पी. चिदम्बरम

व्हॉट्सअ‍ॅप असा दावा करते की तुमची संभाषणे कुणीही पाहू शकत नाही; मग या लेखी संवादाला पाय कुठून फुटले? बरे हा- आता जाहीर झालेला- संवादसुद्धा, आपली हवाईदले करणार असलेल्या कृतीबद्दलची गोपनीय माहिती सरकारबा व्यक्तीला कळतेच कशी या प्रश्नाकडे नेणारा आहे..

दूरचित्रवाणी वाहिनीचे नाव महत्त्वाचे नाही. पत्रकार कोण हा मुद्दा नाही. या दूरचित्रवाणी वाहिनीवर इतर काही प्रकरणांत दाखल असलेले आरोप हाही आजच्या स्तंभाचा विषय नाही. तर निर्णय प्रक्रिया, देशाच्या सुरक्षेशी संबंधित उच्च पातळीवर सरकार घेत असलेले निर्णय व त्यांची गोपनीयता हा मुद्दा आहे.

या स्तंभाचा उद्देश हा कुणाची प्रतिमा मलिन करण्याचा नाही. सरकारचे संरक्षणाशी संबंधित संवेदनशील व गोपनीय निर्णय एखाद्या सरकारबाह्य़ व्यक्तीशी कसे चर्चिले जाऊ शकतात, या निर्णय प्रक्रियेत कोण सहभागी होऊ शकते हा पहिला प्रश्न आहे. पुरवणी प्रश्न असा की, यातील काही निर्णय ‘कार्यालयीन गोपनीयता कायद्या’त मोडतात का?

झकरबर्गसाठी वाईट बातमी

एकूण हे सगळे प्रकरण फडताळातून बाहेर कसे आले हे एक गूढ आहे. या प्रकरणात मी जे बोलतो आहे ते काही व्हॉट्सअ‍ॅप गप्पांबाबत. व्हॉट्सअ‍ॅपचे मालक असा दावा करतात की, त्यांच्या या उपयोजनावरील संदेश हे सांकेतिक पद्धतीने गोपनीय असतात. ते एकीकडून दुसऱ्या व्यक्तीकडेच जातात- म्हणजे त्या गप्पा किंवा संभाषणे अन्य कुणापर्यंतही पोहोचत नाहीत. असाही दावा केला जातो की, कंपनीकडेही त्या संभाषणाची नोंद नसते- म्हणजेच तेसुद्धा ही संभाषणे किंवा माहिती कुणाशी आदानप्रदान करू शकत नाहीत. पण मला हे समजत नाही की, जर हे खरे असेल तर व्हॉट्सअ‍ॅपच्या गोपनीयतेबाबत शंका घेण्यास पुरेशी जागा कशी काय उरते. किंवा असा तरी भाग असावा की, दोन व्यक्तींमधील ही संभाषणे हॅक करण्यात आली असावीत. कुणी तरी त्या यंत्रणेत बेकायदा घुसून माहिती-चोरी केली असावी. या प्रश्नाचे योग्य उत्तर मला माहिती नाही. पण अशी संभाषणे हॅक केली जाऊ शकतात अशी शंका आता वाढत चालली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपचे मालक मार्क झकरबर्ग यांच्यासाठी खरे तर ही वाईट बातमी आहे. ते जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

बरे ते काहीही असो; दोन व्यक्तींमधील संभाषणे सार्वजनिक झाली हा तर मुद्दा खरा आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यातील काही माहिती मुद्रित व समाजमाध्यमांतून आली आहे. त्या माहितीचा इन्कार संबंधित व्यक्तींनी केलेला नाही. जर त्यांनी इन्कार केला तर तो प्रश्न संपल्यात जमा आहे. पण हा स्तंभ लिहीत असेपर्यंत तरी त्यांनी असे संभाषण केले नव्हते असे त्यांनी म्हटले नाही. जर त्यांना हे मान्य असेल तर मग आणखी काही प्रश्न निर्माण होतात.

सरकारी गोपनीयता कायदा

भारतीय सैन्याच्या वाहन ताफ्यावर पुलवामात १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये हल्ला झाला होता. त्या वेळी एक पत्रकार व इतर व्यक्ती यांच्यात २३ फेब्रुवारी रोजी जो संवाद समाजमाध्यमावर झाला होता तो असा

‘‘२३-०२-२०१९

रात्री १०.३१- पत्रकार- बहुधा दुसऱ्या आघाडीवर काही तरी मोठे घडणार आहे.

१०.३३ दुसरा- खरोखर काही घडणार आहे का, तसे असेल तर तुम्हाला मी सुयश चिंतितो.

१०.३४  दुसरा- तुमच्या यशासाठी.

१०.३६- पत्रकार- नाही सर, पाकिस्तान. काही तरी या वेळी मोठे घडणार आहे. या काळात एका मोठय़ा व्यक्तीसाठी ते महत्त्वाचेच आहे. ते पुन्हा हल्ला करून किंवा मोठे काही तरी करून निवडणुका जिंकतील.

