अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोदय विचारांचा मागोवा घेताना गांधीजींच्या सोबत विनोबांचे नाव अपरिहार्यपणे येते. इतके की सर्वोदयी म्हणजे विनोबांच्या विचाराशी जोडलेला समूह असेच चित्र उभे राहते. याचे कारण शोधताना या दोन्ही नेत्यांची राजकीय भूमिका माहीत हवी.

आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासातील मोजक्या आणि महत्त्वाच्या पुस्तकांमधे म. गांधींच्या ‘हिंदस्वराज’चे नाव आवर्जून घ्यावे लागते. गांधीजींचा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी ‘हिंदूस्वराज’ला पर्याय नाही.

यातून विकसित झालेले सर्वोदय आणि सत्याग्रह हे तत्त्वज्ञान, गावांच्या विकासाची गांधीजींची कल्पना, त्यांच्या स्वप्नातील भारत आदी गोष्टी लक्षात घेतल्या की विनोबा त्यांचे राजकीय वारसदार ठरतात. एरवी नेहरू राजकीय आणि विनोबा आध्यात्मिक वारसदार अशी ढोबळ मांडणी होते. इथे नेहरूंचे भारताच्या उभारणीतील योगदान मान्य आहे. तथापि गांधीजींच्या तत्त्वज्ञानात वर सांगितलेली तीन अंगे नसतील तर ते तत्त्वज्ञान अपूर्ण राहते.

सर्वोदय आणि सत्याग्रह या दोन्ही विचारांचे विनोबांनी विस्तृत परिशीलन केले. त्यावर भाष्य केले आणि प्रत्यक्ष कृतीही केली. त्यामुळे विनोबांचे सर्वोदयावरील भाष्य मोलाचे मानावे लागते.

या अनुषंगाने विनोबांचे एक पुस्तक आहे. ‘सर्वोदय-विचार आणि स्वराज्य-शास्त्र’ सर्वोदय, गांधीजींची स्वराज्याची कल्पना, गांधीजींचे तत्त्वज्ञान आणि सर्वोदय, गांधीजींनी केलेले साम्यवादाचे परीक्षण आदींवर विनोबांनी केलेले विवेचन सर्वोदय विचार या भागात आहे. सर्वोदयाचे तत्त्व ते सर्वोदय समाज असा या पुस्तकाचा आवाका आहे. कृतीच्या पातळीवर भूदान ते ग्रामदान यांचा आधार आहेच.

‘स्वराज्य शास्त्रा’चे रूप प्रश्नोत्तरांचे आहे. राजकीय विचारांची व्याख्या ते अहिंसक समाजनिर्मिती असे विविध मुद्दे विनोबांनी यात हाताळले आहेत. या पुस्तकाप्रमाणेच लोकनीती, ग्रामदान, आदी पुस्तकांमधून गांधीजींचा वारसा विनोबांनी पुढे कसा चालवला हे ध्यानात येते.

विनोबा तत्त्वज्ञाच्या भूमिकेत शिरले की किती नेमकी भूमिका घेतात याची झलक ‘सर्वोदय विचार’च्या प्रास्ताविकातच दिसते. स्वराज्य मिळाले आता सुराज्य निर्माण करायचे अशी भूमिका अगदी आजही घेतली जाते. कधी सुराज्याऐवजी सर्वोदय म्हटले जाते इतकेच. तथापि या अनुषंगाने विनोबा वेगळाच दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवतात.

‘स्वराज्य मिळाले तेव्हाच सर्वोदय झाला आणि तसे झाले नसेल तर स्वराज्यही मिळाले नाही.’ स्वराज्याची विनोबांची व्याख्याही आगळी आहे. स्वराज्य म्हणजे ना स्वत:चे राज्य, ना स्वत:साठी राज्य. स्वराज्य म्हणजे स्वत:वर राज्य.

भौतिक स्वातंत्र्य गेले तर ती स्थिती दूर करायची तथापि आत्मज्ञानाच्या मार्गाने त्याही पातळीवर स्वयंशासित व्हायचे. हा विचार साम्ययोगाचा आहे. भौतिक साम्य आणि परमसाम्य या परस्परावलंबी अवस्था आहेत. गीतेच्या भाषेत सांगायचे तर कर्म आणि संन्यास. या दोन्ही अवस्था वस्तुत: एकच आहेत.

स्वातंत्र्य, सर्वोदय, साम्ययोग, स्वराज्य ग्रामदान आणि नामस्मरण हे परमसाम्याच्या संकुलातील कक्ष आहेत. त्यांच्यात कोणताही भेद नाही. jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व साम्ययोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave thoughts zws 70
First published on: 22-06-2022 at 03:02 IST