– अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

विनोबांनी साम्ययोगाच्या अनुषंगाने विकास करू पाहणाऱ्या तीन विचार प्रवाहांचा वेध घेतला आहे. भांडवलवाद, लोकशाही समाजवाद आणि साम्यवाद. क्षमतावाद प्रमुख मानणारी भांडवलशाही आजही प्रबळ रूपात उभी आहे.

भांडवलवादाचा विशेष सांगताना विनोबा लिहितात, काही लोकांची योग्यता मुळातच कमी असते. त्यामुळे त्यांना श्रमाचा मोबदला कमीच मिळाला पाहिजे. याच्या उलट अधिक योग्यता असणाऱ्यांना अधिक मोबदला हवा. योग्यतेप्रमाणे श्रमाचा मोबदला देऊन समाजात क्षमता उत्पन्न करण्याची त्यांची इच्छा असते. या विचारसरणीमुळे काहींचे जीवनमान उंचावते आणि उरलेले दरीत कोसळतात.

या पेचावर भांडवलशाहीकडे कोणताही उपाय नाही. याचे त्यांना वैषम्य नसते उलट ज्यांना भौतिक उपभोग मिळत नाहीत ते नालायक आहेत आणि ज्यांच्या वाटय़ाला सर्व सुखसोयी येतात ते त्यासाठी लायक आहेत, असा भांडवलशाहीचा पवित्रा आहे.

विनोबांच्या मते, जगातील सामान्य माणसांच्या दु:खाचे मूळ इथे आहे. भांडवलवादाचे समर्थकही अगदी कमी आहेत. आज ही विचारसरणी प्रचलित असली तरी ती एक दिवस नष्ट होणार, असा विनोबांचा विश्वास आहे. विनोबांचे हे आकलन कोणत्या पातळीवरचे आहे, हे सांगणे कठीण आहे. तथापि ते ज्या काळात ही भूमिका मांडत होते तो काळ लोकशाही, समाजवाद आणि साम्यवाद यांच्या चलतीचा होता हे लक्षात घ्यायला हवे.

लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मत असते. ती व्यवस्था मतांच्या आधारे चालते. परिणामी तिथे बहुसंख्याकांची चलती दिसते. अल्पसंख्य असुरक्षित राहतात. या विचारांच्या समर्थकांचे म्हणणे असे की, त्यात सर्वाच्या हिताचे रक्षण होते. तथापि त्या व्यवस्थेमुळे जे नुकसान होते त्यावर उपाय काय या प्रश्नाचे उत्तर लोकशाही समाजवादाकडे नाही. बहुसंख्याकांचे हित जोवर प्रधान असेल तोवर पूर्ण समाजवाद येणार नाही ही विनोबांची भूमिका आहे.

साम्यवादी, वर्गसंघर्षांचीच भाषा बोलतात. समाजातील उच्च वर्ग नष्ट केल्याशिवाय समता निर्माण होणार नाही. त्यांच्या ताब्यातील सत्ता मिळवायची तर त्यासाठी आवश्यक असणारी हिंसा ते धर्मरूप मानतात. परंतु याही विचारसरणीने जगात शांतता निर्माण होणार नाही हे स्पष्ट आहे.

हिंसेमुळे प्रतिहिंसा निर्माण होते इतका साधा तर्क त्यामागे आहे. काही काळ या हिंसेचे अनिष्ट परिणाम दाबता आले तरी ही प्रतिहिंसा एक दिवस उफाळून येतेच. शेवटी हिंसेमुळे माणसांची प्रतिष्ठा आणि मानवता यांना क्षीणत्व येते.

विनोबांच्या ही भूमिका आणखी विस्तारता येईल. तसे करताना मतभिन्नता आणि वेगळे निष्कर्ष या गोष्टीही समोर येतील. तथापि विनोबांना मानवमात्राचे हित अपेक्षित आहे हे मान्य करावे लागते. त्यांच्या या राजकीय आणि सामाजिक आकलनाला भूदान यज्ञाची जोड दिली की त्यांच्या ध्येयाचा मार्ग स्पष्ट होतो. हा मार्ग वरील तिन्ही विचारसरणींपेक्षा वेगळा आहे हेही जाणवते.

यापेक्षाही एक वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. लौकिक समस्यांची सोडवणूक त्याच पद्धतीने केली पाहिजे, मात्र तिला अध्यात्माची जोड असली पाहिजे. पर आणि अपर या साम्ययोगाच्या दोन शाखा परस्पर पूरक आहेत, ही गोष्टही ध्यानात येते.