scorecardresearch

साम्ययोग : सद्बुद्धीचे लक्षण ओळखावया खूण

विनोबांच्या साहित्यात या दर्शनाची मांडणी तीन वेळा येते. पहिली खेप गीता प्रवचनांच्या अनुषंगाने आढळते.

vinoba

– अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com

ऐसी अनवच्छिन्न समता ।

भूतमात्रीं सदयता ।

आणि पालटु नाहीं चित्ता ।

कवणे वेळी ॥

      – ज्ञानेश्वरी अध्याय २.२९८

विनोबांचे साहित्य वाचताना अडखळायला झालेच तर सरळ ज्ञानोबा, तुकोबादि संतांना शरण जायचे. तिथे तोच विचार आणखी सोपा झाल्याचे आढळते. ‘स्थितप्रज्ञ दर्शन’ वाचण्यापूर्वी ज्ञानेश्वरीतील त्या अनुषंगिक ओव्या पाहिल्या तरी विनोबांनी केलेले विवेचन उकलत जाते.

विनोबांनी स्थितप्रज्ञ दर्शन मांडले त्यामागे त्यांचे ३० वर्षांचे चिंतन होते. गीता प्रवचने वाचताना दमछाक होत नाही कारण ती उत्स्फूर्त वाणी आहे. स्थितप्रज्ञ दर्शनाला मात्र हा निकष लागू होत नाही. कारण हे दर्शन, शास्त्र ग्रंथाच्या धाटणीचे आहे.

दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस आलेल्या १८ श्लोकांमध्ये संपूर्ण जीवन दर्शनाचा अनुभव घ्यायचा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोचवायचा तर तो एका मर्यादेपर्यंतच सोपा करता येणार. याची विनोबांनाही जाणीव होती म्हणूनच एका अनुभवाने हे दर्शन चित्तावर ठसणार नाही; त्यामुळे त्याचे सतत परिशीलन करावे लागेल, असे त्यांनी म्हटले. तसेच स्थितप्रज्ञ दर्शनाचा वाचक गीताई आणि गीता प्रवचनांशी परिचित असेल असेही गृहीत आहे.

विनोबांच्या साहित्यात या दर्शनाची मांडणी तीन वेळा येते. पहिली खेप गीता प्रवचनांच्या अनुषंगाने आढळते. दुसऱ्यांदा ती लक्षणे ‘दर्शन’ म्हणून येतात. तिसऱ्यांदा गीताई चिंतनिके (विवरणासह) मध्ये विनोबांनी आपल्या सहकाऱ्यांना ती शिकवली आहेत. तिन्ही वेळा त्यांची मांडणी श्रोत्यांनुसार बदललेली दिसते.

विनोबांचे संपूर्ण चिंतन गीताकेंद्री असल्याने त्यांनी या लक्षणांची चर्चा केली असणार. परंतु इथे तीन ग्रंथांचा विचार करायचा आहे. तत्पूर्वी ज्ञानदेवांनी एका ओवीत सद्बुद्धीचे विशेष सांगितले आहेत ते पाहू.

स्थिरावलेली बुद्धी कशी आहे यावर माउलींचे भाष्य नेमके आणि साम्ययोगाचे सार सांगणारे आहे. या सद्बुद्धीचा पहिला विशेष ‘अनविच्छिन्न समता’ आहे. अनविच्छिन्न म्हणजे अभंग. समत्वाच्या आदर्शात माउली जराही तडजोड करत नाहीत. नुसती अखंड समता सांगून ज्ञानदेव थांबत नाहीत तर या समतेला ते दयाभावाच्या हाती सोपवतात. समता आणि दयाभाव हे बुद्धीचे विशेष कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत. हे सद्बुद्धीचे आणखी महत्त्वाचे लक्षण आहे. सारांश साम्य, दयाभाव आणि स्थिरता असे माउलींनी ‘सद्बुद्धीचे लक्षण’ सांगितले आहे.

नामदेवरायांनी संतांची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वरीशी जुळणारी भाषाच वापरली आहे. देहभावाविषयी उदासीनता, सर्वाप्रति प्रेम, मुखात हरिनाम, विश्व म्हणजेच परमात्मा असे मानून त्याची उपासना करण्याची वृत्ती आदि खुणा सांगितल्या आहेत. स्थितप्रज्ञ-दर्शनही असेच पण नेमके आहे. ज्ञानोबा, नामदेवराय, तुकोबा, गांधीजी, विनोबा असे कुणीही साधु पुरुष समत्व, दयाभाव, विश्वात विश्वंभराचा वास मानून त्याची उपासना आदि गोष्टींची कास धरतात. मूळचा सद्विचार आचरणाने आणि चिंतनाने आणखी पुढे नेतात. विनोबांचे स्थितप्रज्ञ दर्शन या साखळीचाच भाग आहे.

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave vision zws