scorecardresearch

साम्ययोग : अर्थसाम्य

भारताच्या विकासात नेहरूंचे योगदान चटकन स्मरते. परंतु विनोबांचा वाटा नीटसा लक्षात येत नाही.

samyayoga darshan vinoba bhave
(प्रातिनिधीक छायाचित्र)

तोषला ज्ञान-विज्ञानें, स्थिर जिंकूनि इंद्रियें

तो योगी सम ज़ो देखे, सोनें पाषाण मृत्तिका

      – गीताई अ. ६ श्लो. ८

भारतीय अर्थकारणाची दिशा साफ बदलली त्याला आता अडीच दशके होत आली. विनोबा ज्या काळात आपला अर्थविचार मांडत होते तो स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा होता. पारतंत्र्य आणि मिश्र अर्थव्यवस्था असे दोन्ही टप्पे त्यांनी पुरेसे अनुभवले. त्यांचा अर्थविचार नेमका कसा होता यावर फारसे बोलले जात नाही.

भारताच्या विकासात नेहरूंचे योगदान चटकन स्मरते. परंतु विनोबांचा वाटा नीटसा लक्षात येत नाही. स्वातंत्र्यानंतर किमान दहा वर्षे ही स्थिती होती. दिल्लीत नेहरू होते आणि गावात विनोबा. विनोबांनी गावांची घडी बसवली त्याचा दिल्लीला मोठाच लाभ झाला. केंद्रीय सत्ता स्थिरावली. देशांतर्गत हिंसेला रोखून धरण्यात विनोबांची कामगिरी फार मोठी होती.

खरे तर गांधीजींच्या हत्येनंतर सर्व प्रमुख नेते मार्गदर्शनासाठी म्हणून विनोबांना शरण गेले. तेव्हा आणखी एक गांधी बनणे त्यांना सहज शक्य होते. ती शक्यता नाकारून ते खेडय़ाकडे वळले. मुखात गीताई आणि कृतीत संसाधनांची समान विभागणी असा दुपेडी कार्यक्रम घेऊन ते चौदा वर्षे हिंडत होते. विनोबांच्या भूमिकेवर कितीही टीका केली तरी त्यांची ही कामगिरी नाकारता येणार नाही. साम्यवाद्यांनीही त्यांची सर्वहारा वर्गाशी असणारी बांधिलकी नाकारली नाही. असे असले तरी विनोबा केंद्र सत्तेचे प्रचारक नव्हते. त्यांचा स्वतंत्र अर्थविचार होता आणि प्रसंगी केंद्रालाही अडचणीचा ठरेल असा होता.

विनोबांचा आणि पर्यायाने साम्ययोगाचा म्हणून काही अर्थविचार होता का असा प्रश्न इथे साहजिकच निर्माण होतो. विनोबा केवळ आश्रमात राहून गीताध्ययन करत बसले तर मग हा मुद्दा आला नसता. तथापि रचनात्मक कार्याची कास त्यांनी कधीच सोडली नाही.

स्वामी स्वरूपानंदांनी त्यांची ही ओळख अचूक हेरली होती. त्यांनी विनोबांना लिहिलेले एक पद्यमय पत्र उपलब्ध आहे. त्यात दोन महत्त्वाचे उल्लेख आढळतात. पहिला उल्लेख त्या दोघांनी एकत्र साधना केली त्याचा आहे आणि दुसरा, साधना मार्ग सोडून तुम्ही कर्मयोग स्वीकारल्याचा आहे. उर्वरित पत्रात विनोबांचा आणि त्यांचा स्नेह दिसतो.

उदाहरण मुद्दामच आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीचे दिले. विनोबांची आध्यात्मिक योग्यता त्यामुळे ध्यानात येते आणि स्वत:ची साधना त्यांनी कुठे समर्पित केली हेदेखील समजते. खरे तर विनोबांच्या आध्यात्मिक साधनेचा हा खरा विकास होता. गीतेच्या भाषेत सांगायचे तर हे ज्ञानोत्तर कर्म होते.

साम्ययोगाच्या अर्थ विचारांना असणारी ही पृष्ठभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. ती पूर्णपणे अध्यात्मावर आधारित आहे. वर गीताईमधील जो श्लोक आला आहे ते खऱ्या अर्थ शास्त्राचे सूत्र आहे असे विनोबा म्हणत. गीता प्रवचनांमधे हे साम्याधिष्ठित अर्थचिंतन सतत दिसते. सामान्य जनांचे श्रद्धाविश्व आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती त्यातून स्पष्ट होते. विनोबा या वर्गाचे आरंभापासून पक्षपाती म्हणावेत असे होते.

हा पूर्वेतिहास माहीत नसेल तर साम्ययोगाचा अर्थविचार आकळणार नाही.

– अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-06-2022 at 02:15 IST