अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

अधिकरण ७ –

सात योगी स्थित-प्रज्ञ थोर आदर्श आमुचा

अर्जुन म्हणाला

स्थिरावला समाधींत स्थित-प्रज्ञ कसा असे

कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा।

गीताई २ – ५४

अर्जुना स्थिति ही ब्राह्मी पावतां न चळे पुन्हां

टिकूनि अंत-काळीं हि ब्रह्म-निर्वाण मेळवी।।

गीताई २ – ७२

गीताईची प्रस्थान त्रयी सांगताना ‘स्थितप्रज्ञ दर्शना’चा उल्लेख झाला होता. आता या दर्शनाची तोंडओळख. गीतेचे सार दुसऱ्या अध्यायात आहे त्यातील अखेरच्या १८ श्लोकांमध्ये एक ‘दर्शन’ आहे. गीतेच्या पोटातील या स्वतंत्र दर्शनाचा परिचय, मराठी माणसांना विनोबांच्यायोगे झाला.

विनोबांनी गीताईच्या प्रसाराइतकाच स्थितप्रज्ञ लक्षणांचा प्रसारही महत्त्वाचा मानला. काही काळापूर्वी आश्रम आणि शाळांमधून ही लक्षणे, नित्याच्या प्रार्थनेचा भाग होती. त्यामुळे ‘गीताई माउली माझी’ प्रमाणेच ‘स्थिरावला समाधीत’ हे शब्दही आपल्या कानांवरून गेलेले असतात. आज हे चित्र सार्वत्रिक नाही. परंतु गीताईच्या सखोल अध्ययनात आणि तिच्या ‘प्रस्थानत्रयी’मध्ये या लक्षणांना महत्त्व आहे.

पारंपरिक प्रस्थान त्रयीमध्ये, ब्रह्मसूत्रे आणि वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमध्ये एकनाथी भागवत, यांना जे स्थान आहे तेच स्थान गीताईच्या प्रस्थान त्रयीत स्थितप्रज्ञ लक्षणांना आहे. नाथांचे भागवत हे वारकऱ्यांसाठी खांबाप्रमाणे भक्कम आणि उंच आहे. तसे साम्ययोगात स्थितप्रज्ञ दर्शन आहे. या दर्शनाच्या मांडणीत सूत्रांची शिस्त आहे आणि शक्य तेवढी सोपी भाषाही आहे.

विनोबांनी १९४४ च्या हिवाळय़ात शिवनी तुरुंगात ही व्याख्याने दिली. १९ श्लोक, १८ व्याख्याने, ४४  खंड आणि २०० परिच्छेद अशी या दर्शनाची रचना आहे. साम्यसूत्रांप्रमाणे त्यांनी या लक्षणांनाही ४४ ‘प्राज्ञसूत्रां’मध्ये गुंफले.

गीताईनंतरची विनोबांची ही आणखी एक शिस्तबद्ध रचना! मूळ तत्त्वज्ञान कायम ठेवून स्वतंत्र भाष्य कसे असते, हे पाहायचे तर विनोबांच्या साहित्यात स्थितप्रज्ञ दर्शनाला क्वचितच पर्याय असेल.

गीतेमध्ये अन्य आदर्श पुरुषांचीही लक्षणे सांगितली आहेत. कर्मयोगी, जीवन्मुक्त, योगारूढ, भगवद्भक्त, गुणातीत, ज्ञाननिष्ठ इ. विविध नावांनी ही अन्य लक्षणे येतात. तीही प्रसिद्ध आहेत. त्यांचेही पठण होते. तथापि ‘स्थितप्रज्ञ’ हा गीतेचा अगदी शब्दनिर्मितीपासूनचा विशेष आहे. खुद्द गीतेत ‘स्थिर-बुद्धी’, ‘स्थिर-मती’ असे शब्द दिसतात. तेही एका अर्थी स्थितप्रज्ञ असू शकतात, तरीही गीतेने स्थितप्रज्ञांना इतरांपासून वेगळे राखले आहे. याचे कारण म्हणजे साधकाच्या दृष्टीने तो अंतिम टप्पा आहे. ‘अर्जुना स्थिति ही ब्राह्मी’ या अर्धचरणात विनोबांच्या ब्रह्मजिज्ञासा ते ब्रह्मविद्या मंदिर असा सहा दशकांचा पैस आहे. या मंदिरातच त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला. या जगाचा निरोप घेतला तोही ब्रह्मविद्या मंदिरातच. त्यांना ‘ब्राह्मिस्थिती’ प्राप्त झाली होती, का हे फक्त देवच सांगू शकतो. गीता प्रवचनांमध्ये या लक्षणांचे विवरण करताना विनोबांनी अशीच भूमिका घेतली आहे आणि श्रद्धापूर्वक एका नावाची निवड केली आहे. स्थितप्रज्ञाची भाषा जाणून घेताना त्या नावासह या दर्शनाचे इतरही पैलू जाणायचे आहेत.