पी. चिदम्बरम

एखाद्याचे कपडे, खाण्यापिण्याच्या सवयी यावरून त्याच्या धर्मापर्यंत जाण्याची आणि या गोष्टींचे राजकारण करण्याची पद्धत अलीकडच्या काळात पडू लागली आहे. हल्ली हे सगळे ‘हिंदुत्वा’च्या अजेंडय़ाखाली आणले जात असले तरी हजारो वर्षांपासून आपल्याला माहीत असलेला ‘हिंदू धर्म’ वेगळा आहे..

तमिळनाडूतील तेव्हा रामनाथपूरम् आणि आता शिवगंगाई हे नाव असलेल्या जिल्ह्यामधल्या एका खेडेगावात माझा जन्म झाला. मला सांगायला अभिमान वाटतो की, कनियन पुनगुरानार या तमिळमधील सुप्रसिद्ध कवींचा जन्म माझ्या गावापासून काही किलोमीटरवर असलेल्या पुनगुनराम (आता महिबलनपट्टी) या गावात झाला. ही दोन्ही गावे एकाच जिल्ह्यात मोडतात. कनियन पुनगुरानार हे तमिळनाडू आणि परिसरात ‘संगम काळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुवर्णकाळात जन्मले. (इसवीसनपूर्व सहावे शतक ते इसवीसनोत्तर पहिले शतक असा हा संगम काळ समजला जातो. या परिसरातील राजघराण्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे या कालावधीत कला आणि संस्कृतीच्या विकासाला बहर आला होता. आज अस्तित्वात असलेली द्रविडी संस्कृती त्याच काळात विकसित झाली. या संगम काळाला सुवर्णयुग मानले जाते; कारण त्याचा तमिळनाडूच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक जीवनावर मूलगामी परिणाम झाला आहे.) ‘यद्दुम ओरे यावरुम केलिर’ ही त्यांची जेमतेम १३ ओळींची कविता अत्यंत लोकप्रिय आहे. ‘प्रत्येक ठिकाण हे माझे गावच आहे आणि प्रत्येक जण माझा सगासोयरा’  असा- ‘ हे विश्चचि माझे घर’ सारखा – या ओळींचा भावार्थ.

अर्थात त्यांच्या इतरही अनेक कविता उत्कृष्ट आहेत; पण याच  कवितेच्या पहिल्या ओळीचा उ ल्लेख केला कारण ती, संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या भिंतीवर कोरलेली आहे. त्या कवितेत दोन हजार वर्षांपूर्वीचे तमिळ लोकांचे लोकजीवन प्रतिबिंबित होते असे मानले जाते.

हिंदूहा शब्द

तत्कालीन तमिळ साहित्यात त्या काळातील शैव आणि वैष्णव या दोन धर्माची नोंद आहे. समानम् (जैन धर्म) आणि बौद्धम् (बौद्ध धर्म) हे दोन धर्म त्यानंतरच्या काळामधले. प्राचीन तमिळ साहित्यात हिंदू तसेच हिंदूुत्ववाद हे शब्द सापडत नाहीत. शशी थरूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुकुश पर्वताच्या पलीकडल्या परकीयांकडून हा शब्द वापरला जायच्या आधी तो कोणत्याही भारतीय भाषेत आढळत नाही. परकीयांनीच भारतीयांना ही संकल्पना दिली आहे.

बहुसंख्य तमिळी हे हिंदू धर्माचरण करणाऱ्या कुटुंबात जन्माला येतात. ते अनेक देवतांना पूजतात (त्यात गावातील स्थानिक देवताही आल्या.). पोंगल, दिवाळी यांसारखे सण साजरे करतात. पोंगल, पाल कुडम, कावडि यांसारख्या प्रथा पाळतात. तमिळ हिंदूंना गेली अनेक शतके इतर धर्मीयांबरोबर राहण्याची सवय आहे. गेली दोन हजार वर्षे त्यांना ख्रिश्चनधर्मीयांची; तर गेली ८०० वर्षे मुस्लीमधर्मीयांची सवय आहे. तमिळ साहित्यात तसेच तमिळ भाषेच्या विकासात मुस्लीम तसेच ख्रिश्चन लेखकांचे, विद्वानांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे, इतर धर्मीयांमध्ये हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी कोणत्याही तमिळ हिंदू राजाने युद्ध छेडले नाही.

हिंदू धर्म म्हणजे नेमके काय, हे जाणण्यासाठी मी डॉ. एस. राधाकृष्णन आणि स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाचली असल्याने मला याबाबत आणखी माहिती घ्यावीशी वाटली नाही. मी जे काही ऐकले, वाचले, परिश्रमपूर्वक जी माहिती गोळा केली त्यामधून हिंदू धर्म म्हणजे काय याविषयी मला काय वाटते ते मला थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल.

साधे सत्य

* आपला धर्म हाच एकमेव आणि खरा धर्म आहे असा दावा हिंदू धर्म कधीच करत नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ज्या धर्माने जगाला सहनशीलता आणि वैश्विक स्वीकारार्हता शिकवली त्या हिंदू धर्मात जन्माला आल्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही वैश्विक पातळीवरच्या सोशीकपणावर विश्वास ठेवतो असे नाही तर आम्ही सगळ्या धर्माचा सहज स्वीकार करतो.

