विहीनतेचा, दास्यतेचा, अपमान व हिंसेचा जो समान अनुभव महार-मांग अशा अस्पृश्य जातींच्या वाटय़ाला येत होता, त्या आधारावर तिने हे स्व-भान उभे केले. दुसरे म्हणजे, ‘मांग’ हे जातिविशिष्ट आत्मभान तिने अंगीकारले. जातिव्यवस्थेतील अशुद्धी व दास्याच्या उतरंडीत निम्नतम अवस्थेला ढकललेल्या मांग जातीच्या आत्मानुभावावर हे स्व-भान उभे राहिले. तिसरे म्हणजे, प्रबोधनाचे ‘मनुष्यत्वा’चे अमूर्त तत्त्व आणि मनुष्यत्वदर्शक स्वातंत्र्य व समतेच्या इच्छांचे विश्व आपल्या महार-मांग या आत्मकल्पनेतून मुखर केले.

ब्राह्मणवादाच्या विरोधात महार-मांग ही आत्मकल्पना मुक्ताने उभी केली. जातिश्रेष्ठत्वाच्या भावनेतून ब्राह्मण करत असलेला अस्पृश्यांचा द्वेष तिने अधोरेखित केला. अस्पृश्यांना वेद वाचण्यास मनाई करणाऱ्या धर्मावर तिने तिखट टीका केली आणि महार-मांग धर्मरहित लोक आहेत अशी घोषणा केली. ब्राह्मण्यवादाशी असलेला विरोध मांडताना पेशवाईत अस्पृश्यांवर लादलेल्या संस्थात्मक हिंसेचे व जुलमाचे दाखले तिने पेश केले. पेशवाईत अतिशूद्रांवर लादलेली ज्ञानबंदी, चांगल्या वस्तू उपभोगण्याची मनाई, बाजारात फिरण्याची मनाई, अस्पृश्यांना इमारतीच्या पायात जिवंत पुरण्याची प्रथा, सवर्णाचा अपराध केल्यावर होणारी हिंसा तिने अधोरेखित केली.

स्वत:च्या जातिविशिष्ट अनुभवांची संगती लावून अस्पृश्यतेमुळे येणाऱ्या विषमतेचे व अन्यायाचे विवरण मुक्ताने केले : अस्पृश्यतेमुळे नोकरी मिळत नाही, विपन्नावस्था सुटत नाही, ब्राह्मण मुलांनी मारलेल्या दगडांनी रक्तबंबाळ झाल्यावरही मिंधेपणामुळे तक्रार करता येत नाही. बाळंत होण्यासाठी स्त्रियांना छप्पर मिळत नाही, संकटप्रसंगी उच्चजातीयांची सहानुभूती मिळत नाही; आत्मोन्नतीचा मार्ग आक्रमता येत नाही.. दलितांच्या तत्कालीन स्थितीत परिवर्तन घडवणाऱ्या योजनाही मुक्ताने पुढे आणल्या आहेत. अस्पृश्यांना शिक्षण देणे, इंग्रज सरकारने गुन्हेगारी जात म्हणून सुरू केलेली हजेरीची प्रथा बंद करणे, अस्पृश्य स्त्रियांना बाळंतपणाची सुविधा पुरवणे अशी अस्पृश्यतामुक्तीकडे नेणारी कार्यक्रम पत्रिका त्यातून आकाराला आली.

जातीखंडनाची परंपरा

महाराष्ट्रात जातीविद्रोहाच्या मुशीतून आलेली जातीखंडनाची परंपरा मध्ययुगापासून चालत आलेली होती. तिचा शोध घेण्याचे प्रयत्न १९ व्या शतकात झाले. ‘परमहंस मंडळी’ची जातीविरोधाची निष्ठा अंगीकारलेल्या तुकारामतात्या पडवळ यांनी ‘जातीभेद विवेकसार’ हा ग्रंथ ‘एक हिंदू’ या नावाने १८६१ मध्ये लिहिला. त्यात त्यांनी हिंदू धर्मशास्त्रांचा व्यासंग करून वर्ण-जातीखंडनाचा विचार आधुनिकतेच्या नव्या संदर्भात मांडला.