१०.४०- पत्रकार- नेहमीपेक्षा वेगळा हल्ला. त्याच वेळी काश्मीरमध्ये महत्त्वाचे काही घडेल. पाकिस्तान सरकारबाबत लोकांच्या मनात संतप्त भावना आहेत, त्यामुळे सरकार हल्ला करण्याच्या तयारीत आहे. असे खरे शब्द आहेत जे माझ्या कानावर आले.’’

पुलवामातील हल्ला हे दहशतवादी कृत्य होते. त्यात ४० सैनिकांना वीरमरण आले. संरक्षण दले संतप्त झाली. पाकिस्ताननेच या हल्ल्यासाठी त्यांच्या लोकांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे प्रतिहल्ला अपेक्षित होता. आता वर दिलेले जे संभाषण आहे ते २३ फेब्रुवारीचे आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानातील बालाकोट येथे घुसून दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हल्ले केले.

मला याची चिंता वाटत नाही की, संभाषणातील शब्द नेमके कुणी ऐकले असावेत. ज्याने कुणी ऐकले असतील तो नशीबवान असावा, कारण तो योग्य वेळी योग्य ठिकाणी होता! पण ते शब्द कोण बोलले, हे माझ्यासाठी चिंतेचे कारण आहे. सरकारी नसलेल्या व्यक्तीशी हे सगळे कोण बोलले हा खरा प्रश्न आहे. सुरक्षित माहिती मुद्दाम फोडण्याच्या उद्देशाने ते शब्द किंवा वाक्ये उच्चारली गेली होती का? सुरक्षा दले पुलवामाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे तर अपेक्षित होते. पण कुणीही त्या निर्णय प्रक्रियेतील प्रत्यक्ष वापरण्यात आलेले शब्द जाहीरपणे प्रसारित होतील याची कल्पना केली नव्हती. कुणी तरी ही संवेदनशील व सुरक्षित माहिती बाहेर फोडली, ती व्यक्ती कोण होती..?

काही निर्णय गुप्त असतात. तर काही गोपनीय असतात. काही अतिगोपनीय असतात. काही केवळ दृश्य असतात. पाकिस्तानात बालाकोट येथे करण्यात आलेल्या हल्ल्याचा निर्णय हा फक्त तो प्रत्यक्षात येईल त्याच वेळी सगळ्यांना कळेल म्हणजे ‘फॉर युवर आइज ओन्ली’ असा होता. या निर्णय प्रक्रियेत पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख, वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख हे सारे सहभागी असणार हे उघड आहे. हल्ल्याची माहिती वैमानिकांना केवळ काही तास अगोदर देण्यात आली असणार, यावर दुमत नाही. त्यांना प्रत्यक्ष मोहिमेवर निघताना ऐन वेळी माहिती देण्यात येते. तोपर्यंत त्यांचा निर्णय प्रक्रियेत कुठेही संबंध नसतो. अगदी शेवटी, वैमानिकांना काय करायचे ते सांगण्यात येते. त्यामुळेच प्रत्यक्षात नेमके शब्द कुणी वापरले याचा अंदाज आता तुम्हीच करा. यात ‘संरक्षित माहिती’ची देवाणघेवाण करण्यात आली.

माझी काळजी अशी की, ही संरक्षित माहिती तिसऱ्याच कुणी तरी (बहुधा अज्ञात स्रोताने) ऐकली असेल तर? कदाचित तो गुप्तहेर किवा पाकिस्तानचा खबऱ्या असू शकतो. दुसरी चिंतेची बाब अशी की, संभाषणातील दुसऱ्या व्यक्तीचे काय, त्याच्या सुरक्षा वर्गीक रणाचे काय. त्याने इतरांशी ही माहिती देवाणघेवाणीत दिली नसेल कशावरून.

मृत्यूपूर्व देखरेख..

यात समांतर हानी झाली ती दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रतिष्ठेची (त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना).

‘‘१०-०४-२०१९

दुपारी १२.४५- दुसरा- जेटली हे त्यांचे सर्वात मोठे अपयश आहे.

पत्रकार- त्यावर माझी सहमती आहे. ते आजारी आहेत. पण त्यांच्यावर देखरेख आहे.

१९-०८-२०१९

सकाळी १०.०८- जेटलींचे सगळेच लांबत चालले आहे. पंतप्रधान कार्यालयाला काय करावे ते कळत नाही. पंतप्रधान बुधवारी फ्रान्सला जाणार आहेत.

१०.०९- दुसरा- म्हणजे ते अजून गेलेले नाहीत.

१०.५५- पत्रकार- त्यांना कसेबसे जिवंत ठेवले आहे. सायंकाळपर्यंत काहीही घडू शकते. दिल्लीत माझी एक बैठक होती ती त्यामुळेच लांबणीवर टाकण्यात आली आहे.’’

मला वाईट वाटते, ते देशाच्या लष्करी दलांचे. त्यांच्या गोपनीय गोष्टींचे. आणि अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांचे.. ते अरुण जेटली, ज्यांनी भाजपची व जनसंघाची सेवा केली..१९७५ पासून ते एकनिष्ठ होते.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN