अतुल सुलाखे  

विनोबांनी अनेकदा साम्ययोगाच्या अनुषंगाने संवाद साधला आहे. गांधीजींचे साम्यवादाच्या बाबतीतील चिंतनही मांडले आहे. सर्वोदयी विचारधारेचा हा पैलू फार कमी प्रमाणात पोहोचला आहे. हा विषय आपल्याला पाहायचा आहेच तथापि सध्या भांडवलशाही, लोकशाही, समाजवाद आणि साम्यवाद यांच्या संदर्भात साम्ययोगाचे विशेष पाहू.

साम्ययोग मानवांमध्येच नव्हे तर मानवेतर प्राण्यांप्रतिही समत्व राखतो. मानवेतर सृष्टीमध्ये समत्व भावना राखताना तो प्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारी माणसांवर सोपवतो. माणसांना शिक्षण, साधना आदींच्या जोरावर विकास करून घेणे शक्य असते. प्राण्यांच्या बाबतीत ती शक्यता नाही. पर्यायाने त्यांचे रक्षण करताना त्यांच्यात समत्व पाहणे हे या विचारसरणीत अभिप्रेत आहे.

आत्म्याचे अस्तित्व, त्याचा सर्वाच्या ठायी असणारा समान इतिहास, यांना मान्यता देणे ही अध्यात्माची सर्वोच्च भूमिका आहे. तिला ब्रह्मतत्त्व असेही म्हणतात. हे ब्रह्मतत्त्व किंवा आत्मतत्त्व जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत प्रविष्ट करणे ही साम्ययोगाची भूमिका आहे. एकदा आधार म्हणून आध्यात्मिक विचार ग्रहण केला की तो आचरणात आणणे भाग असते. नैतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय या क्षेत्रांमध्ये साम्ययोग प्रमाण मानून कार्य केले तर त्याचे क्रांतिकारक परिणाम होतात. ही प्रक्रिया नेमकी कशी होते?

वरीलपैकी एखाद्या क्षेत्रात कार्य करणारी साम्ययोगनिष्ठ व्यक्ती आपल्या बुद्धीचे धनी आपण नसून परमेश्वर आहे असे सहजपणे मानेल. बुद्धीच काय पण ती शरीरावरही आपला हक्क सांगणार नाही. या शरीराचे आपण मालक नसून विश्वस्त आहोत ही साम्ययोगाची भूमिका आहे.

गांधीजींचा ‘ट्रस्टीशिप’चा क्रांतिकारी विचार इथे चपखल बसतो. विनोबांनीही गीता प्रवचनांमध्ये या भूमिकेचा पुनरुच्चार आणि विस्तार केला आहे. आपल्या सर्व शक्ती या स्वार्थासाठी नसून समाजाच्या सेवेसाठी आहेत ही साम्ययोगाची नैतिक भूमिका आहे.

ईश्वर भक्ती, व्यापकत्व, समत्व, सेवानिष्ठा आणि मालकीचे समाजहितार्थ विसर्जन हे साम्ययोगाचे पंचकोन आहेत. याला श्रीकृष्णाच्या ‘पांचजन्या’ची अथवा बुद्धाच्या पंचशीलाची उपमा देता येईल. साम्ययोगाच्या तत्त्वाशी नाते सांगणारी अशी उपमा विनोबांनी दिली आहे.

सविवरण गीताई चिंतनिकेच्या पहिल्याच अध्यायात ती आढळते. गीतेचा पहिला अध्याय भाष्यकारांच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. भाष्याचा आरंभ दुसऱ्या अध्यायापासून करायचा. विनोबांना मात्र ही धारणा अमान्य होती. युद्धाच्या आरंभी प्रमुख योद्धे शंख वाजवतात. त्या शंखांची नावेही आढळतात. श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव ‘पांचजन्य’ आहे. याचा विशेष अर्थ विनोबांनी सांगितला आहे. त्यातून त्यांची सर्वोच्च समत्व दृष्टी दिसते.

पांचजन्य म्हणजे ‘पंचजनांसाठी’ ही निरुक्ती आहे. या पंचजनांमध्ये विनोबांना सर्व मानवांचे रूप दिसले. रक्त, श्वेत, पीत, कृष्ण आणि श्याम या वर्णाचे हे पंचजन आहेत. रेड इंडियन, युरोपीय,  मंगोलियन, चिनी, जपानी, आफ्रिकी आणि भारतीय असा पांचजन्यचा विनोबांना दिसलेला अर्थ आहे. आत्मतत्त्व प्रमाण मानणारा साम्ययोगी जगाकडे कशा प्रकारे पाहतो याचे हे चपखल उदाहरण आहे.

jayjagat24 @gmail.com