‘‘..शास्त्र नेहमी नम्र असते. इतक्या इतक्या गोष्टी पक्क्या आहेत आणि इतक्या अजून ठरलेल्या नाहीत, असे सांगते. प्रयोगाला मोकळीक आहे..’’

 – विनोबा

(गीताई चिंतनिका विवरणासह- अध्याय १६)

विनोबांनी साम्यवादावर टीका केली आणि त्याची स्तुतीही केली. यापेक्षाही त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सर्वोदयाची मर्यादा आणि ही विचारधारा अपयशी झाली तर तिला पर्याय काय? विनोबांच्या व्यक्तित्वातील हा अत्यंत विलोभनीय पैलू आहे. आपली भूमिका मांडताना ते सर्व शक्यता गृहीत धरतात.

कोणतीही गोष्ट मी म्हणतो म्हणून करू नका. माझा विचार पटला तरच करा. मीही हे तत्त्व मानतो. कुणीही यावे, मला विचार पटवून द्यावा आणि आपलेसे करावे. विनोबांचे विचारविश्व इतके साधे आहे. त्यांची गीतेवर अपार निष्ठा होती. गीता हा राष्ट्रीय ग्रंथ असावा अशी त्यांची इच्छा होती. पण फक्त इच्छाच होती. साधा आग्रहसुद्धा नाही. हाच निकष त्यांनी सर्वोदयालाही लावला.

यासाठी रशियाचे तत्कालीन अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव यांच्या एका विधानाचा संदर्भ त्यांनी घेतला. साम्यवादाचे कोणत्याही विचारसरणीसोबत ‘सहजीवन’ असू शकत नाही. वेगवेगळय़ा देशांमध्ये सहजीवन असू शकते. परंतु साम्यवादाची जी कल्पना आहे ती दुसऱ्या कोणत्याही कल्पनेला जगू देणार नाही. साम्यवाद जगेल आणि दुसरे विचारही जगतील, असे होणार नाही. आदर्शाचे सहजीवन अशक्य आहे, असे ख्रुश्चेव्ह यांचे मत होते.

विनोबांच्या मते, ख्रुश्चेव्ह यांनी ही महत्त्वाची गोष्ट सांगितली. साम्यवादाला अन्य विचारसरणी सहन होत नाही कारण केवळ आपल्या तत्त्वज्ञानामुळे जगाचा उद्धार होणार याची त्यांना खात्री आहे. अशा स्थितीत ही विचारसरणी अन्य वादांना खपवून घेणार नाही हे उघडच आहे. ही असहिष्णुता झाली, अशी टिप्पणी करत विनोबा दुसऱ्या पातळीवरची असहिष्णुता सांगतात आणि सर्वोदयही असाच असहिष्णु आहे हा निष्कर्ष काढतात. सर्वोदयाची अशी धारणा आहे की हाच विचार जगाला तारक आहे. साम्यवाद व सर्वोदय या विचारधारा दोन टोकांवर आहेत. अर्थात केवळ दावा केला म्हणजे काहीच साधत नाही. तो सिद्ध करावा लागतो. सर्वोदयाने आपला दावा सिद्ध केला की साम्यवादाचा आपोआपच पराभव झाला, अशी विनोबांची सकारात्मक भूमिका दिसते.

सर्वोदयाला, कांचनमुक्त आणि स्पर्धारहित समाजरचना उभी करता आली तरच तो साम्यवादाला पराभूत करू शकेल. एरवी नाही असे विनोबांचे स्पष्ट प्रतिपादन आहे. सर्वोदयामध्ये सर्व विचारधारा सामावता येतील आणि त्याचे पोट तेवढे मोठे आहे, असे विनोबा सांगतात. तथापि सर्वोदयाला या कामी अपयश आले तर? अशा परिस्थितीत विनोबा साम्यवादावर जबाबदारी टाकतात. साम्यवाद आणि सर्वोदय यातील साम्य दाखवताना विनोबांनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे. ‘साम्यवादाकडे आईच्या हृदयाची कळकळ आहे, फक्त गुरूची कूर्म-दृष्टी नाही. ती सर्वोदयाकडे आहे.’ पर्यायच द्यायचा झाला तर विनोबा साम्यवाद निवडतात, पण ‘जैसे थे’ स्थिती त्यांना अमान्य आहे.

आपली राजकीय विचारसरणी कितीही प्रिय असली तरी तिच्या मर्यादा शोधाव्यात. तिला पर्यायही द्यावा आणि शेवटी प्रतिस्पर्धी विचारांना प्रेमपूर्वक आत्मसात करावे ही परिपक्व राजकारणाची आणि समाजकारणाची खूण आहे.

अतुल सुलाखे