* हिंदू धर्मात एक चर्च, एक पोप, एक प्रेषित, एक पवित्र गं्रथ, एकच एक प्रथा नाही. या प्रत्येकापैकी तिथे अनेक गोष्टी आहेत आणि त्यातल्या हव्या त्या गोष्टीची निवड करायची किंवा नाकारायची हिंदू धर्मीयांना मुभा आहे. एखादा माणूस हिंदू असू शकतो, आस्तिक असू शकतो, अज्ञेयवादी असू शकतो किंवा नास्तिक असू शकतो अशी मांडणीही इथल्या काही विद्वानांनी करून ठेवली आहे. 

* हिंदू धर्मातील धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दय़ाचा विचार केला तर लक्षात येते की, हिंदू धर्मात लग्न करण्याची एकच एक प्रथा नाही, तर अनेक आहेत. इथे वारसाहक्काची एकच एक पद्धत नाही तर अनेक आहेत. हिंदू कायदा सुधारणांमधून (१९५५-१९५६) त्यात एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्या सगळ्यात अगदी आजही प्रचंड वैविध्य आहे.

* हिंदू धर्म त्याचे पालन करणाऱ्या लोकांना इतर धर्मातील संत, देव यांचीही उपासना करण्याची परवानगी देतो. हजारो हिंदू आपल्या आराधनेसाठी वेलंकनीला जातात, अमृतसरच्या सुवर्णमंदिरात जातात किंवा अजमेरच्या दर्गा शरीफला जातात. शिर्डीचे साईबाबा हिंदूू होते की मुस्लीम याविषयी इतिहासकारांचे एकमत नाही. खरे तर साईबाबा दोन्ही होते. कारण त्यांच्या दृष्टीने या दोन्ही धर्मात काहीच फरक नव्हता. ‘अल्लाह मालिक है’ ही त्यांची ओळ प्रसिद्ध आहे.

* शिकागो विद्यापीठात धर्माचा इतिहास हा विषय शिकवणाऱ्या डॉ. वेन्डी डोनीगर यांनी जवळजवळ ५० वर्षे संस्कृत तसेच प्राचीन भारतीय धर्माचा अभ्यास करून आपले निरीक्षण मांडले आहे. त्या म्हणतात, प्राचीन भारतात गोमांस खाल्ले जात होते हे गेली अनेक शतके इथल्या विद्वानांना माहीत आहे. त्यांनी ऋग्वेद, ब्राह्मणे, याज्ञवल्क्य यातील उतारे दिले आहेत. सध्याच्या काळात बरेच हिंदू मांस, मासे आणि अंडी खातात, पण गोमांस खात नाहीत. अनेक हिंदू तर शाकाहारी आहेत.

* डॉ. डोनीगर याकडे लक्ष वेधतात की, गांधीजींनी कधीही गायींना मारण्यावर बंदी आणण्याची मागणी केली नव्हती. ते असे म्हणाले होते की, ‘मी एखाद्याला गायीला मारू नकोस यासाठी सक्ती कशी काय करू शकतो? भारतात काही फक्त हिंदूच राहतात असे नाही. इथे मुस्लीम आहेत, पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत. इतरही धर्म आहेत.’ असे असले तरी अनेक मुस्लीम तसेच ख्रिश्चन गोमांस खात नाहीत. तसेच अनेक मांसाहारी लोक लाल रंगाचे मांस खात नाहीत.

डॉ. आंबेडकरांचे सवाल!

‘जातिप्रथेचे निर्मूलन’ (अनायहिलेशन ऑफ कास्ट) या आपल्या भाषणसंग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंडियन नॅशनल काँग्रेस (स्थापना १८८५) आणि इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स (१८८७) यांच्यातील संघर्षांचा आढावा घेऊन खेदाने नमूद केले आहे की, राजकीय सुधारणांनी सामाजिक सुधारणांचा पराभव केला आहे. राजकारणच करणाऱ्या (पोलिटिकल माइण्डेड) हिंदूूंसंदर्भात त्यांनी तेव्हाच अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते विचारतात, ‘‘त्यांना आवडतात ते कपडे किंवा दागिनेही तुम्ही त्यांना घालू द्यायला तयार नाही आणि तरीही तुम्ही राजकीय सत्ता ग्रहण करण्यासाठी लायक आहात? त्यांना आवडते ते अन्न त्यांना खाऊ द्यायला तुम्ही तयार नाही आहात आणि तरीही तुम्ही राजकीय सत्ता ग्रहण करण्यासाठी लायक आहात?’’ हे प्रश्न आजही वास्तवाला भिडणारेच आहेत, पण ते वेगळ्या संदर्भात.

शशी थरूर यांच्याप्रमाणेच मीही म्हणेन की, ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून वाढलो आणि मी स्वत:ला आयुष्यभर हिंदूच मानले आहे.’ दुसरे म्हणजे ‘आम्ही हिंदू म्हणून वाढलो आणि हिंदू हीच आमची आजची ओळख आहे’ असे पीईडब्ल्यू सव्‍‌र्हेमध्ये सांगणाऱ्या ८१.६ टक्के हिंदूंपैकी मीही एक आहे. ‘प्रत्येक जण माझा सगासोयरा आहे’ या कनियन पुनगुरानार यांच्या साध्यासुध्या काव्यपंक्ती आणि माझा हिंदू धर्म याबाबत मी आनंदी, समाधानी आहे. मला हल्लीच्या त्या ‘हिंदुत्वा’ची गरजच काय? 

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in  ट्विटर : @Pchidambaram_IN