scorecardresearch

साम्ययोग : एका दर्शनाची पृष्ठभूमी

‘साम्यवाद’ आणि ‘साम्यसूत्रे’. यातील साम्यवाद आणि साम्ययोग अशी तुलना करत साम्ययोग कसा अपरिहार्य आहे यावर विनोबांनी लिहिले आहे.

samyayoga darshan vinoba bhave
(प्रातिनिधीक छायाचित्र)

अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

‘साम्ययोग’ हा शब्द समोर आला की आणखी दोन शब्द आठवतात. ‘साम्यवाद’ आणि ‘साम्यसूत्रे’. यातील साम्यवाद आणि साम्ययोग अशी तुलना करत साम्ययोग कसा अपरिहार्य आहे यावर विनोबांनी लिहिले आहे. तसेच १०८ साम्यसूत्रांमधील काहींवर विनोबांची व्याख्यानेही उपलब्ध आहेत.

एखादा विषय जाणायचा तर माहिती, त्यावर पूर्वसूरींची मते, संशोधकाची भूमिका आणि शेवटी निष्कर्ष, या रीतीने एखाद्या प्रश्नाकडे पाहिले जाते. विनोबा तसे करत नाहीत. ते वरील सर्व मुद्दे एका प्रथम सूत्रात सांगतात. उदा. ‘हरिरेव जगत् जगदेव हरि:’ या एका सूत्रात लौकिक आणि आध्यात्मिक या दोन्हींचे नाते स्पष्ट होते.

विनोबांच्या विचारांचा पाया असा शास्त्रीय आहे. त्यांची अभिव्यक्ती मात्र सोपी आहे. आज ही विचारपद्धती काहीशी विस्मृतीत गेली आहे. परंतु साम्ययोगाचे अध्ययन करताना ती माहीत हवी. त्या अनुषंगाने विनोबांचे भारतीय दर्शनांमध्ये नेमके काय योगदान आहे तेही जाणायला हवे.

दर्शन शब्द ऋषींशी जोडलेला आहे. ‘दर्शनात् ऋषि:’ अशी ऋषी शब्दाची व्याख्या आहे. तर ‘मुनी’ म्हणजे मनन करणारा. ऋषींनी तत्त्वांचे दर्शन घ्यावे. त्यांनी किंवा नंतरच्या पिढीने मनन, चिंतन आणि आचरणातून ते दर्शन विकसित करावे ही आपल्या दर्शनांची रीत आहे.

कोणत्याही दर्शनाचे बीज रुजावे म्हणून त्यांचे ग्रथन करणे गरजेचे असते. हे ग्रथन, चिंतन, मननास अनुकूल असावे म्हणून त्यांना सूत्ररूप दिले जाते. अशा सूत्रकारांमध्ये भगवान शंकर हे आद्य नाव आहे. त्यांच्या ‘शिवसूत्रजालांवर’ म्हणजे शिवसूत्रांवर संपूर्ण व्याकरणशास्त्र उभे आहे, अशी मान्यता आहे.

यानंतर भगवान पतंजली, महर्षी व्यास, गौतम, कणाद, कपिल आदी नावे सूत्रकार म्हणून समोर येतात. पाठोपाठ योग, व्याकरण, वैद्यक, न्याय आदी शास्त्रांचे स्मरण होते. या सूत्रांचा आटोपशीर परिचय म्हणजे वृत्ती आणि विस्तार म्हणजे भाष्य.

विनोबांनी या सर्व अंगांनी साम्ययोगाची मांडणी केली आहे. या विचारपद्धतीचा उपयोग करत त्यांनी ख्रिश्चन, इस्लाम आदी धर्माच्या शिकवणुकीचे सारही काढले.

या विचारपद्धतीचे सामान्य माणसाला ओझे होऊ नये म्हणून त्यावर सुलभ भाष्य लिहिले. गीताई, गीता प्रवचने, हे साहित्य याचे उत्तम उदाहरण आहे.

पारंपरिक दर्शनांना विनोबांनी नवे आयामही दिले. त्यांचा साम्ययोग हा संतांना शरण आहे. तो आधुनिक आहे आणि समन्वयाचा विस्तार करणारा आहे.

कोणत्याही भाष्यकारांपेक्षा संत श्रेष्ठ आहेत, हे त्यांचे मत, पुरेसे स्पष्ट आहे. आध्यात्मिक परंपरेला विज्ञानाची जोड असेल तरच खरी धर्मस्थापना होईल, ही त्यांची भूमिका आहे. विनोबांनी या दोन्ही ज्ञानशाखांचा समन्वय साधताना त्यांच्या मर्यादाही सांगितल्या आहेत.

हे तत्त्वज्ञान रोजच्या प्रश्नांना भिडणार नसेल तर ते निर्थक आहे इतकी स्वच्छ भूमिका घेत साम्ययोग उभा आहे. तत्त्वज्ञ, आचरण करणारा, समन्वयक, आधुनिक विचारांना उचित महत्त्व देणारा आणि म्हणून दार्शनिक हे विनोबांचे आणि तत्पूर्वी साम्ययोगाचे रूप आहे. भारतीय दर्शन परंपरा कोणत्याही काळात मार्गदर्शक आहे हे विनोबांनी सिद्ध केले आहे.

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog spiritual acharya vinoba bhave thought zws