अतुल सुलाखे

रचनाग्रही क्रांतिनिष्ठा आणि सत्याग्रही तत्त्वनिष्ठा या संकल्पना केवळ सन्मार्ग आणि साम्यवाद इतपतच सीमित नाहीत. विनोबांनी त्यांचे विवेचन दुहेरी अंगाने केले आहे. सर्वोदय आणि साम्यवाद यांच्यातील परस्परविरोध दाखवणे हा त्या विवेचनाचा एक भाग आहे.

समाजकारण आणि राजकारण असे सतत ध्रुवांवर राहून करता येत नाही. अशा स्थितीत अशा दोन्ही टोकांच्या निष्ठा नसणारे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडेही पाहायला हवे; विनोबांनी या दृष्टीनेही विवेचन केले आहे.

नवसमाजरचनेला त्यांचा विरोध नाही. हा विकास शाश्वत मूल्ये गमावून केला जाऊ नये ही त्यांची दृष्टी आहे. काहीही करून समाजरचनेचे कार्य केले तर कबीर महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘लाहे कारण मूल गवांयो’ अशी आपली स्थिती होईल. याशिवाय एकदाच आणि कायमची समाजरचनाही करता येत नाही. ती शाश्वत गोष्ट नाही. समाजरचनेची देवता बनवणे चुकीचे आहे.

समाजरचना चांगली असेल तर सद्गुणांची वाढ होते हे खरे आहे. परंतु सद्गुणांच्या योग्य वाढीवर आधारलेला समाज अधिक प्रगल्भ असतो. ‘सद्गुणाधिष्ठित नवसमाज’ ही अत्यंत मूलभूत गोष्ट आहे.

अत्यंत बिकट स्थिती निर्माण झाली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर विनोबांनी दिले आहे.

हिंसेला त्यांची संमती नाहीच. हा देश आता लोकशाही पद्धतीने चालणार. तिथे हिंसा चालणारही नाही आणि परवडणारही नाही. क्रांती होईल तर ती मतपेटीतूनच होईल. त्यासाठी लोकमत तयार करावे लागेल. वाट पाहावी लागेल. एवढे होऊनही सत्ताधारी दमन करत राहिले तरी ही रीत बदलता येणार नाही.

सत्याग्रही नैतिकता हा संतांचा मार्ग आहे. गौतम बुद्ध ते गांधीजी अशी ही समृद्ध परंपरा आहे. दुसरी- म्हणजे रचनाधिष्ठित विकासाची- भूमिकाही आपल्या परंपरेला नवी नाही. साधारणपणे सर्व स्मृतिकारांची हीच भूमिका आहे. स्मृतिकार ते साम्यवादी या भूमिकेवर दिसतात. एवढेच नव्हे तर काँग्रेस, त्यांच्यातील गट, भारतीय बाण्याचे समाजवादी, इतकेच काय पण काही गांधीवादीदेखील याच गटात येतात.

अशी तडजोडवादी भूमिका घेणारे शेवटी हिंसेवर उतरतात आणि अहिंहसेच्या मुळावर घाव घालतात. भांडवलवाद, साम्राज्यवाद, जाति-वंशवाद, हे सर्व अहिंसेसाठी बाधक आहेत आणि म्हणून त्या मार्गाला संमती देता येत नाही. गुणविकास आणि समाजरचना या दोन मार्गाचे विनोबांचे आकलन असे आहे.

त्यांची राजकीय आणि सामाजिक भूमिका ही प्रथम भाबडी आणि नंतर पक्षपाती ठरवली गेली. विनोबांचे हे चिंतन अमान्य झाले तर समजू शकते; पण ते अशास्त्रीय नाही आणि भाबडे तर नाहीच नाही.

एकीकडे अगदी सत्याग्रहाच्या मार्गावर ते मूलगामी प्रयोग करत होते तर या युगात कुणालाच राजकारण टाळता येणार नाही याचे भान राखून कामही करत होते. नैतिकता आणि रचनात्मकता यांच्यातील तोल सांभाळत होते. गांधीजींच्या वारसदाराला साजेल अशीच त्यांची कृती होती.

jayjagat24 @gmail.com