अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

जैसी दीपकळिका धाकुटी ।

परी बहु तेजातें प्रगटी ।

तरी सद्बुद्धि हे थेकुटी ।

म्हणों नये ॥         – ज्ञानेश्वरी २.२३८

अर्थ – दिव्याची ज्योती लहान असली तरी खूप प्रकाश देते, त्याप्रमाणेच ही सद्बुद्धी आत्मप्रकाश देणारी असल्यामुळे ‘अल्प’ म्हणता येत नाही.

****

‘बुद्धी कुणाच्या ठिकाणीं कमी असो, कुणाच्या ठिकाणीं अधिक असो, त्याचें महत्त्व नाही. महत्त्व आहे स्वच्छ बुद्धीचें. अग्नीची एक लहानशी ठिणगी कापसाच्या ढिगाला जाळू शकते. उलटपक्षी भला मोठा कोळसा असला तरी तो दबून जातो.

बुद्धीच्या कमीजास्तपणाचा प्रश्न नाही. निखळ बुद्धीची एक लहानशी ठिणगी, एक लहानशी ज्योत असली तरी पुरें. बुद्धीच्या शक्तीची हीच खुबी आहे. शारीरिक शक्तीचें तसें नाही.

एखाद्या अल्पबुद्धी माणसाला राष्ट्राचा कारभार चालवण्याचें नेतृत्व साधणें संभवनीय होणार नाही. पण अगदी अल्पबुद्धीच्या आणि अशिक्षित माणसालाही या जन्मात स्थितप्रज्ञ होण्याची शक्यता नि:संशय आहे. त्याला भाराभर बुद्धीची गरज नाही. प्रज्ञेची एक ठिणगी पुरे.  – विनोबा.

प्रत्येक व्यक्ती साधना मार्गाने जाऊन याच जन्मी स्थितप्रज्ञावस्था प्राप्त करू शकते. त्यासाठी केवळ सद्बुद्धी हवी. वरील अवतरणांचा हा सारांश आहे. असा साधना मार्ग म्हणजे वनात जाणे, लोकांपासून अलग राहणे नव्हे. अर्थात एखाद्या व्यक्तीसाठी अशा साधनेचेही महत्त्व असू शकते, पण तो ‘आम-मार्ग’ नव्हे. त्यामुळेच प्रत्येक कालखंडात साधुचरित व्यक्तींनी आणि त्यांच्या मांदियाळीने आत्मज्ञानाचा मार्ग प्रशस्त आणि सुगम केला.

संतांनी नामस्मरण सांगताना योग, याग, विधि, हा सिद्धीचा मार्ग नाही असेही बजावले. साधूंची संगत धरा, त्यांच्याकडून ज्ञान मिळवा आणि परम तत्त्वाला जाणा, असे मांडले. अवनत समाजाला लौकिक आणि आध्यात्मिक शिस्त लावली. यानंतर रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांनी मानवसेवा हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग सांगितला. भारतासाठी ही अनोखी गोष्ट होती. स्वामीजींना ही प्रेरणा दिली ती स्थितप्रज्ञ ठाकुरांनी. पुढे गांधीजी आणि विनोबांनी साधनेची पूर्वअट म्हणून शरीरश्रम अपरिहार्य मानले. योगाची जशी अष्टांगे आहेत तशी सर्वोदयाची आहेत. प्रार्थना, व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, आश्रमात शरीरश्रमाचे विशेष प्रशिक्षण घेऊन त्यांचा प्रसार करणे, सूत्रयज्ञ, शेतीच्या माध्यमातून भूमातेची सेवा ही यादी कितीही वाढवता येते आणि शेवटी एकादश व्रतांपाशी थांबते. त्यापूर्वी धर्माचरण, साधना या गोष्टी इतक्या थेटपणे व्यापक समाजकारणात आल्या नव्हत्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे स्वातंत्र्य संग्रामात हे ‘सद्बुद्धीधारक’ अग्रेसर होते. हे थोडे तपशिलात लिहिले कारण स्थितप्रज्ञ लक्षणांशी या परंपरेचे घट्ट नाते आहे. ही लक्षणे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस येतात. तत्पूर्वी सांख्य आणि योग या दोन मार्गाचे महत्त्व, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. सांख्य म्हणजे ज्ञान. ते व्यवहारात आणण्यासाठीची कला म्हणजे योग. आणि या दोहोंचा सगुण रूपातील आविष्कार म्हणजे स्थितप्रज्ञ. भारताच्या इतिहासात या योगबुद्धीचे मोठे योगदान आहे. अखंड साम्य, भूतमात्रांसाठी दयाभाव आणि अविचल बुद्धी. गेली आठ शतके या तत्त्वत्रयीने समाजधारणा केली.