– अभय टिळक agtilak@gmail.com
‘यज्ञासाठी तयार केलेली भूमी’ हा ‘वेदी’ या शब्दाचा अर्थगाभा असल्याने यज्ञाच्या स्वरूपानुसार वेदीचे रंगरूप निश्चित व्हावे, हे स्वाभाविकच. निरनिराळ्या यज्ञांसाठी त्याबरहुकूम वेगवेगळ्या आकाराच्या वेदी विधिपूर्वक तयार करण्याची परंपरा यज्ञसंस्कृतीने प्रस्थापित केली व जपली. ‘वेदी’ या शब्दाला लाभलेल्या अन्य दोन अर्थच्छटा ‘यज्ञ’ या विधीच्या प्रयोजनाचे सूक्ष्म सूचन घडवितात. यज्ञकुंडाच्या वरच्या भागाला ‘वेदी’ असे संबोधन होय. त्याचवेळी यज्ञासाठी परिष्कृत केलेली भूमी म्हणजे ‘वेदी’ अशीही एक छटा या संज्ञासंकल्पनेला जोडलेली आहे. ‘यज्ञ’ या विधिविधानाचा संबंध पावित्र्याशी व त्याद्वारे समाजजीवन परिष्कृत बनविण्याच्या प्रेरणेशी असल्याचे सूचन या उभय बाबी घडवितात. विश्वातील यच्चयावत जीवमात्रांचे पालन-संगोपन घडावे यासाठी यज्ञाचे आयोजन करण्याच्या पूर्वापार परंपरेचा निर्देश यज्ञ भूतांच्या पाळणा अशा शब्दांत तुकोबाराय करतात, त्यामागील संकेत हाच. तिळातांदळाचे हवन करण्याद्वारे सिद्ध होणाऱ्या पारंपरिक यज्ञाऐवजी नामजपरूपी यज्ञाचा पुरस्कार करत भागवत धर्मविचाराने प्राचीन यज्ञ-संकल्पनेमागील पावित्र्याच्या आदिप्रेरणेला कालोचित वळण बहाल केले. लोकव्यवहार शुद्ध बनावयाचा असेल तर लोकमानस मुळात परिष्कृत बनावयास हवे हा कार्यकारणभाव ध्यानात घेत, चित्तशुद्धीचे प्रधान साधन म्हणून नामयज्ञाचा अंगीकार व प्रवर्तन भागवत धर्मविचारी संतपरंपरेने जाणीवपूर्वक घडविले. ऐसें अनंत अपार । नामें तरले चराचर। नाम पवित्र आणि परिकर। रखुमादेविवराचें अशा शब्दांत भगवन्नामाच्या स्वयंभू पावित्र्याचा अनुभवसिद्ध दाखला देतात ज्ञानदेव. ‘सुंदर’, ‘चांगले’, ‘मधुर’ या विविध अर्थच्छटा होत ‘परिकर’ या शब्दाच्या. आपले शरीर हेच मग ठरते यज्ञकुंड अशा अविरत धगधगणाऱ्या नामयज्ञाचे. साहजिकच आपले मुख हा ठरतो त्या शरीररूपी यज्ञकुंडाचा वरील भाग. यज्ञाच्या स्वरूपानुसार वेदीचे रूप-स्वरूप निश्चित व्हावे या न्यायानुसार, पवित्र असा नामयज्ञ ज्या वेदीवर प्रज्ज्वलित करावयाचा ती वेदीही तितकीच पवित्र व परिष्कृत असावयास हवी. म्हणजेच नामयज्ञाच्या यजमानाची वाचा असावयास हवी विशुद्ध. आपली वाचा तर असते विटाळलेली असत्याने. तीर्थक्षेत्रांवर जाऊन तेथील पवित्र तीर्थामध्ये कितीही बुडय़ा मारल्या तरी जिव्हेवर चढलेली असत्याची पुटे काही होत नाहीत दूर. परमपवित्र असा नामयज्ञ चेतविण्यासाठी जिव्हारूपी वेदी प्रक्षाळून परिकर कशी बनवायची, हा इथे उभा ठाकतो आता जटिल प्रश्न. ‘असत्याचे मळ बैसले ये वाचे। ते न फिटती साचे तीर्थोदके। हरीनामामृत प्रक्षाळी जिव्हेतें। पाणीयें बहुतें काय करिती’ असा निर्वाळा देत इथे धावून येतात नामदेवराय मदतीला आपल्या. नामचिंतनाच्या साधनाचे अवघे अमोघत्व एकवटलेले आहे ते इथे आणि असे. वाचा विशुद्ध बनवणे हे होय भागवत धर्मविचाराच्या लेखी नामचिंतनाचे आद्य प्रयोजन. वाचेच्या शुद्धतेद्वारे प्रतिबिंबित होत असते विशुद्ध अंत:करण. ‘सकळ धर्माचें कारण। नामस्मरण हरिकीर्तन। दया क्षमा समाधान। संतजन साधिती’ अशा शब्दांत ज्ञानदेव विदित करतात नामयज्ञाची अपेक्षित परिणती. अंत:करणात दया, क्षमा, समाधान यांसारख्या सुभग मूल्यांचे अधिष्ठान दृढ होणे, ही होय अंतिम फलश्रुती नामयज्ञाची. केवळ पारलौकिकच नव्हे, तर ऐहिक व्यवहारही पवित्र बनण्यासाठी भागवत धर्मप्रणीत भक्तिविचार पिटतो डंका नामजपाचा. चित्तशुद्धीच साधत नसेल तर काय उपयोग ढीगभर माळा ओढण्याचा!