अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com

इथें चि जिंकिला जन्म समत्वीं मन रोवुनी

निर्दोष सम जें ब्रह्म झाले तेथें चि ते स्थिर

गीताई, ५-१९

साम्ययोगाशी परिचय करून घेण्याच्या निमित्ताने या श्लोकाचा संदर्भ येऊन गेला असेल. परंतु इथे त्याकडे वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहायचे आहे.

एकाच म्हणजे पाचव्या अध्यायातील हे लागोपाठचे श्लोक आहेत परंतु मांडणीसाठी २० वा श्लोक आधी निवडला. कारण नैतिक आदर्श आणि शिकवण ही आध्यात्मिक वाटचालीसाठी उचित आहे. व्यवहारात जगताना तडजोड करावी लागते. हा सहज दिसणारा समज आहे. अगदी विनोबाही त्याला अपवाद नव्हते.

गांधीजींच्या संपर्कात येण्यापूर्वी विनोबाही या मताविषयी सहानुभूती राखून होते. गांधीजींमुळे त्यांच्या लक्षात आले की आपण ज्याला आदर्श म्हणतो, ते व्यवहारांच्या कसोटीवर सिद्ध करायचे असतात.

गांधीजींचे आचरण आणि गीतेची शिकवण या दोहोंचा मेळ विनोबांनी घातला. अध्यात्मातील आणि लौकिकातील समत्व या गोष्टी वेगळय़ा नाहीत, हे त्यांना स्पष्टपणे जाणवले. जर समत्वाची ही दोन्ही रूपे समान असतील तर सुरुवात कुठून करायची? वरील श्लोकाचे विवरण करताना विनोबांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

आपण समत्वाचा आदर्श समोर ठेवून वागायला लागलो की समत्वाचे क्षेत्र उत्तरोत्तर अधिक व्यापक आणि खोल होत जाते. अंतिमत: ब्रह्मसाम्याचा अनुभव याच देही येतो. असे झाले म्हणजे जन्म जिंकला असे म्हणता येते.

साम्याच्या अंतिम अवस्थेसाठी विनोबांनी वापरलेला हा शब्द अत्यंत समर्पक आणि सखोल आहे. या ‘ब्रह्मसाम्या’ची आणि लौकिक समतेची फारकत होत नाही. तसे घडले तर ज्या ध्येयासाठी आटापिटा करायचा ते ध्येयच दुरावते.

समत्वात मन स्थिर झाले की त्या व्यक्तीने जन्म जिंकला म्हणजे आत्मज्ञान प्राप्त केले. मोक्ष आणि मुक्ती यांच्या प्राप्तीसाठी मरण्याची गरज नाही. गीतेचीही शिकवण अशीच आहे. समत्वाचा विकास परमोच्च बिंदूपर्यंत साधला की व्यक्ती जीवनमुक्त होते.

मरणोत्तर मोक्ष आणि मुक्तीपेक्षा ही कल्पना वेगळी आहे. समत्वाचा विकास होईल तशी ब्रह्मप्राप्तीची वेळ अधिक निकट येईल.

समत्वाचा हा अनुभव प्रथम कुटुंबाच्या पातळीवर घेतला पाहिजे. तो समत्वाचा स्वाभाविक आरंभ आहे. माणूस परिवारातील लहान-मोठय़ा स्त्री-पुरुषांना प्रेमाने आणि आदराने पाहू शकतो. त्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. तसे ते पडूही नयेत. ही लहान पातळीवरची समता.

यापुढचा टप्पा म्हणजे सर्व जाती, पंथ, धर्म आणि देश यांच्यामध्ये समत्व पाहणे. सर्वोच्च अवस्था म्हणजे जड आणि चेतन, चर आणि अचर यांच्यात समत्व पाहायचे. ही गोष्ट स्वाभाविक असली तरी सहजसोपी नाही. म्हणजे आपल्याच करणीने आपण एका दु:स्थितीला पोचलो आहोत. एवढेच नव्हे तर समत्वाच्या मार्गावरील लोकांना आपण वेडे ठरवून मोकळे होतो. विनोबांनी या अवनत अवस्थेचेही शोधन केले आहे. त्यांच्या गीतार्थात या विश्लेषणाला कळीचे स्थान आहे.