– अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

विनोबांच्या प्रत्येक कृतीवर परंपरेची दाट छाया आढळते. शिवाय परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ दिसतो. साम्ययोग आणि त्याचा विस्तार असणारी ‘साम्यसूत्रे’  यांतही ही भूमिका दिसते.

प्राचीन सूत्र वाङ्मयात ‘सांख्य कारिका’, ‘पातंजल योगसूत्रे’ यांना महत्त्वाचे स्थान आहे. पातंजल योगसूत्रे म्हणजे ‘आशियाचा मणिदीप’ आहे, असे विनोबा म्हणत. या दोन सूत्र ग्रंथांपेक्षा वेदान्त दर्शनावर व्यास निर्मित ब्रह्मसूत्रांचा प्रभाव आहे. त्यालाच ‘शारीरक भाष्य’ म्हणतात. त्यांना वेदान्त दर्शन असेही म्हटले जाते. 

विनोबांच्या साम्ययोग दर्शनावर गीतेप्रमाणेच वेद ( ऋग्वेद ), योगसूत्रे, बह्मसूत्रे यांचाही प्रभाव आहे. या ग्रंथांमधील शब्द, क्वचित् शब्दसमूह विनोबांनी थेटपणे वापरल्याचे दिसते. यातून परंपरेचा आधार घेण्याची आणि तिचे ऋण मान्य करण्याची त्यांची वृत्ती दिसते.

‘अभिधेयं परमसाम्यम्। ’ हा साम्यसूत्रांचा आरंभ आहे. हा ‘परम साम्य’ शब्द मुंडकोपनिषदात दिसतो. ‘तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्ज्न: परमं साम्यमुपैति।’ ( जीवात्मा त्या परमपुरुषाला पाहतो तेव्हा तो विद्वान, ज्ञानी मनुष्य होत पुण्य आणि पाप दोन्ही झटकून निर्मल होत ‘परम साम्य’ प्राप्त करतो.)

साम्यसूत्रांवर दिलेल्या प्रवचनात, ‘या सूत्रातील शब्द अनेक ठिकाणांहून घेतलेले आहेत. काही वेदातून, काही गीतेतून, काही ब्रह्मसूत्रातून काही भागवतातून, काही मनुस्मृतीतून, काही संतांच्या ग्रंथातून,’ असे विनोबांनीच म्हटले आहे.

साम्यसूत्रातील प्रमाद: मृत्यु:’ या सूत्रावर धम्मपदातील

‘अप्पमादो अमतपदं

पमादो मच्चुनो पदं।

अप्पमत्ता न मीयन्ति,

ये पमत्ता यथा मता।।

प्रमाद न करणे हे अमृत (निर्वाण) पद आहे आणि प्रमाद मृत्यूचे. प्रमाद न करणारे अमर असतात तर प्रमादी मृतवत् असतात. संस्कृत सूत्राचा, प्रमाद म्हणजे मृत्यू हा अर्थ सहज ध्यानात येतो. गीता प्रवचनांच्या १४ व्या अध्यायात यावर आणखी विवेचन आहे.

ब्रह्मसूत्रांतील ‘फलाध्याय’ नावाच्या चौथ्या अध्यायातील बारावे सूत्र आहे ‘आ प्रयाणात्तत्रापि हि दृष्टम्।’ तर साम्यसूत्रातील चाळिसावे सूत्र ‘आ प्रयाणात्’ असे आहे. दोहोंचा अर्थ एकच आहे. प्रायण म्हणजे प्रयाण. निधन पावणे. आ प्रयाणात् म्हणजे मरेपर्यंत. तोवर काय करावे? तिथवर व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रवासात निराशेला स्थान देऊ नये. यशापयशाचा विचार न करता परमेश्वरावर नितांत श्रद्धा राखावी. उत्कट आशावाद म्हणजे श्रद्धा.

ब्रह्मसूत्रे आणि साम्यसूत्रे या दोहोंची समाप्ती समान आशय असणाऱ्या सूत्रांनी झाली आहे.

साम्यसूत्राची अखेर ‘अहंमुक्ति: शब्दात् अहंमुक्ति: शब्दात्’ अशी आहे. अनावृत्ति: म्हणजे पुनर्जन्म नसणे तर अहंमुक्ति: म्हणजे अहंकारापासून सुटका. सर्वात्मभाव म्हणजेच परम साम्य. विनोबांच्या साम्ययोगाला गीतेचा आधार आहेच तथापि गीतेव्यतिरिक्त प्राचीन दर्शन परंपरेचीही त्यावर छाया आहे. परंपरेचा आदर करत विनोबांनी तिचा विकासही केल्याचे दिसते. विकासाची ही दिशा समन्वय आणि साम्य यांच्यावर आधारित आहे.