अतुल सुलाखे

विनोबांच्या वाई वास्तव्यातील ही गोष्ट आहे. न. चिं. केळकर यांच्या एका व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विनोबा होते. स्वराज्यानंतर देशाची काय स्थिती असेल हा व्याख्यानाचा गाभा होता. त्यांनी रंगवलेले स्वराज्याचे चित्र अत्यंत मोहक होते. प्रत्येक माणूस चैनीत जगेल, असा श्रोत्यांचा ग्रह व्हावा इतके त्यांचे ‘स्वराज्य’ सुखजीवी होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात विनोबांनी केळकरांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. ‘राष्ट्र उभे राहते ते त्यागावर. भोगावर नाही. हा जगाचा इतिहास आहे. गिबनने रोमच्या पतनाचे हेच कारण सांगितले आहे. रोम चढले त्यागाने आणि पडले भोगाने,’ असे विनोबा म्हणाले.

भारताचे अर्थकारण कसे असावे याची ही दिशा आहे. हा देश, खरे तर अखिल मानवी समाज भोगप्रधान होणे, हे सर्वार्थाने घातक आहे हा कांचनमुक्तीचा अर्थ आहे.

पुढच्या काळात आठ तास उत्पादक आर्थिक शरीरपरिश्रम हाच विनोबांचा आग्रह होता. ही भूमिका गांधीजींच्या सहवासाने आणखी विकसित झाली. अर्थकारणाप्रमाणेच आध्यात्मिक भूमिकेचाही विकास करणारी, असे तिचे रूप आहे.

‘कामिनी कांचनाचा त्याग’ ही साधनेची पूर्वतयारी मानणे हा आध्यात्मिक क्षेत्रातील विचार आहे. भूतदया, मानवसेवा ही मूल्ये त्यानंतर येतात. गांधीजींनी एकादश व्रतांमध्ये अस्पृश्यतेला जागा दिली नाही, तर विनोबांनी शरीर परिश्रम व्रत अशी नवीन संकल्पना मांडली. श्रमाच्या पूर्वी शरीर आणि नंतर व्रत यामुळे श्रमांना नवा अर्थ मिळाला. शरीर श्रम करताना उत्पादक श्रमांना प्रतिष्ठा द्यायची आणि हे श्रम एखाद्या व्रताप्रमाणे पूज्य मानायचे, अशी ही भूमिका आहे.

प्रत्येक व्यक्तीकडे विशिष्ट शक्ती असते. ती शक्ती त्या व्यक्तीच्या मालकीची नसून ईश्वरदत्त असते. हेच तत्त्व समूहालाही लागू आहे. ही शक्ती समाजाच्या सेवेसाठी वापरायची असते. उत्पादक शरीर परिश्रम हा त्यासाठीचा उत्तम मार्ग आहे. चरखा, शेती, ही सर्वाना उपलब्ध होणारी साधने आहेत.

एखाद्या धडधाकट व्यक्तीने पूर्ण परिश्रम घेऊन केलेले काम आणि एखाद्या अपंग व्यक्तीने केलेले काम यात कदाचित फरक राहील. अपंग व्यक्तीचे काम कमी भरले तरी त्याला जेवणाचा हक्क असेलच. आणि तशी सोय नसेल तर ती करावी लागेल.

भौतिक आणि नैतिक असे हे दोन विचार आहेत. उत्पादन पहिल्या गटात तर क्षुधा शांती दुसऱ्या गटात घालावी लागेल. ही नैतिक भूमिका झाली. हीच नैतिकता अर्थकारणामध्ये रुजावी याला प्राधान्य दिले आहे. सेवाभाव राखत उत्पादक श्रम करणे हा साम्ययोगाच्या अर्थकारणाचा गाभा आहे.

प्रत्येक व्यक्तीला मोक्षाचा अधिकार आहे आणि तत्पूर्वी सन्मानाने जगण्याचाही. त्यासाठी शरीरश्रमांना प्रतिष्ठा हा एकच उपाय आहे. आज शरीर श्रमांपेक्षा बुद्धीप्रधान कामाला मान आहे. श्रमजीवी माणूस प्रतिष्ठित नाही. आपण कोणते काम करतो हे सांगायची लाज वाटावी, अशी त्यांची स्थिती आहे. डोके चालवणारा शरीर हलवत नाही आणि श्रमिकांना काबाडकष्टांनंतर काही सुचत नाही. हाच तो राहू केतूंचा समाज. ज्या अर्थव्यवस्थेतून तो निर्माण झाला ती व्यवस्था साम्ययोगाला अमान्य आहे.

jayjagat24 @gmail.com