पडवळांनी जसा पाश्चात्त्य आधुनिकतेचा विवेक जातीखंडनात अवलंबला, तसा परंपरेतील जातीउच्छेदाचा विवेकही वापरला. जातीच्या तर्कातील विसंगती दाखवत, जातीचे दुष्परिणाम सांगत, प्राचीन व मध्ययुगीन संत-महंतांचे जातीविरोधी विचार उद्धृत करत, ‘वज्रसूची’मधील जातीखंडनाला मध्यवर्ती करत, १८ व्या शतकातील जातीसंघर्षांचे दाखले देत त्यांनी आपला युक्तिवाद मांडला. हिंदू आत्मकल्पनेच्या चौकटीत युक्तिवाद करताना जातीसमर्थक शास्त्रांचे खंडन व जातीउच्छेदक वचनांचे मंडन असा पवित्रा त्यांनी घेतला.

पडवळांच्या ग्रंथाचा पुरस्कार महात्मा फुले यांनी केला. त्यांनी ग्रंथाची दुसरी आवृत्ती छापण्याच्या कामी मदत केली. गोपाळबाबा वलंगकर या दलित चळवळीची सुरुवात करणाऱ्या फुलेंच्या शिष्यावर या ग्रंथाचा प्रभाव पडलेला दिसतो. विशेषत: ग्रंथातील जातीखंडनाच्या तर्कपद्धतीचा प्रभाव वलंगकरांच्या ‘विटाळविध्वंसन’ या कृतीमध्ये उमटलेला दिसतो.

‘जातीभेद विवेकसार’प्रमाणेच जातिव्यवस्था व अस्पृश्यतेचा प्रश्न हिंदू धर्मकल्पनेच्या मर्यादेत सोडवण्याची भूमिका वलंगकरांनी घेतली. त्यांनी आपले विनंतीपत्र शंकराचार्य, शास्त्री-पंडित, संस्थानिक, ईश्वरभक्तीपरायण साधू-महंत, तसेच अन्य पवित्र व विद्वान हिंदूंना उद्देशून लिहिले. शास्त्रवचनांचे दाखले देत जातिव्यवस्था व अस्पृश्यतेला आव्हान देणारे बिनतोड असे २६ प्रश्न त्यांनी त्यात विचारले. अस्पृश्यता ही सृष्टीनियमाविरुद्ध, बुद्धीविरुद्ध, नीतीविरुद्ध व सद्धर्माविरुद्ध आहे असा युक्तिवाद त्यांनी केला.

दलितांच्या मध्ययुगीन आत्मोन्नतीच्या संघर्षांचे सातत्यही ‘विटाळविध्वंसन’मध्ये पाहायला मिळते. आधीच्या शतकात ब्राह्मणांचे पौरोहित्य जातीउतरंडीतील प्रतिष्ठा प्रदान करत असल्यामुळे महारांचे धार्मिक विधी ब्राह्मणांनी करावेत अशी मागणी करण्यात आली होती. आत्मोन्नतीची ही प्रेरणा १९ व्या शतकात येऊन धडकली. महाराच्या दुमजली माडीची वास्तुशांत केलेल्या ब्राह्मणाला वाळीत टाकण्यात आल्याच्या कोकणातील घटनेवरून- ‘ब्राह्मण महारांचे विधी का करत नाहीत,’ असा प्रश्न वलंगकरांनी विचारला; तिथूनच अस्पृश्यताविरोधी युक्तिवादाला सुरुवात केली.

