– अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोबांचे जवळपास संपूर्ण आयुष्य खेडय़ातील जनतेची सेवा करण्यात गेले. भारतीय ग्रामीण जनतेचे सखोल आणि विशाल निरीक्षण केलेला अन्य नेता कदाचितच असेल. अपवाद अर्थातच गांधीजींचा. याचे पडसाद साम्ययोगप्रणीत ग्रामसेवेच्या कार्यक्रमात दिसतात. गाव आणि साम्ययोग यांचा संबंध पाहण्यापूर्वी विनोबांची विकासाची कल्पना, तत्त्व आणि त्यांचे श्रद्धाविश्व आता पाहू.

‘खेडय़ातील जनता ही स्वयंभू महादेवाचे रूप आहे. यापुढे त्या शिवाचे पूजन केले पाहिजे,’ अशा आशयाचे विनोबांचे एक वचन आहे. विनोबांच्या श्रद्धेचे हे नित्यरूप नेहमी दिसते. आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, ‘ग्रामसेवा ही आमची मूर्तिपूजा आहे. आज जेव्हा जनता दारिद्रय़ात आणि दु:खात आहे, अशा काळात मंदिरे उभारावीत हे मनाला पटत नाही. मंदिरे विद्यामंदिराच्या स्वरूपात असावीत. मूर्तिपूजेचे रूप बदलून राहिले आहे. आता मानव समाजाच्या रूपात भगवंताची सेवा करण्याचे युग आले आहे.’

ही भावना एकीकडे तर दुसरीकडे त्यांचे श्रद्धाविश्व शंकराशीही नाते सांगणारे आहे. त्यांनी ‘राम हरि’ या मंत्राचे, आयुष्याच्या अखेपर्यंत स्मरण केले. यात त्यांचा कृष्ण दिसत नाही. रमवणारा राम, आणि उरलेले सर्व हरि हा त्यांनी सांगितलेला त्या मंत्राचा अर्थ आहे. यातील राम-हरि तेवढे त्यांनी निवडले. हरि म्हटले की ‘हरा’चे स्मरण होतेच. सारांश हरीमध्ये त्यांचे तत्त्वज्ञान होते तर हरामध्ये सेवाकार्य.

शिवोपासना ही भावे घराण्याची परंपरा होती. आजोबांचे नावच ‘शंभू’ होते. वाईमधील भावे घराण्याचे शिवमंदिर आजही खूण म्हणून उभे आहे. या मंदिरात विनोबा एक वर्ष राहिले. स्वत:च्या ज्ञानसाधनेचा पाया त्यांनी शिवाच्या सान्निध्यातच घातला. त्याआधी गृहत्याग करून ते श्रीविश्वनाथाच्या नगरीत गेले.

भुकेलेली जनता ही रुद्र रूपात समोर येते याची त्यांना पूर्ण जाणीव होती. हा मेळ साम्ययोगातील ग्रामसेवेच्या कार्यक्रमात दिसतो. समाजात अपरिग्रहाचे तत्त्व असावे ही साम्ययोगाची मुख्य धारणा आहे. त्यामुळे आपोआपच पैशांवरील अवलंबित्व कमी होईल. इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट विनोबांनी सांगितली आहे, ‘अपरिग्रह म्हणजे दारिद्रय़ नव्हे तर क्रमयुक्त संग्रह.’

गावांमधील गरजांचा क्रम असा : (१) उत्तम अन्न, (२) पुरेसा कपडा, (३) चांगली घरे, (४) काम करण्यासाठी अवजारे, (५) ज्ञानाची साधने, (६) संगीतादी मनोरंजनाची साधने.

गांधी, विनोबा म्हणजे आणि तंत्रज्ञानाला आणि एकूणच विकासाला विरोध अशी समाजातील धुरीण म्हणवणाऱ्या मंडळींची कल्पना दिसते. हा विचार म्हणजे दारिद्रय़-पूजा आहे असेही म्हटले जाते. तथापि या गरजा बाजूला ठेवून खरा विकास शक्य आहे का? आज या प्रश्नाची तीव्रता अधिकच जाणवते.

साम्ययोगाची भौतिक विकासाबद्दलची भूमिकाही लक्षात घेतली पाहिजे. आधुनिक विकासाच्या बाबतीत हा विचार अत्यंत लवचीक भूमिका घेतो. ‘यंत्र आणा पण त्यापूर्वी मानवी हातांचा त्यांच्या शक्तीचा पुरेपूर वापर झाला आहे ना हे पाहा’. ‘फक्त दिल्लीत सूर्य उगवला तर गावात उजेड पडला असे कसे म्हणता येईल’ आदी मुद्दे इथे ठळकपणे दिसतात. विकासाचा हा विचार आणखीही जाणायचा आहे.

jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व साम्ययोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samyog biography of acharya vinoba bhave zws
First published on: 20-06-2022 at 00:54 IST