अतुल सुलाखे – jayjagat24@gmail.com

दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम।

मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रय: ।।

– आद्य शंकराचार्य, विवेकचूडामणी

ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात

साधूचे संगती तरणोपाय

– ज्ञानोबा, हरिपाठ

नलगे मुक्ति धन संपदा

संत संग देई सदा।

– तुकोबा

साधाँ संग बैठ बैठ लोक लाज खोई॥

संत देख दौडिम् आई, जगत देख रोई।

– मीराबाई

‘देशाचे राजकीय स्वातंत्र्य व आध्यात्मिक विकास हे दोन्ही साधू पाहणारा हा पुरुष आहे असे मला वाटले आणि मला हेच हवे होते..’

-विनोबा, ‘गांधी जसे पाहिले जाणले विनोबांनी’मधून.

विनोबा, गांधीजींकडे का आकर्षित झाले, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. या प्रश्नामागे काही तर्क आहेत. विनोबा, १९१६ मध्ये गांधीजींच्या संपर्कात आले. खरे तर काही प्रश्नोत्तरे होऊन हा विषय संपायला हरकत नव्हती. कारण विनोबांचे ध्येय स्पष्ट होते. ‘क्रांती’ऐवजी ‘शांती’ची निवड करून ते काशी क्षेत्री दाखल झाले होते.

अगदी हिमालय नाही तरी काशीमध्येच ते साधना करू शकले असते. मुंज झाल्यापासूनच त्यांनी शास्त्रकारांच्या आज्ञेनुसार जगायला सुरुवात केली होती. चप्पल न घालणे, गादीवर न झोपणे, परान्न वज्र्य आदी. हा जीवनक्रम काशी क्षेत्री आणखी पुढे गेला असता तर ते सयुक्तिक होते. तथापि विनोबांनी तसे केले नाही. बापू, विनोबांसारखे विद्वान नव्हते. आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांची वाटचाल विनोबांच्या एवढी नव्हती. तोवर त्यांना ‘महात्मा’ हे विशेषणही मिळाले नसावे. त्यांची आणि विनोबांची काशीमध्ये भेटही झाली नव्हती. बनारस हिंदू विद्यापीठातील त्यांचे ते प्रसिद्ध भाषण विनोबांनी ऐकले नव्हते. त्याची फक्त बातमी वाचली होती. एवढय़ा विसंगती असताना गांधी-विनोबांची भेट झाली म्हणून आश्चर्य वाटत असेल तर त्यात चुकीचे काही नाही.

तथापि आपली परंपरा नीटपणे ठाऊक असेल तर गांधी-विनोबांचे नाते फार स्वाभाविक वाटते. या दृष्टीने वरील अवतरणे पुरेशी आहेत.

आरंभ अर्थातच आचार्य शंकर यांच्यापासून. ‘विवेक चूडामणी’ या प्रसिद्ध ग्रंथाच्या मंगलाचरणात त्यांनी तीन गोष्टी केवळ देवाच्या कृपेने मिळतात असे म्हटले आहे. ‘ज्या व्यक्तीला ईश्वरप्राप्ती करून घ्यायची आहे तिने ध्यानात ठेवायला हवे की देवाच्या कृपेनेच तीन गोष्टी लाभतात. मनुष्य जन्म, आत्मज्ञानाची ओढ आणि महापुरुषाचा सहवास.’ ही एका असीम तत्त्ववेत्त्याची भूमिका आहे.

माउली हीच गोष्ट लोकभाषेत सांगतात. तिला आधार काय तर स्वानुभव. तुकोबा नि:शंकपणे संतसंगच हवा असा वर देवाकडे मागतात. मीराबाई सारी बंधने सोडून सत्संगाची कास धरतात.

देवापेक्षा देवाचे नाव श्रेष्ठ, मोक्ष मुक्तीहून संतसंग मोठा. हरिदासांचे एकच कूळ आहे आणि ते चिरंतन राहावे अशी ही धारणा आहे. विनोबांनी या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले आहे. अध्यात्माला नेमकी कशाची जोड त्यांना हवी होती हेही त्यातून दिसते.

आचार्य आणि संतगण, वर्तमानाची गरज आणि आत्मज्ञानाची ओढ इतकी अनुकूलता असताना विनोबा गांधीजींकडे गेले नसते तरच नवल होते. विनोबांच्या या निर्णयात साम्ययोगाच्या सामाजिक आणि राजकीय अंगांचे बीज आहे. साम्ययोग कोरडय़ा अध्यात्मावर उभा नाही आणि आत्मज्ञानाला पारखा नाही.