– अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

‘मला संतांपेक्षा जास्त समजते. अधिक दिसते. कारण मी त्यांच्या खांद्यावर बसलो आहे. एरवी असे औद्धत्य दाखवण्याची माझी हिंमत झाली नसती. संतांची परंपरा आपण पुढे नेली नाही आणि उद्या त्यांनी विचारले लेको, तुम्ही नुसत्याच झोपा काढल्यात तर काय उत्तर आहे?’ अशा आशयाचे विनोबांचे उद्गार आहेत.

या धारणेतून गीतेच्या भाष्यकारांचा समन्वय हा विनोबांचा आणखी एक कार्यविशेष. गीता हा भांडणाचा आखाडा नसून समन्वयाचे स्थान आहे, हे त्यांचे आकलन गीतेच्या भाष्यकारांच्या समन्वयात दिसते. या भाष्यकारांचा म्हणून एक गीतार्थ आहे आणि त्या बाबतीत ते आग्रही असल्याचे दिसते.

आद्य शंकराचार्यानी भाष्यकारांचा मागोवा घेतला, तथापि हे भाष्यकार कोण याची पुरेशी माहिती त्यांच्या गीता भाष्यातून मिळत नाही. त्यामुळे आचार्याचा अद्वैत सिद्धांत बराचसा स्वयंभू मानावा लागतो. त्यांनी वेद प्रामाण्य मानले, तथापि वेदातील कर्मकांडाला म्हणजे यज्ञ-यागादींना गौणत्व दिले. कर्मसंन्यास घेतल्याशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही अशी आचार्याची भूमिका आहे. आचार्याच्या या ‘कर्मसंन्यासा’ बाबत विनोबांनी एक वेगळी भूमिका मांडली आहे. जो माणूस १६ वर्षे पायपीट करतो आणि अगदी पंचायतन पूजन सांगतो त्याला कर्मयोगी नाही तर आणखी काय म्हणायचे?

शंकराचार्याच्या नंतर गीतेचे महत्त्वाचे भाष्यकार म्हणजे आचार्य रामानुज. त्यांचे मत ‘विशिष्टाद्वैत’ म्हणून ओळखले जाते. रामानुजही मोक्षप्राप्ती हेच ध्येय मानतात आणि ज्ञान आणि कर्म यांचा मेळ घालतात. आचार्याच्या तत्त्वज्ञानाला भक्ती आणि कृतिशील समता या दोहोंचा आधार आढळतो.

स्वमताचा आग्रह नाही आणि समन्वयाची भूमिका घेणारे तिसरे महत्त्वाचे भाष्यकार म्हणजे ज्ञानदेव. माउलींनी आपला गीतार्थ सांगताना ‘भाष्यकारांते वाट पुसतु’ असे म्हटले असले तरी त्यांची भूमिका ‘धर्म कीर्तना’ होती. ज्ञानेश्वरी खरे तर स्वतंत्र ग्रंथ आहे. ज्ञान, भक्ती, योग, हठयोग आदींचा तिथे समुच्चय आहे. शिवाय साधकाने ‘स्वकर्मकुसुमांची पूजा’ केली तर त्याने ईश्वराला परम संतोष होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्ञानदेव म्हणजे मराठी जनतेसाठी प्रेषित, ज्ञानेश्वरी म्हणजे धर्मग्रंथ आणि ज्ञानदेवांचे जीवित् कार्य म्हणजे धर्मस्थापना या विनोबांच्या भूमिकेवर टिप्पणीची गरज नाही. ज्ञानदेवांची महती नेमक्या शब्दात सांगण्यासाठी विनोबांनी माउलींच्या आरतीतील दोन चरण उद्धृत केले. ‘प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मचि केले!’

आधुनिक भाष्यकारांमधे लोकमान्यांचा कर्मयोग, गांधीजींचा अनासक्तियोग आणि अरिवदांनी दाखवलेली मानवी उत्क्रांतीची भावी दिशा, ही मते महत्त्वाची आहेत. साम्ययोग, हे आणि इतरही गीतार्थ आदरपूर्वक स्वीकारतो. गीतेवर लिहिताना आणि बोलताना विनोबांनी आचार्याच्या मताला जराही धक्का लावला नाही. ज्ञानदेव तर त्यांचे सर्वस्व होते. लोकमान्यांकडून त्यांनी गीतेच्या अध्ययनाची प्रेरणा घेतली आणि गांधीजींच्या रूपात सगुण गीतेचे दर्शन घेतले.

परंपरेचा इतका प्रभाव असेल तर मुद्दा असा आहे की, साम्ययोग म्हणजे प्राचीन परंपरेचे केवळ संकलन आहे का आणि विनोबांनी परंपरेत भर घातली म्हणजे नेमके काय केले?