अनुभवाधारित मीमांसा

महात्मा फुले यांनी अनुभववादी ज्ञानमीमांसेची कास पकडली. उच्च जातीच्या व पुरुषांच्या ज्ञानातील अधिसत्तेला आव्हान देताना ‘जिस तन लागे वही तन जाने। बिजा क्या जाने गव्हारा रे॥’ हे कबीराचे वचन उद्धृत करून त्यांनी निम्न जातीयांच्या व स्त्रियांच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवाची ज्ञाननिर्मितीमधील गरज प्रतिपादली. निरीक्षण व चिंतन (रिफ्लेक्शन) या प्रक्रियांद्वारे अनुभवापासून वस्तुनिष्ठ ज्ञान संपादन करण्याचा पाश्चात्त्य अनुभववाद्यांचा मार्ग त्यांनी पुरस्कारला होता.

व्यक्तिगत अनुभवाचा अभ्यास करत निरीक्षण नोंदवणे व त्या निरीक्षणांच्या विश्लेषण व चिंतनप्रक्रियेतून ज्ञाननिर्मिती करणे या प्रक्रियेचा अवलंब वलंगकरांनी केला. अस्पृश्यता जे अनेक प्रकारचे प्रतिबंध लादते, त्याची नोंद त्यांनी केली. अस्पृश्यतेचे तत्त्व पाणवठे, धर्मशाळा, मंदिरे अशा सार्वजनिक ठिकाणांचा व स्रोतांचा उपभोग घेण्यापासून दलितांना प्रतिबंधित करते. ते दलितांना अधिकारविहीन करते; चांगली घरे व अंगभर कपडे घालण्यास प्रतिबंध करते, शिक्षणाचा अधिकार नाकारते, नोकरी, व्यापार, व्यवसाय करण्याची संधी नाकारते, त्यांना अशुद्ध, कष्टप्रद व हीन मानलेले श्रम करण्यासाठी भाग पाडते. वलंगकरांनी केलेली अस्पृश्यतेची ही उकल अनुभवाच्या निरीक्षण, विश्लेषण व चिंतनातून आली आहे. ‘अस्पृश्यता ही दलितांना मानवी अधिकार नाकारणारी संस्था आहे’ हे ती स्पष्ट करते. त्यामुळेच तिच्या आधारावर अस्पृश्यतामुक्तीच्या भौतिक लढय़ाची कार्यक्रम पत्रिका उभी राहिली आहे.

फुलेंच्या इतिहासविचाराची कास वलंगकरांनी पकडली. त्यांनी आर्य-अनार्य विग्रहाचा स्वीकार करत अनार्य हे अस्पृश्यांचा सामाजिक वारसा सांगणारे आत्मतत्त्व अंगीकारलेच; शिवाय महार हे जातिविशिष्ट आत्मतत्त्वही स्वीकारले. महार या  आत्मकल्पनेच्या चौकटीत जातीसुधारणेचा मार्ग वलंगकरांनी स्वीकारला. अस्वच्छ राहणीमान, अशौचाशी जोडलेली कामे, मृत मांसाचे सेवन अशा अशुद्धीचा आरोप असलेल्या बाबी त्यागण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यांनी स्थापन केलेल्या पहिल्या दलित संघटनेचे नाव ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ असे राहिले. विदर्भातील पहिले दलित समाजसुधारक विठोबा मुनपांडे यांनीसुद्धा शुद्धीचाच मार्ग श्रेयस्कर मानला होता.

दलितांच्या आत्मकल्पनेच्या घडणीतून चळवळीला आकार येत राहिला. त्याद्वारे ब्राह्मणवर्चस्वातून शूद्रातिशूद्रांनी मुक्त होण्याची लढाई पुढे आली. तर अस्पृश्यतावाचक आत्मतत्त्वातून अस्पृश्यतामुक्तीची भौतिक लढाई उभी राहिली आणि मांग, महार, चांभार, ढोर अशा जातिविशिष्ट आत्मतत्त्वाच्या स्वीकारातून जातीसुधारणेची आत्मिक लढाई आकाराला आली.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल : ubagade@gmail.com

मराठीतील सर्व समाजबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on transition from dalit consciousness abn
First published on: 08-07-2020 at 00:03 IST